फळांचा राजा संकटात

Mumbai
आंबा

आंब्याचं ते झाड तुटल्यावर साधारण १५ वर्षांनी कलम करण्याची पद्धत मला समजली. कोईपासून लावलेल्या झाडाचा आंबा त्याच आंब्यासारखा असेलच असे नाही. मात्र कलम केलं तर त्याची चव, आकार व रंगाचा आंबा टिकवून ठेवता येतो. ही गोष्ट आधी कळली असती तर तो आंबा टिकवता आला असता. ही खंत मनात कायम घर करून आहे.

आंध्रा, कर्नाटकाच्या सीमेवर असणारा देगलूर. नांदेड जिल्ह्यातील एक तालुका. तालुक्यावरून बसने आमच्या गावाला (येरगीला) जाताना होट्टूळ गाव लागतं. होट्टूळ सोडलं की बसमधूनच दिसायचं आमच्या शेतातील डेरेदार आंब्याचं झाड. २००१ साली ते झाड तोडलं गेलं. मात्र त्या डेरेदार झाडाचा शोध आजही संपत नाही. पायवाटेनं शेताकडं जाताना काळप्पाची विहीर ओलांडली की, नजर आजही त्या झाडाला शोधते. वावरात फिरताना, खिन्न होऊन उरलेल्या खोड-मुळाकडे नजर जाते. पावलं क्षणभर थबकतात. असं काय होतं त्या झाडात, ज्याच्या नसण्याने एवढं अस्वस्थ वाटतंय. का तोडलं असेल ते?

माझे आजोबा राचन्ना. राचन्ना आणि म्हादप्पा हे दोघे भाऊ भाऊ. भावकीत शेतीची वाटणी झाली. वाटायला घर नव्हतंच. शेतात कडुलिंबाची दोन, आंब्याचं एक अशी तीन डेरेदार झाडं होती. वाटणी करणार्‍या पंचांनी सांगितलं, छोटीछोटी झाडं ज्याच्या शेतात असतील ती त्यांची, मोठी झाडं ही सर्वांची. आंब्याचं झाड राचन्नाकडं आलं. वाटणीनंतर घर बांधायला काढलं. कौलारू घर बांधायला तुळई, वासे, बाजू, दरवाजे, खिडक्या इ. साठी खूप लाकडं लागायची. कुठून आणणार एवढी लाकडं? गवंडीकाम करणार्‍याचे पैसे देणंही मुश्कील. मग शेतातील असलेली सगळ्यांच्या वाटेची कडूलिंबाची झाडं तोडायचं ठरलं. झरी मष्ण्या याच्याकडे मोठी करवत होती. राचन्नाचा मुलगा, म्हणजे माझे वडील व झरी मष्ण्या या दोघांनी मिळून शेतातील लिंबाची तीनही झाडं कापून काढली. त्यातून राचन्ना आणि म्हादप्पा या दोन भावाचं एक मोठे घर उभे राहिले.

पंचांनी वाटणी केलेल्या मोठ्या झाडांपैकी फक्त आंब्याचं एक झाड राहिलं होतं. या झाडाच्या आंब्याची वाटणी करून दोघे भाऊ खाऊ लागले. पुढे राचन्ना आणि म्हादप्पा यांची मुलं मोठी झाली. म्हादप्पाला तीन मुलगे एक मुलगी, तर राचन्नाला एक मुलगा आणि दोन मुली. राचन्नाचा मुलगा म्हणजे माझे वडील. आंब्याची वाटणी पहिल्यांदा दोन हिश्शात करून नंतर त्याचे पुढे एकात तीन आणि एकात एक असे हिस्से होऊ लागले.

झाड खूप डेरेदार होतं. या झाडाचा बुंधा तीन माणसांच्या हातात मावणार नाही इतका. फांद्या एकाला लागून एक असा डोलारा. कुठल्याही फांदीवर चढून पुन्हा त्याच फांदीपर्यंत बुंध्याकडे न जाताही पोचता येत होतं. बुंध्यापासून निघालेली एक एक फांदी अशी की त्यावर निवांत झोपता येईल. बुंध्याची उंची तशी खूप मोठी नव्हती. इनमीन दीड माणूस उंच; मात्र त्याच्या फांद्या इतक्या उंच की चार मैलावरून सहज दिसतील. वर्षाला पंधरा हजार आंबे निघायचे. फळ कमी धरलं म्हटलं तरी दहा हजार कुठे गेले नाहीत. कैरी लय आंबट आणि पिकल्यावर गोडचीटूक. आंबा आकाराला मध्यम; पण दोन-तीन आंब्यांच्या रसात अख्ख्या (५ माणसांच्या) कुटुंबाच ंपुरणपोळीचं जेवण व्हायचं. आंबा पाडाला सुरू झाला की घरात पुरणपोळी सुरू व्ह्यायची.

आंब्याला कुणी राखण नव्हतं. उन्हाळा सुरू होताना शेतीची कामं संपवून सगळी राने मोकळी व्हायची. आई आम्हाला अधूनमधून आंब्याकडे पाठवायची. शेत थोडं जास्तच लांब होतं, आंध्रच्या सीमेलगत. त्यामुळे शेताशेजारील सर्वजण तेलगुभाषिक. शेतात आल्यावर आंब्याच्या झाडाखाली न जाता परत घरी परतलो असं खूप कमी वेळा व्हायचं. आम्हाला कळायला लागलं तेव्हापर्यंत (१९९५) पाण्याच्या बाटल्या नुकत्याच गावात पोहचलेल्या होत्या. भरलेल्या नसल्या तरी रिकामी झालेल्या, शहरी नातेवाइकांनी आणलेल्या. अशा बाटल्यांमध्ये पाणी घेऊन शेतात जायचो. मीठ, लसणाची चटणी सोबत घेतलेली असायचीच. कधी एकटा, कधी छोट्या भावासोबत, कधी दोन-तीन वर्गमित्र यांना कैरीची चटक दाखवून शेतात घेऊन जात असू. आंबट कैर्‍या मनसोक्त खात असू. थोडं आराम करत. थोड्या वेळाने पुन्हा हुक्की येऊन सगळे झाडावर चढणार. झाडावरच पकडापकडीचा खेळ खेळणार. खेळता-खेळता दमलो की, मग झाडावरच झोपणार. प्रत्येकाची झोपायची फांदी ठरलेली होती. संध्याकाळ झाली की जळताणासाठी तुराट्या-पळट्याचे भारे घेऊन घरी परतत असू. एकदा का शेतात आलं की आंब्याखालून निघावसं वाटायचं नाही.

झाडावरून आंबे तोडून घरी नेण्याच्या कामाला आंबे उतरवणे असे म्हटले जाते. कारण आंब्याला थोडासाही मार लागू न देता आंबे अलगदपणे काढायचे असतात. मार लागल्याने आंबा सडतो. आंबा उतरवण्यासाठी दोरीची विणलेली जाळी आणि त्याला वरतून एक लाकडी रिंग, रिंगेच्या मधोमध एक लांब भाला. या साहित्याला गावाकडे ‘चिक्का’ म्हणतात. चिक्का, एक बारदान आणि मोठा सोल (जाड लांब दोरी) घेऊन आंबे उतरवणारे येत. शंभरामागे ३-५ आंबे घेऊन ते आंबे उतरवून देत. बारदानाला दोरी बांधून एक माणूस फांदीच्या टोकापासून थोड्या अंतरावर आपला तोल सांभाळून थांबतो. चिक्काच्या मदतीने फांदीच्या शेंड्यापर्यंतचे सगळे आंबे तोडून बारदानामध्ये टाकतो. बारदानाच्या ओझ्याने फांदी वाकू लागली की दोरीच्या मदतीने बारदान अलगद खाली सोडले जाते. खाली असलेल्या माणसाचे काम काय तर जिथे जिथे बारदान भरून खाली येईल तेथून ते घेऊन एकत्र ढीग लावणे. ढीग लावताना आंबे मोजून भावकीचे वाटे आणि आंबे उतरवणार्‍यांचा हिस्सा वेगळा काढणे.

आंबा उतरवताना भेटलेली पाडं मनसोक्त खाऊन झाल्यावर उरलेली पाडं ही उतरवणार्‍याचीच असतात. खाऊन झाल्यावर ५०-६० पाडं शिल्लक राहायची. वडील पन्नाशीचे होईपर्यंत आंबे उतरवण्याचे काम तेच करीत असत. आंबे उतरविताना खूप-खूप मज्जा येई. मी ही छोटा चिक्का, सोल, बारदान घेऊन से-पाचशे आंबे उतरवीत असे. त्यातून मिळालेले आंबे ही माझी स्वतःची कमाई वाटत असे. उतरविलेले आंबे घरी नेताना त्यातील १०-१५ आंबे मी वेगळे ठेवत असे. पाच हजाराचा वडिलांना वाटा मिळाल्यावर ते १०-१५ आंबे त्यात मिसळून टाकत असे.

जे आंबे पाना-फांद्यामध्ये लपलेले असतात त्यांना ‘चुकारी’ म्हणतात. सगळं झाड उतरवून झालं की, हे चुकारी आंबे हुडकण्यासाठी लहानलहान पोरं तोल सांभाळत झाडावर चढून ते काढीत असत. असं चुकारी आंबे नेण्यास सगळ्यांना मोकळीक असायची.

हिस्स्याला आलेले सर्व आंबे काही सरायचे नाहीत. जर पाच हजार आंबे असतील तर त्यापैकी साधारण दोन हजार आंब्याची मंडी घातली जाई. आंबा गवतात किंवा तेंदू/बिडीच्या पानांत पिकायला ठेवतात. कानडीत त्याला ‘मंडी’ म्हणतात. उरलेल्या आंब्यांपैकी काही आंबे शेजारी, नातेवाईक यांना वाटण्यात जायचे तर काही लोणची टाकण्यासाठी. यानंतरही उरलेले आंबे (साधारणत: हजारभर आंबे तरी) विकायचो. ‘फेंगडी सिद्दया’ हा गावातील आंब्याचा विक्रेता होता. शेतकर्‍याकडून आंबे घेऊन तो ते खेडोपाडी विकायचा. उरलेले आंबे आम्हीही त्याला विकायचो. आमच्या झाडाच्या कोईपासून तयार झालेलं एक झाड शेजारच्या शेतात होतं. त्या झाडांचा आंबा दिसायला सारखाच असला तरी चवीला मात्र आंबटचिट होता. फेंगडी सिद्दया या दोन्ही झाडांचे आंबे विकत घ्यायचा. बाजारात नेऊन विकताना चवीसाठी आमच्या झाडाचा आंबा द्यायचा आणि आंबट आंबे विकून यायचा.

पिकायला ठेवलेल्या मंडीतून २-३ दिवसांनंतर ५०-६० आंबे आई टोपलीत काढायची. मंडी घातल्यानंतरचा एक-दीड महिना आईचा स्वयंपाक करायचा. त्रास कमी व्हायचा. आंबे खाऊनखाऊन तोंड खूप गोड होत असल्यामुळे नुसती आंबट-तिखट कडी आणि भात करायला सांगायचो. आम्ही तर नुसती कडी पीत असू. आंबे खाण्याला सुरुवात झाली न झाली तोच आठ एक दिवसात न दाखवता येईल अशा ठिकाणी मोठमोठी बेंड (फोड) येत असत. ‘जांभळं खाल्ली की हे फोड येणं जातं’ असं आई सांगायची. आंबे खाऊन जे गर्मी अंगात भरते ती जांभूळ खाऊन जाते असं तिचं विज्ञान.

भावकीतील झाड आमच्या शेतात. या झाडाने जवळपास दीड-दोन गुंठा जागा व्यापलेली. वडिलांचा अंदाज असा की इतक्या जागेत दहा-बारा पायली पीक येईल; पण झाडामुळे पीक बसते. म्हणजे झाडाखाली पीक वाढत नाही. वाढलं तरी त्यात धान्य भरत नाही. आंबे सर्वजण खाणार आणि शेत मात्र आपलं नासणार. याची सल वडिलांच्या मनात कधीपासून सुरू होती कुणास ठाऊक. शेतीला गेलो तरी तुम्ही आंबे तोडून आणले अशी भावकीची कुरकुर. स्वतःच्या शेताला जाणंदेखील चोरी होऊन बसलं होतं, अशी आई म्हणायची. शेवटी वैतागून वडिलांनी झाड विकून टाकलं. मी उदगीर तालुक्यातील एका आश्रमशाळेत असताना कधीतरी शेतातून ते झाडं गेलं.

झाड गेल्यावर घरातील सगळेच लोकं त्याच्या आठवणीने हळहळले. शेतात झाड उभं असताना तितकं महत्त्व वाटलं नव्हतं कदाचित. आता कुठेही आंबा खाताना, आंब्याचा मोहर पाहताना डोळ्यासमोर आमचं ते झाड, त्याची प्रत्येक फांदी, ज्यावर खेळलो, बसलो, झोपलो ती अशी डोळ्यासमोर उभी राहते. आंब्याची चव तर अजूनही तोंडात आहे. शिवारात याच झाडाच्या कोईपासून वाढलेली दोन-तीन झाडे आहेत; पण त्यांना ती चव नाही.

आंब्याचं ते झाड तुटल्यावर साधारण १५ वर्षांनी कलम करण्याची पद्धत मला समजली. कोईपासून लावलेल्या झाडाचा आंबा त्याच आंब्यासारखा असेलच असे नाही. मात्र कलम केलं तर त्याची चव, आकार व रंगाचा आंबा टिकवून ठेवता येतो. ही गोष्ट आधी कळली असती तर तो आंबा टिकवता आला असता. ही खंत मनात कायम घर करून आहे. माझ्यासारखीच इतरांना ही खंत राहू नये म्हणून कलम करण्याची कला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवित आहे. कलमाच्या माध्यमातून जुनी, वटत जाणारी झाड त्यांच्या गुणधर्मांसह आपण टिकवू शकतो आणि ते टिकविले पाहिजेत. असे केले तर जुने हरवल्याची खंत आपल्याला असणार नाही.

खोकी आणि बांधकाम व्यवसायातील लाकूड मिळविण्यासाठी, भावकीचे झालेले वाद, शेती वाढविण्याचा हव्यास, या अनेक कानांनी गावठी आंबे आपण गमवून बसलो आहोत. अनेक आंबे गमावण्याच्या वाटेवर आहेत. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील अंबवडे नावाचे गाव. तेथे लोक सांगतात की, खूप मोठी आमराई होती. मात्र वरील अनेक कारणाने आता तिथे मोजकीच झाडे शिल्लक आहेत. अकोले, अहमदनगरमधील गर्डनी, सुगाव परिसरातील अनेक प्रसिद्ध आंबे नाहीसे झालेत. महाराष्ट्रभरात झपाट्याने गावठी आंब्याची झाडे तुटली जात आहेत.

पर्यावरण शिक्षण केंद्रातर्फे विद्यार्थी व शिक्षक यांच्या सहभागातून २०१२ ते १४ मध्ये एक अभ्यास केला. या अभ्यासात केवळ सह्याद्रीमधील आठ नऊ जिल्ह्यांमध्येच दोनशेहून अधिक आंब्यांचे वाण मिळाले. ज्यांना वेगळी चव, आकार, रंग, गुणधर्म आणि नावे आहेत असेही आंबे होते. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता हजाराहून अधिक वेगवेगळे आंबे असणे सहज शक्य आहे. मात्र फळ-संशोधन केंद्रामध्ये यांचा अभ्यास केला जात नाही.

शेपू भाजीसारखा वास असणारा शेपू/ शेप्या, खूप केसर असणारा तोकेसर, मधासारखा गोड आणि छोटा गोल आकार असणारा तोमधगोट्या, चंद्राच्या कोरीप्रमाणे डोक्यावर लाल रंगाची कोर असणारा चंद्रया, पिकला तरी आंबट-ढ्यान तो आमट्या, इवलासा पण कमालीचा गोड तो बीटकी, पोपतावणी चोचीचेराघू, टोची, कच्चा असतानाही खायला चवदार असा खोबरी आंबा, लोणच्याचा स्पेशल असा लोणची आंबा, रंगांवरून पांढरा आंबा, काळा आंबा, खूप चिक असणारा- चीक्कुळ, साखारीसारखा गोड साखरी आंबा, घडच्या घड लागणारा तोघडिया, लिंबुच्या वासाचा लिंबू आंबा, साखरेवानी गोड आणि लांब तो साखरदोडी, नारळावानी मोठा नारळ्या असे बहुमोल आंबे संकटात आहेत. आमराया तर आज दुर्मीळ झाल्या आहेत. मात्र बांधावरील ही उरलीसुरली झाडे टिकवली पाहिजेत.

वैज्ञानिक अंदाजानुसार सर्व भारतभरात १००० हून अधिक आंब्यांचे वाण आहेत असे मानले जाते. इतर कोणत्याही वनस्पती किंवा पिकाप्रमाणे आंब्याचे गावठी, जंगली वाण, ज्यांना रायवळ असं या नावाने ओळखलं जातं. हे आंबे महत्त्वपूर्ण जनुकीय ठेवा आहेत. या रायवळ आंब्यांमध्ये आकार, चव, रंग, केसाराचे प्रमाण, सालीची वैशिष्ठ्ये, हंगाम या सर्वांमध्ये विविधता आढळते. हापूस, केसर, पायरी असे मोजकेच आंबे बाजारात दिसतात. या आंब्याला प्रचंड खते, कीटकनाशक वापरून पिकवले जातात. बाजारच्या मागणीनुसार हे प्रकार सतत वाढत जात आहे. यामध्ये गावठी, रायवळ आंबे संकटात सापडली आहेत. त्यांना मागणी नसल्यामुळे ते बाजारात येत नाहीत. म्हणून हळूहळू या आंब्याचे झाडे बांधावरूनही हद्दपार होत आहेत. या उन्हाळ्यात समृद्ध गावठी आंब्याचा आस्वाद नक्की घ्या. खरा फळांचा राजा हा गावठी आंबाच आहे. गोड, आंबट, तुरट अशा वेगवेगळ्या चवीच्या गावठी आंब्याची मज्जाच वेगळी असते.

-बसवंत विठाबाई बाबाराव : (लेखक ‘पर्यावरण शिक्षण’ विषयाचे अभ्यासक आहेत.)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here