घरताज्या घडामोडीसांगा कसे जगायचे?

सांगा कसे जगायचे?

Subscribe

आता निसर्ग मुळावर आल्याने कोकण मुळासकट हादरले आहे.

कोकण किनारपट्टीला निसर्ग वादळाच्या बसलेल्या जोरदार तडाख्याच्या बातम्या आता एकामागून एक येऊ लागल्या आहेत आणि त्या ऐकून रायगड आणि रत्नागिरीच्या माणसांपुढे जगायचे कसे असा प्रश्न उभा राहिला आहे. होत्याचे नव्हते करून हे वादळ निघून गेले असले तरी आता कोकण परिसर दहा वर्षे मागे पडलाय…२००९ साली झालेल्या ‘फयान’ वादळाने कोकणाला हादरवले होते. त्यामधून सावरत गेली दहा वर्षे पुन्हा हा भाग सावरत असताना ‘निसर्ग’ मुळाशी आले आणि पुन्हा एकदा होत्याचे नव्हते करून कोकणाला या वादळाने एक दशक मागे ओढून नेले. नारळ, आंबा, सुपारी, कोकम, फणस, आवळे अशी नगदी पिके या भागात घेतली जातात. येथील शेतकरी आणि बागायतदार यांचे सर्वांचे आर्थिक गणित याच पिकांवर अवलंबून असून या सर्व पिकांच्या वाढीसाठी आणि त्यामधून येणाऱ्या उत्पन्नासाठी किमान १० वर्षांचा कालावधी लागत असल्याने आधी फयान आणि आता निसर्ग यामुळे कोकणचे शेतकरी एकूण २० वर्षे मागे फेकले गेले आहेत. निसर्गचे तांडव फक्त दोन तास चालले. या दोन तासांत मुलाबाळांसारखी वाढवलेली हजारो झाडे मुळांसकट उन्मळून पडली. काही झाडे घरांवर पडली असून बऱ्याच लोकांच्या डोक्यावर आता छप्परही उरलेले नाही. आयुष्यभर काबाडकष्ट करून उभे केलेले वैभव डोळ्यासमोर भुईसपाट होताना त्या शेतकऱ्याच्या काय भावना असतील, ते येथे शब्दात व्यक्त करता येणार नाही. या वादळामुळे दोन चार माणसे या जगात उरली नसतील, पण मागे जी हजारो माणसे राहिली आहेत त्यांचे दुःख अपरिमित असे आहे. आज उद्धवस्त झालेल्या झाडांनी तीन पिढ्या पाहिल्या होत्या. ४०-५० वर्षे उत्पन्न देणारी ही झाडे दोन तासात नाहीशी होतात, ही काळीज चिरणारी गोष्ट धीराच्या दोन शब्दांनी कशी भरून येतील? ही झाडे आज या भागातील शेतकरी कुटुंबाच्या जीवनाचा एक भाग होती.

शेतकऱ्याचे कष्ट निसर्गने मातीत घातले असताना मच्छिमारांची घरे उघड्यावर पडली आहेत. उडालेली कौले, मोडलेले पत्रे, ढासळलेल्या भिंती यामुळे आता पावसात राहायचे कुठे असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. या घडीला शाळा, समाज मंदीर, देवळे अशा ठिकाणी ते मुलाबाळांसकट आसऱ्याला आले आहेत, पण जेव्हा धो धो पावसाला सुरुवात होईल त्यावेळी ते पुढचे चार महिने राहणार कसे, जगणार कसे? कोकणातला पाऊस हा एकदा कोसळायला लागला की दोन तीन दिवस धो धो ओतत असतो, अशा वेळी डोक्यावर छप्पर नसेल तर जगणे कठीण होऊन बसेल. किनाऱ्यांवर असलेल्या घरांबरोबर मासेमारी करणाऱ्यांच्या होड्या, जाळी आणि वाळत घातलेले मासे सर्व नष्ट झाले आहे. घरांबरोबर जगण्याची त्यांची सर्व साधने वाऱ्याने समुद्रात भिरकावून दिली असताना ते सुद्धा शेतकऱ्यांबरोबरच दहा वर्षे मागे गेले आहेत. गेली काही वर्षे कोकणातील शेतकरी, बागायतदार आणि मच्छिमारांनी आपला पारंपरिक व्यवसाय सांभाळून पर्यटन व्यवसायावर भर दिला होता. रायगड तसेच रत्नागिरीमधील अलिबाग, रेवदांडा, चौल, काशिद, मुरुड, श्रीवर्धन तसेच रत्नागिरी येथील हरिहरेश्वर, आंजर्ले, कोलथरे, हर्णे- मुरुड, वेळास, आंजर्ले हे समुद्र किनारे देशी पर्यटकांनी गजबजून गेले आहेत. आपली घरे, घरांसमोरील जागा निवासस्थाने करून आणि घरगुती लज्जतदार कोकणी जेवणाने पर्यटकांचे तन मन कोकणी बांधवांनी जिंकले आहे. विशेषतः यासाठी महिलांनी पुढाकार घेऊन आपल्या घरी पर्यटन केंद्र उभारली. कोकणी माणूस फटकळ, त्याला धंदा व्यवसाय करता येत नाही, वाढवता येत नाही या साऱ्या जुन्या शिक्यांना पुसून काढताना कोकणी भगिनींनी काबाड कष्ट करून उभारलेली पर्यटन घरे आज वादळाने नाहीशी केली आहेत. हा खिशात हमखास दोन पैसे देणारा व्यवसाय मोडून गेला आहे. करोनाने आधीच अडीच महिने पर्यटकांनी पाठ फिरवली होती, त्यात आता निसर्ग मुळावर आल्याने कोकण मुळासकट हादरले आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्याचा दौरा करत १०० कोटींची तातडीची मदत करत या जिल्ह्याला तात्पुरता आधार दिला आणि नंतर रत्नागिरीला तेवढीच मदत केली असली तरी वादळाने उडवलेला हाहाकार बघता या नुकसानीचा आकडा १ हजार कोटींच्या घरात जाण्याची दाट शक्यता आहे. या दोन्ही जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी आज या भागांमध्ये फिरत असून त्यांनी केलेला हा नुकसानीचा आकडा आहे. मात्र करोनामुळे आधीच राज्याचे अर्थचक्र रुतले असताना त्यातून आताच १ हजार कोटींची मदत मिळणे तात्काळ तरी शक्य दिसत नाही. पण, ठाकरे  सरकार कोकणाच्या प्रती सकारात्मक दिसत आहे, ही गोष्ट आशादायक आहे. कारण भाजपसारख्या पॅकेजच्या कोटी कोटींच्या घोषणा करून प्रत्यक्षात लोकांच्या पदरी काही पडणार नसेल तर आधी छोटी छोटी मदत करत नंतर ती गरज पडेल तशी वाढवत नेणे कधीही चांगले. मुळात एखाद्या घटनेकडे पाहण्याचा सरकारचा दृष्टिकोन खरा असायला हवा, आकड्यांच्या खोट्या खेळाने तो बुद्धीभ्रम करणारा नसावा. उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ठाकरे सरकारचे आधार शरद पवार हे सुद्धा रायगड दौऱ्यावर आहेत. इतक्या वर्षांचा दांडगा अनुभव तर त्यांच्याकडे आहेच, पण अनेक नैसर्गिक आपत्ती पवार यांनी जवळून पाहिल्या आहेत. ते निसर्ग वादळाने केलेल्या नुकसानीचा नीट अंदाज घेऊन उद्धव यांच्याशी बोलतील आणि रायगड- रत्नागिरीतील लोकांना त्यांच्या पायावर पुन्हा एकदा उभे करण्यासाठी पुढचे पाऊल टाकतील, अशी आशा आहे. आता या घडीला उद्धवस्त झालेल्या कोकणातील लोकांना घरांवर छप्पर घालण्यासाठी पत्रे, कौले याची तातडीने गरज आहे. दुसरीकडे युद्ध पातळीवर विजेचे खांब उभे केले पाहिजेत. वादळानंतर या भागातील वीज गेली असून अंधारात दिवस काढावे लागत आहेत. घरात केरोसीन आणि मेणबत्त्या सुद्धा नाहीत.काळ्या बाजाराला चाप लावून आधी पत्रे, केरीसीन आणि मेणबत्त्या दिल्यास भर पावसात लोकांना आपल्या घरात आसरा मिळेल. शिवाय तातडीने पंचनामे झाल्यास निसर्गग्रस्त्यांच्या खिशात दोन पैसे येतील आणि बेफान पावसात जगण्याचा त्यांना आधार मिळेल. कोकणातील लोकांच्या जगण्याच्या खूप मोठ्या अपेक्षा कधीच नव्हत्या. प्रतिकूल परिस्थितीत कसे जगायचे याचे त्यांना उपजत ज्ञान आहे. पण, आता त्यांचे सर्वस्व नाहीसे झाले असताना सरकारबरोबर सामाजिक संस्था, मंडळे, दानशूर व्यक्ती आणि मुंबई, ठाणे, नवी मुंबई,  पुणे, नाशिक अशा शहरात राहणाऱ्या माणसांनी मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे. तुमची एक मेणबत्ती रायगड- रत्नागिरीच्या लोकांच्या जीवनात अंधार दूर करायला मदत करेल…

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -