घरफिचर्ससत्याला सामोरे जा ः शौर्य

सत्याला सामोरे जा ः शौर्य

Subscribe

पुलवामा जिल्ह्यातील पुंज या गावात घुसखोर दडल्याच्या संशयावरून लष्कराचे सैनिक त्याला वेढा घालतात येथपासून चित्रपट सुरू होतो. अनेक झटापटी, पाठलाग आणि त्यानंतर वरिष्ठ अधिकार्‍याचा झालेला खून आणि तो ज्याने केलेला असतो तो अधिकारी स्वतःहून सहकार्‍यांच्या स्वाधीन होतो, येथे हा प्रसंग संपून त्यानंतर भूतकाळातील प्रसंगांतून कथा मांडली जाते. दिल्लीतील दोन मित्रांची. दोघांनीही सैन्यात प्रवेश घेतला आहे. मेजर सिद्धांत चौधरी आणि मेजर आकाश कपूर. सिद्धांत तसा नाखुशीनेच सैन्यात आला आहे.

अनेक लोक आपलेच खरे असे मानणारे असतात. ते काश्मिरी म्हणजे मुस्लीम आणि पाकिस्तानधार्जिणे अशी पक्की सोयीस्कर समजून बाळगून असतात. वा तशी ती करून दिलेली असते. पण यामुळेच काश्मिरींच्याही मनात वेगळेपणाचे भावना आपण जागी करतो याची जाण त्यांना नसते. हे अंतर वाढतच जाते. त्याचा पुरेपूर फायदा फुटीरवादी आणि पाकिस्तान घेतात. त्यामुळेच या सार्‍यांनी आपल्याला नक्की काय हवे आहे, याचा विचार करायला पाहिजे. असा विचार करण्यास प्रवृत्त करणारा एक चित्रपट गेल्या दशकात आला होता.

- Advertisement -

त्या चित्रपटाचे नाव होते ‘शौर्य’. त्यात शौर्य कशाला म्हणायचे हे अप्रतिमपणे समजावून देण्यात आले होते. शौर्य म्हणजे सत्याला सामोरे जाणे, ते मान्य करणे. कदाचित तेच लोकांना पटले नसावे. त्यामुळे त्याची दखलच घेतली गेली नव्हती.(बहुधा सत्य पाहण्याचे आणि पचवण्याचे शौर्य त्यांच्यात नव्हते.) सैन्यातील एका अधिकार्‍यावर त्याच्या वरिष्ठ अधिकार्‍याचा कारवाई दरम्यान गोळी मारून खून केल्याबद्दल करण्यात येणारे कोर्ट मार्शल हा त्या चित्रपटाचा गाभा होता. या खटल्यातूनच सत्य काय ते अखेर बाहेर येते आणि सर्वांनाच धक्का देते.

पुलवामा जिल्ह्यातील पुंज या गावात घुसखोर दडल्याच्या संशयावरून लष्कराचे सैनिक त्याला वेढा घालतात येथपासून चित्रपट सुरू होतो. अनेक झटापटी, पाठलाग आणि त्यानंतर वरिष्ठ अधिकार्‍याचा झालेला खून आणि तो ज्याने केलेला असतो तो अधिकारी स्वतःहून सहकार्‍यांच्या स्वाधीन होतो, येथे हा प्रसंग संपून त्यानंतर भूतकाळातील प्रसंगांतून कथा मांडली जाते. दिल्लीतील दोन मित्रांची. दोघांनीही सैन्यात प्रवेश घेतला आहे. मेजर सिद्धांत चौधरी आणि मेजर आकाश कपूर. सिद्धांत तसा नाखुशीनेच सैन्यात आला आहे. त्याचे वडील सैन्यातील अनेक पदकांचे मानकरी आहेत. निवृत्त झाले आहेत. पण सिद्धांत मात्र सैन्यातून बाहेर पडून मौजमजा करण्याची संधी शोधतो आहे. आकाशचे लग्न होते. त्यानंतर कामावर एकाच ठिकाणी – श्रीनगरला-रुजू होता यावे म्हणून ते यशस्वी प्रयत्न करतात.

- Advertisement -

सिद्धांतला बचावाचा तर आकाशला फिर्यादी पक्षाचा वकील म्हणून नेमण्यात येते. सुरुवातीला दाखवलेल्या प्रसंगातील घटनेच्या कोर्ट मार्शलसाठी. मृत व आरोपी हे दोन्ही अधिकारी राष्ट्रीय रायफल्सचे आहेत. हे कळल्यावर सिद्धांत कुरकूर करतो. आकाश त्याला गप्प करतो.

दरम्यान, श्रीनगरची एक वार्ताहर काव्या शास्त्री हिला या खटल्याचा सुगावा लागतो. त्यासंबंधात चांगली कामगिरी करता आली, तर नाव होईल म्हणून ती प्रयत्न सुरू करते. खून झालेला आणि खुनी अधिकारी यांची नावे, मेजर वीरेंद्र सिंग राठोड आणि कॅप्टन जावेद खान, अशी आहेत हे ती शोधते. कारवाई दरम्यान अधिकारातिक्रमण आणि खून असे आरोप जावेदवर ठेवण्यात येतात. त्यावरच कोर्ट मार्शल होणार असते. काव्या जावेदला भेटायचा अयशस्वी प्रयत्न करते. दरम्यान आकाश आणि सिद्धांत श्रीनगरला दाखल होतात. त्यांना सारी माहिती सांगण्यात येते. केस चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी सिद्धांत जावेदला भेटायला जातो. पण तेथे त्याच्या नवखेपणामुळे जावेद त्याला दाद देत नाही. निराश होऊन सिद्धांत बाहेर पडतो. आकाशला तो याबाबत सांगतो. आकाश त्याची अडचण समजून घेतो. हे सारे प्रकरण सोपे आहे. त्यात फिर्यादीला सहज विजय मिळेल असे सांगतो. तिकडे काव्याला केसची माहिती समजते. ती आरोपीचा वकील सिद्धांतला भेटण्याचा प्रयत्न करते. तो तिच्याकडे आकर्षिला जातो आणि तिच्यावर छाप पाडण्यासाठी प्रयत्न करतो. पण काव्या त्याची थापेबाजी ओळखतेे. पण दरम्यान त्याने अनवधानाने खान आणि राठोडचा वरिष्ठ ब्रिगेडिर प्रतापचे नाव उघड केलेले असते. काव्या जास्त माहिती मिळवू पाहते. पण एकदम सावध होऊन सिद्धांत काही सांगत नाही. निराश होऊन ती जाते.

तेथून ती तडक आपल्या ऑफिसमध्ये जाऊन बातमी लिहिते. तिच्यात ब्रि. प्रतापचे नाव आणि बातमी सिद्धांतकडून मिळाल्याचा उल्लेख करते. लष्करात खळबळ माजते आणि सिद्धांतला वरिष्ठ बोलावून घेतात. नंतर तो काव्यावर विश्वासघाताचा आरोप करतो, तर काव्या त्याला अपरिपक्व म्हणते. बातमीकडे नाही, तर कामावर लक्ष केंद्रित करण्यास सांगते. सिद्धांतला प्रतापच्या कारकिर्दीला धक्का लावल्याबद्दल ताकीद मिळते. मात्र त्याला प्रतापला भेटून माफी मागायची परवानगी मिळते. त्यावेळी प्रताप प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ असतो. सिद्धांत माफी मागतो. प्रताप कशालाच फारसे महत्त्व देत नाही. केसबाबत माहिती देण्याची विनंती तो धुडकावतो. घटनास्थळाला भेट देण्याची सिद्धांतची मागणी मात्र तो मान्य करतो.

त्या भेटीतील पाहणीनंतर सिद्धांतला काहीतरी चुकतेय आहे असे वाटते. तो स्थानिकांना भेटतो तेव्हा त्याला त्यांचा सैनिकांवर विश्वास नसल्याचे जाणवते. मुळापासून छडा लावण्यासाठी तो श्रीनगरला परततो. जावेदला आपण प्रतापला भेटल्याचे सांगतो. जावेद प्रथमच बोलतो. तुला काय वाटते, मी दोषी आहे की निर्दोष? असे त्याला विचारतो. मी माझा निर्णय कोर्टात सांगेन असे सिद्धांत सांगतो. संध्याकाळी काव्याला भेटल्यावर तो सारे सांगते व तीही त्याला प्रतिसाद देते. प्रतापचा या खुनाच्या केसशी संबंध आहे, यात बरेच काही दडलेले आहे. त्याच्यापासून सावध राहा असे सांगते. तो तिला प्रतापच्या भेटीबाबत सांगतो. ती त्याला सर्व मदत करण्याचे आश्वासन देते. जावेद निरपराध असल्याचे सिद्धांतला वाटू लागते. तो मनःपूर्वक केस लढवायचे ठरवतो. जावेद आणि आकाशसह सर्वांचा जावेद दोषी असल्याचे मान्य करायचा प्रस्ताव तो मान्य करत नाही. आता सिद्धांतची कळकळ लक्षात आल्याने जावेद मोकळेपणाने बोलायला लागतो. बचावासाठी आवश्यक संबंधित कागदपत्रेही देतो. काव्या जावेदच्या आईला भेटून माहिती घेते. ती आणि सिद्धांत मिळून जावेदच्या बचावाची योजना आखतात.

खटल्याची सुनावणी सुरू होते. साक्षीदारांपैकी एक, आर.पी.सिंग, उडवाउडवी करत आहे, असे सिद्धांतला वाटते. पण तो काही करण्याआधीच दिवसाचे काम संपते. काव्या राठोडच्या कुटुंबियांना भेटण्याचे सुचवते. ते तेथे त्याच्या पत्नी-मुलाला भेटतात. काव्या माहिती काढण्याचा प्रयत्न करते. तर सिद्धांत घराची पाहणी करतो. त्यांना यश येत नाही. पण पत्नी-मुलगा राठोडच्या मरणोत्तर गौरवाला नव्हते, हे विचित्र वाटते, असे काव्या म्हणते. राठोडच्या मृत्यूने त्याच्या छळापासून पत्नीची एकप्रकारे सुटकाच झाली आहे, असे ती म्हणते कारण ते लग्न धड नव्हते. ब्रि. प्रतापवरही मानवी हक्क समितीचे अनेक आरोप असतात, ही माहिती काव्याला मिळते. ती पुरावे मिळवते व सिद्धांतला देते. तिला गोपनीय माहिती फोडल्याबद्दल अटक होते. तिला जामीन मिळत नाही पण ती संशय बोलून दाखवते आणि सिद्धांतला खटल्यावरच लक्ष देण्यास सांगते. एका रात्री अचानक जावेदची आई सिद्धांतला भेटते. आणि राठोडची पत्नी गाव सोडून जाताना, त्याला भेटून अनेक कागदपत्रे त्याच्या हवाली करते. त्यावरून या प्रकरणाशी प्रतापचा दाट संबंध आहे हे कळते. तो प्रतापला त्याच्या घरी भेटतो. तो सिद्धांतला वडिलांच्या लौकिकाला बाधा पोहोचवू नको असे सांगतो. तेव्हा वडलांच्या शौर्याची जाणीव सिद्धांतला होते.

महत्त्वाचा साक्षीदार असलेला आर.पी.सिंग अचाकन गायब होतो. सिद्धांतच्या अडचणी वाढतात. मात्र एका रात्री तो सिद्धांतला भेटून कारवाईच्या रात्रीच्या सार्‍या घटना सांगतो. राठोडने खेडुतांवर अनन्वित अत्याचार केले त्यांच्याकडून ते पाकचे आणि दहशतवाद्यांचे साथीदार असल्याचे वदवून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी नकार देताच जावेदचा विरोध न जुमानता एका मुलाला गोळी घालून मारले. जावेदने त्याला शांत होण्यास सांगितले तेव्हा जावेदवरच त्याने गद्दार असल्याचा आरोप केला, एका बालिकेवरही अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मात्र संयम संपून जावेदने त्याला गोळी घातली. पळून जाण्याची संधी असूनही तो साथीदारांच्या स्वाधीन झाला आणि होईल ती शिक्षा मान्य आहे असे म्हणाला. सिंगला हे कोर्टात सांग असे सिद्धांत सांगतो. पण तो नकार देऊन पळून जातो. आत्महत्या करतो.

सिद्धांत ब्रि. प्रतापला कोर्टात बोलावण्याचा निर्णय घेतो. आकाश आणि काव्या त्याला याच्या परिणामांची जाणीव करून देतात. पण तो आपल्या निर्णयावर ठाम असतो. सुनावणीचे वेळी तो थोडा गडबडतो पण नंतर प्रतापच्याच भाषेत त्याला उत्तर देण्याचे ठरवतो. कोड्याच्या बहाण्याने तो प्रतापचा राठोड खटल्याशी संबंध असल्याचे त्याला स्पष्ट करायला लावता. मानवी हक्क आणि अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवतो. प्रताप ते झटकून टाकायचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याला डरपोक म्हणतो. तेव्हा तोल सुटून प्रताप त्याचा आत्यंतिक मुस्लिम द्वेष आणि लोकशाहीही मान्य नसल्याचे बोलून दाखवतो. राष्ट्रीयत्व आणि देशप्रेमाच्या नावाखाली प्रताप स्वतःचे वागणे योग्य ठरवू पाहतो.पण सिद्धांत त्याला पुरते खोटे ठरवतो. जावेदची निर्दोष सुटका होते आणि आकाशच्या अर्जावरून प्रतापवर कोर्ट मार्शल करण्याचा निर्णय होतो. जावेद सिद्धांतला अधिकारी म्हणून मान्य करतो. आकाश आणि सिद्धांत यांची मैत्री पुन्हा पहिल्यासारखी होते.

दिग्दर्शक समर खान यांनी संवेदनशील विषयाला कुठेही भडकपणा न आणता न्याय दिला आहे. जावेद अख्तर यांच्या संवादांचा प्रभाव जाणवण्याजोगा आहे. मोजकी गाणी आहेत पण ती नसती तरी चालले असते असे वाटते. तसेच काही प्रसंग उगाच तणाव कमी करण्यासाठी म्हणून योजल्यासारखे वाटतात. एरवी कथानकाचा प्रभाव जास्त पडला असता. चित्रपटाची लांबी कमी होऊन प्रभाव वाढला असता असे वाटते. प्रमुख भूमिकांत राहुल बोस (मे.सिद्धार्थ), जावेद जाफ्री (मे. आकाश), के.के. मेनन (ब्रिगेडिअर रुद्र प्रताप सिंग राठोड) आणि मिनिषा लांबा (काव्या शास्त्री)यांच्या असून त्यांना दीपक डोब्रियाल (कॅ. जावेद), अमृता राव (मेजर राठोडची पत्नी), सीमा विश्वास इ. नी चांगली साथ दिली आहे. खरेखुरे टीमवर्क पाहायला मिळते. सत्याची ओळख करून घ्या. त्याला धीटपणे सामोरे जा. पाहा शौर्य!

-आ. श्री. केतकर.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -