घरफिचर्सडेरी अभियान अन् आमदारकीचं स्वप्न ! - भाग 2

डेरी अभियान अन् आमदारकीचं स्वप्न ! – भाग 2

Subscribe

आमदारकीचं स्वप्न पाहत डेरी ‘अभियाना’साठी अण्णा पाटील बैठक बोलावतो. त्यात मास्तर एक भन्नाट कल्पना मांडतो, याबद्दल आपण मागच्या भागात वाचले. आता पुढे हे अभियान कसं राबविलं जातं? याबद्दल या भागात वाचूयात !

बैठकीत ठरल्यानंतर दुसर्‍या दिवशी भल्या सकाळीच दामू, भिवा आणि रामा मास्तरकडे दाखल झाले. पन्नास राजहंस विकत आणायचं ते ठिक; पण कुठून आणि ते दिसतात कसे? हा त्यांचा मूलभूत प्रश्न होता. खरं तर या प्रश्नाचं उत्तर मास्तरकडं नव्हतंच; पण तेवढ्यात त्याला काहीतरी आठवलं आणि त्यानं आपल्या पिशवीतून दुसरीचं पुस्तकं काढलं. त्यातील ‘तो एक राजहंस’ या कवितेच्या पानावर राजहंसाचं चित्र होतं ते त्यांनी या तिघांना दाखवलं; पण ते चित्र अगदी बारीक होतं, ते बदकासारखंच दिसू लागलं तेव्हा भिवानं तोंड उघडलं आणि विचारलं, ‘मास्तर, म्हणजे ह्यो बदकंच म्हना की..’

पण त्यावर डोळे वटारीत मास्तरनी बदक आणि राजहंस यात कसा फरक असतो वगैरे हे त्याला माहिती नसलेलं सगळं ज्ञान पाजळून भिवाला गप्प केलं.‘पन मास्तर, आणायचा कुठून हा पक्षी? असा प्रश्न दामूनं केला,’बेरडवाडीकरांना बहुतेक वस्तू या तालुक्याच्या गावात मिळायच्या; पण राजहंस ही तशी वेगळी वस्तू असल्यानं जिल्ह्याच्या ठिकाणी मिळेल असा तर्क मास्तरनी केला. ‘जिल्ह्याच्या गावी जा तिथे मिळेल राजहंस? एखाद्या पोल्ट्रीवाल्याला सांगितलं, तर तोही आणून देईल’, असं त्यानं दामूला ठासून सांगितलं.मास्तरवर या तिघांनी विश्वास ठेवला असला, तरी यातून काहीतरी शक्कल लढवायची आणि चार पैसे कमवायचं तिघांच्या डोक्यात होतं. त्यांनी मग राजहंस मिळवणं कसं अवघड काम आहे, हे तिखटमीठ लावून अण्णा पाटलाला सांगितलं आणि त्याच्याकडून एका राजहंसासाठी एक हजार या प्रमाणे 50 हजार रुपये आणि प्रवासखर्चासाठी वेगळे तीन हजार उकळले. अर्थातच अण्णा हे पैसे डेरीच्याच खर्चात दाखवणार असल्यानं त्याला पैसे द्यायला काहीच कष्ट पडले नाही.

- Advertisement -

पैसे मिळाल्यावर तिघेही जिल्ह्याच्या गावी जाण्यासाठी एस. टी. नं निघाले. निम्म्या वाटेत एस. टी. चहापाण्यासाठी एका ढाब्यावर थांबली. हा ढाबा अलीकडेच झाल्यासारखा दिसत होता. अगदी चकाचक टेबल-खुर्च्या, हिरवळ असलेला छोटा बगीच्या, त्यात तलाव आणि त्या तलावात पांढर्‍या रंगाचे बदक, असं वातावरण पाहून तिघंही हरखून गेले. त्यातल्या त्यात मास्तरनं दाखवलेल्या पुस्तकातील राजहंसाचे चित्र या बदकांशी जुळत असल्याचा शोध रामाला लागला. आणि ‘राजहंस राजहंस, काम झालं’ असं तो मोठ्यानं ओरडला. त्यानं लगेच भिवा आणि दामूलापण तळ्यातले ‘राजहंस’ दाखवले. चहापाणी झाल्यावर मग तिघांनीही ढाब्याच्या मालकाला गाठून त्याच्या ढाब्याची स्तुती केली. त्या स्तुतीने मालक सुखावल्यावर रामाने नेहमीच्या चालूपनानं त्याच्याकडून तलावातल्या पांढर्‍या बदकांबद्दल माहिती घेतली आणि नंतर ते पुन्हा एस. टी. मध्ये येऊन बसले.

जिल्ह्याच्या अलीकडेच एका फार्मवर या पांढर्‍या बदकांची विक्री होते. एक बदक 100 रुपयांपर्यंत मिळतो, अशी माहिती ढाबामालकाकडून रामाला मिळाली होती. त्यामुळे ते वाटेतच त्या फार्मजवळ एस. टी. मधून उतरले. तिथल्या फार्मवर जाऊन मालकाशी घासाघीस करून त्यांनी 60 रुपयांप्रमाणे एक या हिशेबानं अवघ्या तीन हजारांत 50 बदकांची खरेदी केली. नंतर त्याच्याच गाडीतून मोठ्या ऐटीत बदकांना (चुकलं, आपलं हे राजहंसांना) घेऊन बेरडवाडीत आले. या व्यवहारात जवळपास प्रत्येकालाच 15 हजारांचा डल्ला मारता आला.

- Advertisement -

बेरडवाडीत गाडी आल्यावर अण्णा पाटलाला बोलावणं धाडण्यात आलं. तोपर्यंत पांढर्‍या रंगाचे हे ‘राजहंस’ पाहण्यासाठी गावकर्‍यानी चांगलीच गर्दी केली होती. अण्णा पाटील, मास्तर आणि हे तिघे आल्यानंतर त्या गर्दीत पुन्हा ‘राजहंस अभियाना’बाबत एक छोटेखानी भाषणाचा कार्यक्रम झाला. भाषणामुळे अर्थातच गर्दी पाच मिनिटांत पसार झाली. त्यानंतर अण्णाच्या हाताने बेरडवाडीच्या दोन डेर्‍यांमध्ये प्रत्येकी एक बदक अर्थातच ‘राजहंस’ ठेवण्यात आले. उरलेले जवळच्या गावांतील डेर्‍यांना पाठविण्यात आले. अण्णाच्या उपस्थितीतच मग ‘राजहंस’ आता दूध आणि पाणी कसे वेगळे करतो, त्याचे प्रात्यक्षिक सुरू झाले.

प्रवासाने आलेला थकवा म्हणा किंवा नवीन जागा म्हणा, ते बिचारं बदक आधीच घाबरून गेलं होतं. त्यात त्याला गेले काही तास खायला-प्यायला न मिळाल्यानं ते मलूल झालं होतं. अशा अवस्थेत त्याच्यापुढे एका मोठ्या वाडग्यात दूध ठेवण्यात आले; पण ते काही पुढे येईना. तेव्हा प्रत्येकानेच आपल्या तोंडाने क्वॅक, क्वॅक, चॅक चॅक, असे जमेल ते आवाज काढून त्याला चुचकारलं. तेव्हा ते जरासं वाडग्याजवळ सरकलं. आता हा ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ करेल, या समजुतीने मंडळींनी श्वास रोखून धरला; पण त्यांची निराशा झाली. कारण तहानेने व्याकुळ झालेल्या बदकाने वाटीतले सगळेच दूध पाणी समजून झटक्यात रिकामे केले.त्यावर ‘बघा बघा, आपल्या डेरीतले दूध कसे शुद्ध आहे ते, या राजहंस पक्षाने प्यायलेल्या दुधातून जराही पाणी उरले नाही. त्याअर्थी आपली डेरी भेसळीच्या बाबतीत पवित्र आहे. अण्णा पाटलाचा विजय असो…’ अशी बडबड एकदम वाताचा झटका आल्यागत कुलकर्णी मास्तरनी सुरू केली.

बाकीच्या मंडळींनीही मास्तरच्या म्हणण्याची री ओढली. यावर खूश होऊन अण्णा पाटील, पुन्हा एकदा भाषण देणार होता; पण मंडळी पळून जाणार या भीतीने मास्तरनी त्याला दाबलं म्हणून तो गप्प बसला. आपण ‘राजहंस अभियाना’त नंबर पटकावणार या भ्रमात मंडळी जायला निघाली, तोच डेरीसमोर एक सरकारी जीप येऊन थांबली. आतून तालुक्याचे पशू अधिकारी उतरले आणि मोठ्या आनंदाने ओरडत अण्णा पाटलाकडे धावले. ‘अहो अण्णा, पेढे काढा पेढे, भेसळमुक्त दुधाचे ‘राजहंस अभियान’ रद्द झाल्याचं वरच्या पातळीवरून आजचं कळलं आणि लगोलग तुम्हाला सांगायला आलो.ऽऽऽ’ पण हे ऐकल्याबरोबर आनंद होण्याऐवजी पाटलाचा चेहरा पांढराफटक पडला. मास्तरची तर वाचाच गेली. दामू, भिवा आणि रामा गुपचूप मागच्या मागंच पळून गेले.

…आता गेल्या दोन दिवसांपासून ‘राजहंस अभियाना’चा पन्नास हजारांचा खर्च कसा वसूल करायचा, या विचारानं अण्णा पाटील वाड्यावरच्या ओसरीत सारखा येरझार्‍या घालतोय. तिकडे सगळ्या डेर्‍यांमधून राजहंसांच्या अर्थातच बदकांच्या करामतींच्या वेगवेगळ्या बातम्या त्याच्या कानावर येतायंत. सारखं दूध प्यावं लागल्यामुळं काही ठिकाणी राजहंसांनी डेरीच्या कर्मचार्‍यांवर हल्ले सुरू केले होते, तर काही ठिकाणी राजहंसांनी दूध पिण्याला साफ नकार देत दुधाची नासधूस केल्याच्याही बातम्या होत्या. तेव्हा या राजहंसांचं काय करायचं असाही प्रश्न अण्णासमोर आहे. त्यानं पुन्हा मास्तरला बोलावलंय आणि मास्तर हे पन्नास राजहंस शेजारच्या तालुक्यातील देशमुखाच्या दूध संघाला एक लाखात विकून टाकायची आयडिया अण्णाला सांगतोय. बिचारा देशमुख आणि त्याचा दूधसंघ….!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -