घरफिचर्सचौथी सीट आणि विक्रमादित्याचं न्यायासन

चौथी सीट आणि विक्रमादित्याचं न्यायासन

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादरातून उभारलेले संयमाचे राजेशाही महाल ठाण्यापासून पुढं भदाभद कोसळू लागतात. या रोजच्याच लोकल सोहळ्याला रोजच उपस्थित असलेल्यांची नजर आता ठिबक सिंचनाच्या कारंज्यासारखी वर खाली होते. खिडकीतली सीट आता गुलामी बंद करून विक्रमादित्याच्या न्यायासनावरून उठवल्याच्या अविर्भावात खिडकी मोकळी करते.

लोकलमध्ये चौथ्या सीटला मिळालेली साडेतीनव्या सिटची सवलत ही अधिकार वाटत असते. यातल्या तिसर्‍या सिटेला खिडकीकडे स्वतःला कोंबून घेण्याचे गर्दीतले आपले परमकर्तव्य निभवावेच लागते. त्याला पर्याय नसतो. मात्र, त्यासाठी दुसर्‍या सीटवरून अचल आणि कायम स्थितप्रज्ञ असलेल्या हिमालयाच्या केवळ जागच्याजागी हलल्याचा होणार्‍या आभासालाच मोलाचे सहकार्य समजावे लागते. यावेळी तिसर्‍या सीटकडूनच अपरिमित त्यागाची आणि माणुसकीची अपेक्षा साडेतीन सीटवाल्यांकडून बाळगली जाते. त्यामुळे तिसर्‍या सीटची अवस्था दोन्ही बाजूंकडून केविलवाणी असते.
लोकलच्या फस्ट क्लासात असली काही भानगड नसते. तिथं चौथ्या सीटकडं पहाणं म्हणजे सॉफिस्टिकेटेड खेडवळपणा असतो. जरी एखाद्याने चुकून चौथी सीट मागितली तर त्याकडे अंतराळातून आलेल्या एखाद्या एलियनसारखं तुच्छतेच्या कटाक्षानं पाहिलं जातं. फ्लस्ट क्लासात सीटांना गाद्या डकवलेल्या असतात म्हणे. त्यामुळे चौथ्या सीटची सोय तिथं नसते. तसा बळजबरीचा प्रयत्न केलाच तर गाद्यांच्या या टोकांवरून घसरल्यानं दोन सिटांच्या मधोमध थांबलेला मिनार त्याच्यावर अतिक्रमण केल्याचा दावा तुमच्यावर ठोकू शकतो.

इकडे डब्यातल्या खिडकीजवळचं लॉटरी लागलेलं नशीबवान डोकं लोकल ट्रेनमध्ये नसतंच. कानात ध्वनीचुंबकाची बोंड घालून जिहाले मस्कीनची गुलामी सुरू असते. तर अधून मधून अंतराळातल्या एका ग्रहावरून आलेले शब्दसंदेश दुसर्‍या ग्रहावर प्रक्षेपित करणं सुरू असतं. चौथ्या सीटनं तिसर्‍या शिटेला पाठीफुडं होणार्‍या एष्टीतली शिटेसारखं एव्हाना अ‍ॅडजस्ट केलेलं असतं.

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादरातून उभारलेले संयमाचे राजेशाही महाल ठाण्यापासून पुढं भदाभद कोसळू लागतात. या रोजच्याच लोकल सोहळ्याला रोजच उपस्थित असलेल्यांची नजर आता ठिबक सिंचनाच्या कारंज्यासारखी वर खाली होते. खिडकीतली सीट आता गुलामी बंद करून विक्रमादित्याच्या न्यायासनावरून उठवल्याच्या अविर्भावात खिडकी मोकळी करते. त्यावेळी त्याच्या नजरेत अपरिमित त्याग, विनाअट समर्पण केल्याची भावना असते. सारी दुनियाका बोझं, लगूनच्या बॅगा, छत्र्या, पिशव्या, रॅकवर उतरवण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून इमानेइतबारे करून करून कोसळण्याच्या बेतात असलेला एका बाजूला कललेला रॅकखाली उभारलेला मिनार पिसाळण्या आधी त्याला तातडीनं टेकू लावला जातो. तर कर्जत, खोपोली गाडीत अशा वेळी बुडाला गोंद चिकटवलेल्यांना दादर, सीएसटीवाले ठाना गया…ठाना गया…असा ठणाणा अंधारवाटेतल्या पारसिक बोगद्यातंच ऐकवला जातो.

त्याआधी ध्वनीक्षेपकातून आपल्या गोड मधूर आवाजातून अगला स्टेशन ठाणे, म्हणणार्‍या तिच्या रोजच्या बोलण्याकडे कुणाचंच लक्ष नसतं. बोगद्यात अंधार असल्यानं आपल्याला ठाणा गेल्याची अक्कल कोणी शिकवली त्याचा चेहरा बुडसिटांना पाहता येत नाही. तर काही उभ्या मनोर्‍यांना डोंबिवली तरी आपलं कल्याण होईल, असं वाटण्यातंच गाडी विठ्ठलवाडीपर्यंत पुढं येते. तेव्हा कधी चौथ्या सीटची उरलेल्या तीन सीटांच्या उपकारवंचनेतून सुटका झालेली असते. चौथी सीट आता विक्रमादित्याच्या न्यायासनापर्यंत बेलाशक सरकलेली असते. हातातल्या स्क्रीनवर कँडीक्रशचा कँड्या फोडून पुढचा टप्पा पार पाडल्याचं समाधान त्यात असतं. लोकलमधल्या सिटांचे मालक रोज बदलतात. पण, सिटांचा गुण का वाण बदलत नाही. तो कायम असतो विक्रमादित्याच्या न्यायासनासारखा..अचल आणि अढळ.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -