घरफिचर्सनेते कुठायत?

नेते कुठायत?

Subscribe

राज्यात करोनाच्या संकटाने मान वर काढली असताना अनेकजण त्याला तोंड देण्यासाठी सज्ज आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेवून असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या प्रयत्नांची पराकाष्टा थांबत नाही. जिल्ह्याजिल्ह्यातील पालकमंत्री आपापल्यापरीने संकटाला सामोरं जात असताना विरोधकांचा मात्र सरकारवर टीका करण्याचा एककल्ली कार्यक्रम थांबायचं नाव घेत नाही. कोणत्याही परिस्थितीत उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचं सरकार पडलं पाहिजे, अशी आकांक्षा ठेवून विरोधक विशेषत: भारतीय जनता पक्षाचे नेते त्यातही विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील कामाला लागले आहेत. संकटात सरकारला पध्दतशीर अडचणीत आणण्याचा त्यांचा प्रयत्न हास्यास्पद तर आहेच; पण राजकारण धर्मालाही तिलांजली देणारा आहे. या दोघांच्या विचित्र कार्यपध्दतीचा पक्षाच्या राज्यातील नेत्यांनाही उबग आला आहे. सरकार पडावं आणि आपण खुर्चीवर विराजमान व्हावं, इतकीच या दोघांची मनिषा दिसते. लोकं करोनात मेली तरी याचं या नेत्यांना काहीही नाही. सत्ता मिळावी आणि त्याच्या नाड्या आपल्या हाती राहाव्यात असं वाटणं या घडीला योग्य नाही. पात्रता असलेल्या माणसाला तो अधिकार संविधानाने दिलेलाच आहे; पण यासाठी काळ आणि वेळ ठरलेली असते. याकरता कुठल्याही थराला जाण्याची आवश्यकता कुठल्याही नेत्याला नाही. कारण नसताना संकटात स्वत:ची पोळी भाजून घेण्याची कला या दोन नेत्यांच्या इतकी अंगवळणी पडलीय की आज वा उद्या हेच सत्तेवर येऊन बसतील, अशा चर्चेची व्यवस्था भाजपत करण्यात आली आहे.
राज्यातील सत्ता ही महाविकास आघाडीची आहे. भाजपने केलेल्या विश्वासघातानंतर शिवसेनेने त्या पक्षाबरोबरील सत्तेचा नाद सोडून दिला आणि कधी न जुळणारे समिकरण तयार करून त्या पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला सोबत घेऊन सत्ता राबवण्याचा निर्णय घेतला. सरकारची निर्मिती ही अपघाताने झाली होती. हे सरकार सत्तेवर विराजमान होत असताना ते कुठल्या दिवशी पडेल याची शाश्वती कोणालाच नव्हती. यातही भाजप भक्त अधिक अ‍ॅग्रेसीव्ह होते, हे सांगायला नको. जन्मजात सेनेने आपल्यासोबत राहिलं पाहिजे, अशी मानसिकता असलेल्या भाजपच्या नेत्यांना महाविकास आघाडीचं सरकार आजही पचत नाही.
खरं तर तो त्यांचा दोष नाही. सत्ता आज आहे ती उद्या असेलच असं नाही; पण ते समजून घेण्याचीच पात्रता नसल्याने असं घडत असतं. पुन्हा येणार..चा नारा सतत घुमत राहण्याचं हेच कारण होय. आता सत्ता जाऊन आणि महाविकास आघाडीचं सरकार येऊन सहा महिन्यांचा अवधी पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर खरं तर फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी मनाचा मोठेपणा दाखवायला हवा होता. तत्पर विरोधक म्हणून सरकारकडून जबाबदारीने काम करून घेण्याऐवजी सरकार म्हणजे गैरसोय, असा समज त्यांनी करून दिला आहे. यामुळेच येनकेन प्रकारे ते तक्रारींचा सूर आळवत थेट राजभवनावर पोहोचत आहेत. या आगाऊपणामुळेच ते आज इतके ट्रोल होत आहेत की विचारायला नको. या ट्रोलिंगविरोधात पोलीस आयुक्तांपर्यंत तक्रारी करण्याची पातळी त्यांना गाठावी लागली आहे. इतक्या प्रकरणात ट्रोल होणं हे कोणाही नेत्याच्या राजकीय प्रवासासाठी योग्य नाही. फडणवीस तर चांगल्या घराण्यातले आणि सुजाण व्यक्तिमत्व. तेव्हा त्यांनी अधिक समजदारी दाखवायला हवी होती. मात्र घडतं उलटच. पक्षात ते एकटेच आग्रही असल्यासारखे वागताहेत. जी कामं तावडे, शेलार, कदम यांनी करायची असल्या कामातही तेच दखल देऊ लागले आहेत. लहानसहान तक्रारी घेऊन विरोधी पक्षनेता सतत राज्यपालांच्या भेटीला गेला तर त्या पदाची गरीमा राहू शकत नाही, हे फडणवीसांना कोणी सांगावं? इतरांनी करायची कामं फडणवीस स्वत:च करत असतील तर इतरांनी घरीच बसलेलं बरं. फडणवीसांकडे असलेलं विरोधी पक्ष नेतेपद हे संविधानाने दिलेलं पद आहे. या पदाला मुख्यमंत्र्यांइतकाच मानमरातब आहे. तेव्हा त्या मानातून जनतेच्या समस्या सोडवण्याऐवजी उठसूठ राज्यपालांकरवी त्याची सोडवणूक केली जात असेल तर त्या पदाचा अधिकार तो कसा राहील?
सरकारच्या विरोधात सतत तक्रारीच करत असल्यामुळे राज्यभर फडणवीस यांच्या विरोधात तीव्र भावना व्यक्त होत आहेत. राज्यातील जनतेकडून विरोधी पक्ष नेत्याचा असा अवमान कधी झाल्याचं आजवर पाहायला मिळालेलं नाही. याला अपवादही फडणवीसांचं गेल्या पाच वर्षांतील सरकार होय. या सरकारला जाब विचारल्यावर अशा विरोधी नेत्यांच्या चौकशांच्या फेर्‍या लागलीच सुरू व्हायच्या. ज्यांच्याविरोधात काहीही कारवाई करता येणार नाही, अशांच्या अंगावर सोशल मीडियातील आपल्या भक्तांना सोडण्याचा आगाऊपणा भाजपने अनेकदा केला. फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात तर मंत्रालयाचा सहावा मजला जणू काही याच कामासाठी गुंतलेला असायचा. जाब विचारणार्‍या विरोधकांवर अश्लाघ्य टीका करण्याची एकही संधी भाजपच्या सोशल मीडियातील उपटसुंभ्यांनी कधी सोडली नाही. या पगारी नोकरांमध्ये काही हौशी पत्रकारही सामील होते. आजही ते नोकरी वाहिन्या आणि वर्तमानपत्रांची करतात आणि चाकरी भाजपची. असल्या आगलाव्यांनीही समाजात भाजपची पुरती मानहानी केली, हे ही भाजपच्या नेत्यांना कळत नाही.
आज संकटात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार काम करत असल्याचं सांगणारी ही पत्रकारांतील भाजपची जमात फडणवीसांच्या तोंडचे प्रश्न विचारून काम करणार्‍यांनाही नामोहरम करत आहे. प्रत्येक गोष्टीला उत्तर अशा संकटात देत बसणं हे व्यवस्थेसाठी अडचणच असते. अशावेळी सरकारच्या वतीने त्यांच्या मंत्र्यांनी जबाबदारी उचलली पाहिजे, हे खरं आहे. फडणवीस जेव्हा केंद्र सरकारचे प्रवक्ते बनून केंद्र सरकारच्या निधीची भलामण करतात तेव्हा त्याची उत्तरं देण्यात मंत्र्यांचा वेळ खर्ची होतो. अशावेळी पक्षीय पातळीवर त्याचा प्रतिवाद करता येऊ शकतो. दुर्दैवाने उध्दव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष यात पुरता नापास झाला आहे, हे मान्यच करावं लागतं. हे सरकार तीन पक्षांचं जरी असलं तरी मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचा बोलबाला सरकारमध्ये अधिक असतो. अशावेळी सरकारवर होणारी टीका ही मुख्यमंत्र्यालाच जाब विचारणारी असते. करोनाच्या संक्रमणात भाजप नेते मुख्यमंत्र्यांवर टीका करतात तेव्हा त्यांची बाजू आजवर काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, प्रवक्ते सचिन सावंत, राजू वाघमारे, ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, विश्वजित कदम यांच्यासारख्यांना घ्यावी लागल्याचं पाहायला मिळालं. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, रोहित पवार, नवाब मलिक यांनी ही बाजू उचलून धरली. पण ठाकरे यांच्या स्वपक्षाचा एकही नेता अशावेळी पुढे येताना दिसत नाही. खासदार संजय राऊत हे पक्ष प्रवक्ते म्हणून ही जबाबदारी उचलतात. कधी काळी सुभाष देसाई वा अनिल परब ही जबाबदारी घेताना दिसतात; पण ज्यांनी आजवर सत्तेची उब घेतली ते दिवाकर रावते, रामदास कदम, भास्कर जाधव यांच्यासारखे कार्यकर्ते कुठे आहेत, हा प्रश्न सगळ्याच शिवसैनिकांना पडला आहे. ज्या शिवसेनेने सारी पदं मिळवून दिली, त्या शिवसेनेवर टीका होत असताना हे नेते उघड्या कानांनी ती ऐकू कसे शकतात, हा प्रश्नच आहे. हे नेते सत्तेत असताना टीका झाली तर पेटून उठत. थेट मुख्यमंत्र्यांना भिडण्याची भाषा ते करत. यामुळे फडणवीसांच्या सरकारवर सेनेचा काहीसा धाक होता. यामुळे या मंत्र्यांना त्यांच्या सरकारमध्ये चांगली कामगिरी करता आली. आता आपल्याच मुख्यमंत्र्यांवर शेलक्या शब्दात टीका होत असताना हे नेते प्रत्युत्तर देण्यासाठी कोणाच्या आदेशाची वाट पाहत आहेत? महाराष्ट्रात सेनेकडे वाकड्या नजरेने पाहण्याची एकाचीही आजवर हिंमत होत नसे. आज फडणवीस, राणे, त्यांच्या मुलांनी काहीही बोलावं, आणि वर्तमानपत्रांनी ते जसंच्या तसं छापावं, ही आता अंगवळणी पडलेली पध्दत बनली आहे. इतक्या खालच्या वक्तव्यांचा प्रतिवाद करण्यासाठी पध्दत सेनेत आजवर कधी नव्हती. ठकास ठोसे देण्याच्या पध्दतीमुळे सेनेचा आवाज दुमदुमत राहिला. आज त्याची आवश्यकता नसली तरी नटखटास तसंच उत्तरं द्यावी लागतात, हे सेनेच्या या नेत्यांनी लक्षात घ्यावं..

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -