घरफिचर्सआता काय करायचं मुंबईकरांनी?

आता काय करायचं मुंबईकरांनी?

Subscribe

ये शहर अब शहर नहीं यारों,
और मेरा घर भी घर नहीं यारों;
कवी गौरव बंसल यांची ही कविता आता प्रत्येक मुंबईकरासाठी लागू पडतेय. कदाचित भारतातील प्रत्येक शहराला देखील ही कविता लागू पडेल. मुंबईत कधी झोपडीवर भिंत-दरड कोसळते, उभी असलेली इमारत क्षणार्धात जमीनदोस्त होते. घरातून बाहेर पडलात तर बस, रेल्वे, फलाट, फुटपाथ, रस्ता, पूल अगदी कुठेही मृत्यू दबा धरून बसलेला असतो. कुणावर कधी काय संकट येईल, हे स्वतः यमराजही सांगू शकत नाही. काल-परवा मुंबई पुन्हा एकदा बुडाली. पुन्हा एकदा मिठी नदीवरील अतिक्रमण, नाल्यांची साफसफाई, अनधिकृत बांधकाम, महापालिकेचा भ्रष्टाचार या विषयांना माध्यमं तडका देतात. लोकही पाणी ओसरेपर्यंत त्यावर तावातावाने बोलतात. मात्र पाणी उतरण्याचा अवकाश की म्हणजे समुद्राला ओहोटी लागली की लगेच सर्व आपापल्या कामाला लागतात. कदाचित महापालिका किंवा नगर विकास सारख्या यंत्रणा अशाच ओहोटीची वाट पाहतात. या यंत्रणा निर्ढावण्यामागे लोकांची आपल्या शहराबाबतची असलेली उदासीनता कारणीभूत असू शकते. पण यंदाचा पावसाळा काही नवे प्रश्न घेऊन आलाय. पूर्वी मिलन सबवे, हिंदमाता परिसर पावसाळ्यात हमखास तुंबायचा. मात्र यंदा कधीही पाण्याखाली न गेलेला भागही पाण्यात जातोय. अशा परिस्थितीत मुंबईकरांनी काय करायचं? हा प्रश्न उपस्थित होतो.
परवाच्या पावसातील एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. नवी मुंबईतल्या ऐरोली येथे पुलाखाली साचलेल्या पाण्यात एक जॅग्वॉर गाडी अडकून पडते. त्याचवेळी मागून येणारी महिंद्रा बोलेरो गाडी त्या पाण्यातून सहज निघून जाते. काही लाखांची गाडी कोट्यवधीच्या गाडीला कशी मागे टाकते, यावर सोशल मीडियावर मजेशीर प्रतिक्रिया टाकल्या जात आहेत. हा गमतीशीर विषय आपल्या यंत्रणांनाही लागू पडतोय का? बघा ना ब्रिटिशांनी मुंबईसारख्या शहराला आकार दिला. सुबक इमारती, इमारतीबाहेर भला मोठा फुटपाथ, त्यापुढे रस्ता आणि रस्त्याच्या दुतर्फा उंच उंच झाडं. हे चित्र तुम्हाला दक्षिण मुंबईत (ब्रिटिशांची मुंबई) अनेक ठिकाणी दिसतं. आता देश स्वतंत्र झाला, शहरांचा विस्तार झालाय. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प एका छोट्या राज्याएवढा झालाय. मात्र त्याला ब्रिटिशांसारख्या शहर नियोजनाची सर आलेली नाही. मुंबई महापालिका रस्ते, नाले आणि पायाभूत सोयी-सुविधांसाठी हरसाल हजारो कोटींचा खर्च करते. मात्र हे पैसे कुठे जातात? हा प्रश्न देखील मुंबईकरांना नेहमी सतावतो.
यावर्षीचा पावसाळा फक्त मुंबईसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला धडा शिकवणारा ठरला आहे. सांगली, कोल्हापूरसारख्या जिल्ह्यात नदीपात्रात केलेल्या अतिक्रमणामुळे पूर आला. पालघर, कोकणातही अनेक गावांमध्ये पुराचे थैमान पाहायला मिळाले. तर मराठवाडा अजूनही दुष्काळात आहे. सरकार नावाची यंत्रणा कुंभकर्ण असते, हे यंदाच्या पावसाळ्यात दिसून आले. मग सांगली-कोल्हापूर असो किंवा मुंबई. ग्रामीण आणि शहरी भागाची गत एकच. रामाच्या नावाने गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेवर आलेल्या सरकारने जनतेलाही रामभरोसे सोडलंय. असं म्हणतात मुंबई कधीही थांबत नाही. मुंबईचं स्पिरिटच वेगळं. मात्र पावसासमोर यंत्रणेचा पीआर काही चालला नाही. त्याने मुंबईला नुसतेच थांबवले नाही, तर बुडवून दाखवले सुद्धा. काही झालं तरी आपण कामावर पोहोचणारच… हा स्पिरिट किंवा माज मुंबईकरांना होता. तो देखील पावसाने चांगलाच उतरवलेला दिसला. पण पोटा-पाण्यासाठी घडाळ्याच्या काट्यावर धावणार्‍या मुंबईकरांना याचं कोणतंही सोयरसुतक नाही. ते असतं तर आज मुंबई महापालिकेत २५ वर्षे एकच पक्ष सत्तेवर राहिला नसता. स्वप्ननगरी म्हणून आजवर ज्या शहराने जगभरात आपला डंका पिटला. त्या स्वप्ननगरीत आता अनेकांची स्वप्ने वाहून जाताहेत. अगदी पक्ष प्रमुखांच्या ‘मातोश्री’समोर तळं साचूनही पक्षाच्या नेत्यांना काही वाटत नसेल, तर अजब. अगदी पाच किलोमीटरच्या अंतरात अरबी समुद्राची किनार असताना शहरातलं पाणी बाहेर पडत नाही, असं होणं नाही. तसं असतं तर राज्याचा ५७० किलोमीटरच्या समुद्रालगतची सगळी गावं पाण्यात गेली असती. पण या गावांनी अरबी समुद्राला त्याचा अधिकार दिला. यामुळेच गावकर्‍यांनी दिलेलं दान समुद्राने मुकाट गिळलं. मुंबईकरांनी म्हणजे या शहराने समुद्राला जितकं म्हणून पिचता येईल तितकं पिचलं. अजस्त्र असूनही त्यालाच मर्यादा घालण्याचा प्रयत्न शहरातल्या यंत्रणेने केला. आता तर कुलाब्यात आणखी एका मोठ्या पार्कची आखणी यंत्रणेने करू घातली आहे. हा म्हणजे निसर्गावर जाणीवपूर्वक केलेला कोप म्हणता येईल.
मुंबई शहराला सबर्ब म्हटलं जातं. म्हणजे समुद्राच्या भरतीचं पाणी या शहरात घुसू शकतं, अशी या शहराची रचना आहे. हे पाणी शहरात येऊ नये, म्हणून ब्रिटिशांनी पध्दतशीर बंदस्ती करून ठेवली आहे. पण समुद्राची हद्दच ताब्यात घ्यायला निघालेल्या यंत्रणेला आणि यंत्रणा चालवणार्‍यांना याची अक्कल नाही. ती असती तर समुद्राला त्याचा अधिकार दिला असता. उलट याच मुंबईच्या यंत्रणेमुळे आणि सिडकोसारख्या महामंडळांमुळे सुरक्षित असलेली गावं पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली आहे. अपरिमित अशी मातीची भरणी करून यंत्रणेने सागराचा घात केल्यावर तो त्याचा बदला घेणारच. आज मुंबईतील अवस्था हा याचाच भाग झालाय. पूर्वी समुद्राला साडेचार मीटर इतक्या क्षमतेची भरती असल्यासच शहरातील पाण्याच्या निचर्‍याची अडचण यायची. आज तीन मीटरपासूनच सांडपाण्याच्या निचर्‍याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळेच थोडा अधिकचा पाऊस झाला की मुंबईची तुंबई होते. यातच मिठीसारख्या नद्यांकडे पाहण्याचा राजकारण्यांचा हेतू हा प्रामाणिक असता तर या नदीने पुराची पातळी राखली असती. सुमारे साडेतीन मीटरची धोक्याची पातळी आज २.८ मीटर इतक्या अंतरावर आली आहे. याचा अर्थ या नदीतून वाहून जाणार्‍या पाण्याची क्षमता आखूड बनली हे उघड आहे. हे म्हणजे ओढावून घेतलेलं दुखणं होय. माणसाचं जीवन हे निसर्गाच्या समतोलावर अवलंबून आहे. निसर्गापुढेच अडचणी निर्माण केल्या तर त्याचं उट्ट निघणं हा निसर्ग नियम आहे. या नियमाला आपण मुंबईकर पारखे झालोत, हेच बुधवारच्या पावसाने दाखवून दिलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -