घरफिचर्समराठ्यांचे राजपद खालसा...?

मराठ्यांचे राजपद खालसा…?

Subscribe

कमळ हातात धरल्यावर छत्रपतींची तलवार खाली ठेवण्याची वेळ सातारचे उदयनराजे भोसले यांच्यावर यायला नको, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मराठा राजकारण हे समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वर्षे सत्ताकेंद्री राहिले आहे. त्यामुळे उदयनराजे भोसले यांच्या राजकारणाला बारामतीचा पाठिंबा कायमच मिळत आला. मात्र, भाजपचा मार्ग स्वीकारल्यावर राजे यांनी जी काही कारणे यामागे दिली आहेत, ती पुरेशी पटण्यासारखी नाहीत. राष्ट्रवादीत असताना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना आपण नेलेल्या विकासकामांच्या फाईल्स पुढे सरकत नव्हत्या, त्या डस्ट बीनमध्ये जायच्या, असा आरोप राजांनी केला आहे. मात्र, जर या फाईली ‘त्यावेळी’ पुढे सरकत नव्हत्या त्यावेळी या न सरकणार्‍या फायलींबाबत आपण सत्ताधारी पक्ष नेतृत्वाकडे आपली नाराजी व्यक्त केली नव्हती का? जर केली नसेल तर का केली नाही? विधानसभेची आचारसंहिता लागण्याची वेळ जवळ आली असताना या फाईलींचे महत्त्व कमळ हाती धरल्यावरच लक्षात आले आहे काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात उदयनराजेंची आपली एक स्टाईल आहे. कोणी कितीही मोठा नेता त्यांच्यासमवेत असला तरी त्यांची कॉलर इतरांच्या तुलनेत कायमच ताठ राहिलेली आहे. भाजपमध्ये सहभागी झाल्यावर नागपुरातील काळी टोपी आणि लाठीकाठीपुढे साताराची ही ताठ कॉलर आणि महाराजांची तलवार म्यान होता कामा नये? राष्ट्रवादीत उरलेले ‘रोखठोक प्रवक्ते’ जितेंद्र आव्हाड यांनी सांगितल्याप्रमाणे राजांच्या बालिश वर्तनाला शरद पवारांनी अनेकदा पाठीशी घातले होते, ते किंबहुना त्यांच्याकडील राजेशाहीमुळेच. अन्यथा व्यक्तीगत इतके महत्व उदयन राजेंना कशासाठी आले असते? राजकारणापलीकडील असे प्रेम आणि मान राजांना भाजपमध्ये मिळेल का? हा प्रश्न आहे? दुसरीकडे राजांची सातार्‍यातील प्रतिष्ठा त्यांचं वजन त्यांची ‘उडणारी कॉलर’ भाजपमध्ये तशीच राहील का? अशीही शंका उपस्थित केली जात आहे. भाजपमध्ये प्रवेशासाठी सध्या मोठी रांग लागली आहे. राष्ट्रवादीतील मासे गळाला? हा वर्तमानपत्राचा मथळा कमी पडेल असे जाळे भाजपकडून टाकले गेले आहे. त्यात अनेक मासे अडकले आहेत किंवा अडकण्यासाठी इच्छुक आहेत. ईडी किंवा सीबीआय नावाच्या कोळ्यांकडून आपण मारले जाणार नाही? याची खात्री मिळवणारे यातील अनेक मासे असल्याची शक्यता राजकीय अभ्यासकांमध्ये आणि विरोधकांमध्ये आहे. मात्र, असे अभय मिळवणार्‍या अशा माशांमध्ये छत्रपतींच्या वाघाला सामील होण्याची गरज का भासावी? असा प्रश्नही निर्माण होत आहे. ज्या माशांनी असे अभय मिळवले आहे, त्यांना फिशटँकमध्ये शोभेचे बनवून ठेवले जाण्याचीच शक्यता जास्त आहे. छत्रपतींच्या खर्‍याखुर्‍या वाघाचा असा शोभेचा मासा होता कामा नये. भाजपमध्ये खोर्‍याने ओढता येतील असे अनेक नेते राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून दाखल झाले आहेत. त्यापैकीच राजे एक…असा संदेश सातार किंवा महाराष्ट्रातील जनतेपर्यंत जाणीवपूर्वक नेला जाऊ शकतो. हर्षवर्धन पाटील (काँग्रेस), राधाकृष्ण विखे-पाटील (काँग्रेस), राणाजगजीतसिंह पाटील (राष्ट्रवादी), छत्रपती संभाजीराजे (राष्ट्रवादी) आणि स्वतः उदयनराजे यांचे बंधू शिवेंद्रराजे यांनीही भाजपचे कमळ हाती धरले आहे. भाजपने मराठ्यांचे हे राजकीय पानिपत केले नसून मराठ्यांचा ऐतिहासिक विजयच ताब्यात घेतल्याचे चित्र आहे. मराठ्यांच्या देदीप्यमान इतिहासाचे आजचे राजकीय शिलेदार म्हणून शरद पवार यांचे नाव ‘जाणता राजा’ म्हणून राजकीय क्षेत्रात घेतले जात होते. मात्र, जाणता राजा किंवा महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवछत्रपतींच्या वंशजांनी विधानसभेच्या तोंडावर भाजपमध्ये सहभागी होणे ही मराठा राजकारणासाठी धोक्याची घंटा ठरण्याचीच शक्यता अधिक. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावल्यावर त्याचे राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाईलच. मात्र, त्याआधी मराठ्यांचे लाखोंच्या निघालेल्या मोर्चाचा निर्माण झालेला सामाजिक दबाव विसरता येणार नाही. मराठ्यांचे ऐतिहासिक सत्ताकेंद्रच ताब्यात घेऊन मराठ्यांच्या पर्यायाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला शह देण्याचा हा केवळ राजकीय प्रयत्न एवढाच त्याचा अर्थ नाही. विरोधकांना नामोहरम करताना त्यांना आपल्यात सामील करून विरोधकच नाहीसे करण्याचा हा मार्ग लोकशाहीसाठी धोक्याचा आहे. निवडणुकांआधी आयाराम-गयारामांची बंडखोरी हा नवा विषय नाही. मात्र, शरद पवारांसारख्या राज्यातील सर्वाधिक मोठ्या आणि अनुभवी नेत्यावर आलेली किंवा जाणीवपूर्वक आणलेली वेळ ही लोकशाही निश्चितच नाही. विकासाचे मुद्दे, राजकीय धोरणांतून केलेला विरोध लोकशाहीचा पाया असतो, सभागृहात तेच अपेक्षितअसते, तसेच सभागृहाबाहेरही अशा मुद्यांवर विरोध करण्याऐवजी किंवा आपले धोरण पटवून देण्याऐवजी विरोधकांवरच सत्ताधार्‍यांचे लेबल लावण्याचा हा प्रकार लोकशाहीसाठी घातक आहे. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीत असताना मोदी आणि राज्याच्या नेतृत्व आणि सत्तेवरही टीका केली होती. ही टीका मुद्यांना धरून होती, तर पक्ष बदलल्यावर त्या मुद्यांचे काय झाले? हा प्रश्न सातारची जनता ज्यावेळी राजांना विचारेल, त्यावेळी या प्रश्नाचे उत्तर राजकीय नैतिकतेने देणे राजांचा राजधर्म असेल, इतर नेतेमंडळी जशी साळसूद भूमिका घेऊन आपले म्हणणे जनतेच्या गळी उतरवतात, अशी अपेक्षा छत्रपतींचे वंशज असलेल्या उदयनराजेंकडून रयतेला निश्चितच नसेल. छत्रपती शिवाजी महाराज नावाचा दैदिप्यमान इतिहास उदयन राजे या नावाशी जोडला गेला आहे. सत्ता आणि आकड्यांच्या खेळातील आजच्या आयाराम-गयारामांच्या राजकारणामुळे लोकशाहीची नैतिकता पुरती बासनात गुंडाळून ठेवली आहे. धर्म, जात, गटवाद केंद्रस्थानी ठेवून आज लोकशाहीची गणिते मांडली जात आहेत. इथे रयतेचा विकास आणि तत्व, निष्ठा हे शब्द मागे पडून केवळ सत्तास्थापन हेच उदीष्ट ठेवले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेत खर्‍या अर्थाने ‘रयतेची लोकशाही’ निर्माण केली. आजच्या बिघडलेल्या राजकीय संकल्पांमध्ये न अडकता उदयनराजे यांनी छत्रपतींच्या अशा लोकशाहीआड येणार्‍यांना वठणीवर आणण्याची अपेक्षा लोकशाहीतल्या रयतेची आहे. त्यात स्वकीय किंवा परकीय असा भेद राजेंकडून अपेक्षित नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -