Monday, August 10, 2020
Mumbai
28 C
घर फिचर्स भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते

भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते

भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख राजकीय पुढार्‍यांमध्ये मौलाना आझाद यांचे नाव येते. ११ नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस. मौलाना आझादांचा जन्मदिवस हा ‘शिक्षण दिवस’ म्हणून साजरा करण्याचे केंद्र सरकारने नुकतेच जाहीर केले आहे. ११ नोव्हेंबर १८८८ रोजी सौदी अरेबिया या देशातील पवित्र भूमी मक्का येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील मौलाना खैरुद्दीन हे धर्मगुरू होते, तर त्यांची आईसुद्धा मक्का येथील धर्मगुरूंच्या कुटुंबातील होत्या. १८९० मध्ये मौलाना खैरुद्दीन आपल्या कुटुंबासह भारतात आले.

Mumbai

भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख राजकीय पुढार्‍यांमध्ये मौलाना आझाद यांचे नाव येते. ११ नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस. मौलाना आझादांचा जन्मदिवस हा ‘शिक्षण दिवस’ म्हणून साजरा करण्याचे केंद्र सरकारने नुकतेच जाहीर केले आहे. ११ नोव्हेंबर १८८८ रोजी सौदी अरेबिया या देशातील पवित्र भूमी मक्का येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील मौलाना खैरुद्दीन हे धर्मगुरू होते, तर त्यांची आईसुद्धा मक्का येथील धर्मगुरूंच्या कुटुंबातील होत्या. १८९० मध्ये मौलाना खैरुद्दीन आपल्या कुटुंबासह भारतात आले. त्यांनी कोलकाता शहरात वास्तव्य केले. आझाद यांच्या आई आणि वडील दोघांचेही घराणे उच्चशिक्षित होते. आझाद सुद्धा लहानपणापासूनच अतिशय हुशार होते. पारंपरिक मुसलमानी शिक्षणपद्धतीप्रमाणे मौलाना आझादांनी फार्सी, उर्दू व अरबी या भाषांचे प्रथम अध्ययन करून नंतर तर्कशास्त्र, इस्लाम धर्म, तत्त्वज्ञान व गणित यांचा अभ्यास केला. पुढे सर सय्यद अहमदखान यांच्या लेखांचा परिणाम होऊन मौलानांनी इंग्रजीचा अभ्यास स्वतंत्रपणे सुरू केला. आई आणि वडिलांची घराणी कट्टरपंथी असूनही मौलाना आझाद मात्र कट्टरपंथी नव्हते. ते इस्लाम धर्माचे आधुनिक विचारवंत होते. १९०८ मध्ये ईजिप्त, अरबस्तान, तुर्कस्तान, फ्रान्स इ. देशांना त्यांनी भेटी दिल्या. तेथील क्रांतिकारकांच्या संपर्कामुळे त्यांची राजकीय मते बदलू लागली आणि कोलकात्यास परत येताच हिंदी मुसलमानांनी स्वातंत्र्य संग्रामात पुढाकार घ्यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
१९१२ साली कोलकाता येथे त्यांनी अल्-हिलाल हे उर्दू साप्ताहिक सुरू केले. अनेक वृत्तपत्रांतून ‘आझाद’ ह्या टोपणनावाने ते लेखन करीत. अल्-हिलालमधील प्रखर राजकीय टीकेमुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्याकडून १० हजार रुपयांचा जामीन मागितला. आझादांनी तो दिला नाही, म्हणून ते वृत्तपत्र बंद पडले. १९१५ साली त्यांनी अल्-बलाघ हे दुसरे वृत्तपत्र काढले. त्यामुळे आझादांना अनेक प्रांतांत जाण्यास बंदी घालण्यात आली; पुढे त्यांना सांचीला स्थानबद्ध करण्यात आले. १९२० साली त्यांची सुटका झाली. नंतर ते असहकाराच्या चळवळीत सामील झाले. १९२१ मध्ये पुन्हा त्यांना अटक करण्यात आली; पण एका वर्षानंतर त्यांना मुक्त करण्यात आले; १९२३ च्या दिल्ली येथील काँग्रेसच्या विशेष अधिवेशनाचे ते अध्यक्ष झाले. १९३० मध्ये त्यांना पुन्हा कैद झाली. आझाद १९३९ ते ४६ पर्यंत काँग्रेसचे अध्यक्ष होते. १९४२ च्या चले जाव आंदोलनाच्या वेळी त्यांना पुन्हा तुरुंगवास भोगावा लागला. १९४५ साली सर्व नेत्यांबरोबर त्यांची सुटका झाली. १९४२ ची क्रिप्स योजना, १९४५ ची वेव्हेलची सिमला परिषद व १९४६ मधील ब्रिटिश मंत्र्यांचे शिष्टमंडळ इ. प्रसंगीच्या सर्व वाटाघाटींत काँग्रेसतर्फे अध्यक्ष या नात्याने त्यांनीच पुढाकार घेतला. स्वातंत्र्यानंतर ते केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झाले आणि अखेरपर्यंत शिक्षणमंत्री म्हणून राहिले.
मौलाना आझाद यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात एका निष्ठावान राष्ट्रवादी मुसलमानाची भूमिका बजावली. त्यांनी देशाचे विभाजन स्वीकारले, पण जे मुसलमान भारत सोडून पाकिस्तानला स्थलांतरित होत होते, त्यांना मौलाना आझादांनी विरोध केला होता. मौलाना हे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे सच्चे प्रतीक होते. सन १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. पं. जवाहरलाल नेहरूंनी मौलानांकडे शिक्षण मंत्रालयाचे काम सोपवले व ते स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री झाले. त्यांनी त्या काळी अत्यंत बिकट परिस्थितीतही भारतात शिक्षणाचा प्रसार व प्रचार उत्तमरित्या केला. मौलाना आझाद यांना युरोपियन साहित्याचेही चांगले ज्ञान होते. महाकवी बायरन आणि फ्रान्सच्या कादंबरीकारांची त्यांना चांगली माहिती होती. २२ फेब्रुवारी १९५७ रोजी मौलाना अबुल कलाम आझाद यांचे निधन झाले. मौलाना आझाद यांच्या कार्याची दखल महाराष्ट्रानेही घेतली आहे. मौलाना आझाद यांच्या नावाने वित्तसंस्था उभारण्यात येऊन त्याद्वारे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जात आहे. इतर राज्यांतही मौलाना आझादांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अनेक प्रकल्प राबवण्यात येत आहेत. हैदराबाद येथे मौलाना आझाद मुक्त विद्यापीठ उभारण्यात आले आहे. केंद्र सरकारने १९९२ मध्ये मौलाना आझाद यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ किताब प्रदान केला.