घरफिचर्सशेतकर्‍याचं भळभळतं दुःखं दो बिघा जमीन

शेतकर्‍याचं भळभळतं दुःखं दो बिघा जमीन

Subscribe

गावात शंभूने कर्जफेड न केल्याने त्याच्या जमिनीचा लिलाव होतो. धंगू भ्रमिष्ट होतो. जमीन हरनामसिंगची होऊन तेथे मिलचे बांधकामही सुरू झालेले असते. शंभू कुटंबियांसह परत येतो, तेव्हा त्याला हे दिसते. तेव्हा तो आपल्या जमिनीवरील मूठभर माती हातात घेतो, पण तेथेही पहारेकरी त्याला अडवतो. निराश होऊन शंभूचे कुटुंब दूर जात असतानाच ‘दो बिघा जमीन’ हा चित्रपट प्रेक्षकांना सुन्न करून संपतो.

वास्तववादी चित्रपटांतील व्हिट्टो डि सिका यांचा ‘द बायसिकल थीफ्स’ हा अप्रतिम चित्रपट पाहून, बिमल रॉय यांना तसा चित्रपट बनवावा असे वाटले. त्यातूनच 1953 मध्ये तयार झाला ‘दो बिघा जमीन’. तसेच पाहायचे झाले, तर भारतातील पहिला वास्तववादी चित्रपट म्हणून ‘सावकारी पाश’चे नाव घ्यावे लागेल. त्यानंतरही प्रभातचे काही चित्रपट त्याच प्रकारचे होते. तरीही बिमल रॉय यांच्या या चित्रपटाचे महत्त्व कमी होत नाही. रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘दुई बिघा जोमी’ या कवितेवर हा बोलपट आधारलेला आहे.

अलीकडील काही वर्षांत देशात सर्वत्र दीर्घकाळ चालू असलेल्या, कर्जबाजारी शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या चर्चेच्या संदर्भात, आजही हा चित्रपट महत्त्वाचा आहे. कारण त्यात सतत निराशा पदरी येऊनही आत्महत्या न करता यातील नायक हा नव्याने उभे राहण्याचा प्रयत्न करतो, हे सूचित केले आहे.

- Advertisement -

शंभू महातो या शेतकर्‍याची ही कथा. शंभू त्याची पत्नी पार्वती-पारो, मुलगा कन्हैया आणि वडील धंगू महातो यांच्याबरोबर एका छोट्या दुष्काळाने ग्रासलेल्या गावात राहत असतो. या दीर्घकाळ चाललेल्या दुष्काळानंतर पाऊस येतो. शेतकरी सुखावतात. शंभू दोन बिघे, बंगालमध्ये बिघा म्हणजे साधारण दोन तृतीयांश एकर (विविध ठिकाणी हे परिमाण वेगवेगळे असते), जमिनीचा मालक. तेच त्याचे उपजीविकेचे साधन असते. गावचा जमीनदार ठाकूर हरनामसिंग काही व्यापारांबरोबर स्वतःच्या मोठ्या जमिनीवर एक मिल उभारण्याचे ठरवतो. त्यामुळे त्यांच्या मोठ्या फायद्याबरोबर गावाचीही भरभराट होईल, असे तो सांगतो.

परंतु यात एकच अडचण असते. ती म्हणजे, हरनामसिंगच्या जमिनीच्या मधोमध शंभूच्या जमिनीचा दोन बिघ्यांचा तुकडा असतो. शंभू आपली जमीन सहज देईल, असा हरनामसिंगला विश्वास असतो. शंभूने पूर्वी अनेकदा हरनामसिंगकडून कर्ज घेतलेले असते. त्याच्या बदल्यात शंभूने आपली जमीन विकावी, असे हरनामसिंग सांगतो. पण शंभूची त्याला तयारी नसते. त्यामुळे रागावलेला हरनामसिंग त्याला दुसर्‍याच दिवशी कर्ज फेडायला सांगतो. ते न केल्यास त्या जमिनीचा लिलाव करण्यात येईल, असे धमकावतो.

- Advertisement -

खचून गेलेला शंभू घरी आल्यावर कुटुंबियांबरोबर हिशोब करतो आणि कर्ज 65 रुपयाचे आहे असे दिसते. घरातील सर्व सामान आणि पारोचे दागिने विकून तो ते जमवतो. पण ते घेऊन परतफेड करायला हरनामसिंगच्या मुनीमाकडे तो जातो, तेव्हा त्याला कर्जाची रक्कम प्रत्यक्षात 235 रुपये आहे, हे ऐकून धक्का बसतो. मुनीमाने हिशोबात चलाखीने गडबड केलेली असते. शंभूच्या वडिलांनी-धंगूने-कर्जाच्या बदल्यात केलेल्या मजुरीचा विचार करून ती रक्कम वळती करायला तो नकार देतो. हा वाद कोर्टात जातो. पण अशिक्षित शंभूला मुनिमाने घोटाळा केला आहे, आपण त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पावती मागितली नव्हती, हे पटवून देणे अवघड जाते. शंभू दावा हरतो. न्यायाधीश त्याला हरनामसिंगचे कर्ज फेडण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देतात. त्या अवधीत शंभूने कर्ज फेडले नाही, तर त्याच्या जमिनीचा लिलाव करून मिळणारी रक्कम कर्जफेडीसाठी वापरली जाईल, असेही स्पष्ट करतात.

कजर्र्फेडीसाठी शंभूकडे अन्य काहीच मालमत्ता नसते. त्याचा मित्र शंभूला पैसे कमावण्यासाठी कलकत्त्याला (आता कोलकाता) जाऊन काम बघायला सांगतो. शंभूला ही कल्पना आवडते, पण पार्वतीला दिवस गेलेले असल्याने ती त्याच्यापासून दूर राहायला तयार नसते. आपण केवळ तीन महिन्यांसाठीच जाणार असल्याने कुटुंबाचा आणि येणार्‍या बाळाचा फायदाच होईल असे शंभू सांगतो. कन्हैयाला वडिलांबरोबर जायचे असते. त्यासाठी तो हट्ट करतो. अखेर बर्‍याच वादानंतर त्याला बरोबर न्यायला शंभू तयार होतो.

कलकत्त्यातील वास्तव्याची त्यांची सुरुवातच खराब होते. त्यांना मदत करायलाच काय, पण त्यांच्याशी बोलायलाही कुणी तयार नसते. त्यामुळे त्यांना फुटपाथवर झोपावे लागते. कन्हैयाची मैत्री लालू-उस्ताद-या बूट पॉलिश करणार्‍या मुलाशी होते. शंभू, चहावाला आणि राणी या घरमालकिणीच्या दत्तक मुलाच्या मदतीने झोपडपट्टीत जागा मिळवतो. भाडे भरण्यासाठी शंभू हमालीचे काम करतो. त्याची दोस्ती वयस्कर रिक्षावाल्याबरोबर होते. तो शंभूला रिक्षा (माणसाने ओढण्याची रिक्षा)चा परवाना मिळवून देतो. कन्हैया लालूच्या मदतीने बूट पॉलिश करून कमाई करतो. तिकडे गावात पार्वती-धंगू कसेबसे पोट भरत असतात. शंभूशी संपर्क साधण्यासाठी, पार्वती ठाकुराइन बहूची मदत घेत असते.

तीन महिने पुरे होत आलेले असताना, शंभू जास्त पैसे जमवण्यासाठी अधिकच जोमाने काम करतो. एकेदिवशी एकजण त्याला आपल्या मैत्रिणीच्या रिक्षाचा पाठलाग करायला सांगतो. त्यासाठी जास्त पैसे देऊ करतो. पण त्या रेसमध्ये रिक्षाचे चाक निखळते आणि शंभूला अपघात होतो. वडिलांची अवस्था बघून कन्हैया खिसेकापूंच्या टोळीमध्ये सामील होतो. ते कळल्यावर शंभू संतापून त्याला मारतो. गेल्यापासून शंभूचे पत्र नसल्याने पार्वती काळजीत पडते. तिच्यादेखत मुनीम शंभूला कुटुंबाचा विसर पडल्याचा दोष देतो. ती एका बांधकामावर मजुरी करू लागते. शंभूच्या अपघाताची बातमी कळताच ती मोडून पडते. अखेर, धंगूला ताप असतानाही ती शंभूला भेटायचे ठरवते.

ती कलकत्त्याला आल्यावर, एक अनेळखी माणूस तिला आपण शंभूकडे तिला नेऊ असे सांगतो. पण तिला स्वतःच्याच खोपटात नेतो. तिच्यावर अत्याचार करायचा प्रयत्न करतो. ती तेथून पळताना एका मोटारीखाली सापडते. गर्दी जमते. तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी, लोक रिक्षा बोलावतात. तेथूनच जाणारा शंभू त्यासाठी तयार होतो. पण ती जखमी बाई आपली बायको आहे, हे पाहताच त्याला धक्का बसतो. दरम्यान कन्हैया वडिलांची अवस्था न बघवल्याने चोरी करून झोपडीत येतो. त्याला आईची अवस्था कळते. तो हॉस्पिटलकडे धावतो. तिची अवस्था पाहून, आपल्याला चोरीबद्दल देवानेच ही शिक्षा दिलीय असे त्याला वाटते. तो मिळालेल्या नोटा फाडून टाकतो. औषधांसाठी पैसा लागेल, असे डॉक्टर शंभूला सांगतात, त्यामुळे तो जमवलेली सर्व रक्कम पार्वतीला वाचवण्यासाठी खर्च करतो.

तिकडे गावात शंभूने कर्जफेड न केल्याने त्याच्या जमिनीचा लिलाव होतो. धंगू भ्रमिष्ट होतो. जमीन हरनामसिंगची होऊन तेथे मिलचे बांधकामही सुरू झालेले असते. शंभू कुटंबियांसह परत येतो, तेव्हा त्याला हे दिसते. तेव्हा तो आपल्या जमिनीवरील मूठभर माती हातात घेतो, पण तेथेही पहारेकरी त्याला अडवतो. निराश होऊन शंभूचे कुटुंब दूर जात असतानाच चित्रपट प्रेक्षकांना सुन्न करून संपतो.

चपखल पात्रयोजना कशी असावी याचे हा चित्रपट हे उत्तम उदाहरण. शंभू (बलराज सहानी), पार्वती (निरुपा रॉय), कन्हैया (रतन कुमार), ठाकुर हरनाम सिंग (मुराद), धंगू महातो (नाना पळशीकर), रिक्षावाला (अन्वर हुसेन), बूटपॉलिशवाला लालू-उस्ताद (जगदीप), पोस्टमन (नर्मदा शंकर), आणि ठाकुराइन (मीनाकुमारी). मीनाकुमारीची ही भूमिका पाहुणी कलाकार म्हणून होती. पाहुणी कलाकार म्हणून तिच्या कारकिर्दीतील ही एकमेव भूमिका हे मुद्दाम सांगायचे. बलराज सहानींच्या कामाबद्दल सांगायचे, तर आपण साक्षात शंभू महातोच बघत आहोत, असे वाटते. तीच गोष्ट निरुपा रॉय, रतनकुमार आणि नाना पळशीकर यांची. मुरादचा हरनामसिंगही प्रभावीच. नासिर हुसेनचा रिक्षावाला, जगदीपचा बूटपॉलिशवालाही तसाच. एका छोट्या भूमिकेत महमूदही आहे.

संगीत सलील चौधरी यांनी दिले आहे. मोजकीच चार गाणी. पण ती लक्षात राहण्यासारखीच आहेत. ‘आजा रि आजा निंदिया’ हे लता मंगेशकर यांनी म्हटलेले गीत मीनाकुमारीच्या तोंडी आहे. महंमद रफी यांचे ‘अब तोरी दुनिया हो मेरे राजा’ हे गीत आहे. मन्ना डे, लता आणि कोरस यांची दोन्ही गाणी ‘धरती कहे पुकारके’ आणि दुष्काळाने जमिनीला गेलेले तडे दाखवून नंतर श्रेयनामावलीलाच सुरू झालेले, पावसाने झालेला आनंद चित्रत करणारे, ‘हरियाला सावन ढोल बजाता आया’, ही गाणी आजही लोकप्रिय आहेत.

फिल्मफेअर पुरस्कारांच्या पहिल्याच वर्षी (1954) ‘दो बिघा जमीन’ची निवड सर्वोत्तम चित्रपट म्हणून तर सर्वोत्तम दिग्दर्शक म्हणून बिमल रॉय यांची निवड करण्यात आली. पहिल्याच (1953)राष्ट्रीय चित्रपट पारितोषिकांत या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपट म्हणून खास प्रशस्तीपत्र (ऑल इंडिया सर्टिफिकेट ऑफ मेरिट फॉर बेस्ट फीचर फिल्म) देण्यात आले. (त्यावेळी राष्ट्रपती सुवर्णपदक ‘शामची आई’ या आचार्य अत्रेंच्या चित्रपटाला मिळाले होते). 1954 मध्येच सातव्या कान्स महोत्सवात आंतरराष्ट्रीय विभागात प्रि इंटरनॅशनल प्राइझ आणि ग्रँड प्राइझसाठी नामांकन मिळाले होते. कार्लोव्ही व्हेरी महोत्सवातही हा सर्वोत्तम सामाजिक चित्रपट या गटात विजेता ठरला. (परदेशात या चित्रपटाचे वितरण बिमल रॉय यांनी कलकत्ता एक क्रूर शहर -कलकत्ता अ क्रुएल सिटी- या नावाने केले होते.)

चित्रपटातील शंभूच्या भूमिकेसाठी सुरुवातीला बिमल रॉय जयराज, त्रिलोक कपूर आणि नाझीर हुसेन यांचा विचार करत होते. पण त्यांनी ‘हम लोग’ या चित्रपटातील बलराज सहानी यांचे काम पाहिले आणि त्यांचीच निवड करण्याचा निर्णय घेतला. शंभूच्या भूमिकेत वास्तवता यावी यासाठी बलराज सहानी यांनी कलकत्त्याच्या रस्तांवर स्वतःला रिक्षा ओढण्याचा अनुभव असायला हवा, म्हणून मुद्दाम सराव केला होता. त्यामुळे काही रिक्षावाल्यांबरोबर त्यांची चांगली दोस्ती झाली होती. त्यांच्यातील बर्‍याच रिक्षावाल्यांची अवस्था शंभू महातोसारखीच असल्याचे त्यांना कळले होते.

या चित्रपटाआधी पौराणिक चित्रपटांत देवतांच्या भूमिका करणार्‍या निरुपा रॉयने एकदा सांगितले होते की, त्यातील करुण प्रसंगात रडण्याच्या वेळी तिला ग्लिसरीन वापरायलाच लागले नव्हते, इतका त्या भूमिकेचा प्रभाव होता. ‘दो बिघा जमीन’ आणि ‘परिणिता’ (मीना कुमारी आणि अशोक कुमार), हे दोन्ही चित्रपट बिमल रॉय एकाच वेळी बनवत होते. त्यांनी मीनाकुमारीला पाहुणी कलाकार म्हणून ‘दो बिघा जमीन’मध्ये काम करायला सांगितले, तेव्हा तिने लगेच होकार दिला होता.

– आ. श्री. केतकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -