घरफिचर्सखरीप गेलाच; रब्बीही संकटात

खरीप गेलाच; रब्बीही संकटात

Subscribe

‘सत्तावीसातून नऊ गेले, उरले किती?’ असा प्रश्न अकबराला पडला. अकबराची शंका दूर करत बिरबल उत्तरला, ‘शून्य!’ आता बिरबलाच्या या आकडेमोडीवर लगेच मान डोलवावी इतके काही अकबराचे गणित कच्चे नसावे. म्हणून लगेचच त्याचा प्रतिप्रश्न आला, ‘कसे काय?’ संपूर्ण वर्षातल्या १६ पैकी मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त ही नऊ नक्षत्रे पाऊस देणारी. धरती भिजवणारी. जलाशय तुडुंब करणारी. नद्या-ओहोळांना खळाळते करणारी. त्यामुळे हे नऊ नक्षत्र हातून गेले की उरते शून्य, पण यंदा शून्याचाच अन्वयार्थ नऊ नक्षत्रांव्यतिरिक्त झालेल्या पावसाने बदलून टाकला आहे. चित्रा आणि स्वाती नक्षत्रातही तो धो-धो बरसतोय. त्यामुळे भूतो न भविष्यती इतके नुकसान या अवकाळीने झाले आहे. त्यामुळे सांप्रतकाळात जर अकबर असता आणि त्याने विचारले असते की, नऊमध्ये दोन मिळवले तर किती? तर बिरबलाने याचेही उत्तर शून्य असेच दिले असते. कारण, या नऊ नक्षत्रांव्यतिरिक्त कोसळणार्‍या अवकाळीने राज्यभरातील शेती शून्य करून सोडलीय. खरेतर परतीच्या पावसाने बळीराजा सुखावतो. या पावसात त्याची रब्बीची तयारी होऊन जाते, पण परतीचा पाऊस सप्टेंबर अखेरपर्यंतच. त्यानंतरचा पाऊस म्हणजे नुकसान करणारा, बळीराजाची लख्तरं काढणारा. या अवकाळीने खरीप तर संपवून टाकलाच, शिवाय रब्बीलाही त्यामुळे तडा गेलाय. खरीप हंगामातील पिके काढून शेतकरी रब्बीत गहू, हरभरा, मका इ. पिकांची पेरणी करतो. मात्र, यंदा अतिपावसामुळे सध्या तरी पेरणीयोग्य चित्र नाही. कोकणातही भातशेती धोक्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे खरीप पिकांसह कांदा, भाजीपाला व फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यातच उन्हाळ कांद्याच्या लागवडीसाठी टाकलेल्या रोपांनाही अवकाळीचा फटका बसला आहे. कांद्याची लागवड करण्यासाठी शेतीची मशागत करता येत नसल्यामुळे कांद्याचे रोपही वाया जात आहे. यामुळे यंदा रब्बी व उन्हाळ कांद्याच्या लागवडीवर परिणाम होऊन कांद्याचे दर फेब्रुवारीपर्यंत तेजीत राहतील असं चित्र दिसतंय. दरवर्षी जुलै महिन्यात पोळ कांद्याची लागवड होऊन साधारण सप्टेंबरअखेर वा ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत हा कांदा बाजारात येत असतो. मागील वर्षाच्या दुष्काळामुळे यंदा जून महिन्यात रोपे तयार करताच आलेली नाही. त्यातच सलग चाललेल्या पावसानेे कांदे लागवडीला वेळच न मिळाल्याने खरीप कांद्याची लागवड गत वर्षाच्या तुलनेत निम्म्याने घटली आहे. परिणामी यंदा चाळीत साठवलेल्या उन्हाळ कांद्याला विक्रमी दर मिळाले. यामुळे शेतकर्‍यांनी रब्बी व आगाऊ उन्हाळ कांद्याची लागवड करण्यासाठी सप्टेंबर महिन्यातच रोपे तयार करण्यास सुरुवात केली. मात्र, ऑक्टोबरच्या तिसर्‍या आठवड्यापासून सुरू झालेला अवकाळी पाऊस रोजच कोसळतो आहे. परिणामी लागवडीसाठी तयार रोपे सडण्यास सुरुवात झाली आहे. कांदा लागवडीसाठी शेतीची मशागत करणेही शक्य होत नाही. परिणामी शेतकरी मेटाकुटीस आला आहे. एकीकडे लागवड केलेला खरीप कांदा काढणीच्या अवस्थेत आल्यानंतर तो सडण्यास प्रारंभ झाला, तर दुसरीकडे रब्बी व उन्हाळ कांद्याची लागवड करणे शक्य होत नाही. यामुळे खरीप हातातून गेल्यानंतर खचलेल्या बळीराजासमोर रब्बीच्या आशाही धूसर दिसू लागल्या आहेत. खरिपाची कापणी झाल्यानंतर शेतकरी त्यात गहू, हरभरा ही रब्बीची पिके घेतो. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात मशागत करून नोव्हेंबरमध्ये रब्बीची पेरणी सुरू होते. यावर्षी तर नोव्हेंबरमध्येही पाऊस थांबण्याची कुठलीही चिन्हे नाहीत. हवामान विभागाने १५ नोव्हेंबरपर्यंत पाऊस सुरूच राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे अद्याप खरिपाच्या काढणीलाच सुरुवात झाली नाही, तेव्हा मशागत कधी होणार व पेरणी कधी होणार याची शेतकर्‍यांना चिंता लागली आहे. रब्बीसाठी तयार करून ठेवलेल्या रानात पावसामुळे तण वाढले आहे. त्यामुळे वाफसा मिळाल्यानंतर मशागतीचे काम पुन्हा सुरुवातीपासून करावे लागणार असल्याने खर्च वाढणार आहे. त्यातच जादा पावसामुळे बर्‍याच प्रकारचे तण आणि कीड यांनी डोके वर काढले आहे. जादा पावसानंतर उगवणार्‍या वनस्पती शेतात उगवल्या आहेत. त्यासोबतच काळ्या, लाल गोगलगाईसह अन्य किटकही या वेळी आल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे रब्बी पिकांना या किडीच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. मशागतीच्या कामाला मजूर मिळत नसल्याने तणनाशक वापरण्याकडे शेतकर्‍यांचा कल असतो. त्याच्या किमतीसोबतच त्याच्यापासून होणार्‍या धोक्यांचाही शेतकर्‍यांना सामना करावा लागणार आहे, तर शेतीमालाच्या टंचाईची शेतकर्‍यांसह अन्य नागरिकांनाही झळ बसणार आहे. भाज्या आणि फळांचा भाव आतापासूनच वाढण्यास सुरुवात झाली आहे. सध्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर वाफसा पाहून शेतकर्‍यांना ही पिके काढून पुढील पिकांसाठी शेत तयार करावे लागणार आहे. सरकारकडून मिळणारी नुकसानभरपाई किती आणि केव्हा मिळते यावर ही कामे अवलंबून असणार आहेत. शिवाय हवामानाचीही अद्याप खात्री देता येत नाही. त्यामुळे रब्बी हंगामावरही टांगती तलवार कायम आहे. महत्त्वाचे म्हणजे देशापुढे अगोदरच अन्नधान्याच्या उत्पादनवाढीचे आव्हान उभे असताना अवकाळीने नव्या समस्येची भर पडली. याचा परिणाम म्हणून यावर्षी शेतीचे उत्पादन घटणार हे उघड आहे. महाराष्ट्राबरोबर गुजरातसह अन्य काही राज्यांमध्येही अवकाळीचा फटका बसला आहे. त्यामुळे यंदा परदेशातून अधिक प्रमाणात अन्नधान्य आयात करावे लागेल असे दिसते. मुळात परदेशातून आयात केल्या जाणार्‍या अन्नधान्याबाबत अनेक तक्रारी असतात. एक तर हे अन्नधान्य अत्यंत चढ्या दराने आयात केले जाते. त्याची आपल्याकडील बाजारपेठेतील किंमत अधिक असते. असे अन्नधान्य खरेदी करणे गोरगरिबांच्याच नव्हे तर सामान्यांच्याही आवाक्यापलीकडचे ठरते. या पार्श्वभूमीवर वारंवार परदेशातून अन्नधान्य आयात करायची वेळ आल्यास गोरगरिबांनी खायचे काय, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे यंदा अन्नधान्याच्या बाबतीत सरकारला अतिशय विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील.आजही शेतात गुडघाभर पाणी साचलेले आहे. या पाण्याचा उपसा वीजपंपाद्वारे होऊ शकतो, पण त्यासाठी ग्रामीण भागातील वीज पुरवठा काही दिवस खंडीत न करण्याचा निर्णय शासनाने घेणे क्रमप्राप्त होते. शिवाय रब्बी पिकांच्या बियाणांच्या किमती आटोक्यात राहतील यासाठीही जाणीवपूर्वक प्रयत्न व्हावेत. अवकाळीने बळीराजा पुरता पिचला असल्याने आता बँकांनी किमान रब्बी हंगाम संपेपर्यंत तरी कर्जवसुलीचा तगादा लावू नये. अनेक ठिकाणी छोटे बंधारे कोलमडून पडले आहेत. त्यामुळे त्यातून जलधारा अजूनही शेतांमध्ये वाहत आहेत. हे पाणी वाहून गेले तर पुढचा काळ अतिशय भयावह ठरू शकतो. त्यामुळे या बंधार्‍यांची युद्धपातळीवर दुरुस्ती होणे आवश्यक आहे. सत्ताकारणात मश्गुल राज्यकर्त्यांनी बळीराजाच्या वेदनांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्यातून त्याला मोठा दिलासा मिळू शकतो, पण त्यासाठी हवा आहे शासनाचा कृतीशील आधार!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -