घरफिचर्सआनंद दिघे ते एकनाथ शिंदे...

आनंद दिघे ते एकनाथ शिंदे…

Subscribe

एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील दरेगावातले. ठाणे शहरातच त्यांनी शिक्षण पूर्ण केले. या दरम्यान मराठी माणसांच्या हक्कासाठी लढणार्‍या शिवसेनकडे ते आकर्षित झाले. त्या काळात संपूर्ण ठाण्याचे जिल्हाप्रमुख म्हणून दिवंगत आनंद दिघे यांच्यावर जबाबदारी होती. एक निष्ठावंत कार्यकर्ता, शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंवर जीवापाड प्रेम करणारा झपाटलेला कार्यकर्ता अशीच ओळख त्यावेळी सर्वत्र आनंद दिघेंची होती. याच काळात दिघे यांची शिंदेंसारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर नजर पडली. ठाण्यात एकदा साखरेचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याचा प्रसंग घडला होता. यावेळी दिघे यांनी शिंदे यांच्यावर थेट कारखान्यात जाऊन साखर घेऊन येण्याची जबाबदारी सोपवली होती. प्रचंड धोकादायक परिस्थितीतून ते एक ट्रक घेऊन गेले. जबाबदारीने ट्रक चालकाच्यावर असलेल्या लाकडी खणात पैसे सांभाळून नेले. कारखान्यात सुरक्षित साखऱ आणून ठाण्यात वाटण्याची जबादारी त्यांनी व्यवस्थित पार पडली. या प्रसंगाने त्यांनी दिघे यांचे मन जिंकलं आणि त्यांच्या मनात घर केलं. कठोर मेहनत, अभ्यासू नेतृत्व, मितभाषी, संयमी आणि एकनिष्ठ माणूस असलेले शिंदे हे दिघेंचे विश्वासू व्यक्ती झाले. यामुळे ठाण्यात त्यांना दिघेंचे पट्टशिष्य म्हणून ओळख मिळाली. या नात्यामुळेच त्यांच्या ठाण्यातील राजकारणाच्या प्रवासाला सरुवात झाली.

आनंद दिघे यांचे २००१ साली निधन झाले. या दुखःद घटनेनंतर एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसला. कारण दिघे हे त्यांच्यासाठी आणि शिवसैनिकांसाठी पित्यासमान होते. शिवसैनिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहणार्‍या दिघे यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली होती. या बिकट परिस्थितीत दिघे यांचा वारसा त्यांना पुढे चालवायचा होता. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ते ठाणे महानगरपालिकेत दोनदा नगरसेवक म्हणून निवडणून आले. नगरसेवक झाल्यानंतर आपल्या कामातून सर्वसामान्य जनतेच्या मनात आणि शिवसेनेत आपली वेगळी प्रतिमा तयार केली. त्यानंतर २००४ साली पहिल्या प्रथम आमदारकी लढवली आणि ते आमदारही झाले. २०१४ साली संपूर्ण देशात मोदी लाट असताना त्यांनी शिवसेनेचा बालेकिल्ला असणारा ठाणे जिल्हा कायम अबाधित ठेवला.

- Advertisement -

काही काळानंतर शिवसेना युतीत समील झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांना सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रिपद सोपविण्यात आले. दरम्यान, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील त्यांना करण्यात आले. यावेळी पाच वर्षात आपल्या कामकाजाच्या बळावर त्यांनी ठाणे, मुंबई, पालघरसह संपूर्ण महाराष्ट्रात मजबूत शिवसैनिकांची फौज तयार केली.

आपल्या सामाजिक कार्याने आणि लोकांशी असलेल्या बांधिलकीमुळे आनंद दिघे यांचा वारसा पुढे चालवणार्‍या शिंदे यांनी ठाकरे सरकारचे मंत्रिमंडळ जाहीर होत असताना आनंद दिघे यांचे नाव घेत त्यांचे स्मरण केले आणि त्यांच्यात असणार्‍या घट्ट नात्यांची जाणीव सर्व जनतेला पुन्हा एकदा करून दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -