घरफिचर्ससत्यवचनी भाजप!

सत्यवचनी भाजप!

Subscribe

देशात सुरू असलेल्या करोनाच्या महामारीत भारतीय जनता पक्षाने अशी काही उत्तुंग कामगिरी केलीय, की ज्याचे नाव ते. आपली सत्ता आहे की नाही, याची जराही फिकीर न करता तो पक्ष असा काही कामाला लागला आहे, की सगळेच राजकीय पक्ष तोंडात बोट घालून भाजपची ही कमाल पाहत आहेत. इतर राजकीय पक्षाने काम केलं की त्याकडे बोटं मोडून पाहण्याची वृत्ती आजकाल राजकारणातल्या सगळ्यांनाच आहे. यामुळे स्वत: चांगलं काम करून भाजपला हे पक्ष शाबासकी देतील, असं थोडंच आहे? राज्यात त्या पक्षाचा एकही नगरसेवक, आमदार, खासदार घरी सापडत नाही. जिल्हाधिकार्‍यांनी बोलावलेल्या बैठकांना यायला त्यांना वेळ नाही. करोनाग्रस्तांच्या मदतीत ते इतके व्यस्त आहेत की त्यांचा पत्ताच लागत नाही. त्यांच्या व्यस्त कामामुळेच काही आमदारांना उगाच गुन्हे ओढवून घ्यावे लागले. लोकांच्या आग्रहास्तव तुला केल्या जातात यात त्यांचा काय दोष? एव्हाना हे काम शिवसेनेचे आमदार-खासदार करायचे. आज ते आणि त्यांच्या सत्तेत असलेले राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाले कुठेच दिसत नाहीत. जिथे जावं तिथे केवळ भाजपचेच कार्यकर्ते. मग या कार्यकर्त्यांनी झेंडा नाचवला तर बिघडलं कुठे? पण हे या मंडळींना सांगणार कोण? कुठलंही संकट आलं की सर्वांच्या पुढे मदतीचा हात देणार्‍या शिवसेनेलाही भाजपने मागे टाकत राज्यभर लंगर सुरू केले आहेत. जो तो याच लंगरमध्ये जाऊन भरपेट सेवन करतो आहे. सरकारने सुरू केलेल्या शिवभोजनाच्या थाळ्या तशाच शिल्लकीत राहताहेत. रस्तो रस्ती याच लंगरची चर्चा सुरू आहे. भाजपच्या या लंगरमध्ये रोज लाखो माणसं आपलं पोट भरत आहेत. एकीकडे भाजपची ही लंगरं लाखोंची पोटं भरत असताना घरी असलेल्यांना थोडं थोडकं नव्हे चक्क ३५ हजार टन इतकं धान्य त्या पक्षाने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात वितरीत केलं आहे. इतकं धान्य सरकारनेही वाटलं नाही. इतक्या संख्येने धान्य वाटप केल्यावर त्याचं श्रेय भाजपला मिळणं स्वाभाविक आहे. यामुळेच विरोधकांची पोटदुखी सुरू झालीय. आता तर ते हिशोबच मांडू लागले. ३५ हजार टन इतक्या धान्यासाठी लागणार्‍या यंत्र आणि तंत्राचा, त्याच्या वितरणातील मनुष्यबळाचा हिशोब घेण्याचा प्रयत्न झाला. कर नाही त्याला डर कशाला? भाजपने विरोधकांकडे केवळ दुर्लक्ष केलं. अर्थात अशा संकटात असल्या टीकेला उत्तर द्यायचं नसतं, हे भाजपची नेतेमंडळी चांगलीच जाणून आहेत. कोल्हापूरमध्ये लोकं संकटात असताना उगाच विरोधक चंद्रकांत पाटलांकडे बोट दाखवत होते. कर्मभूमी असली म्हणून काय? तिथे थोडंच निवडून आलोय, जिथून निवडणूक लढवली त्यांची खुशामत करणं हे आपलं काम. तेव्हा उगाच असल्या टीकेकडे लक्ष कशाला द्या?
देशात करोनाचा कहर निर्माण झाल्यापासूनच केंद्रातल्या त्या पक्षाच्या सरकारने अशी काही उचल घेतली की जगालाही तोंडात बोटं घालायला लागली. कोणी थाळ्या पिटल्या, घंटा वाजवल्या, दिवे विझवले आणि पणत्या जाळल्या. कोणी सिलिंडरलाच दिवा बनवून टाकला. तर कोणी तोंडात रॉकेल घेऊन ते फुंकरण्याचा पराक्रम केला. विरोधकांना विजय कशात हेच दिसत नसल्याने या सगळ्या घटना त्यांनी हसण्यावारी नेल्या. समज नसली की काय होतं? ट्रम्प भारतात आले म्हणून जगभरात भारताची उंची इतकी वाढली की जो तो ट्रम्पच्या जागी मोदींनाच पाहू लागला. कधी नव्हे इतका सन्मान जगात भारताला मिळू लागला. या सन्मानात मोदी मोठे होऊ लागणं हे विरोधी पक्षांना थोडच मानवणार? असा मान-सन्मान मिळणार असेल तर थोडासा करोना ट्रम्पबरोबर आला तर काय बिघडलं? जगात इतकी माणसं मरत असताना गुजरातमध्ये थोडी मेली तर काय बिघडलं? पण विरोधकांना हे सांगेल कोण? ते राहुल गांधी आधीच सेन्सलेस, त्यांच्या म्हणण्याला महत्त्व ते किती द्यावं, याला काही मर्यादा? पण नाही. कधी काळी डिसेंबर महिन्याच्या अधिवेशनात सांगितलं म्हणून ते मार्चला ऐकायलाच पाहिजे, असं थोडंच आहे? महाराष्ट्रातल्या विरोधी नेत्यांची बौध्दिक कुवत किती आणि ते बोलतात किती? उगाच नको त्या गोष्टीचा बाऊ करतात.
पीएम केअर फंडाबाबतही अशीच कोल्हेकुई झाली. काय संबंध या केअर फंडाचा आणि महाराष्ट्राचा? रिलीफ फंड असला म्हणून काय झालं? तो आहे म्हणून केअर करायची नाही काय? आणि प्रत्येक गोष्टीचं ऑडीट झालंच पाहिजे, असा थोडाच नियम आहे? भाजपच्या पाच वर्षांच्या काळात सुजलाम सुफलाम बनवलेल्या राज्याचं काय करायचं हे ठरवण्याचा अधिकार ठाकरे सरकारला दिला कोणी? तेव्हा सीएम फंडाचा आग्रह चुकीचाच. आमचा निधी पीएम फंडालाच. आणि आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यालाच पिडणार. कारण पिडणं आमचा अधिकार आणि तो जन्मसिध्द हक्क आहे. सीएसआर फंडाचा पंतप्रधानांचा अधिकार काढून घ्या सांगण्याचा अधिकार महाराष्ट्राला कोणी दिला? आमच्यासाठी देश हा पहिली चॉईस आहे. यामुळे आम्ही राज्याचा नाही देशाचाच विचार करू. राज्याच्या टॅक्स परताव्याच्या आणि जीएसटी रिफंडवर तोंड वाजवणार्‍यांना देशाची चिंता नाही. एका राज्यापुरतं पाहून हे विरोधक देशद्रोहच करत नाहीत? आज देश संकटात असताना पैसे काय मागताय? आम्ही सत्तेत होतो तेव्हा अतिवृष्टीतील ओल्या दुष्काळासाठी १४००० कोटी आम्ही मागणी केली. त्यातले ४०० कोटी मिळाले ते काही कमी नव्हते.
राज्यपाल कोश्यारी हे आमचे संघिय कार्यकर्ते आहेत. त्यांच्याशी गोलगप्पा आणि गुलूगुलू करण्यात तुमचं पोट काय म्हणून दुखावं? इतका प्रामाणिक राज्यपाल महाराष्ट्राला मिळाला, याचं खरं तर कौतुक करायला पाहिजे. राज्याच्या भल्यासाठी जो राज्यपाल सकाळी ८ वाजता शपथविधी घेतो, हे काय कमी आहे? म्हणे राष्ट्रपती राजवट रातोरात निकाली काढली. आपल्या अधिकाराचा वापर केला म्हणून राज्यपालांना शिकवणारे तुम्ही कोण? खरं तर गोलगप्पांमधून राज्याचं भलं करण्यासाठी ते थेट जिल्हाधिकारी आणि मुख्य सचिवांशी बोलतात यात राज्याचं भलं कसं दिसत नाही ह्यांना? आम्ही इतके उतावीळ असताना उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून बसवणं हे संघिय शिस्तीत बसणारं थोडीच आहे? इतकं माहिती असूनही राज्यपालांवर अकारण टीका करण्यात मतलब काय? राज्यात करोनाचं संक्रमण सुरू असताना राज्य सरकार घरात बसलंय. या सरकारला जागं करायला पाहिजे की नको? मग त्यासाठी राज्यपालांकडे गेलो तर काय बिघडलं? राज्यपाल हे तुमचे पालक असतील तर आमचे मालक आहेत. तेव्हा तेच तुमचा निकाल लावू शकतात, याची आम्हाला खात्री आहे. यामुळे तुमच्यापेक्षा ते आम्हाला जवळचे आहेत, हे लक्षात घ्या. तुमच्या या कारभाराचा जाब विचारण्यासाठी आम्ही राज्यव्यापी आंदोलन छेडलं. या आंदोलकडे विचकावण्याचे उद्योग आता बंद करा.
म्हणे पक्षात एकाधिकारशाही सुरू आहे. एककल्ली निर्णय होत असल्याच्या टीका करतात. काय अधिकार आमच्या पक्षाकडे बोट दाखवण्याचा? आम्ही एकाधिकारशाही करू की ठोकशाही, तुमचा काय आमच्या पक्षाशी संबंध? खडसेबिडसेंचा पुळका तुम्हाला का यावा? त्यांना इतकी पदं दिली, उमेदवार्‍या दिल्या, इनामतवार्‍या दिल्या तरी निवडणुकीला मीच उभा राहणार हा मतलबीपणा नाही वाटत? खडसेंसाठी गळे काढण्याचे उद्योग करून काहीही उपयोग होणार नाहीत, हे त्यांनी लक्षात घ्यावं. सचिन सावंत यांना आमदारकी न दिल्यामुळे ते भरकटत चालले आहेत. म्हणे आम्ही हॅशटॅगवर ट्रोल झालो. ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलनासाठी लोकांनी आम्हाला ट्रोल केलं, असं सांगणारे आजवर ट्रोल होत होते तेव्हा कुठे बसले होते? आजवर पक्षाने जे केलं त्यातून अजून शहाणपणा आलेला दिसत नाही. या आंदोलनामुळे लोकांची भावना भाजपबरोबर आहे, हे तुम्हाला दिसणार नाही. सात आठजण असले म्हणून काय झालं. एकाच्या मागे असंख्य ही आमची उक्तीच आहे. अशा ट्रोल करणार्‍यांचा आम्ही लवकरच बंदोबस्त करणार आहोत. मंत्रालयाचा सहावा मजला खाली झाल्याने आधीची ट्रोल टीम आज थोडी नेभळी झालीय हे खरं असलं तरी नवी टीम नव्या जोमाने काम करेल तेव्हा तुम्ही जात्यात असाल हे लक्षात ठेवा…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -