घरफिचर्सएका लग्नाची दुसरी गोष्ट...

एका लग्नाची दुसरी गोष्ट…

Subscribe

"बायचा उद्या लगीन करूया", या काकांच्या एका वाक्याने आम्हाला बॉम्ब फुटल्यासारखे झाले. सुरुवातीला कोणी काही बोलले नाही. आणि काकांनी हा प्रसंग पुढे नेला : " आत्मारामचा चेडू पळान गेला. त्याची काय चूक नाय. कोणाक काय कळाक नाय. चुडो ( हिरव्या बांगड्या) भरूक गेला ता घराकडे इलाच नाय. आत्माराम रडताहा. परबांचा नाक कापला गेला, पण अजून येळ गेलो नाय. एक दिस हा. आत्मारामान लग्नाची तयारी केलेली हा. ता सामानसुमान घेवन आपण बायक लग्नाक उभ्या करूया. तुम्ही काय येक डोक्याक हात लाव नको, मी आसय".

ही एका लग्नाची दुसरी गोष्ट… सत्यकथा आहे. मी आठवीत म्हणजे १३ वर्षांचा असताना घडलेली. मला ती अजूनही जशीच्या तशी आठवते. कालच घडल्यासारखी. स्वदेशी मिलच्या मागच्या बाजूला सायन चुनाभट्टीच्या डोंगरावर झोपडपट्टीत आमचे एकत्र कुटुंब परिसरातील मिल कामगारांच्या जोडीने या वस्तीत राहत होते. ऐशीच्या दशकातील त्या काळातील म्हणजे मिल संपाच्या आधीच्या पाच वर्षांपूर्वी घडलेल्या या गोष्टीचे पडसाद आजही आमच्या कुटुंबात पडतात. जेव्हा जेव्हा एखादी चांगली गोष्ट घडते तेव्हा ती दोन माणसे आमच्या समोर लख्ख पुढे येतात. समाज, कुटुंब बांधिलकीचे दोर घट्ट विणू पाहतात, जगण्याला नवा आयाम देतात. एक आता या जगात नाहीत. ते म्हणजे माझ्या वडिलांच्या सात भावांपैकी दोन नंबरचे काका आणि माझ्या सर्वात मोठ्या काकांची मोठी मुलगी सुषमा. आम्ही तिला बाय म्हणतो. जी आज आजी झालीय आणि तिचा नातू सातवीत आहे. तिच्या लग्नाची ही दुसरी गोष्ट…

चुनाभट्टीला आम्ही दहा बाय दहाच्या पत्र्याच्या झोपडीत तीन नंबर काकांच्या म्हणजे आमच्या अण्णांच्या सोबतीने १० जण एकत्र राहत होतो. अण्णा, ताई (काकीला आम्ही ताई म्हणायचो), बाळा, सरिता, शैलेश, ताईची आई हे एक कुटुंब आणि त्यांच्या जोडीने मी आणि माझे बाबा (भाई). सोबत मोठ्या काकांच्या दोन मुली बाय आणि संगीता. आता दहा बाय दहाचा मोठ्या ब्लॉकचा मोठा बाथरूम असतो आणि तो सुद्धा लोकांना कमी पडतो, हे मी बघितलंय. आपल्या त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंबाच्या पलीकडे जग नसणारी माणसे स्वतःच्या आई बाबांना सोबत ठेवू शकत नाहीत ती चुलत्यांची मुले सोबत ठेवून त्यांना पायावर उभे करण्याचा काळ हा आता माहिमच्या खाडीत वाहून गेला आहे. झोपडपट्टीतील दिवस गरिबीचे, पण आनंदाने जगण्याचे होते. एकमेकांना माणूस म्हणून समजून घेण्याचे होते. पण स्वतःला माणूस म्हणून घडवून घेण्याचे अधिक होते, हे मागे वळून बघताना मला स्पष्टपणे जाणवते…

- Advertisement -

अण्णा आणि भाई मिलमध्ये कामाला. ताई गारमेंटमध्ये नोकरीला, तर १८ वर्षांची बाय धारावीला झोपडपट्टीतल्या बायांबरोबर फॅक्टरीत कामाला जायची. ताईची आई घरी जेवण करायला आणि तिला मदत करून आम्ही सारी भावंडे शाळेत जाऊन घरकामात मदत करणार, अशी जगण्याच्या लढाईची कामे सर्वांनी वाटून घेतली होती. या लढाईतील दोन कामे आठवली तर माझ्या अंगावर काटा उभा राहतो. पाहिले काम म्हणजे पाणी भरण्याचे. डोंगरावरून उतरून दररोज हे काम करायला लागायचे. मोठे हंडे घेऊन दहा मिनिटे खाली उतरून नळावर नंबर लावायचे आणि अर्ध्या तासाने आपला नंबर आला की डोक्यावर मोठा हंडा घेऊन डोंगर वर चढून जायचे. मध्येच सार्वजनिक संडासची टाकी भरलेली असे, त्याच्यातील घाण पाणी ओलांडून झाले की मोठ्या दगडांच्या पायर्‍या जिवाच्या आकांताने पार करत पाणी भरावे लागे. यासाठी आमच्यावर सुपरवायझर होती ती संगीता. उंचपुरी आणि धिप्पाड संगीता. हा हा म्हणता डोंगर तुडवून पाणी भरायची आणि आम्हाला धापा लागायच्या आणि दोन एक दिवसांनी हंड्यासकट आमची गुठडी पडायची.

हंडा चेपायचा, मुका मार बसायचा, पण त्यापेक्षा संगीताचा पाठीत मोठ्याने धपाटा पडायचा. धो धो पावसात पाणी भरणे आताच्या भाषेत स्टंट करण्यासारखे होते. हे कमी म्हणून की काय आठवड्याने डोक्यावर गव्हाचे मोटले घेऊन डोंगर तुडवत दूर एक तासांच्या अंतरावर कुर्ला कसाईवड्यातील गिरणीवर दळण करून घेऊन यायचे. ५ पैशात एक किलो दळण दळून मिळायचे म्हणून हा द्राविडी प्राणायाम करायला लागायचा. पण, संगीता वाचलेल्या पैशातून आम्हाला आईसफ्रुट आणि भेळ घेऊन द्यायची. दिवस गरिबीचे असले तरी आनंदाचे होते. एकमेकांना समजून घेत मोठे होण्याचे होते. अण्णा, भाई, ताई, सुषमा जगण्याच्या लढाईत उतरून आमचे एकत्र कुटुंब जगवत असताना अचानक एके दिवशी विक्रोळीहून आमच्या दोन नंबर काकांची एन्ट्री झाली. तो नाटकातील एखादा प्रवेश असावा, अशी ती एन्ट्री होती. पण खर्‍याखुर्‍या जिवंत नाटकाची!

- Advertisement -

माझे हे काका म्हणजे समाजसेवक कसा असावा हे जिवंत उदाहरण. मिलमध्ये नोकरीला आणि काँग्रेसच्या मिल मजदूर संघाचे वरिष्ठ पदाधिकारी. कमी उंची, बारीक शरीर, डोळ्यावर चष्मा, काखेला झोळी आणि त्यात पेपर, चॉकलेट्स, विडीचे बंडल आणि माचीस. खिशात फार पैसे नाहीत, पण आत्मविश्वास पुरेपूर. मुख्य म्हणजे अतिशय प्रामाणिकपणा आणि कायम कुटुंबाबरोबर गावचा समाज, मिल कामगारांच्या भल्याची चिंता. फक्त आमचे वेंगुर्ले गाव नव्हे तर कोकणातील कित्येक गावांशी त्याचा थेट संबंध होता. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे निष्ठावंत कार्यकर्ते. माझ्या या काकांनी कोकणातील शेकडो लोकांना मुंबईत आणून नोकरीला, पेजेपाण्याला लावले. त्यांना आपल्या पायावर उभे केले. हे काका आले समजले की आम्ही भावंडे एकत्र येऊन त्यांच्या झोळीकडे पाहत असो आणि चॉकलेट वाटण्याचा कार्यक्रम झाला की मोठी माणसे बोलू लागत. त्या दिवशी सकाळीच घरी आलेल्या काकांचा चेहरा काहीसा गंभीर होता. आमच्या चुलत काकांची मोठी मुलगी लग्नाच्या आदल्या दिवशी आपल्या प्रियकराबरोबर पळून गेली होती. प्रसंग बाका होता. चुलत काकांनी ही बातमी सांगितल्यानंतर तातडीने भावबंधांची बैठक लालबागला झाली. आणि काका तिकडून काही ठरवून आपल्या भावांबरोबर बोलायला आले होते. खरेतर त्यांनी निर्णय घेतला होता, फक्त त्यांना तो सांगायचा होता. “बायचा उद्या लगीन करूया”, या काकांच्या एका वाक्याने आम्हाला बॉम्ब फुटल्यासारखे झाले.

सुरुवातीला कोणी काही बोलले नाही. आणि काकांनी हा प्रसंग पुढे नेला : ” आत्मारामचा चेडू पळान गेला. त्याची काय चूक नाय. कोणाक काय कळाक नाय. चुडो ( हिरव्या बांगड्या) भरूक गेला ता घराकडे इलाच नाय. आत्माराम रडताहा. परबांचा नाक कापला गेला, पण अजून येळ गेलो नाय. एक दिस हा. आत्मारामान लग्नाची तयारी केलेली हा. ता सामानसुमान घेवन आपण बायक लग्नाक उभ्या करूया. तुम्ही काय येक डोक्याक हात लाव नको, मी आसय”. काका बोलत होते. शेवटी अण्णा म्हणालेच, “रे काका, ता लहान असा. त्याका असा अचानक सांगला तर काय होयत आणि त्याच्या आवशीक गावात कोण सांगतलो. ती गाव डोक्यार घेतली”. काका शांत होते. ” वामन आणि गणपत तुम्ही बाकी काय होताला ह्या माका सांगा नको. जा काय होयत त्याका पुढो जावक मी तयार असय…” आणि सोबत आपल्या भावांना आणि बायला घेऊन काका विक्रोळीला निघाले.

कोणाला हासभास नसताना बायचं लग्न उद्या आहे ही बातमी झोपडपट्टीत आणि गावात वेंगुर्ल्यात पसरली. बायची आई आमची मोठी काकीला हा निर्णय पसंत नव्हता. गावाला शेतीला असणारा नाना काकाही चिडीचूप झाला. संध्याकाळी लालबागवरून आत्मारामकडून लग्नाचे सामान आणले गेले. एकही दागिना नव्हता. पण, दागिन्यांपेक्षा मोठ्या किंमतीची माणसे काकांच्या रुपात होती आणि ती बायच्या गळ्यात उद्या हिरे होऊन चमकणार होती… ज्या मुलाबरोबर लग्न ठरले होते तो मुलगा आणि त्याच्या घरची माणसे या बिकट प्रसंगात अतिशय समजूतदार निघाली. काकांनी भावबंध सोबत घेऊन झाला प्रकार त्यांच्या कानी घातला. काका त्यांना म्हणाले, “लग्न ठरल्याप्रमाणे होणार. पत्रिका तीच, वेळ तीच, हॉल तोच, आपण दोन्हीकडची माणसेही तीच. फक्त मुलगी आत्मारामाची नाही.

माझी पुतणी सुषमा. गोरीपान, नाकी डोळी सरस आहे. कामाला जाते, जेवण येते आणि एकत्र कुटुंबात राहणारी आहे. आम्ही तयार आहोत, तुमचे काय ते बोला”. काकांनी अतिशय कठीण प्रसंगातून मार्ग काढला होता. बाय दिसायला सुंदर असल्याने तिला नकार देण्याचा प्रश्न नव्हता. पण, तेव्हा काही चुक नसताना झाल्या प्रकाराने धक्का बसलेल्या मुलांकडच्यांनी मालणकर परिवाराने अतिशय समजूतदारपणा दाखवला. आमच्या भावजींचे बाबा खूप मोठ्या मनाचा माणूस होता. “काका माझो तुझ्यार ईस्वास आसा. कोण आपली पुतणी अशा टायमाक उभी करीत? घरची आणि दारची पर्वा न करता तू जा काय ठरलंय त्याका आमची तयारी आसा. लग्न उद्या होताला. आम्ही येतो, तुम्ही तयारीक लागा”.

बायचे लग्न ठरल्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी झाले. साखरपुडा, हळद आणि लग्न एकाच दिवशी झाल्याने आमची बाय दमून गेल्यासारखी होईल, असे वाटत होते. पण, तिचा चेहरा उजळला होता. त्या दिवशी दोन माणसांचे चेहरे नेहमीपेक्षा अधिक चमकदार दिसते. एक काका आणी दुसरी सुषमा. काका आत्मविश्वासाने बहरून आले होते आणि अनपेक्षित प्रसंगातही आपल्या आयुष्यात पुढे सोनेरी क्षण येणार आहे, याची चाहूल लागून बायचा चेहरा फुलला होता…बायचे यजमान हे टेलिफोनमध्ये नोकरीला तर होतेच, पण मॅट्रिक शिकलेले होते. मालणकर घराणे सुशिक्षित आणि समजूतदार होते. या कुटुंबात जाऊन बाय जाणती झाली आणि सासूनंतर घरातील कर्ती बाई झाली. तिला तीन मुले झाली आणि आज तिच्या मोठ्या मुलीचा मुलगा सातवीत आहे. चुनाभट्टीत आमच्या बरोबर वाढलेल्या बायचा नवरी ते आजी हा प्रवास बघताना मला माणसाच्या जीवनात अनपेक्षित प्रसंगाने किती मोठा बदल होऊ शकतो याची जिवंत गोष्ट सापडते.

ठरवून बर्‍याच गोष्टी चांगल्या होतही असतील, पण जीवनाला अनपेक्षित कलाटणी देणार्‍या त्या क्षणांचे साक्षीदार होऊन आयुष्य गुलमोहराने बहरून जावे, असे क्षण माणसांच्या आयुष्यात फार कमी येतात…बाय स्थिरस्थावर होत असताना आत्माराम काकांच्या मुलीच्या नशिबी संघर्ष आला. तिने ज्याच्या बरोबर पळून जाऊन लग्न केले तो त्या भागातील गुंड होता. लग्न होऊन काही वर्षे होत नाही तोच त्याची हत्या झाली. त्याच्या राहत्या घरच्या समोर तलवारीने वार करून त्याला ठार मारण्यात आले. मुले पदरी घेऊन ती पुढे उभी राहिली तरी शेवटपर्यंत तिच्या जगण्याची लढाई संपली नाही. लग्नाच्या आदल्या दिवशी तिने त्याला नकार दिला असता तर कदाचित ती सुखी झाली असती किंवा नसतीही. जगण्याचे हे भोग घेऊन पुढे तिने ठरवलेले लग्न करून आपल्याबरोबर कदाचित ज्या मुलाची काही चूक नव्हती त्याच्या आयुष्याला वेदनाही दिल्या असत्या… या जर तरच्या गोष्टी झाल्या.

या कठीण प्रसंगी देव, नियती आणून आपण सामान्य माणसे माणसांच्या हिमती प्रयत्नांना कमी करण्याचा प्रयत्न करते झालो असतो. पण, मला तरी तसे मुळीच वाटत नाही.

खरंतर एका लग्नाच्या या दुसर्‍या गोष्टीचे नायक आमचे काका होते. त्यांनी घरच्या लोकांचा तात्कालिक विरोध मोडून काढत तो निर्णय घेतला नसता तर बायचे जगणे इतके सुंदर झाले असते…? मी आज विचार करतो तेव्हा मला नाही असेच उत्तर सापडते. ठरवून, पत्रिका बघून, देवाला कौल लावून अशी जोडी जमली नसती, ती काकांनी जमवली. आज ते हयात नाही, पण आमच्या एकत्र कुटुंबाला बांधून ठेवून त्यांचे जीवन सुखी होण्यासाठी त्यांनी टाकलेली पावले आज काळाच्या पुढे जाऊन निर्णय घेणारी ठरली… समाज शिक्षित होऊनही अंगठी-खडे, धागे-दोरे, बाबा-बुवा यांच्या गराड्यात गुरफटलेला पाहताना हाडामासाचा माणूस म्हणून मला जगण्याची लाज वाटते तेव्हा काकांसारखी डोंगराएवढी मोठी माणसे डोळ्यासमोर येतात आणि जगणे सहजसोपे होऊन जाते…

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -