घरफिचर्सवडील-मुलीचे आगळे नाते ऑन गोल्डन पाँड

वडील-मुलीचे आगळे नाते ऑन गोल्डन पाँड

Subscribe

चेल्सीला आपले वडील आणि तिच्या प्रियकराचा, आता तिच्या पतीचा मुलगा, बिली यांची चांगली दोस्ती झाल्याचे दिसते. आपल्या वडिलांच्या वागणुकीतला हा फरक जाणवल्यावर, चेल्सी उलटी कोलांटी (बॅक फ्लिप) घेऊन पाण्यात सूर मारण्याचा प्रयत्न करते. बिलीने त्याचे तंत्र आत्मसात केलेले असले तरी तोवर चेल्सीला ते जमलेले नसते. यावेळी मात्र चेल्सी त्यात यशस्वी होते. नॉर्मन, इथेल आणि बिली तिला दाद देतात. चेल्सी आणि नॉर्मन अखेर मिठी मारतात. बाप लेकीतला दुरावा नाहीसा होतो. चेल्सी बिलीबरोबर घरी जाते.

गेल्याच आठवड्यात चेम्मीन आणि त्यातील समुद्राच्या विविध रूपांविषयीही लिहिले. यावेळी ‘ऑन गोल्डन पाँड’ या कॅथरीन हेपबर्न, हेन्री फोंडा आणि जेन फोंडा यांच्या अविस्मरणीय चित्रपटाबाबत लिहीत आहे. नावात जरी पाँड असे म्हटले असले, तरी प्रत्यक्षात ते डबके नाही, तर विस्तीर्ण सरोवर आहे. नावाप्रमाणेच सोनेरी! अर्थातच चित्रपटात त्याला चांगलेच महत्त्व आहे. प्रचंड आकारमानाचे हे सरोवर पाहताना त्याचे विविधांगांनी छायाचित्रण करणार्‍याला नकळतच दाद दिली जाते. मनाच्या अथांग सरोवराप्रमाणेच हे सरोवर भासते.

नॉर्थ न्यू इंग्लंड या दूरवरच्या भागातील या सरोवराकाठी दीर्घ काळ उन्हाळा घालवण्यासाठी, नियमितपणे तेथील त्यांच्या कॉटेजमध्ये राहायला येण्याचा नियम जपणार्‍या इथेल आणि नॉर्मन थायर्स या वयस्कर जोडप्याची आणि त्यांच्या एकुलत्या एका मुलीची ही कहाणी हृदयस्पर्शी आहे. मुख्य म्हणजे ती कुठेही घडू शकेल, असे तिचे रूप आहे आणि म्हणून तर 1981 मध्ये निर्मिती झालेल्या चित्रपटाला जगभर चांगली दाद मिळाली होती.

- Advertisement -

हे जोडपे प्रथमच तेथे आले होते, तेव्हा तेथील सरोवरावरील लून्स, म्हणजे आपल्याकडील खंड्यासारखे पाण्यात सूर मारून मासे पकडणारे पक्षी, आवाज करून आपले घरी आल्याबद्दल स्वागत करत आहेत असे इथेलला वाटले होते. नंतर प्रत्येक वेळी तिला तसेच वाटत आले आहे. पण या उन्हाळ्यात येथे येऊन स्थिरस्थावर होईपर्यंत नॉर्मनला विस्मरणाचा त्रास नव्याने जाणवू लागला आहे. कुटुंबाच्या आल्बममधील कित्येक फोटो त्याला ओळखताच येत नाहीयेत. त्याचा मुकाबला करण्यासाठी तो वारंवार मृत्यू आणि वाढते वय याबाबतच बोलत असतो.

अशातच त्यांची एकुलती एक लाडकी लेक, चेल्सी त्यांच्या भेटीसाठी येते. ती कोरड्या आणि विक्षिप्त पित्यापासून काहीशी दुरावलेली आहे. ती ज्याच्याबरोबर लग्न करायचे ठरवत आहे, त्या तिच्या प्रियकराची, बिलची ती आई वडिलांशी ओळख करून देते. बिलचा तेरा वर्षांचा मुलगा बिली त्यांच्याबरोबरच आलेला आहे. केवळ वेळ घालवण्यासाठी म्हणून, त्याच्या सवयीनुसार नॉर्मन बिलबरोबर बुद्धीचे डावपेच करत आहे. पण बिलला ते फारसे भावत नाही, त्यामुळे तो आता पुरे असे सांगून टाकतो.

- Advertisement -

दुसरीकडे इथेल आणि चेल्सी बोलत असताना चेल्सी ती हजारो मैल दूरवर लॉस एंजेल्समध्ये राहात असली, तरीही आता तिला वडिलांचे वागणे सहन होण्यापलीकडचे वाटायला लागले आहे, असे सांगते. चेल्सी आणि बिल सुटीसाठी युरोपला जाण्यापूर्वी त्यांना थोडी मोकळीक मिळावी म्हणून बिलीला तेथे ठेवून घ्यायची विनंती करतात. खरे तर नॉर्मन त्याच्या 80 व्या वाढदिवसामुळे मानसिकदृष्ठ्या अधिकच क्षीण आणि इतरांबाबत तुसडा झाला आहे. तरीही तो बिलीला त्यांच्याबरोबर ठेवून घ्यायला तयार होतो.

सुरुवातीला बिली या वृद्ध आणि अनोळखी लोकांबरोबर ठेवल्याने वैतागलेला असतो. कारण तेथे जवळपास त्याला मित्र नसतात आणि काय करायचे हा प्रश्नच असतो. नॉर्मनचे फटकळ वागणे बिलीला आवडत नाही, पण अखेर त्यांच्या गोल्डन पाँडवरील मासेमारीच्या साहसाची मजा तो लुटू लागतो. काही काळातच बिली आणि नॉर्मनला मासे पकडण्याची झिंगच चढते. त्यांच्यात नॉर्मनचा शत्रू मासा, म्हणजे वॉल्टरला पकडण्याची मोहीम सुरू होते. पण त्या नादातच त्यांच्या मोटरबोटला अपघात होतो आणि ती कुचकामी बनते.

परतल्यानंतर चेल्सीला आपले वडील आणि तिच्या प्रियकराचा, आता तिच्या पतीचा मुलगा, बिली यांची चांगली दोस्ती झाल्याचे दिसते. आपल्या वडिलांच्या वागणुकीतला हा फरक जाणवल्यावर, चेल्सी उलटी कोलांटी (बॅक फ्लिप) घेऊन पाण्यात सूर मारण्याचा प्रयत्न करते. बिलीने त्याचे तंत्र आत्मसात केलेले असले तरी तोवर चेल्सीला ते जमलेले नसते. यावेळी मात्र चेल्सी त्यात यशस्वी होते. नॉर्मन, इथेल आणि बिली तिला दाद देतात. चेल्सी आणि नॉर्मन अखेर मिठी मारतात. बाप लेकीतला दुरावा नाहीसा होतो. चेल्सी बिलीबरोबर घरी जाते.

गोल्डन पाँडवरील मुक्काम संपून, परत जाण्याचा दिवस उजाडतो, तेव्हा सामान हलवण्यासाठी नॉर्मनही मदत करत असतो. एक जड पेटी उचलून नेत असताना त्याच्या छातीत दुखू लागते आणि तो पोर्चमधल्या जमिनीवरच पडतो. इथेल हॉस्पिटलला फोन करण्याचा प्रयत्न करते, पण फोन लागत नाही. ती कावरीबावरी होते. तोच नॉर्मन सांगतो, त्याला आता बरं वाटतंय! सोनेरी सरोवराचा निरोप घेण्यासाठी तो उभे राहायचा प्रयत्न करतो. इथेल त्याला म्हणते, मला मृत्यूबाबत माहीत होते, पण यावेळी मात्र तो खराच जाणवल्यासारखं झालं. कारण वाटलं होतं की नॉर्मन तेथेच मरण पावणार. मग नॉर्मनला आधार देत ती सरोवराच्या काठी नेते. तेथे पुन्हा त्यांना सुरुवातीला त्यांचे स्वागत करणारे पक्षी दिसतात. नॉर्मनला कळते की, ते अगदी इथेल आणि त्याच्यासारखेच आहेत. त्यांचे अपत्यही मोठे होऊन त्यांच्यापासून दूर गेले आहे, आता ते अगदी आपल्यासारखेच बनले आहेत!

या चित्रपटात इथेलच्या भूमिकेत कॅथरीन हेपबर्न आहे. तिच्याखेरीज अन्य कुणाची कल्पना करणे अवघडच आहे. उगाच नाही तिला क्वीन कॅथरीन म्हटले जात होते. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच तिला या भूमिकेसाठी ऑस्कर मिळेल असे म्हटले जात होते आणि ते खरेच ठरले. तिचे हे चौथे ऑस्कर. त्यानंतरही तिने आणखी काही ऑस्कर पारितोषिके मिळवली आहेत. तिच्या अभिनयाबाबत सांगायचे तर तुम्ही तो प्रत्यक्षच पहायला हवा एवढेच सांगता येईल. दीर्घकाळ चित्रपटसृष्टीत असून, अनेक समान स्नेही असूनही कॅथरीन हेपबर्न आणि हेन्री फोंडा यांनी एकत्र भूमिका केलेला हा पहिलाच चित्रपट होता!

नॉर्मनच्या भूमिकेत हेन्री फोंडा आहे. त्याची भूमिका अगदी वेगळ्या प्रकारची आहे. तो अशी भूमिका करू शकेल, असे त्याच्या पूर्वीच्या चित्रपटांवरून कोणालाच वाटत नव्हते. पण त्याने खरोखरच नॉर्मन हुबेहूब उभा केला आहे. अगदी जपून चालण्यापासून ते इकडे तिकडे बघण्यापर्यंत, तसेच त्याचे विक्षिप्त वागणे, सुरुवातीचा तुसडेपणा त्याने छान दाखवला आहे. बिलीशी त्याची मैत्री जमते आणि मासेमारीच्या सफरीवर त्यांची मैत्रीपूर्ण स्पर्धा सुरू होते, तेव्हाचा फरक त्याने अप्रतिमपणे दाखवला आहे. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ठ अभिनेता म्हणून ऑस्करही मिळाले. एकाच गोष्टीने सिनेरसिक हळहळले, कारण हा चित्रपट त्याचा अखेरचाच चित्रपट ठरला.

जेन फोंडा, ही वास्तवातील त्याचीच मुलगी. तिने सुरुवातीचा वडिलांबद्दलचा कटुपणा आणि तरीही त्यांच्याबाबत वाटणारी काळजी छान दाखवली आहे. बिलीचे त्यांच्याशी कसे जमेल ही चिंताही तिने सौम्यरूपात प्रकट केली आहे. पौगंडावस्थेतील बिली त्याच वयाच्या डग मॉकिऑनने कुठेही कृत्रिमपणा जाणवू न देता साकारला आहे. नॉर्मनबद्दल बालसदृश राग आणि त्याच्याशी गट्टी जमताच वाटणारे प्रेम त्याने छान दाखवले आहे. डॅबनी कोलमनने बिलची भूमिका व्यवस्थित केली आहे, पण त्याला सार्‍या चित्रपटात फारसा वावच नाही.

मुळात ‘ऑन गोल्डन पाँड’ हे नाटक होते. आणि त्यावरूनच तयार करण्यात आलेला मार्क रायडेलने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 1981 डिसेंबर महिन्यात प्रदर्शित झाला. त्याला ऑस्करसाठी पाच विभागांत नामांकन मिळाले होते आणि प्रत्यक्षात तीन ऑस्कर त्याने पटकावली. (फक्त सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ही पारितोषिके त्याला मिळाली नाहीत.) सर्वोत्तम अभिनेत्रीः कॅथरीन हेपबर्न, सर्वोत्तम अभिनेता हेन्री फोंडा आणि सर्वोत्तम पटकथेबद्दल अर्नेस्ट थॉम्पसन यांना हा सन्मान मिळाला होता. हेन्री फोर्ड हा सन्मान मिळवणारा सर्वात वयस्कर अभिनेता ठरला. त्यावेळी त्याचे वय 76 होते. कॅथरीन त्यावेळी 74 वर्षांची होती. चित्रपटातील सरोवरात सूर मारण्याचा प्रसंग तिने डमी न घेता, स्वतःच केला.

ऑन गोल्डन पाँड या नाटकाचे चित्रपटासाठीचे हक्क जेन फोंडाने तिच्या वडिलांसाठी (हेन्री फोंडासाठी) म्हणूनच घेतले होते. त्याने नॉर्मनची भूमिका करायची हे नक्कीच होते. ती अर्थातच चेल्सीची भूमिका साकारणार होती. यातही एक गंमत आहे, ती म्हणजे प्रत्यक्षातही या फोंडा बाप-लेकीचे संबंध काहीसे चित्रपटात दाखवल्यासारखेच होते. पटकथाकार थॉम्पसनने उन्हाळा बेलग्रेडमध्ये असलेल्या गोल्डन पाँडवर घालवला होता. चित्रपटात मात्र न्यू हँपशायरमधील होल्डरनेस येथील स्क्वॅम सरोवरावर चित्रीकरण करण्यात आले. तेथील कॉटेजमध्ये चित्रीकरणासाठी काही बदल करण्यात आले होते. चित्रीकरण संपल्यावर त्यांना ते मूळच्याप्रमाणे मालकाला परत द्यायचे होते. पण त्या मालकाला ते बदल एवढे आवडले की त्याने ते बदल तसेच ठेवायचे ठरवले.

चित्रीकरणासाठी तेथे एक बोट हाऊसही उभारण्यात आले होते. चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी कॅथरीनने हेन्रीला तिच्या जोडीदाराची लकी हॅट दिली होती. तीच त्याने चित्रपटात वापरली होती. ती खरोखरच त्याला लकी ठरली असे म्हणावे लागेल.

चित्रपटात नॉर्मन आणि बिलीची बोट खडकावर आदळून फुटते असा प्रसंग होता. पण ती 1951 सालची बोट एवढी भक्कम होती की ती खडकांवर वारंवार आदळूनही फुटत नव्हती. त्यासाठी खास प्रयत्न करावे लागले. नॉर्मन आणि बिली खडकाला धरून बसतात या प्रसंगाच्या वेळीही गंमतच झाली. उन्हाळ्यामुळे तळ्यातील पाणी एवढे कमी झाले होते की ते दोघे तेथे आरामात उभे राहू शकले असते. परंतु थंडी एवढी होती की त्यांना बाहेरच्या कपड्यांच्या आत वेट सूट परिधान करावे लागले होते. आजही न्यू हॅम्पशायरला जाणार्‍यांना जेथे चित्रीकरण झाले होते, ते स्क्वॅम सरोवर पाहता येते. बिली ज्याला पकडतो, तो वॉल्टर हा ट्राउट जातीचा मासा मुद्दाम आणण्यात आला होता. चित्रीकरणानंतर तो सरोवरातच सोडून देण्यात आला. त्याच्यावरूनच आज तेथे वॉल्टर्स बसीन या नावाचे एक उपहारगृह थाटले गेले आहे.

सरोवराचे विविध अंगांनी आणि त्याच्या विविध भागांचे चित्रीकरण आवर्जून बघायला हवे एवढे ते अविस्मरणीय आहे. सरोवर आणि त्याच्या भोवतीचा भूल पडेल असा निसर्ग यांनी मन हरखून गेले नाही, तरच नवल. आणि त्याला उत्तम कथा, अभिनय आणि दिग्दर्शन यांची जोड, असा चित्रपट क्वचितच पाहायला मिळतो. बघा जमेल तेव्हा.

– आ. श्री. केतकर.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -