जाणत्या राजाची ‘संघ’शरणता !

महाराष्ट्राच्या राजकारणात गेली अनेक वर्षे आपला दबदबा कायम ठेवणारे आणि जाणता राजा म्हणून ओळखले जाणारे शरद पवार यांनी आजवर अनेक राजकीय भूकंप घडवून आणले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांचा हिंदुत्त्ववाद हा पवारांचा नेहमीच टीकेचा आणि टोमण्यांचा विषय राहिलेला आहे. पण आता सर्वत्र पराभवाचा अंधकार पसरत असताना संघ स्वयंसेवकांच्या चिकाटीत त्यांना आपल्या पक्षासाठी नवा आशेचा किरण दिसू लागला आहे, याला काय म्हणावे.

Mumbai
NCP Chief Sharad Pawar
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

महाराष्ट्राच्या राजकारणातील मुरब्बी आणि मातब्बर राजकीय नेते म्हणून परिचित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पोटातले ओठात आले आणि एकच गहजब झाला. त्यानंतर पवारांनी नेहमीप्रमाणे प्रचारमाध्यमांनी माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला, मला असे बोलायचे नव्हते, असे सांगून आपला सेक्युलर बाणा कायम राखण्याचा प्रयत्न केला. पण ते म्हणतात ना, माणूस जेव्हा जीवनात जेव्हा अगदी निर्णायक अडचणीत सापडतो, त्यावेळी तो आपल्या मनात असलेली खरी गोष्ट बोलून जातो. आयुष्याच्या संध्याकाळी पवारांना परिस्थितीने सत्य बोलायला भाग पाडले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा दारूण पराभव झाला. हा दुसर्‍यांदा झालेला पराभव होता. कारण पहिला पराभव २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत झालेला होता.

मध्यतंरी पाच वर्षे गेली. पवारांनी केंद्रातील मोदी आणि राज्यातील फडणवीस सरकारवर सडकून टीकेची झोड उठवली. इतकेच नव्हे तर पवारांनी संघाच्या हाफ पॅन्टवरून बरीच टर उडवली आणि टीकेच्या ठिणग्या पाडल्या. जाहीर प्रचारसभांमधून त्यांनी त्यांच्या समोर उपस्थित असलेल्या जनसमुदायाला तुम्ही हाफ चड्डीवाल्यांच्या हाती सत्ता देणार का, असा सवाल विचारून लोकांचा हशा आणि टाळ्या जरूर मिळवल्या; पण त्याचा निवडणूक जिंकण्यासाठी काहीही उपयोग झाला नाही. पवारांवर जेव्हा कुणी थेट टीका करतो, त्यावेळी सार्वजनिक ठिकाणी कसे बोलावे हे त्यांना कळत नाही, त्यांनी ते पहिल्यांदा शिकून घ्यावे, अशी प्रतिटीका पवार करत असतात. पण संघावर टीका करताना मात्र ते हात आणि जीभ आखडती घेत नाहीत. पण २०१४ आणि २०१५ या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये पक्षाचा झालेला दणदणीत पराभव आणि दुसर्‍या बाजूला संघप्रणित भाजपची वाढत जाणारी ताकद पाहिल्यावर आता आपल्या पक्षाचे काय होणार, असा प्रश्न पवारांना पडल्यावाचून राहत नाही. कारण महाराष्ट्रात एक काळ होता, ज्यावेळी पवार म्हणतील ती पूर्व दिशा, असा त्यांचा राजकीय दबदबा होता. पवार अद्याप राजकीय निवडणुकीत कधीच पराभूत झाले नाहीत. महाराष्ट्राच्या राजकारणात अपराजित अशीच त्यांची प्रतिमा राहिलेली आहे.

पवारांच्या या अपराजितपणाला ग्रहण लावणार्‍या दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय पातळीवर झालेला उदय आणि दुसरे पवारांचे झालेले वय. शेवटी मन कितीही वेगाने धावत असले तरी शरीराच्या मर्यादा पडतात. अर्थात, वय झाले असले तरी पवारांची धावपळ कमी झालेली नाही; पण त्या धावपळीचा प्रभाव आता नक्कीच कमी झालेला आहे. त्यामुळेच आता महाराष्ट्राच्या मातीत त्यांच्या पक्षाला पराभवाची धूळ चाखावी लागली. इतकेच नव्हे तर वाढत्या वयाप्रमाणे आता पवारांच्या घरातही महत्त्वाकांक्षा असलेल्या सदस्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे त्यांना आवर घालणे त्यांना कठीण होऊ लागले आहे. पवारांचे नातू पार्थ पवार यांचा मावळ मतदारसंघातून झालेला पवार हा पवार घराण्याला बसलेला पहिला धक्का आहे. शेवटी हा माझा पराभव आहे, असे अजित पवार यांनी मान्य केले. पण त्या माध्यमातून त्यांनी शरद पवारांना काही अप्रत्यक्षरित्या सुनावले तर नाही ना,अशीही चर्चा आहे.

महाराष्ट्र ही पवारांची कर्मभूमी आहे. पण आता काहीही करून पक्षाला यश मिळताना दिसत नाही. दुसर्‍या बाजूला ज्यांना आपण अर्ध्याचड्डीवाले म्हणून हिनवले, त्यांच्या पक्षाला मात्र भरघोस यश मिळताना दिसत आहे. त्यांनी ईव्हीएम मशीनवर शंका घेऊन भाजपच्या झालेल्या विजयाला बोगस ठरवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण त्यातही त्यांना यश आले नाही. शेवटी एखाद्या संघटनेचा विजय होतो, त्याची कारणमीमांसा करण्याशिवाय गत्यंतर उरत नाही. सतत टीका करत राहिले तर ते हास्यास्पद बनून जाते. हास्य पिकवणारी विधाने केली की, टाळ्या मिळतात, पण मते मिळत नाहीत, हे २०१४ पासून पवारांच्या लक्षात आलेले आहे. त्यामुळेच त्यांनी भाजपच्या विजयासाठी सातत्याने राबणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांच्या समर्पित वृत्तीचे आणि चिकटीचे अनुकरण करण्याचा सल्ला आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला. त्यांना सल्ला देताना ते म्हणाले, स्वयंसेवक एखाद्याच्या घरी भेटायला गेले. समजा तो माणूस त्यांना घरी भेटला नाही, तर ते दुसर्‍या दिवशी जाऊन त्याची भेट घेतात. लोकसंग्रह करण्याची त्यांची ही चिकाटी त्यांना विजय मिळवून देते, याकडे आपण लक्ष द्यायला हवे, असे पवारांना आपल्या घराण्यातील सदस्यांना आणि कार्यकर्त्यांना सांगावेसे वाटले.

पवारांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत संघावर नेहमीच जातीयवादी म्हणून टीका करून त्यांच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न केला; पण आता सगळ्या बाजूंनी पराभवांचा अंधकार होऊ लागल्यानंतर मात्र त्यांना संघाच्या चिकाटीत आपल्या पक्षासाठी आशेचा नवा किरण दिसू लागला आहे. व्यवस्थापनतज्ज्ञ शिव खेरा यांनी ‘यू कॅन विन’ या जगप्रसिद्ध पुस्तकात एका ठिकाणी म्हटले आहे. तुमच्याकडे बुद्धीमत्ता कमी असेल, संंसाधने कमी असतील, पण जर का तुमच्याकडे चिकाटी असेल तर या कमतरतांवर तुम्ही मात करून विजय संपादन करू शकतात. म्हणजेच काय तर कुठल्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर माणसाच्या अंगी चिकाटी असणे आवश्यक आहे. हिच चिकाटी त्यांना संघाच्या स्वयंसेवकांमध्ये दिसून आली. तिच आपल्या कार्यकर्त्यांनी अंगी बाणवावी, असे त्यांना वाटू लागले आहे. कुठलीही संघटना किंवा पक्ष यांचा विजय हा त्याच्या नेत्यावर अवलंबून असतो, म्हणूनच म्हटले जाते की, राजा कालस्य कारणम. सैन्य हे स्वयंप्रेरणेने लढत नाही, त्यांना लढवणारा प्रतिभावान सेनापती असावा लागतो. कार्यकर्ते ही एक यंत्रणा असते. तिच्यामध्ये प्राण फुंकावा लागतो, जान आणावी लागते, हे करणे नेत्याला शक्य झाले तरच तो यशस्वी ठरू शकतो. कारण कार्यकर्ते नेत्याकडून प्रेरणा घेत असतात, आज पवारांकडे ती प्रेरकशक्ती किती उरली आहे हा खरा प्रश्न आहे. राष्ट्रभक्ती ही संघाची प्रेरणा आहे. हिंदुत्ववाद हा त्यांचा गाभा आहे. ज्या हिंदुत्त्ववादावर पवार नेहमी टीका करत राहिले, आयुष्याच्या संध्याकाळी त्यांना त्या विचारसरणीला मानणार्‍यांचे अनुकरण करावेसे वाटत आहे, याला काय म्हणावे.