घरफिचर्सफॅनी आणि एक फूल दो माली

फॅनी आणि एक फूल दो माली

Subscribe

‘वक्त’ या चित्रपटातील ऐ मेरी जोहरा जबीं, तुझको मालूम नही .. या गाण्याच्या वेळचा बलराज सहानी यांचा अभिनय कोण विसरेल? अशीच एक भूमिका ‘एक फूल दो माली’ या चित्रपटात त्यांच्या वाट्याला आली होती. हा चित्रपट पाहताना ‘फॅनी’ या सुंदर इंग्रजी चित्रपटाची आठवण होते. कारण दोन्ही चित्रपटांच्या कथेत खूपच साम्य आहे. अर्थात कथेला भारतीय बाज देताना तीमध्ये उचित बदल करण्यात आले आहेत.

बलराज सहानी हे एक चतुरस्र अभिनेता होते. ते उच्चविद्याविभूषित होते, त्याआधी त्यांना रेडिओवर काम करण्याचाही अनुभव होता. आणि रंगमंचाचाही त्यांना दीर्घ अनुभव होता. त्यामुळे कोणतीही भूमिका ते चटकन समजून घेत आणि अर्थातच तिला योग्य न्याय देत असत. असे असले तरीही त्यांना दिलीप कुमार, देव आनंद, राजकपूर यांच्याप्रमाणे स्टार म्हणून मान्यता मिळाली नाही. पार्श्वगायक मन्ना डे हे असेच गुणी गायक असूनही त्यांना रफी, मुकेश, तलत महमूद आणि किशोर कुमार यांच्याप्रमाणे खास स्थान मिळाले नाही. योगायोगाची गोष्ट की अन्य काही म्हणा, बलराज सहानींची खूपशी गाणी मन्ना डे यांनीच म्हटली आहेत. त्यातील ‘काबुलीवाला’ या चित्रपटातील ऐ मेरे प्यारे वतन तर अविस्मरणीयच आहे.

कोणत्याही वेशभूषेमध्ये बलराज शोभून दिसत आणि अजिबात अवघडल्यासारखे होत नसत. त्यामुळे अनेक छटांच्या अनेक भूमिका त्यांच्या वाट्याला आल्या. याबाबतीत त्यांची तुलना मोतीलाल यांच्याशीच होऊ शकते; पण तसे करण्याचेही कारण नाही. कारण दोघेही जण आपल्यापरीने श्रेष्ठच होते. वयपरत्वे त्यांनी वयाला अनुसरून भूमिका करायला सुरुवात केली आणि चरित्र अभिनेता म्हणून ते कुठेही कमी पडले नाहीत हे महत्त्वाचे. ‘वक्त’ या चित्रपटातील ऐ मेरी जोहरा जबीं, तुझको मालूम नही .. या गाण्याच्या वेळचा त्यांचा अभिनय कोण विसरेल? अशीच एक भूमिका ‘एक फूल दो माली’ या चित्रपटात त्यांच्या वाट्याला आली होती. हा चित्रपट पाहताना ‘फॅनी’ या सुंदर इंग्रजी चित्रपटाची आठवण होते. कारण दोन्ही चित्रपटांच्या कथेत खूपच साम्य आहे. अर्थात कथेला भारतीय बाज देताना तीमध्ये उचित बदल करण्यात आले आहेत. त्यामुळेच तिचा प्रभाव प्रेक्षकांवर पडतो, अर्थात त्यात कलाकारांबरोबर गाण्यांचाही मोठा वाटा आहे.

- Advertisement -

तर आधी फॅनी बाबत… सीसेरो (चार्लस बॉए) हा मार्सेलिसमधील एका बारचा मालक आहे. त्याचा 19 वर्षांचा मुलगा मारिअस (हॉर्टस बुशॉल्झ) याला समुद्रावर जाऊन आपले कंटाळवाणे जीवन विसरायचे आहे. 18 वर्षांची फॅनी (लेस्ली कॅराँ) त्याच्या प्रेमात पडलेली आहे; पण तो तिला झटकून टाकतो. त्याच गावातला गडगंज श्रीमंत व्यापारी पॅनिसी (मॉरिस शॅव्हिलिए) फॅनीच्या एकाकी आईला भेटून फॅनीशी लग्न करण्याची त्याची इच्छा सांगतो. प्रथम तिला वाटते, तो आपल्यालाच मागणी घालायला आला आहे. पण नंतर त्याला फॅनीशी लग्न करायचे आहे, हे कळल्यावर ती विचारात पडते. अर्थात त्याच्या संपत्तीचा मोह तिला असतोच.

मारिअस एका विज्ञान संशोधनासाठी चाललेल्या बोटीवर जाण्यासाठी करार करतो आणि दुसर्‍याच दिवशी तो निघणार असतो. त्याआधीच फॅनी त्याला भेटून पॅनिसीचा लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याचे मारिअसला सांगते. पण त्यावर तो आपण बोटीवर जाणार असून, पाच वर्षे परतणार नाही आणि तू मला तोवर विसरशील असे सांगतो. तरीही ते एकदुसर्‍यावरील प्रेम असल्याचे मान्य करतात. त्या रात्रीच्या वेळी फॅनीची आई घरी नसते. ते तेथे जाऊन प्रेमवर्षावात रात्र साजरी करतात. सकाळी फॅनीची आई त्या दोघांना पाहते. तिला हे लग्न मान्य असल्याने ती आणि सीसेरो आपल्या मुलांच्या लग्नाची तयारी करू लागतात.

- Advertisement -

पण फॅनी मॉरिअसला त्याच्या इच्छेप्रमाणे बोटीवर जायला सांगते. तो गेल्यावर दोन महिन्यांनी तिला मॉरिअसपासून मूल होणार असल्याचे कळते आणि ती ते पॅनिसीला सांगते. तरीही, आता मूल होण्याची शक्यता नसल्याने, तो तिच्याबरोबर लग्न करण्यात त्याला आनंदच वाटेल असे सांगतो. यथावकाश फॅनी मुलाला जन्म देते. त्याचे नाव सीसेरिओ मारिअस पॅनिसी असे ठेवण्यात येते. मुलगा वर्षाचा झाल्यावर पॅनिसी फ्रान्सला वर्षभरासाठी जातो. तो नसताना अचानक मारिअस परततो. मुलगा त्याचा आहे, असे फॅनीने सांगितल्यावर तो तिची माफी मागतो आणि ती त्याला हवीय असे सांगतो. पॅनिसीची त्याला हरकत नसते; पण तो सिझेरिओला मात्र स्वतःकडे ठेवीन असे सांगतो. फॅनी ते मान्य करत नाही. फॅनी मुलाशिवाय राहणार नाही ही खात्री पटल्याने मॉरिअस पुन्हा जातो.

दहा वर्षांनंतर सिसेरिओच्या वाढदिवसाची तयारी सुरू असते. त्याच्या आजीबरोबर तो समुद्रावर जातो. पण तेथे ती खरेदीत गर्क असताना तो इतरत्र जातो. तो हरवला आहे, असे तिला वाटते. दरम्यान, मारिअस परतलेला आहे, आणि आता तो एका गॅरेजमध्ये काम करतो आहे. मुलगा नेमका त्या गॅरेजमध्येच पोहोचतो. मुलाला पाहून तो खुलतो. मुलाला शोधण्यासाठी बाहेर पडलेली फॅनी मुलाला त्याच्या बापाबरोबर पाहते आणि तिला आश्चर्य वाटते. इकडे मुलगा हरवल्याचे कळताच ते दुःख असह्य झाल्याने पॅनिसाला हृदयविकाराचा झटका येऊन तो बिछान्याला खिळतो. मारिअसचे वडील, सिसेरो, त्या तिघांना घेऊन अखेरचे क्षण मोजणार्‍या पॅनिसीकडे येतात. तेथे पॅनिसी सीसेेरिओने त्याचे संपूर्ण नाव-सीसेरिओ मारिअस पॅनिसी असेच कायम ठेवावे अशी शेवटची इच्छा सांगतो. आपली सर्व संपत्ती तो फॅनीच्या नावावर करतो. फॅनी, मारिअस आणि सिसेरिओ क्षितिजाकडे पाहात आहेत या दृश्यानेच चित्रपट संपतो. अशी ही कथा. मॉरिस शॅव्हिलिए, लेस्ली कॅराँ आणि हॉटर्झं बुशॉल्झ, चार्लस बॉये अशा कलाकारांच्या अभिनयाने अविस्मरणीय झालेली.

त्यात इरसाल म्हातार्‍यांची पात्रे आणून दिग्दर्शकाने मोठी रंगत आणली आहे. त्यातला रस्त्यात हे टोळके एक हॅट ठेवतात. येणारा तिच्यावर लाथ मारून ती उडवण्याचा प्रयत्न करतो; पण खाली या लोकांनी मोठा दगड ठेवल्याने तो कळवळतो हे पाहताना धमाल येते. पण काही वेळा हे घडल्यावर तोच तोपणा टाळण्यासाठी दिग्दर्शकाने एका बेरकी माणसाची जोड दिली आहे. तो हॅट पाहताच तिला लाथ न मारता ती उचलून डोक्यावर ठेवून निघून जातो आणि इरसाल म्हातारे हिरमुसले होतात, हे पाहताना गंमतच वाटते. सिसेरो आणि पॅनिसी यांचे एकत्र असतानाचे प्रसंग तर फारच खुलले आहेत, हे त्या दिग्गज अभिनेत्यांचे कसब.

‘एक फूल दो माली’ या हिंदी चित्रपटाची कथा बरीचशी याच्याशी मिळतीजुळती आहे. एकाकी गरीब आई (दुर्गा खोटे)बरोबर सोनम (साधना) सफरचंदाच्या बागेत काम करत असते. बागेचा मालक विधूर कैलासनाथ कौशल (बलराज सहानी) हा असतो. गिर्यारोहणाचे शिक्षण देणारा अमर आणि सोनमचे एकमेकांवर प्रेम असल्याने ते विवाह करण्याचा निश्चय करतात. तेव्हा अमर एका मोहिमेवर निघताना सांगतो की परतल्यानंतर आपण विवाह करू. पण अमर इतरांबरोबर बर्फालोटात मरण पावतो. खचलेल्या सोनमवर समशेर (शाम कुमार) बलात्कार करतो. कैलास तिला वाचवतो. डॉक्टर (डेव्हिड अब्राहम) कडून तिला ती गर्भवती आहे हे कळते. पण हे कळल्यावरही कैलास तिच्याशी लग्न करतो. समशेरला सहा वर्षांची सजा होते. अपघातातील दुखापतीने मूल होण्याची शक्यता नसलेला कैलास मुलाच्या आगमनाने हरखून जातो. त्याचे नाव बॉबी असे ठेवले जाते.

कैलास मुलाला एकटा सोडत नाही. कारण त्याचा मुलावर जीव जडलेला असतो. त्या दोघांचे चांगलेच जमलेले असते. सहा वर्षांनंतर बॉबीच्या वाढदिवसाच्या समारंभात अमर दिसल्यावर कैलास आणि सोनमला धक्का बसतो. सोनम अमरला भेटून तू बॉबीला भेटायचे बंद कर असे सांगते. अमर ते मान्य करतो; पण एकदा बागेत अमरला पाहिल्यावर बॉबी त्याच्याकडे धावतो. पण अचानक एका स्फोटाने बॉबी जखमी होऊन त्याला हॉस्पिटलमध्ये न्यावे लागते. त्याला रक्ताची गरज असते, पण कैलासचे रक्त जुळत नाही, अमर रक्त देतो आणि बॉबी वाचतो. कैलास सुखावतो; पण अमर बॉबीला नेणार तर नाही ना अशी भीती त्याला असते. कालांतराने अमरला बॉबी हा खरोखरच त्याचा मुलगा आहे हे कळते.

कैलास त्याला आणि सोनमला बॉबीसह एकत्र राहा, असे सांगतो. पण ते मान्य करत नाहीत. तुरुंगवास भोगून सुटून आलेला समशेर बॉबीला पळवतो आणि त्याला अमर वाचवत असताना कैलास त्याच्या मदतीला धावतो. कड्यावरून पडलेला अमर आणि बॉबी एका दोराच्या सहाय्याने तग धरून असतात. समशेर तो दोर कापायचा प्रयत्न करतो. पण त्याला अडवताना कैलास प्राण गमावतो. त्याच्या इच्छेनुसार सोनम अमर पुन्हा एकत्र येतात. नंतर बॉबीचे शाळेत नाव घालताना शिक्षक वडिलांचे नाव अमर असेच लिहायचे ना, असे विचारतात; पण अमर तेथे कैलासनाथ कौशल लिहा असे सांगतो. संजय आणि साधनापेक्षा बुजूर्ग कलाकार बलराज सहानी, डेव्हिड आणि दुर्गा खोटे यांचाच प्रभाव दाखवून देणारा हा सिनेमा गाजला, तो त्यातील ‘औलाद वालो फुलो फलो’, ‘चल चल रे नौजवान’ हे विडंबनात्मक गीत, ‘ओ नन्हे से फरिश्ते’, ‘सैंया ले गयी जिया तेरी पेहली नजर’, ‘सजना सजना ओ सजना’, ‘तुझे सूरज कहूँ या चंदा’, ‘ये परदा हटा दो’ आणि ‘किस्मत के खेल निराले मेरे भैया’ ही सर्वच गाणी रवीच्या संगीताने स्मरणीय केली होती.

– आ. श्री. केतकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -