घरफिचर्सवाचाळवीरांना आवरा

वाचाळवीरांना आवरा

Subscribe

हिंदी चित्रपटात एक प्रसंग अनेकदा येऊन गेला आहे. खलनायकाला शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका मोठ्या सभागृहातील मौल्यवान हिरा चोरी करायचा आहे. मात्र, त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त आहे. त्यामुळे शहरात दुसर्‍याच ठिकाणी खलनायक मंडळी बॉम्बस्फोट, दंगल घडवून आणतात आणि त्यामुळे हिरा ठेवलेल्या ठिकाणी असलेल्या पोलिसांचे लक्ष विचलित होते. नेहमी ही संधी साधून हिरा चोरी केला जातो. सध्या महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय पटलावरही असाच प्रकार सुरू आहे. काही वाचाळवीर आपल्या वक्तव्यांमुळे अचानक प्रकाशझोतात आलेले आहेत. त्यांच्या वक्तव्याचा माध्यमे आणि सोशल मीडियावरही खरपूस समाचार घेतला जात आहे. मात्र, ही वक्तव्ये पद्धतशीरपणे बोलली गेली असावीत, अशी शंका घेण्यासारखी सध्याची परिस्थिती आहे. मासिक पाळीच्या काळात जी महिला अन्न शिजवते त्या महिलेला पुढील जन्म प्राण्याचा मिळतो आणि जो पुरुष असे अन्न खातो, तो पुरुष पुढच्या जन्मात बैल होतो. अलीकडच्या काळात सामाजिक, राजकीय, स्त्रीविषयक आक्षेपार्ह वाक्य विधानांची जी स्पर्धा सुरू आहे. त्यात या विधानाला पहिला क्रमांक मिळायला हवा, इतके पद्धतशीरपणे हे वाक्य काळ वेळ पाहून पेरले गेले होते. दिल्लीतील काँग्रेस, भाजपचे पतन झाल्यानंतर या दोन्ही पक्षांच्या भूमिका आणि कामांचे विश्लेषण होत असताना, हा वक्तव्यांचा धुरळा जाणीवपूर्वक उडवण्यात आल्याची शंका यावी…बैलासमोर चारा टाकल्यावर तो चारा खातो, त्यानंतर निवांतपणे बसून रवंथ सुरू असते. महाराष्ट्रातले एक मान्यवर कीर्तनकार यांनी स्त्री पुरुष जन्माबाबत त्यांना असलेली (सखोल) माहिती दिली. त्यानंतर एक वादळ उठले. त्यावर टिकाटिपण्णी झाल्या. या महाराजांचे समर्थक आणि विरोधक दोन्हींकडून एकमेकांवर भरपूर आव्हाने प्रतिआव्हाने दिली गेली. एक पुरुष विरोधात एक महिला असे स्वरूपही त्याला देण्याचा प्रयत्न झाला. रस्त्यावर उतरण्याची भाषा झाली. हा सर्व प्रकार सुरू होता तोच आणखी एक आक्षेपार्ह विधान वारिस पठाण यांनी केले. या विधानात धार्मिक उन्मादाचा दर्प होता. अहंकाराची किनार होती आणि देशातील सामाजिक सौहार्दाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. सध्याच्या सत्ताधार्‍यांवर धर्मवादी राजकारणाचा आरोप केला जात आहे. मात्र, विरोधकांमधील वारिस पठाण यांसारखी मंडळीही त्या तुलनेत कमी धोकादायक नाहीत. १०० कोटी आणि १५ कोटी यातील फरक सांगण्याची गरज पठाण यांना का पडली. एका विशिष्ट धर्मसमुदायासमोर अशा प्रकारे चिथावणीखोर वक्तव्याचा समाचार घेणे गरजेचे होते. हा समाचार ज्येष्ठ लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी चोख आणि योग्य वेळी घेतला. या १५ कोटी लोकांचा ठेका यांना कुणी दिला, असा तो रास्त प्रश्न होता. वारिस पठाण यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक, महिला अत्याचाराच्या प्रश्नांवरून सुरू असलेल्या चर्चेचे केंद्र अचानक वळते झाले. हिंगणघाट महिला अत्याचाराचा सामाजिक विषय मागे पडला आणि पुन्हा उन्मादी राजकारणाला पोषक वातावरण निर्माण झाले. वारिस पठाण यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे त्यांनी स्वपक्षालाच अडचणीत आणले होते. या विषयावर मनसेचे बाळा नांदगावकर यांनी पठाण यांना इशारा देण्याची संधी सोडली नाही. मनसेच्या बदललेल्या राजकीय भूूमिकेच्या प्रसारासाठी अशा संधीची वाट त्या पक्षाकडून पाहिली जात असताना पठाण यांनी ही संधी दिली. मात्र, ज्यावेळी ही बाब पठाण यांच्या लक्षात आली तेव्हा वेळ निघून गेली होती. राज्य सरकारला शेतकर्‍यांच्या सात बारा कोरा करण्याच्या मुद्यावरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होणार होता. त्यासाठी त्यांनी चोख तयारीही केली होती. मात्र, पठाण यांच्या वक्तव्यामुळे हा विषय मागे पडला. या दोन्ही वक्तव्याचा धुरळा उडत असतानाच आणखी एका महिलेने बाप लेकीच्या नातेसंबंधावर बोलताना आक्षेपार्ह विधान केले. या महिलेने आपल्या पतीसमोर कसे वागायला हवे, याविषयीही भाष्य केले. पित्याच्या गळ्यात पडणार्‍या आजच्या पोरींनी ध्यानात घ्यावे की वडील हेसुद्धा एक पुरुष आहेत, असे पहिले विधान होते, तर दुसरे विधान हे पतीला चहा देताना पत्नी थरथर कापायला हवी, असे होते. ही दोन्ही विधाने आक्षेपार्ह होतीच. एक महिला आपल्यासारख्याच महिलांविषयी बोलताना असा सल्ला कसा काय देऊ शकते. यावर पुन्हा माध्यमे आणि समाज माध्यमांवर चर्चा झडू लागल्या. सोशल मीडियावर यावर होणार्‍या चर्चेवरून देशातील इतर सर्व प्रश्न सुटले आहेत, अशी स्थिती जाणवत होती. या विधानामुळे विशिष्ट धर्मावर टीका करण्याचा ठेका घेतलेल्यांच्या हाती आयतेच कोलित मिळाले. त्यांनी या महिलेल्या विधानावरून ताबडतोब महिला आणि त्यांची धार्मिक स्थिती अशी प्रवचनांची मालिका सुरू केली. हे सर्व होत असताना हिंगणघाट आणि राज्यातील इतर ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटनांना सोईस्कर बगल देण्यात आली. धर्म आणि महिला हा विषय वादग्रस्त राहिलाच आहे. त्याविषयी आपली मते लोकशाही मार्गाने व्यक्त करणे रास्तच आहे. मात्र, अशी वादग्रस्त वक्तव्ये जाणीवपूर्वक केली जात आहेत का, लोकांचे लक्ष एखाद्या मुद्यावरून हटवले जावे, माध्यमांच्या पडद्यावरून लोकांच्या जीविताशी संबंध असलेले प्रश्न मांडले जाऊ नयेत, याची खबरदारी घेण्यासाठी ही खेळी खेळली जात नाही ना, याची आता शंका येऊ लागली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताच्या दौर्‍यावर आलेले असताना आंतरराष्ट्रीय व्यापार, आर्थिक मंदीनंतर देशातील बदललेली धोरणे, गटांगळ्या खाणारी अर्थव्यवस्था, नोटाबंदीचे भीषण परिणाम याची चर्चा व्हायला हवी होती. अमेरिकेच्या आर्थिक धोरणातून आपल्याला साध्य करण्याची उद्दिष्टे समोर यायला हवी होती. मात्र, यावर चर्चा करायला वेळ आहेच कोणाला? आक्षेपार्ह विधाने, धार्मिक अस्मितांचे साळसूद राजकारण, स्मारके आणि पुतळ्यांच्या उंचीचे कौतुक होणार्‍या देशात भुकेपेक्षा ताटाच्या रंगांवरून वाद घातले जाणारच. ज्या देशात महिलांविषयी रोगट मानसिकता जाहीरपणे स्पष्ट केल्यावर त्याला टाळ्या पडत असतील त्या देशात महिला अत्याचार ही रोजची घटना होणारच. ज्या देशात राजकीय उद्दीष्टासाठी धर्माचा वापर केला जात असेल तिथे लोकशाही नसते तर जमातवाद असतो. आपल्याला इतिहासाच्या कौतुकाच्या झोपेतून बाहेर पडून देशाने आता खरोखरच डोळे उघडण्याची गरज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -