घरफिचर्सट्रेनिंग आणि नवी इनिंग

ट्रेनिंग आणि नवी इनिंग

Subscribe

आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबणार होतो, त्या हॉटेलचा पत्ता शोधताना आमच्या नाकीनऊ आले. एका हॉटेलमध्ये गेलो आणि आमच्या जवळ असलेला पत्ता त्याला दाखवत त्या माणसाला विचारले, की हे हॉटेल कुठे आहे, तर तो स्थानिक भाषेत काहीतरी बोलला, आम्हाला काहीच समजले नाही, एकमेकांच्या तोंडाकडे पाहत आम्ही दुसर्‍या माणसाला विचारायला गेलो.

नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना आमच्या आयुष्यातील रंजक, उत्साहवर्धक आणि नवनव्या किस्स्यांनी भरलेला होता. मुंबई आणि गावाशिवाय बाहेर न राहिलेलो आम्ही आता एक महिन्याच्या ट्रेनिंगसाठी चक्क केरळच्या त्रिवेंद्रमला जाणार होतो. महिन्याभराचे वास्तव्य सुमारे 1500 किलोमीटरचा एक दिवसाचा प्रवास. या सर्व त्रिवेंद्रम भेटीमागची पार्श्वभूमी हिच की, एअर इंडियात नोकरीसाठी अर्ज केल्यावर काही दिवसांनी त्यासाठी आमची निवड झाली.

कामाचा अनुभव आणि सुरळीत गेलेली परीक्षा यामुळे कामाचं पक्कं झालं. पण एक महिन्याच्या ट्रेनिंगनंतरच कामावर रूजू होता येणार होतं. परंतु, ट्रेनिंग कुठे आणि कशी होणार याबद्दल उत्सुकता कायम होती. शेवटी त्रिवेंद्रममध्ये ट्रेनिंग असल्याचे एअर इंडियाकडून कळवण्यात आलं. आमचे दोन दिवस तर सामानाची आवराआवर करण्यात गेली. मुंबईहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून आम्ही निघालो. 1 दिवस आणि 4 तासांचा प्रवास करून आम्ही इच्छित स्थळी पोहचणार होतो. कोकण रेल्वेने निसर्ग सौंदर्य पाहत आम्ही कोकण, गोवा, कारवार, उडपी असा प्रवास करत शेवटी त्रिवेंद्रमला पोहचलो. शहरात पोहचल्यावर खरं तर आमच्या कसोटीला सुरुवात झाली.

- Advertisement -

कारण आश्चर्याची बाब म्हणजे तिथे कोणीही हिंदीत बोलत नव्हता. तुमची भाषा जगणं सोपं करते. समोरच्या व्यक्तीशी आपण नीट संभाषण करू शकलो तर आपल्या भरपूर गोष्टी सोप्या होतात. गैरसोय होत नाही. परंतु, एकतर हे शहर आम्हाला नवीन आणि तिथल्या स्थानिक लोकांची भाषा आम्हाला येत नव्हती. किस्स्यांची सुरुवात आम्ही तिथे पोहचल्यापासूनच सुरू झाली. आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबणार होतो, त्या हॉटेलचा पत्ता शोधताना आमच्या नाकीनऊ आले. एका हॉटेलमध्ये गेलो आणि आमच्या जवळ असलेला पत्ता त्याला दाखवत त्या माणसाला विचारले, की हे हॉटेल कुठे आहे, तर तो स्थानिक भाषेत काहीतरी बोलला, आम्हाला काहीच समजले नाही, एकमेकांच्या तोंडाकडे पाहत आम्ही दुसर्‍या माणसाला विचारायला गेलो. अशी 15 मिनिटे आम्हाला आमची मुंबय्या हिंदी येणारा पहिला माणूस भेटण्यात गेली. त्याला तोडकं, मोडकं का होईना पण हिंदी येत होतं. आपल्या दक्षिण भारतीय टोनमध्ये बोलत, त्याने त्याच हॉटेलकडे हात दाखवला आणि तुम्हाला सोडतो असे म्हणाला.

आम्ही हॉटेलमध्ये गेलो, तेव्हा पुन्हा पहिलाच व्यक्ती तेथे होता. तेव्हा त्या दुसर्‍या व्यक्तीकडून आम्हाला समजलं की, तो पहिला व्यक्ती त्या हॉटेलचा कर्मचारी होता आणि तुम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबला आहात, तेच हे हॉटेल आहे. आम्ही तर कपाळावर हात मारून घेतला. महिनाभर हॉटेलच्या कर्मचार्‍यांशी संवाद साधताना भरपूर समस्या आल्या. खायला काही मागताना पण बर्‍याच समस्या आल्या. ट्रेनिंग व्यतिरिक्त महिन्याभराच्या काळात कोवलम बीच,पद्मनाभस्वामी मंदिर,अट्टुकल भगवती मंदिर अशा काही ठिकाणांना भेट दिली. भाषा वेगळी जरी असली तरी हजार किलोमीटरवरील दूर असणारी ही माणसं आमची आपली होऊन गेली हे कळलचं नाही.आयुष्यातील जीवनावश्यक वस्तूंची नावे मल्याळम भाषेतच असल्यामुळे बर्‍याचशा समस्यांना सामोरे जावे लागले. परंतु काही दिवसांनी जशी जशी आसपासच्या माणसांशी ओळख झाली आणि काही समस्याही सुटली. राष्ट्र म्हणून एक असलेल्या भारत देशात लोकांचे राहणीमान, भाषा, परंपरा किती भिन्न असतात याचे भान एका राज्यातून दुसर्‍या राज्यात गेल्यावर कळतेच हे खरे.


-राजेश घाडीगावकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -