‘पळशीची पीटी’ने आव्हान स्वीकारण्याची ताकद दिली

‘लागिरं झालं जी’ या मालिकेत ‘जयडी’ च्या भूमिकेने घराघरात पोहचलेली ‘एक होती राजकन्या’ म्हणजेच अभिनेत्री किरण ढाणेने स्वतःचे वेगळे असे स्थान मनोरंजन विश्वात निर्माण केले आहे. लवकरच ती रुपेरी पडद्यावर एंट्री घेणार आहे. धोंडिबा बाळू कारंडे निर्मित-दिग्दर्शित तसेच जगप्रसिद्ध ‘कान्स चित्रपट महोत्सवा’ मध्ये महाराष्ट्र शासनाद्वारे निवडण्यात आलेली ‘पळशीची पीटी’ या आगामी मराठी चित्रपटातून किरण एका ध्येयवेड्या अ‍ॅथलिटच्या भूमिकेत दिसणार आहे.‘माय महानगर’च्या ‘आपलं महानगर आणि मी’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात किरण ढाणे हिने सहभाग घेतला आणि तिने आपल्या आयुष्याच्या तसेच अभिनेय क्षेत्रातील ‘जयडी ते पळशीची पीटी’ हा तिचा प्रवास उलगडला.

Mumbai

सातार्‍यातील धनंजयराव घाडगे वाणिज्य महाविद्यालयात शिकत असताना महाविद्यालयात होणार्‍या युथ फेस्टिव्हलच्या माध्यमातून मी वत्कृत्व स्पर्धेत सहभागी झाले होते. यावेळी सहज मी एक ऑडिशन दिली आणि नकळत माझी अभिनयासाठी निवड करण्यात आली. या ऑडिशनच्या वेळी उपस्थित असणार्‍या सुहास चव्हाण सरांनी माझी निवड केली आणि तेव्हापासून माझी खर्‍या अर्थाने अभिनयाला सुरूवात झाली. वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षाला शिकत असताना ‘कोयता’ नावाची एकांकिका केली होती. या एकांकिकेच्या माध्यमातून माझे नाव ‘पळशीची पीटी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांना सुचविण्यात आले होते. तेव्हा पळशीची पीटी या चित्रपटाकरिता निवड करण्यात आली, त्या क्षणापासून या चित्रपटाचा माझा प्रवास सुरू झाला. या चित्रपटाचे स्क्रिन प्ले आणि संवाद लेखक तेजपाल वाघच ‘लागिरं झालं जी’ या मालिकेचे असल्याने त्यांनी या मालिकेसाठी माझी लूक टेस्ट पाठवण्यात आली आणि या मालिकेचा माझा प्रवास सुरू केला.

पहिली ऑडिशन…

कोयता या एकांकिकेच्या माध्यमातून धोंडिबा कारंडे सरांकडून विचारणा करण्यात आली होती. पण, माझी ऑडिशन झाली नव्हती. आमचे डि.ओ.पी. संदिप जंगम हे धोडिंबा सरांचे गुरू. त्यांनी माझ्या अभिनयाबद्दल विचारणा केली. यावेळी त्यांच्या एका शब्दावर माझी या चित्रपटाकरिता निवड करण्यात आली.

…म्हणून जयडी झाली लाडकी

मला जराही कल्पना नव्हती की, सुरूवातीला ही एक साधीभोळी, अजिंक्यवर मनापासून प्रेम करणारी आणि त्याच्या प्रेमात वेडी झालेली अशी जयडीची भूमिका पुढे जाऊन नकारात्मक होईल. मात्र ही भूमिका जरी नकारात्मक असली तरी जयडी नकारात्मक भूमिका केवळ अजिंक्यवर असलेल्या प्रेमापोटी करत होती. मला ही भूमिका साकारताना खूप मजा आली आणि मला कधी वाटले नाही की ही जयडी निगेटिव्ह आहे. त्यामुळे मला आतापर्यंत आवडलेली भूमिका कोणती असे विचारले तर ती जयडीच असेल. सातार्‍यातील माझ्या गावी गेले असताना एका प्रेक्षक असणार्‍या आजीने माझ्या हाताला धरून सांगितले की, ‘तूझी आई जशी वागते तशी तू नको वागू. अजिंक्यपेक्षा चांगला मुलगा मी तुझ्यासाठी शोधेल पण, तू चांगली वाग.’ यावरून मला प्रेक्षकांचा भोळेपणा भावतो.

मालिका सोडण्याचा निर्णय योग्यच
कोणताही निर्णय घेताना आपण त्यावर ठाम असले पाहिजे. आपला निर्णय योग्य आहे हे सिद्ध करण्याची ताकद आपल्यामध्ये असायला हवी. त्यामुळे हा निर्णय घेताना मला कुठे वाटत नव्हते की, माझा मालिका सोडण्याचा निर्णय चुकीचा आहे. हा निर्णय घेताना माझा कोणावरही राग नव्हता. कोणताही वाद-विवाद न करता, मला पटले नाही म्हणून मी बोलून हा निर्णय घेतला.

अशी झाले ‘राजकन्या’

लागीर झालं जी सोडल्यानंतर माझ्याकडे बराच वेळ होता. त्यावेळी खूप वाचन केले. वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तिमत्त्वांचा अभ्यास केला. या दरम्यान, अनेक चित्रपटासाठी विचारणा करण्यात आली होती. मात्र, मी आव्हानात्मक भूमिकेची वाट पाहत होती. त्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा माझ्याकडून वाढल्याने मला तसेच काम करायचे होते. यावेळी मला कोठारे व्हिजनमधून ‘राजकन्या’ या मालिकेसाठी कॉल आला. ही मालिका एका विशिष्ट प्रकारची नसून बाप-लेकीची कथा आहे. ही संकल्पना मला भावल्याने मी निवड केली. तसेच या मालिकेतील मुख्य भूमिका एका सक्षम महिला पोलिसाची असून या क्षेत्राचे प्रातिनिधित्व करणारी ही भूमिका असल्याने मी ही मालिका स्वीकारली. मी सातार्‍याची असल्याने मला विदर्भाची भाषा शिकणे थोडे अवघडच होते. या भाषेसह ही पोलिसाची भूमिका साकारण्यापूर्वी काही पोलीस स्टेशनला भेटी दिल्या. पोलिसांकडून करण्यात येणारे सॅल्यूटची पद्धत, पोलीस खात्यातील नियमांचा देखील मी यावेळी अभ्यास केला. व्हिडिओ कॉलद्वारे पोलीस खात्यातील नियम, पोलिसांच्या वर्दीचे महत्त्व देखील जाणून घेतले.

…अन् स्वप्न साकार झाले

लागीरं झालं जी ही मालिका करत असताना उत्कृष्ट सहाय्यकाच्या भूमिकेसाठी मला महेश कोठारेंच्या हस्ते पुरस्कार मिळाला होता. तेव्हा मला त्यांच्या सोबत काम करायचे आहे, असे वाटून गेले आणि वर्षभरातच मला त्याचा राजकन्येसाठी कॉल आला आणि माझी इच्छा पूर्ण झाली. तेव्हा माझा विश्वास एका गोष्टीवर बसला की, स्वप्न लवकर पूर्ण होऊ शकतात. दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याचा मला अनोखा अनुभव मिळाला. यावेळी थोडे फार दडपण होते पण मी नवीन आहे, असे जाणवू न देता सगळ्यांनी सांभाळून घेतले.

अशी आहे ‘पळशीची पीटी’ मधील भागी

धोंडिबा़ बाळू कारंडे निर्मित-दिग्दर्शित ‘पळशीची पीटी’ या आगामी मराठी चित्रपटातून मी एका ध्येयवेड्या अ‍ॅथलिटच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ग्रामीण भागातील मुलांचे भविष्य अधोरेखित करतो. ‘पळशीची पीटी’ मधील भागीची भूमिका ही अधिक जोखमीची होती. माळरानात मेंढपाळ करणार्‍या साधारण कुटुंबात जन्मलेली भागी आपल्या प्रयत्नांची पराकाष्टा करत नॅशनल अ‍ॅथलेट बनण्याचा मान पटकावते. या चित्रपटातील भागी आयुष्यात येणारी प्रत्येक संधी आव्हान म्हणून स्विकारते. अपेक्षांची उंची गाठायची असेल तर नवनवीन आव्हाने सुद्धा स्विकारता आली पाहिजे आणि ही ताकद, सकारात्मकता मला या चित्रपटाने दिली. ‘पळशीची पीटी’ हा चित्रपट करताना मला त्रास झाला मात्र, प्रेक्षकांच्या पसंतीसह या चित्रपटाची जगप्रसिद्ध “कान्स चित्रपट महोत्सव” मध्ये महाराष्ट्र शासनाद्वारे निवड करण्यात आली. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये देखील या चित्रपटाची निवड करण्यात आली त्यावेळी खूपच आनंद झाला.

पळशीची पीटी हेच नाव का ?

‘पळशीची पीटी’ या नावामुळे प्रेक्षकांच्या मनात नेमका हा चित्रपट कशावर आधारीत आहे याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. भागीच्या गावात तिला नेहमी ’आली मोठी पळशीची पीटी’ असे टोमणा मारून चिडवायचे म्हणजे मोठी ‘पीटी ऊषा न तू!’ त्यामुळे या चित्रपटाचे नाव पळशीची पीटी असे ठेवण्यात आले.

संकटाला पूरग्रस्त धाडसाने सामोरे गेले

सांगली, कोल्हापूरमध्ये पूरपरिस्थिती खूप भयावह होती. त्यांनी या परिस्थितीला पूरग्रस्त ज्याप्रमाणे धाडसाने सामोरे गेले त्यांना सलामच आहे. त्यामुळे या परिस्थितीकरिता आवाहन करते आपल्याला शक्य असेल तेवढी मदत शक्यतो पूरग्रस्त भागात करा.

‘महानगर’ने तुला काय दिले
स्वप्न बघण्यासाठी जी एनर्जी लागते ती मला मुंबई या ‘महानगर’ने दिली. कितीही संकटे आले तरी त्या संकटांना आव्हान म्हणून धैर्याने सामोरे जा. आव्हानांना सामोरे जाण्याची ताकद मला या मुंबईने दिली. मी मुंबईत कामासाठी आले होते. हे ‘महानगर’ आपल्याला आपलेसे करते. पण, आपल्याकडे टॅलेंट असेल तर ही मुंबई नक्कीच आपल्यासोबत आहे.

शब्दांकन – हर्षदा शिनकर

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here