घरफिचर्सअधिकाराच्या पायात जबाबदारीची बेडी

अधिकाराच्या पायात जबाबदारीची बेडी

Subscribe

जेव्हा यातला कोणी नाही रेतून आहे तरे वर्गात दाखल होतो, तेव्हा तो आपल्या नाही रे दुखण्याला विसरून आहे रे वर्गाचा लढवय्या होऊ लागतो. फार थोडे असे मिळतील, की नाही रे वर्गातून आहे रे वर्गात आल्यानंतरही नाही रे वर्गाच्या अगतिकता, लाचारी वा गरजेशी सहानुभूती बाळगून असतात, त्यांना मदतीचा हात द्यायला सज्ज असतात. अधिकार वा शक्ती ही दुबळ्यांना मदतीचा हात देण्यासाठी असल्याचे सामाजिक भान जिथे असते, त्याला सभ्यता संस्कृती म्हणतात. पण आजकाल त्याचाच आपल्या समाजाला पुरता विसर पडला आहे. आपण कुठल्याही समाज घटकातले असूद्यात, हाती अधिकार नाही वा पाठीशी बळ नाही तोपर्यंतच आपल्या विद्रोहाची मशाल जळत असते.

सत्ता माणसाला भ्रष्ट करते आणि निरंकुश सत्ता पूर्णपणे भ्रष्ट करून टाकते, असे म्हटले जाते. आपल्या देशात व समाजात हे सातत्याने बघायला मिळत असते. थोडा अधिकार हाती आला, तरी माणसे इतकी मस्तवाल होऊन जातात, की त्यांच्याच मित्रपरिचितांनाही त्यांना ओळखणे अशक्य होऊन जावे. अधिकार साधा बसमधल्या कंडक्टरचा असो किंवा एखाद्या शासकीय सत्तापदाचा असो. आपण आता जगावर राज्य करतोय, अशा थाटात माणसे वागू लागतात. कुणाचेही नशीब घडवणे, बिघडवणे आता आपल्या हाती आल्याची, ही मस्ती त्यांना रसातळाला घेऊन जात असते. प्रामुख्याने गरजवंताला लुबाडणे वा नाडणे, हा तर अशा वृत्तीच्या लोकांसाठी छंद झाला आहे. अन्यथा हजारो करोड रुपये लुटून नीरव मोदी वा विजय मल्ल्या सुखरूप परदेशी पळून जाऊ शकले नसते. अन्यथा शेती पिकासाठी किरकोळ काही हजाराचे कर्ज मागणार्‍या माऊलीकडे एका बँकेच्या शाखाधिकार्‍याने शरीरसुखाची मागणी केली नसती. हा किती विकृत विरोधाभास आहे ना?

- Advertisement -

खर्‍याखुर्‍या गरजवंताला नाडायचे. पण जो कोणी भामटा आहे, त्याला कुठल्याही कागदपत्राशिवाय हजारो करोड रुपये मिळून जातात. हा मस्तवालपणा येतोच कशाला आणि कुठून? जबाबदारीविना अधिकार ही अशा गुन्ह्याची जननी असते. समाजात कुठल्याही जाती धर्माच्या नावाने अन्याय रंगवला जातो. पण जगात दोनच धर्म वा जाती असतात. एक आहे रे व दुसरी नाहीरे, अशी जात वा धर्म असतो. त्यातल्या नाही रेला कायम वा नियमातून गरजवंत बनवून ठेवले जात असते. मग त्याच्या गरजेचा सापळा बनवून त्याचे शोषण व अत्याचार चालू असतात. साहजिकच प्रत्येकाला अशा आहे रे वर्गामध्ये शिरकाव करून घेण्याची आकांक्षा सतावत असते. जेव्हा यातला कोणी नाही रेतून आहे तरे वर्गात दाखल होतो, तेव्हा तो आपल्या नाही रे दुखण्याला विसरून आहे रे वर्गाचा लढवय्या होऊ लागतो. फार थोडे असे मिळतील, की नाही रे वर्गातून आहे रे वर्गात आल्यानंतरही नाही रे वर्गाच्या अगतिकता, लाचारी वा गरजेशी सहानुभूती बाळगून असतात, त्यांना मदतीचा हात द्यायला सज्ज असतात. अधिकार वा शक्ती ही दुबळ्यांना मदतीचा हात देण्यासाठी असल्याचे सामाजिक भान जिथे असते, त्याला सभ्यता संस्कृती म्हणतात. पण आजकाल त्याचाच आपल्या समाजाला पुरता विसर पडला आहे. आपण कुठल्याही समाज घटकातले असू द्यात, हाती अधिकार नाही वा पाठीशी बळ नाही तोपर्यंतच आपल्या विद्रोहाची मशाल जळत असते. पण हातात इवला जरी अधिकार आला, तर आपणही त्याच लाचाराचे शोषण करायची संधी आपण शोधू लागतो. कारण आपण मुळातच समतेचे वा सामाजिक न्यायाचे प्रवक्ते नसतो, तर आपली सगळी धडपड अधिकार प्राप्तीसाठी चाललेली असते.

आपणही लोकांना वाकवू शकतो, त्यांच्या अगतिकतेचे लाभ उठवू शकतो. यासाठी जेव्हा सशक्तीकरण होते, तेव्हा अन्यायाची मालिका कधीच संपत नाही. काल सत्ता राबवणारे आज राजकीय सूडभावनेचा आरोप करतात आणि काल सूडभावनेचा आरोप करणारे आज तशाच कारवाया करतात, हे त्याचे जीवंत उदाहरण आहे. त्यातून आपल्या सामान्य माणसाची जडणघडण होत असते. आपल्या हाती कर्जवाटपाचे अधिकार आलेले आहेत आणि आपल्या सहीशिक्क्याशिवाय ते मिळू शकत नाही, म्हटल्यावर मुजोरी डोके वर काढते. तेच वर्दीतला एखादा पोलीस अधिकारी दाखवतो आणि वंचित पीडितांना नुसत्या तक्रारीने कोणाला गजाआड टाकण्याचा अधिकार मिळाल्यानंतर होत असते. पुरावे देण्याची जबाबदारी नसली मग अधिकाराचा गैरवापर अपरिहार्य असतो. कर्ज अडवणे नाकारण्याचा अधिकार त्याचेच दुसरे रूप असते. सगळा झगडा आहेरे-नाहीरे असाच आहे. त्यापासून लोकांना मुक्ती देण्याच्या चळवळी व लढेही असेच महत्त्वाकांक्षेचे होऊन गेलेले आहेत. बाकीच्या समाज व लोकसंख्येला ओलिस ठेवण्याचा अधिकार प्रत्येकाला हवा आहे. समता वा सामाजिक न्याय कोणाला हवा आहे?

- Advertisement -

आपली अरेरावी म्हणजे सामाजिक न्याय, अशी एकूण समजूत आपण करून घेतलेली आहे. आपले सबलीकरण व दुसर्‍याचे दुर्बलीकरण, ही आता सामाजिक वा अन्य न्यायाची व्याख्या होऊन गेलेली आहे. त्यामुळे अशा एका बँक अधिकार्‍याला अटक करून वा शिक्षापात्र ठरवून न्यायाची प्रस्थापना होऊ शकत नाही, की अशा विकृत प्रवृत्तीला पायबंद घातला जाऊ शकणार नाही. सामाजिक न्याय वा समता हे कायद्याने प्रस्थापित होत नसतात, तर प्रबोधनाने समाजात परिवर्तन घडवून आणणे अगत्याचे असते. ते काम शाहू, फुले, आंबेडकर वा अन्य महर्षी, कर्वे, आगरकर अशा महात्म्यांनी आयुष्य खपवून केले. पण त्यांच्या मागे आजचे परिवर्तनवादी सशक्तीकरण व दुर्बलीकरण अशा गुंत्यात फसलेले आहेत. नाहीरेला आहेरेमध्ये आणून सशक्तीकरण होते. पण कुठेतरी नवा नाहीरे वर्ग निर्माण होतच असतो आणि त्याचे शोषण होणे अपरिहार्य असते. अधिकाराच्या पायात जबाबदारीची बेडी घातल्याशिवाय यातून सुटका होण्याची शक्यता नाही.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -