घरफिचर्ससंपादकीय : राजकारणातील राणी पडद्याआड!

संपादकीय : राजकारणातील राणी पडद्याआड!

Subscribe

काँग्रेस पक्षाला आणखी एक धक्का म्हणजे ज्येष्ठ काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांचं निधन. वयाच्या ८१ व्या वर्षी दिल्लीत हृदयविकाराने त्यांचं निधन झालं. भल्याभल्यांना जमलं नाही ते शिला दिक्षित यांनी करून दाखवलं. केंद्रिय सत्तेच्या सारीपाटात म्हणजे दिल्लीच्या राजकारणात दीर्घकाळ स्वत:चं महत्त्व टिकवून ठेवणार्‍या काही मोजक्या नेत्यांमध्ये दिक्षित यांचं नाव आवजून घेतलं जातं. एक मुरब्बी आणि सुसंस्कृत राजकारणी म्हणून त्यांची ओळख होती. दिल्लीच्या दरबारी राजकारणात त्यांचे जितकं वजन होतं तितक्याच त्यांची लोकांशी जवळकी होती. स्वत:चा आणि आपल्या पक्षाचं महत्व राखून त्यांनी दिल्ली राज्याचं राजकारण केलं. एका महिला नेत्याला हे सहज जमेल असं नाही. म्हणूनच इंदिरा गांधींनंतर दिल्लीतल्या राजकारणातील महिलांमध्ये शिलाजींचं नाव घेतलं जातं. केवळ महिला म्हणून त्यांनी राजकारणात आपल्याला राखिव काही मिळालं पाहिजे, असा हट्ट कधी धरला नाही. अनेक राज्यांच्या राज्यपाल आणि पुढे केंद्रिय मंत्री आणि तीन टर्म दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द खूपच वाखाणण्याजोगे होती. कारकीर्द करावी तर ती शिलाजींनी. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी घेतलेल्या निर्णयांची सर्वदूर चर्चा होत असे. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी घेतलेल्या निर्णयाने दिल्लीकरांच्या मनात कायम घर करून ठेवलं होतं. लोकप्रियतेत त्या इतक्या उंचींवर होत्या की आजचा भाजप तेव्हाही दिल्लीत जोरात होता. तरीही शिला दिक्षित यांनी त्या पक्षाला डोकं वर करू दिलं नाही. दिल्लीचा विकास आणि विकासाची मात्रा ही शिलाजींची देण आहे, असं दिल्लीकर आजही मान्य करतात. चांदनी चौकसारख्या भागात मेट्रोचं जाळं निर्माण करणं ही गोष्टी भाजपने तेव्हा हस्यास्पद ठरवून टाकली होती. हा विषय घेऊन त्या पक्षाचे नेते मुख्यमंत्र्यांची टर उडवत. पण त्यांना जराही किंमत तेव्हा शिलाजींनी दिली नाही. उलट इथल्या मेट्रोने दिल्लीकरांनाही तोंडात बोटं घालायला लावली. जेव्हा हा प्रकल्प पूर्ण झाला तेव्हा टीका करणारे भले भल्यांना पळ काढावा लागला होता. दिल्लीत मेट्रो रेल्वेचे जाळे विस्तारण्यात त्यांचे मुख्य योगदान आहे. लोकांच्या नेमक्या समस्या जाणून घेऊन त्यावर प्रभावी उपाययोजना त्यांनी त्या काळात केल्याने त्यांच्या नेतृत्वाला लोकप्रियतेचे वलय लाभले होते. दिल्लीच्या मेट्रो प्रकल्पाची मुहूर्तमेढ ही लोकांच्या मागणीची उत्तम सांगड घातल्याने रोवली गेली.
त्यांच्यातील राजकीय आणि सामाजिक कामाची जिद्द दाद देण्याजोगीच होती. देशात भाजपचं वारं वाहू लागल्यावर अनेक आयाराम हे भाजपवासी झाले. संकटात पक्षाला मागे टाकणार्‍यांची कमी नसते. संधी साधून फायदा ओरबाडणारे संकटात मागे नसतात. अशा असंख्य फुकट्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने काँगे्रस संक्रमणावस्थेत होती. संकट निर्माण झालं होतं. अशा कठीण परिस्थिती शिला दिक्षित ठामपणे काँग्रेसचा किल्ला लढवत राहिल्या. वृद्धापकाळाकडे झुकलेल्या शीला दीक्षित यांना काँग्रेसने उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून प्रॉजेक्ट करून त्यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशची निवडणूक लढवण्याचा एक मोठा डाव खेळला होता. पण तो अर्ध्यावरच सोडून द्यावा लागला होता. समाजवादी पक्षाशी आघाडी केल्यामुळे शीला दीक्षितांना तिथलं नेतृत्व सोडावं लागलं. आयुष्याच्या उतारवयात त्यांच्यावर ही उत्तर प्रदेशच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती त्यांनीही त्यात हिरीरीने पुढाकार घेऊन गलितगात्र झालेल्या काँग्रेसला त्या राज्यात उभारी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. काही काळ त्यांनी केरळच्या राज्यपाल पदाची जबाबदारीही स्वीकारली. शिला दिक्षित या मुळच्या पंजाबी. तरी त्यांची राजकीय कारकीर्द ही पंजाबबाहेरच दिल्लीत घडली. काँग्रेस नेते उमाशंकर दिक्षित यांचे चिरंजीव विनोद यांच्याशी शिलांचा विवाह झाल्यावर त्या उत्तरप्रदेशवासी झाल्या. पण नाळ दिल्लीतच रुजली, वाढली आणि अंत पावली. सासर हे उत्तरप्रदेशचं असल्याचा फायदा पक्षाला घेता येईल, असं पक्ष नेत्यांना वाटलं यातूनच त्यांना उत्तरप्रदेशाची जबाबदारी देण्याचा प्रयत्न झाला. उत्तरप्रदेशच्या भावी मुख्यमंत्री म्हणूनही पक्षनेते त्यांना उच्चारीत. पण समाजवादी पक्षाबरोबरच्या युतीने हे सगळं समीकरण निकामी ठरलं. राजकारणात त्यांची कारकीर्द सुरू झाली ती १९८०च्या दशकात. १९८४मध्ये त्यांना उत्तरप्रदेशच्या कनौजमधून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत त्या भरघोस मतांनी विजयी झाल्या. खासदार म्हणून त्यांचं नाव कनौजमध्ये रोवलं गेलं. पण पुढे त्यांचा काळ टिकू शकला नाही. हे एक अपयश वगळता पुढे त्यांनी कधी मागे पाहिलं नाही.
दिल्लीच्या राजकारणात त्यांनी काँग्रेसला चांगले दिवस दिले. ज्या गतीने त्यांनी दिल्लीची सेवा केली. त्याच गतीने दिल्लीने त्यांना मागे सारलं. भाजपने बोलबाला केलेल्या केंद्रातील असंख्य घोटाळ्यांचा परिणाम पुढे शिलजींना सोसावा लागला. या घोटाळ्यांमध्ये फारसा दम नव्हता, हे नंतर उघड झालं. पण तोवर आम आदमी पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी करीत राजकारणातला नवीन प्रयोग सुरू केला. अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस आणि भाजपला समदुरीवर ठेवत मतदारांना आपलंसं करण्याची पध्दतशीर आखणी केली. केजरीवाल यांचा अण्णांच्या आंदोलनातील सहभाग हा त्यांना अधिक फायद्याचा ठरला आणि हळूहळू शिला दिक्षित या राजकारणात मागे पडल्या. केजरीवालांच्या कार्यपध्दतीचा शिला दिक्षित यांना अंदाज घेता आला नाही. अखेर केजरीवालांनीच त्यांना विधानसभा निवडणुकीत मोठ्या मतांनी पराभूत करून दिल्लीत चमत्कार घडवला. त्यातून दिल्लीतील काँग्रेसचा पायाच उखडला गेला. पराभवानंतरही शीलाजींचे दिल्लीतील राजकीय वलय कायम होते. पण काँग्रेसने अजय माकन यांच्याकडे दिल्ली प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे सोपवल्यानंतर शिलाजींनी स्वत:ला मागे सारलं. माकन आणि शिला यांच्यात द्वंद्व होतं. असं असताना एका माजी मुख्यमंत्र्यांपुढे माकन यांनाच प्रदेशाध्यक्ष बनवणं, हे दिक्षित यांना रुचलं नाही. याचे परिणाम नंतरच्या निवडणुकीत झाले आणि काँग्रेसला सपाटून मार बसला. सच्च्या कार्यकर्त्याला विश्वासात न घेण्याच्या काँग्रेसच्या खेळीचा फटता त्या पक्षाला कसा बसला, याचं हे उत्तम उदाहरण म्हणता येईल. राजकारणापासून दूर राहिल्याचा फटका शिलाजींना बसला आणि नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत त्यांना पराभव चाखावा लागला. शेवटची लोकसभा निवडणूक लढवली तेव्हा शिला या ऐंशींच्या पल्याड होत्या. गांधी परिवाराशी जवळीक ही शिला दिक्षित यांची सर्वात मोठी जमेची बाजू असताना त्यांना दिल्लीच्या राजकारणापासून दूर करण्याचं कारण आजही पडद्याआड आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भ्रष्टाचार हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीला लागलेला एक बट्टा होता. त्यातून झालेल्या आरोपांमुळे त्यांची प्रतिमा झाकोळली गेली. त्या आरोपांचा प्रभावी मुकाबला करणे त्यांना सहज शक्य होते. पण ते झाले नाही. या भ्रष्ट्राचाराला आळा घालणेही त्यांना जमले नाही. एका प्रकरणात तर थेट त्यांच्यावरच आरोप लावला गेला. हे सगळे आरोप कपोलकल्पित होते हे नंतर स्पष्ट झालं. पण तोवर पुलावरून पाणी निघून गेलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -