घरफिचर्ससंपादकीय : बिन पावसाचा मान्सून

संपादकीय : बिन पावसाचा मान्सून

Subscribe

अखेर मान्सून मंगळवारी मुंबईत दाखल झाला. भारतीय हवामान खात्यासोबतच खासगी हवामान संस्था असलेल्या स्कायमेट दोघांनीही एकाच वेळी आपापल्या ‘बुलेटिनद्वारे’ हे मान्सूनचे हे शुभ वर्तमान सांगितले. त्यात विसंगतीचा भाग असा की मान्सून तर दाखल झाला, पण पाऊस कुठाय? तर पाऊस हा आणखी २४ तासांनी पडणार असेही सांगण्यात आले. हवामानाचे अभ्यासक असो नाही तर सामान्य जनता, सर्वांनाच खटकणारी ही बाब आहे. मात्र, हवामान खात्याने प्रसिद्ध केलेले दैनंदिन वृत्त तपासले, तर त्यात ‘मान्सून प्रोग्रेस रिपोर्ट’ मधील भारताच्या नकाशाचा आधार घेत जो काही आलेख देण्यात आला आहे, त्यात मुंबई शहराजवळून हिरवी रेष मारलेली दिसते. थोडक्यात मान्सून मुंबईत आला याची ही त्यांनी केलेली शास्त्रीय परिभाषेतील पुष्टी. २५ जूनचा याच हवामान खात्याचा सकाळी आठच्या सुमारास प्रसिद्ध केलेला दैनंदिन वृत्तांत पाहिला, तर त्यात ही हिरवी रेष नकाशावर मुंबईच्या खाली म्हणजेच साधारण रत्नागिरीच्या आसपास दाखविलेली दिसते. यावरून असे दिसते की मान्सूनने अगदी तीन ते चार तासांत मुंबईपर्यंत मजल मारली. म्हणूनच दुपारी १ च्या आतच याचा सर्वच माध्यमांमध्ये गवगवा झाला आणि मान्सूनच्या आगमनाचा ‘चॅनेली’ आनंदही साजरा करण्यात आला.हे सगळं सुरू असताना मुंबईच्याच जवळ असलेल्या ठाणे जिल्ह्यातील एक बातमी लक्ष वेधून घेते. ठाणे जिल्ह्यात खरिपात प्रामुख्याने भाताचे पीक घेतले जाते. मान्सूनचा पुरेसा पाऊस झाला की वाफे तयार करतात. यंदा काही दिवसांपूवी ‘वायू’ वादळाच्या प्रभावाने मुंबई परिसर व ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस झाला. त्यानंतर जमिनीत जो काही ओलावा आला त्यावरच शेतकर्‍यांनी पेरण्या केल्या. त्यानंतर पाऊस पडलाच नाही. आता स्थिती अशी आहे की ही भातपेरणी वाया जाते की काय अशी भीती शेतकर्‍यांना वाटत आहे. कारण तेव्हा जो पाऊस झाला, त्यानंतर पाऊस पडलाच नाही. परिणामी भाताच्या वाफ्यांना पाणी कुठून द्यायचे असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर आहे. हीच स्थिती साधारणत; धुळे आणि जळगाव जिल्ह्यात आहे. तिथेही शेतकर्‍यांनी हवामान खात्याच्या अंदाजावर विश्वास ठेवून पडेल त्या पावसात मक्याची पेरणी केली. आता त्यांच्यापुढे दुबार पेरणीचे मोठे संकट उभे ठाकले आहे. काही दिवसांपूर्वीच कृषी विभागाने ८० ते १०० सेंमी. पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नका, असा आगाऊ सल्ला दिल्यानंतरही या गोष्टी घडल्या. याचे कारण शेतकर्‍यांमध्ये उडालेला गोंधळ. तो म्हणजे पाऊस मान्सूनचा आहे की पूर्व मान्सूनचा आहे. त्यासाठी कारणीभूत ठरला तो हवामान विभागाचा तथाकथित अंदाज. वायू चक्रीवादळापूर्वी जो पाऊस पडला, त्याला त्यांनी वळीवाचा किंवा मान्सूनपूर्व पाऊस म्हटले. दरम्यान, त्याच काळात मान्सूनच्या आगमनाचीही चर्चा होती. ८ जूनला मान्सून केरळमध्ये दाखल झाला, असे सांगण्यात आले, पण वस्तुस्थिती मात्र याच्या उलट होती. जे काही थोडेफार अभ्यासू आणि कळकळीचे हवामानतज्ज्ञ आहेत, ते सांगत होते की हा मान्सूनचा पाऊस नाही. मान्सूनचे आगमन झालेलेच नाही. खरे तर त्याला आभासी मान्सून असल्याचे या अभ्यासकांनी म्हटले होते. साधारणत: १० मे नंतर मिनिकॉय, अमिनी, थिरुअनंतपुरम, पुनालूर, कोल्लम, अल्लापुझ्झा, कोट्टयम, कोची, त्रिसूर, कोझिकोडे, थालासेरी, कन्नूर, कुडुलू आणि मंगलोर या वेधशाळांच्या क्षेत्रापैकी किमान आठ ठिकाणी सलग दोन दिवस २.५ मि.मी. किंवा त्याहून अधिक पाऊस पडल्यास केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले, असे जाहीर केले जाते. यंदा अरबी समुद्रात ‘वायू’ नावाचे चक्रीवादळ तयार होत असताना बाष्प ओढले गेल्याने केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याचा आभास निर्माण झाला. म्हणूनच हा तो आभासी मान्सून ठरला. याबद्दल ‘आपलं महानगर’ने वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध करून शेतकर्‍यांना सावध केले आहे. इतकेच नव्हे, तर आम्ही आमच्या मागच्या संपादकीयातदेखील हवामान अंदाजाबद्दलची एकूणच वस्तुस्थिती मांडली होती. तथापि हा विषय शेतकरी आणि सामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा असल्याने आज पुन्हा या विषयावर मांडणी करत आहोत. याचे कारण म्हणजे मान्सून आणि मान्सूनपूर्व बद्दल जो गोंधळ सध्या निर्माण केला जातोय, त्यातून शेतकर्‍यांना दुबार पेरणी करावी लागू नये आणि त्यांचे नुकसान होऊ नये, अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे.अलीकडच्या काही वर्षातील मान्सूनच्या आगमनाच्या आणि तो सक्रिय झाल्याच्या तारखा पाहिल्या, तर असे लक्षात येते की आताचा मान्सून पूर्वीसारखा राहिला नाही. म्हणजेच त्याचा ‘पॅटर्न’ बदलत चालला आहे. तो परंपरेप्रमाणे आता १ जूनलाच केरळमध्ये दाखल होत नाही. मात्र, अनेकदा हवामान विभागाकडून ‘मान्सून’चा पॅटर्न’ बदलत असल्याने पावसाला उशीर झाला हे सोयीस्करपणे लपवून ‘हा हवामान बदलाचा परिणाम आहे’, असे सर्रास सांगितले जाते. हवामान अभ्यासक सांगतात की दीडशे वर्षांपासून ही बदलाची प्रक्रिया सुरू आहे. त्याचा परिणाम म्हणून वार्‍यांची दिशा बदलली आहे, वेळही बदलली आहे. खारे वारे आणि मतलई वारे यांच्या दिशेत आणि वेळेत बदल झाला आहे. त्यामुळेच जूनमध्ये ज्याला मान्सून संबोधले जाते, तो मान्सूनचा पाऊस नसून पूर्व मान्सून असल्याचे या हवामान अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार पूर्व मान्सून किंवा मान्सूनपूर्व पावसाचे महत्त्वाचे लक्षण म्हणजे हा पाऊस पडताना विजा कडाक्याचा आवाज करत चमकतात आणि ढगांचा गडगडाट होतो. अनेकदा वीज पडून जीवित आणि मालमत्तेची हानीही याच पावसामुळे झाल्याची कितीतरी उदाहरणे घडलेली आहेत. शिवाय ढगांचे पुंजके दिसणे, पावसानंतर ऊन पडणे ही लक्षणेही पूर्व मोसमी पावसाची असतात. म्हणूनच दोन दिवसांपूर्वी मराठवाडा परिसरात जो पाऊस पडला, तो पूर्व मोसमी समजायला हरकत नाही. त्याला मान्सून समजून पेरण्या केल्या आणि नंतर पावसाने अनेक दिवस ताण दिला, तर शेतकर्‍यांचे नक्कीच नुकसान होऊ शकते. मात्र, हवामान खात्याला त्याच्याशी काही सोयरंसुतक नसल्याचे दिसते. त्यांना सध्या १५ जुलैपर्यंत हा मान्सून थेट जम्मू कश्मीरपर्यंत पोहोचविण्याची आणि तिथून त्याला परत माघारी बोलावण्याची घाईच झालेली दिसते. त्यासाठीच ते दररोज ‘मान्सून प्रोग्रेस’ अहवालातील भारताच्या नकाशावर हिरव्या रेषा ओढण्याची सध्या कार्यकत्परता दाखवित आहेत. अर्थात यामागचे कारण आम्ही मागच्या संपादकीयात दिले आहेच. ते पुन्हा थोडक्यात सांगत आहोत. सध्या पावसाळी अधिवेशनाच्या काळात सत्ताधारी पक्षांचे राजकीय हितसंबंध जोपासणे, शेअर मार्केट, बियाणे, खते कंपन्यांचे हितसंबंध जोपासणे यासाठीच तर हा आटापिटा केला जात असल्याचे आरोप अनेकदा हवामान खात्यावर झालेले आहेत. त्यात तथ्य यासाठी आहे की अनेकदा चांगल्या पावसाचे अंदाज प्रसिद्ध झाल्यानंतर त्याप्रमाणे पाऊस येतोच असे नाही, उलट चांगल्या पावसाच्या अंदाजानंतर दुष्काळही पडलेला आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आता शेतकर्‍यांनी सावधानता बाळगली पाहिजे. ज्यांची कोरडवाहू शेती आहे, त्यांनी जोपर्यंत आकाशात खरंचे काळे ढग येऊन १०० मिमी पाऊस येणार नाही आणि आपल्या जमिनीला वाफसा येणार नाही, तोपर्यंत तरी पेरण्या करू नये. अन्यथा दुष्काळामुळे होरपळून निघालेल्या शेतकर्‍यासाठी हवामान खात्याने कागदोपत्री आणलेला हा ‘बिन पावसाचा’ मान्सून हानीकारक ठरायचा !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -