Thursday, January 14, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स नैतिकतेच्या नावानं चांगभलं...

नैतिकतेच्या नावानं चांगभलं…

Related Story

- Advertisement -

भौतिक सुखं वाढली की असं म्हणतात की नैतिकता हळूहळू कमी होऊ लागते. खरंतर भौतिक सुखांच्या वाढीबरोबर माणसातील नैतिकता ही वाढली पाहिजे अशी अपेक्षा असणे काही गैर आहे असे नाही. मात्र जे होत असते ते याच्या पूर्णपणे उलटे होत असते. गरीब माणूस श्रीमंत झाला की तो पैशाने जरूर श्रीमंत होतो, मात्र त्याचबरोबर सद्गुणांनी, चांगल्या संस्कारांनी आणि कायद्याच्या पालनाने श्रीमंत होतोच असे नाही. उलटपक्षी हातात चार पैसे खेळू लागले की त्याला जग खिशात घेतल्याचा एक विकृत आनंद मिळू लागतो आणि मग पैशाच्या बळावर आपण कोणालाही खरेदी करू शकतो अशीच विकृत भावना ही हळूहळू माणसांमध्ये जोर धरू लागते. मात्र या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात नैतिकता आणि सुसंस्कार सद्गुण खरेदी करता येत नाहीत याचे मात्र त्याला सोयीस्करपणे विस्मरण होते आणि त्याचा नेमका घात होतो.
महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील कथित आरोप आणि या खर्‍या खोट्या आरोपांना मुंडे यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून अर्थात सोशल मीडिया वरून दिलेले सविस्तर विश्लेषणात्मक उत्तर हे बरेच काही सांगून जाणारे आहे. या प्रकरणाबाबत मुंडे दोषी आहेत की नाहीत याचा योग्य तो निवडा संबंधित यंत्रणा आहेत त्या कायद्याच्या आधारावर करतीलच. त्यामध्ये प्रसारमाध्यमांनी किंवा अगदी समाज माध्यमांनी न्यायाधीशाची भूमिका घेण्याचे काहीच कारण नाही. मुंडे यांनी संबंधित महिलेबाबत जी काही भूमिका त्यांच्या सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या स्वतःच्या मनोगतात मांडली आहे ती कितपत खरी आहे अथवा काय याबाबतही संबंधित यंत्रणा तपास करण्यास सक्षम आहेत त्यामुळे त्यामध्येही प्रसारमाध्यमांनी नाक खुपसण्याचे काही कारण नाही. मात्र इथे प्रश्न जो उभा राहतोय तो केवळ धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मनोगतामध्ये जे काही सविस्तरपणे मांडले आहे ते खूप काही बोलके आहे. त्यामुळे मुंडेंच्या या मनोगताविषयी मात्र बरीच काही मतमतांतरे असू शकतात. धनंजय मुंडे यांनी स्वतःचा त्यांच्या फेसबुकसारख्या एका मजबूत समाज माध्यमावर त्यांची ही भूमिका मांडल्यामुळे त्याबाबत चर्चा होणे, विचारविमर्श होणे, उहापोह होणे हे क्रमप्राप्त आहे.

याबाबत आधी धनंजय मुंडे यांनी त्यांच्या फेसबुक या समाज माध्यमांमधून नेमकं काय व्यक्त केलं आहे ते त्यांच्याच शब्दात समजून घेणं आवश्यक आहे. धनंजय मुंडे असं म्हणतात की समाजमाध्यमांमध्ये माझ्याविरुध्द होणारे आरोप पूर्णपणे खोटे, बदनामी आणि ब्लॅकमेल करणारे आहेत. कालपासून समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्रे प्रसारित होत असल्याचे तसेच मीडिया व सोशल मीडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. सदर प्रकरणी रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. माझ्याविरुद्ध काही तक्रार केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो. हे सर्व आरोप खोटे असून माझी बदनामी करणारे आणि मला ब्लँकमेल करणारे आहेत असे मुंडे यांचे म्हणणे आहे. रेणु शर्मा ही करुणा शर्मा यांची सख्खी लहान बहीण आहे. तसेच यानंतर त्यांनी करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. दोन्ही मुलांना मी माझे आडनाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांचा पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे. करुणा शर्मा नावाची महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे, मी त्यांना विमा पॉलिसी व त्यांच्या भावाला व्यवसाय सुरू करण्यास मदत केलेली आहे. या सर्व गोष्टी मी सद्भावनेने केलेल्या आहेत, अशी स्वतः कबुली दिली आहे. जो प्रश्न उपस्थित झालेला आहे तो धनंजय मुंडे यांनी कायदेशीररित्या दुसरे लग्न केले की नाही? असं नाहीच आहे. त्याबाबतचा धनंजय मुंडे यांनी कायद्याचा भंग केला की नाही त्याबाबत त्यांना काय शिक्षा होईल, त्यामध्ये ते दोषी आहेत का नाहीत याचा निर्णय घेण्यास न्यायालय आणि संबंधित यंत्रणा या सक्षम आहेत. इथे प्रश्न नैतिकतेचा आहे.

- Advertisement -

जी नैतिकता सामान्य माणसाला लागू असते तीच राज्य सरकारमधील एका जबाबदार मंत्र्यालाही लागू असली पाहिजे अशीच सर्वसामान्यांची इच्छा आणि अपेक्षा असते. त्यामुळेच धनंजय मुंडे यांनी याप्रकरणात दिलेला कबुलीजबाब हा सर्वसामान्यांना धक्का देणारा आहे. त्यात त्यांचे हे दुसरे प्रेमसंबंध त्यांच्या कुटुंबियांना माहिती होते आणि ते त्यांनी स्वीकारले हे जे मुंडे यांनी सांगितले आहे ते तर अधिक गंभीर आणि नैतिकतेला मोठा तडा देणारे आहे. भारतीय विवाह कायद्यानुसार मुंडे हे कायदेशीरदृष्ठ्या योग्य असतीलही मात्र त्यांचे याबाबतीतले वर्तन हे नैतिकतेच्या दृष्टीने क्षमा करण्याजोगे नक्कीच नाही. कोणती पत्नी पतीचे दुसर्‍या अन्य स्त्रीबरोबर असलेले अशा प्रकारचे संबंध स्वखुशीने स्वीकारेल याचे उत्तर नैतिकतेच्या कसोटीवर मुंडे यांनी समाजाला नाही तर स्वतःच्या कुटुंबाला व पत्नीला देण्याची खरी गरज आहे.
त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरती तिसर्‍या महिलेने कोणते आरोप केले? ते खरे आहेत का खोटे आहेत हा भाग निराळाच राहिला. त्या महिलेने याबाबत मुंबई पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला आहे त्याचा योग्य तो निर्णय घेण्यास पोलिस यंत्रणा आणि सरकार सक्षम आहे. तसेच या तिसर्‍या महिलेस न्यायालयातही याबाबत दाद मागता येऊ शकते. त्यामुळे तिसर्‍या महिलेचा जो काही आरोप आहे तो खरा की खोटा याची शहानिशा संबंधित यंत्रणा करतीलच. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणता निर्णय घेतात याकडेही राज्यातील जनतेचे लक्ष आहे. आणि त्यातही विशेषत: राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे त्यांच्या पक्षातील एका जबाबदार मंत्र्याच्या अशा वर्तणुकीबाबत नेमकी कोणती भूमिका घेतात याकडेही राज्यातील सर्वसामान्य जनता लक्ष ठेवून आहे. धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांची बाजू मांडल्याचे समोर आले आहे. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिक्रिया वगळता पक्षाध्यक्ष म्हणून शरद पवार यांची व मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची कोणती प्रतिक्रिया या प्रकरणावर व्यक्त झालेली नाही. या मौनाचा राज्यातील सर्वसामान्य जनतेने नेमका कोणता अर्थ घ्यायचा याचाही खुलासा एकदा शरद पवार यांनी करावा एवढीच अपेक्षा राज्यातील जनता बाळगून आहे.

- Advertisement -