पैशांची गुंतवणूक भवितव्य आणि मानसिक समाधानासाठी !

Mumbai
गुंतवणूक

आपल्याला बचत-गुंतवणूक आणि कर वाचवण्यासाठी करावयाची गुंतवणूक, नफादायी भविष्यकालीन गुंतवणूक आणि आकस्मिक बाबींसाठी आर्थिक तरतूद असे वेगवेगळे कप्पे करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक पैसा गुंतवला की डब्बल होईल अशी अवास्तव अपेक्षा न करता, विविध हेतूंसाठी सुरक्षित गुंतवणूक ही केव्हाही लाभदायी असते. त्यातून सुरक्षित भवितव्य आणि मानसिक समाधान मिळते. आपण त्यापैकी काही पर्याय पाहणार आहोत.

काही गुंतवणूक ही फक्त नफ्याव्यतिरिक्त खूप काही देणारी अशी असू शकते म्हणून सर्वच गुंतवणुकीकडे किंवा विविध साधनांकडे आपण एकाच नजरेने नव्हे, तर त्याकडे वेगळ्या नजरेने पहायला शिकले पाहिजे. पण तसे सहसा होत नाही, विशेषतः अतिव्यवहारी असलेली माणसे तर प्रत्येक ठिकाणी व्यवहार पाहतात, त्यांना साध्या साध्या गोष्टीत आनंद घेता येत नाही. कारण त्यांना प्रत्येक गोष्ट पैशाच्या-किमतीच्या तुलनेत मोजण्या-मापून पाहण्याची एक कु-सवय लागलेली असते. किंबहुना तशी त्यांची मानसिकता झालेली असते. तर काही लोक दुसर्‍या टोकाचे असतात. ते अतिशय उदार आणि अव्यवहारी असे असतात. ‘पैसे गेले तर गेले ! कमावू पुन्हा !! अशी त्यांची मनोवृत्ती असते. मात्र आपल्याला समतोलपणाने पैसा कमावणे आणि गुंतवणे याकडे बघायला हवे. बचत-गुंतवणूक आणि अर्थवृद्धी हे पाहताना काही गुंतवणूक ही आर्थिक मोबदला देत नसली तरी आपण करतो किंवा करावी लागते, अशी कोणती गुंतवणूक असते? हे आपण पाहणार आहोत.

पार्श्वभूमी-पैसा म्हटले की आपल्याकडे एकच विचार होतो-खर्च करणे-उडवणे. कशाला उद्याची बात? ठेवून काय करायचे आहे? ही मानसिकता एकीकडे असते तर दुसरीकडे पै-पै साठवून कंजूषपणा करण्याची प्रवृत्ती असते.या दोन्हीच्या मधोमध जगणारे-उत्पन्न आणि खर्च अशा दोन्ही तोंडाची हातमिळवणी करणारा एक खास वर्ग असतो. त्यांना बचत हवी असते, तितकीच चैन प्यारी असते. अशा संभ्रमित अवस्थेत ते कोणा एका गोष्टीला धड न्याय देवू शकत नाहीत. म्हणूनच आपल्याला बचत-गुंतवणूक आणि कर वाचवण्यासाठी करावयाची गुंतवणूक, नफादायी भविष्यकालीन गुंतवणूक आणि आकस्मिक बाबींसाठी आर्थिक तरतूद असे वेगवेगळे कप्पे करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक पैसा गुंतवला की डब्बल होईल अशी अवास्तव अपेक्षा न करता, विविध हेतूंसाठी सुरक्षित गुंतवणूक ही केव्हाही लाभदायी असते. आपण त्यापैकी काही पर्याय पाहणार आहोत.

1) इन्शुरन्स/ विमा-पॉलिसीसाठी भरलेले पैसे – आपल्याकडे विमा पॉलिसी काढताना लाभ किती होईल?किती टक्के वृद्धी होणार? असा हिशेब केला जातो. किंबहुना ‘बोनस’ किती मिळणार ? असे प्रश्न एजंटला विचारले जातात. पण गुंतवणूक आणि विमा यातील मूलभूत फरकच सहसा लक्षात घेतला जात नाही. मग अपेक्षा ठेवली जाते ती भांडवल-वृद्धीची. दाम-दुप्पटीची. बी पेरले-झाड उगवले की, फळ मिळालेच पाहिजे. हीच आमची साधीसिधी अपेक्षा. मुळात ‘विमा’ का काढला जातो? त्यामागचे तत्व काय आहे? हे आपण गंभीरपणे लक्षात घेतले पाहिजे. हेतू काय ? विमा हे आपल्याला अनपेक्षित घटना, दुर्घटना यापासून जे आर्थिक नुकसान होते त्यापासून संरक्षण नव्हे तर भरपाई देण्याचा प्रयत्न करते. मनुष्य-जीव, मौल्यवान वस्तू, चल-अचल संपत्ती किंवा मालमत्ता, वाहन, जोखीम वस्तू, यांचे नुकसान झाले तर आर्थिक भरपाई मिळू शकते. चोरी, दरोडे, पूर-आग अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान होते त्यापासून संरक्षण म्हणून विमा उतरवला जातो. विमा ही काळाची गरज आहे.

उदाहरणार्थ- आपण पर्यटनासाठी बाहेरगावी गेलो आणि दुर्दैवाने घरफोडी झाली तर दोष कोणाला द्यायचा?त्यातून झालेले नुकसान कसे भरून येणार? पोलीस सीसीटीव्ही पाहणार आणि मग गुन्हेगारांना शोधणार. त्यांच्यावर आधीच शेकडो गुन्हांची जबाबदारी, त्यात आपला नंबर कधी-कसा लागणार? त्यातून चोर सापडले तरी गुन्हा कोर्टात सिद्ध होणे आणि मग आपल्याला आपला गेलेला माल परत मिळणे सोप्पे थोडेच असते? अमूक वस्तू तशीच परत मिळेल? याचा काय भरोसा? घसघशीत चार तोळ्याची चेन तीच मिळेल कशावरून? चोरट्यांनी विकली किंवा वितळवली तर काय उपयोग? किंवा मोटार चोरून नेली? तर विमा आपल्याला काही प्रमाणात नुकसानभरपाई देतो. अर्थात आपण भरलेले हफ्ते-जे मुळातच मूळ वस्तूच्या किंमतीच्या प्रमाणात ठरवलेले असतात. एखादा कुटुंबातील कर्ता-कमावता पुरुष अपघातात मृत्युमुखी पडतो, जर विमा काढला असेल, तर विम्याची रक्कम त्याच्या कुटुंबियांना दिली जाते. त्याद्वारे कुटुंबाला जगण्यासाठी आधार मिळू शकतो.

आपण बहुतेकजण गुंतवणूक व विमा यांची गल्लत करतो आणि इतका विमा भरलाय तर किमान इतका परतावा मिळालाच पाहिजे अशी अपेक्षा करतो. अनेकदा विमा आणि बँकेचे फिक्स्ड डिपॉझीट यांची तुलना केली जाते. साम्यदेखील शोधायचा प्रयत्न होतो. प्लीज अशी मिस्टेक ‘गलतीसे’देखील करू नका. अनेक गुंतवणूक साधने ही एकसारखी नाहीत, प्रत्येकाचे प्लस-मायनस पहायला आणि योग्य जागी फिट करायला शिका. विमा हे कवच आहे, कमाईचे साधन म्हणून त्याकडे बघू नका.

2) सोन्या-चांदीचे दागदागिने – अलंकार आणि आभूषणे मिरवण्याचे आकर्षण हे काही नवे नाही, स्त्रियांप्रमाणे पुरुष-वर्गही आपल्या श्रीमंतीचे-सत्तेचे प्रदर्शन करण्यासाठी आजही विविध दागिने घालताना आपण पाहतो आहोत. सोन्यातील गुंतवणूक ही ‘डेड इन्वेस्टमेंट’ आहे हे कितीही कानीकपाळी ओरडून सांगितले तरी आम्हा भारतीयांना पुढील दहा जन्मतरी हे पटणारच नाही. आचार्य अत्रे असते तर म्हणाले असते- किमान दहा हजार वर्षे तरी या देशातील प्रजेला सोन्याचा मोह होत राहणारच. अगदी सुवर्ण-मृगावरून रामायण घडले तरी आम्ही आमचा सोनेरी हव्यास सोडणार नाही म्हणजे नाहीच! मंदिरातील देव-देवतांच्या अंगावर आणि थेट कळसावर असलेले सोने-चांदी त्यात मृतप्राय अगणित संपत्ती कार्यरत करण्याचा मनसुबा केंद्र सरकारने आखला होता, पण दुर्दैवाने तितकासा प्रतिसाद लाभलेला नाही. सुशिक्षित तरुणवर्गदेखील टीव्ही आणि अन्य माध्यमातील दागिन्यांच्या जाहिराती पाहून आणि आजही आभूषणे घालणे हे प्रतिष्टीतपणाचे लक्षण मानले जात आहे.

सोन्याकडे अजूनही उत्तम गुंतवणूक साधन म्हणून पाहिले जात नाही. पेपर-गोल्ड म्हणजेच गोल्ड-एटीएफ जरी आर्थिक बाजारपेठेत उपलब्ध असले तरीही त्यात गुंतवणारे कमीच आहेत. सोन्याचे मूल्य हे कमी-जास्त होत असले तरीही त्याकडे शेअर्सप्रमाणे बघितले जात नाही. दागिने मोडणे हे फक्त नवीन डिझाईन करण्यासाठीच असते, अन्यथा दागिने विकले जात नाहीत. परिस्थितीमुळे विकावे लागले तरी ते पुन्हा घेण्याची प्रवृत्ती असतेच. गोल्ड-लोनप्रकार आहे, पण पूर्वी जसे सावकाराकडे गहाण ठेवले जायचे तसे आता फायनान्स कंपन्यांकडे ठेवण्याबाबत मोजका प्रतिसाद आहे. सावकारी मात्र ग्रामीण भागात टिकून आहे. महत्वाचा मुद्दा हा की, तुम्ही एखादा दागिना घ्याल, तर त्याकडे गुंतवणूक म्हणून अजिबात पाहू नका. कारण विकून दुप्पट भाव येईल अशा भ्रमात राहू नका, कारण दागिने म्हणजे ‘घरची लक्ष्मी’ ती कदापी विकायची नसते. मग हे गुंतवणूक साधन नाही हे मनात पक्के बिंबवा आणि हौस म्हणून दागिनने खरेदी करा.

3) घर-प्रॉपर्टी-स्थावर-जंगम – हल्ली आपण होम-लोन काढून नवीन किंवा जुने घर घेतो. किंवा अनेकजण ‘सेकंड-होम’ घेऊन कृतार्थ वगैरे होतात. आपण आपले घर झटपट विकायला काढतो का? मग केवळ आमच्या एरियात हा भाव चालला आहे, असे बोलण्यातून कोणते समाधान मिळते? चांगल्या ब्लू-चीप कंपनीचे शेअर्सदेखील उठसूट विकत नाहीत, तिथे राहते घर कसे विकणार? आणि भलामोठा नफा कसा काय कमावणार? तेव्हा यासर्व फक्त हवेतल्या किंवा कागदावरच्या गोष्टी म्हणता येतील. आपण घर-बंगला काहीही घेतले की, आपले पैसे कायमचे गुंतलेच समजा. अगदीच आर्थिक कोंडी झाली किंवा गुंतागुंत झाली तरच घर विकायचा अखेरचा पर्याय निवडला जातो. तेव्हाही आपली घराशी असलेली भावनिक गुंतवणूक आपल्याला अस्वस्थ करते. एक घर सोडले तर दुसरे घेणे काही सोप्पे नसते. घर न विकता काही कमाई करायची तर ते भाड्याने देणे हा एक सर्वसाधारण प्रकार आहे. मात्र तसे केल्यावर आपल्याला त्या घरात राहता येत नाही. म्हणजे तुम्ही एकाचवेळी अंडे तरी खावू शकता, नाहीतर ऑम्लेट. एकाचवेळी दोन्ही शक्य नाही.

4) इमर्जन्सीसाठी बाजूला ठेवलेले पैसे – हल्ली जरी प्रत्येकाकडे एटीएम-पेटीएम किंवा डेबिट-क्रेडीट कार्ड्स असली तरी घरामध्ये विशेषतः लहान-मुले किंवा वृद्ध माणसे असतील तर पाच-दहापासून पन्नास हजार इतकी रोकड रक्कम बाजूला काढण्याची पद्धत आहे. पूर्वी अडीअडचणीला पैसा-अडका असावा असे म्हटले जायचे, आता त्याला ‘इमर्जन्सी फंड’ असे म्हणतात. असे जे ऐनवेळी आकस्मिक खर्च किंवा वैद्यकीय खर्चासाठी बाजूला काढून ठेवलेले पैसे- यावर काही मिळकत होत नाही. हेच पैसे बँकेत ठेवले असते, तर इतके टक्के व्याज मिळाले असते किंवा शेअरबाजारात गुंतवले असते तर ‘सॉलिड कमाई’ झाली असती असा काल्पनिक हिशेब करण्यात अर्थ नाही. कारण हे पैसे मुळातच गुंतवणुकीसाठी नाहीत किंवा सटर-फटर खर्चासाठी नाहीत हे जर पक्के डोक्यात ठेवले तर हेतूची गल्लत होणार नाही. म्हणून तुम्ही अमुकच पैसे ठेवा असे नाही. तुमच्या गरजा, घरातली माणसे याचा योग्य अंदाज घेऊन त्या प्रमाणात काही पैसे बाजूला ठेवा. उरलेले तुम्ही गुंतवा तेही कसे ? तर शॉर्ट टर्म-लाँग टर्म पद्धतीने. म्हणजे तुमची गुंतवणूक व्यवस्थित विभागली जाईल आणि विविध गरजांना त्यांच्या कालावधीत पैसा उपलब्ध होऊ शकेल.

आपल्याला आकस्मिक खर्चासाठी ऐनवेळी रोकड हाताशी असावी म्हणून सेविंग खात्यात पैसे ठेवले जातात, तसेच हल्ली म्युच्युअल फंडातील ‘लिक्विड फंड’ हा एक सोयीस्कर ऑप्शन आहे. तरीही घरात काही पैसे ठेवलेत तर आपली गुंतवणूक हुकली म्हणून नाराज होऊ नका.आपण जे कमावता त्यापैकी योग्य टक्के रक्कम खर्चासाठी-गुंतवणुकीसाठी आणि इमर्जन्सीसाठी किती आणि कशी ठेवायची? हे आपले आपणच ठरवायचे आहे. आपल्याकडे असलेला सर्वच पैसा गुंतवणुकीसाठीच आहे हा गैरसमज मात्र मनातून काढून टाका. कारण आपण आणि आपले कुटुंबीय यांच्या भावभावना आणि वेगवेगळ्या गरजा-हेतू गृहीत धरूनच पैसा गुंतवला पाहिजे आणि जरुरीइतका बाजूला ठेवता आला पाहिजे.

5) भेटवस्तू-दानधर्म – आपण आपल्या प्रिय व्यक्तींना भेट देतो तेव्हा तिथे व्यावहारिक निकष लावायचे नसतात, त्यातून काय नफा-तोटा सुटतोय का? असे पहायचे नसते. भावनिक-मानसिक गुंतवणूक असते, त्याला हिशेबी निकष लावायचे नसतात. दान देताना त्यातून पुण्य मिळेल का, की समाजात दानशूर म्हणून नाव मिळेल? आयकरात सवलत मिळेल ही अपेक्षा समजू शकतो, पण देवस्थान -अनाथाश्रम-वृद्धाश्रम यांना दिलेले पैसे एका श्रद्धेने किंवा आस्थेपोटी किंवा सामजिक भावनेपोटी देतो त्याला व्यावहारिक परिमाणे लावू नयेत. त्या बदल्यात काही मिळावे, ही अपेक्षा अजिबात ठेवू नये. गोरगरीबांना, गरजूंना मदत करण्याचे व्रतदेखील मोलाचे असते. त्यातून एक सामाजिक दायित्वाचे समाधान मिळू शकते.

थोडक्यात, वरील काही गोष्टींसाठी आपण आपले पैसे जरी देत असलो, तरी त्याकडे टिपिकल गुंतवणूक म्हणून पाहू नये. नफा कमावण्याचे साधन म्हणून बघू नका. इतर अनेक गुंतवणूक माध्यमे आणि साधने आहेत. काही बाबतीत पैसा खर्च करणे म्हणजे व्याज-बोनस यापलीकडे जावून काहीतरी मानसिक पातळीवरील समाधान मिळवणे असते. आपल्या जीवनात असेही काही कमावण्याची गरज असते हे लक्षात घ्या आणि तसे पैसे खर्च करा-गुंतवा !!

-राजीव जोशी – बँकिंग आणि अर्थ-अभ्यासक