घरफिचर्ससंपादकीय : एक्झिट पोलचा बोलबाला

संपादकीय : एक्झिट पोलचा बोलबाला

Subscribe

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर काही तास उलटत नाहीत तोच विविध जनमत चाचपणी संस्थांनी एक्झिट पोलचा ढोल बडवायला सुरुवात केली आहे. तरी निवडणूक आयोगाने यावेळी अधिक दक्ष राहून एक्झिटवाल्यांच्या मुसक्या बांधल्या होत्या. कारण निवडणूक निकाल लागायच्या अगोदर गावाला आग लागल्यासारखी ही मंडळी बोंबाबोंब करत सुटतात, हा आजवरचा अनुभव. त्यांच्या या आगलाव्या वृत्तीमुळे निवडणूक आयोग आणि त्यांची निर्णय प्रक्रिया हायजॅक केल्यासारखी परिस्थिती निर्माण होते, कारण निवडणूक प्रक्रिया पार पाडणे आणि त्याचे निकाल जाहीर करणे हे निवडणूक आयोगाचे काम आहे. त्यांचा तो विशेष मान आहे, पण अलीकडच्या काळात ओपिनियन पोल, एक्झिट पोलवाले निवडणूक आयोगाला अक्षरश: फाट्यावर मारतात, असाच त्यांचा रोख असतो. म्हणजेच काय तर निवडणूक आयोग तुम्हाला काय सांगणार, आम्हीच तुम्हाला आधीच मतदान यंत्रात काय रहस्य दडलेले आहे ते सांगतो. त्यामुळे खरे तर ओपिनियन पोल आणि एक्झिट पोलवाले निवडणूक आयोगाला खुंटीला टांगण्याची भूमिका घेत असतात. जणू काही आम्ही अगोदरच निकाल जाहीर केले आहेत. आता निवडणूक आयोग फक्त निकाल जाहीर करण्याची औपचारिकता पार पाडणार आहे, असाच त्यांचा पवित्रा असतो. पण त्यांचा हा ‘पळा पळा आधी कोण पुढे पळतो’, या पळापळीचा बर्‍याच वेळा फज्जा उडालेला दिसतो. त्यामुळे मग ‘तो मी नव्हेच’ असे म्हणण्याची त्यांच्यावर वेळ येते.

सगळ्याच गोष्टी वेळेअगोदर पाहण्याची लोकांना उत्सुकता असते. तशी साधनेही सध्या उपलब्ध झालेली असतात. लोकांच्या या अतिरेकी कुतूहलाचा आणि औत्सुक्याचा फायदा निवडणुकीच्या निर्णयाचा अंदाज बांधणार्‍या संस्था घेत असतात. सध्याच्या लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पडल्यावर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या नव्हे तर अगदी वॉशिंग्टनपर्यंतच्या जनमत चाचपणी संस्थांनी आपापले अंदाजरूपी निकाल जाहीर केलेले आहेत. यात सट्टाबाजारवालेही मागे राहिलेले नाहीत. अलीकडच्या काळात तर त्यांच्याच चाचपण्या जास्त विश्वासार्ह मानल्या जाऊ लागल्या आहेत. खरे तर हे दुर्दैव आहे, पण त्यांचे खरे ठरते म्हणून त्यांच्या निष्कर्षांना मान्यता मिळू लागली आहे. चाचपणी संस्थांंमध्ये प्रामुख्याने टाइम्स नाऊ, इंडिया न्यूज, रिपब्लिक टीव्ही, एनडीटीव्ही, आयएएनएस, नेता न्यूज एक्स, न्यूज १८, एबीपी-नेल्सन, टुडेज चाणक्य यांचा समावेश आहेच, पण त्याचबरोबर गल्लोगल्लीच्या अनेक संस्था आणि तज्ज्ञांनी या निकालाविषयी आपले अंदाज व्यक्त केले आहेत. त्यात पुन्हा वेगवेगळ्या जोतिषांची अधिकच चंगळ असते. या जोतिषांनीही आपापले अंदाज व्यक्त केले आहेत. सध्याचा एकूणच कल पाहता ‘फिर एक बार मोदी सरकार’ असाच बहुतेकांचा सूर दिसून येत आहे. अर्थात, काही जणांनी या सुरांना आव्हान देऊन असे होणार नाही, असा दावा केला आहे, पण एक्झिट पोलवाल्यांच्या या आवाजी मतदानात प्रतिस्पर्धी उमेदवारांचा सूर अगदीच फिका पडू शकतो. त्यामुळे संसदेमध्ये जसा एखादा ठराव आवाजी मतदानासाठी ठेवला जातो आणि बहुमताचा होकाराचा मोठा आवाज झाल्यावर सभापती ठराव मंजूर झाल्याचे जाहीर करून टाकतात, तसाच प्रकार एक्झिटपोलवाल्यांनी करून टाकला आहे. त्यामुळेच ‘फिर एक बार मोदी सरकार’ असे वातावरण निर्माण झालेले आहे.

- Advertisement -

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गुजरातचे विकास पुरुष असलेले नरेंद्र मोदी राष्ट्रीय पातळीवर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार झाल्यावर सगळे चित्रच पालटून गेले. तोपर्यंत काँग्रेस मनमोहनसिंग यांना पुढे करून राहुल गांधी यांना पंतप्रधानपदी आणण्याच्या हालचाली करत होती, पण मोदींनी ‘काँग्रेसमुक्त भारता’ची घोषणा केली. त्यावेळी काँग्रेसप्रणित युपीएच्या केंद्रातील दहा वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचाराला लोक कंटाळलेले होते. त्यामुळे त्यांनी मोदींसारख्या उमद्या माणसाला देशाचा विकास करण्यासाठी बहुमताने निवडून दिले. मोदींनी गेल्या पाच वर्षांमध्ये विकासाच्या बर्‍याच मोठमोठ्या घोषणा केल्या. जगभरात अनेक दौरे केले. त्यातून भारतात मोठी गुंतवणूक येईल, असे करार करण्यात आले. चीन आणि जपानसोबत काही भारतीय शहरांचा विकास करण्याचे करार झाले. स्मार्ट सिटीच्या घोषणा झाल्या, पण अजून एकही शहर स्मार्ट झालेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. मोदींनी आपल्या कार्यकाळात केलेल्या नोटबंदीमुळे अनेक व्यवसायांना फटका बसला. अनेकांचे रोजगार गेले. त्यात पुन्हा मोदींची एकाधिकारशाही अनेकांना त्रासदायक ठरत होती. त्यामुळेच आता या लोकसभा निवडणुकीत मोदींचे काही खरे नाही, असेच अनेकांंना वाटत होते, पण दुसरी बाजू अशी होती की, मोदींना खाली खेचण्यासाठी विरोधी पक्षांनी महागठबंधन तयार केले, पण त्यांच्यातही पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी स्पर्धा आहे. काँग्रेस सगळ्या विरोधी पक्षांच्या पाठीवर बसून राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवू पाहत आहे, पण अन्य प्रादेशिक पक्ष त्यासाठी तयार नाहीत. अशा स्थितीत मोदींचे अनेक निर्णय पटणारे नसले तरी आजच्या घडीला देशाला स्थिर सरकार देणारा एकच माणूस आहे, अशी मानसिकताही आहे.

कुठल्याही पक्षाचे सरकार सत्तेत आले तरी काही क्रांतीकारी बदल घडत नसतात हे लोकांनाही माहीत आहे, पण अनेक पक्षांचा सावळा गोंधळ बघण्यापेक्षा कुणी तरी स्थिर सरकार देऊ दे, अशी जनतेची अपेक्षा असते. त्यामुळेच जनतेने मोदींना मतदान केले असावे, असा सूर पोलमधून पुढे आला असे फारतर मानता येईल, पण अनेकदा असले पोल हे पुरते खोटे ठरले होते, याची आठवण ठेवली पाहिजे. अगदी पाच महिन्यांपूर्वी पार पडलेल्या पाच राज्यांच्या निकालाने एक्झीटवाल्यांना पुरते रस्त्यावर आणून ठेवले होते. इतके की छत्तीसगडच्या निवडणुकीत काँग्रेस कुठेच नाही, असे म्हणणार्‍या पोलवाल्यांच्या तिथल्या जनतेने तोंडात मारली होती. मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या निवडूक निकालानेही एक्झीटवाल्यांना उताणे करून टाकले होते. तेव्हा घोडा मैदान जवळच आहे. उगाच अतिपणा करून घोडेबाजाराला चालना देण्याचे उद्योग आयोगाने कायमचे थांबवले पाहिजेत. २३ मेपर्यंत अनिश्चितता कायम आहे. म्हणूनच मोदींनाही त्यांच्यासाठी होणार्‍या मतदानापूर्वी केदारनाथ येथील गुहेत जाऊन ध्यानमग्न व्हावे लागले, हे लक्षात घेतले तरी पुरेसे आहे.

- Advertisement -

Exit Poll 2019 प्रमुख एक्झिट पोलचा अंदाज
> टाइम्स नाऊ – व्हीएमआर: एनडीए – ३०६, यूपीए- १३२, अन्य – १०४

> इंडिया न्यूज – एनडीए- २९८, यूपीए- ११८, अन्य – १२७

> रिपब्लिक टीव्ही या इंग्रजी वृत्तवाहिनीने दोन एक्झिट पोल केले आहेत. यातील एक एक्झिट पोल सीव्होटर तर दुसरा एक्झिट पोल ‘जन की बात’ चा आहे.

रिपब्लिक टीव्ही- सीव्होटर : एनडीए- २८७, यूपीए – १२८, अन्य – १२७
रिपब्लिक टीव्ही – जन की बात: एनडीए- ३०५, यूपीए- १२४, अन्य – ८७

> एनडीटीव्ही: एनडीए- ३००, यूपीए- १२७, अन्य – ११५

> आयएएनएस- सी व्होटर: भाजप- २३६, काँग्रेस – ८०
एनडीए- २८७

> नेता- न्यूज एक्स: एनडीए- २४२, यूपीए – १६४, अन्य – १३६

> न्यूज १८ : एनडीए- २९२- ३१२, यूपीए – ६२- ७२

> एबीपी – नेल्सन : एनडीए – २६७, यूपीए – १२७, अन्य १४८ (भाजप – २१८, काँग्रेस- ८१)

> टुडेज चाणक्य: एनडीए- ३५०, यूपीए- ९५, अन्य ९७ (भाजप – ३००, काँग्रेस- ५५)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -