घरफिचर्सराष्ट्रवादीला नक्षलवादाचा भूसुरुंग !

राष्ट्रवादीला नक्षलवादाचा भूसुरुंग !

Subscribe

गडचिरोलीत १ मे या दिवशी झालेल्या भूसुरुंग स्फोटात १५ पोलीस आणि एक वाहनचालक हुतात्मा झाले होते. त्यात सहभागी असल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी कैलास रामचंदानी याला अटक करण्यात आली आहे. रामचंदानी याच्या अटकेमुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. रामचंदानीच्या मागे राष्ट्रवादीतील आणखी कुणी बडा नेता आहे का, याचा पोलीस कसून तपास करीत आहेत.

महाराष्ट्र दिनी गडचिरोलीमध्ये झालेल्या भूसुरुंग स्फोटाने अवघ्या महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. या स्फोटाच्या चौकशीत काही जणांना अटक करण्यात आली, त्यातील एक आरोपी कैलास रामचंदानी आहे. कैलास रामचंदानी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गडचिरोली जिल्ह्यातील पदाधिकारी आहे, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत उघड झाली. १ मे या दिवशी झालेल्या भूसुरूंग स्फोटात १५ पोलीस आणि एक वाहनचालक हुतात्मा झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनीही ‘रामचंदानी हा पक्षाचा पदाधिकारी आहे’, असे मान्य केलेे. रामचंदानी याचे जिल्ह्यातील कुरखेडा येथे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान आहे. त्यावरून रामचंदानी याचा या भूसुरुंग स्फोट घडवण्यात कशाप्रकारचा सहभाग असू शकतो, याची कल्पना येईल. रामचंदानी याच्या अटकेतून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. रामचंदानीच्या मागे राष्ट्रवादीतील आणखी कुणी बडा नेता आहे का, अथवा पक्षातील अजून कुणी पदाधिकारी या प्रकरणात सहभागी आहेत का, याचा पोलीस कसून तपास करीत आहेत. याची माहितीही काही दिवसांनी बाहेर येऊ शकते.

या अटकेमुळे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी एक वादग्रस्त स्वरूप लोकांसमोर उघड झाले आहे. देशात दहशतवाद ही जेवढी गंभीर समस्या बनली आहे तेवढीच नक्षलवाद हीदेखील एक मोठी समस्या बनली आहे. गडचिरोली, छत्तीसगड, दंडकारण्याचा भाग हे नक्षलवादाने प्रभावित क्षेत्रे मानली जातात, तर देशात नक्षलवाद फोफावलेल्या २०३ जिल्ह्यांपैकी २३ जिल्हे नक्षलवादामुळे अतिप्रभावित आहेत. छत्तीसगड असो की गडचिरोली नक्षलवादी थेट सुरक्षा दलांवर हल्ला करून मोठ्या संख्येने त्यांची हत्या करत आहेत. या हल्ल्याच्या माध्यमातून ते सुरक्षा व्यवस्था व सरकार यांना आव्हान देत आहेत. घनदाट अरण्यात कुठल्या तरी कोपर्‍यात सुरक्षा रक्षक आहेत किवा त्यांचा ताफा अमूक एका रस्त्यावरून अमुक दिवशी, अमूक वेळेत जाणार आहे, याची इत्थंभूत माहिती कशी मिळते? या प्रश्नाने पोलिसांची झोप उडाली होती. स्थानिकांच्या सहकार्याशिवाय हे हल्ले होऊच शकत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अशा नक्षलवादी हल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍याचा सहभाग उघड झाला, हे धक्कादायक आहे.

- Advertisement -

यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इतिहास, या पक्षाच्या नेत्यांवर आजवर झालेले आरोप यांचा लेखाजोखा समोर येतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार पद्मसिंह पाटील यांना पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी शिक्षा झाली आहे. त्यांच्यावर थेट खुनाचा गुन्हा नोंद आहे. गुजरातमध्ये दहशवादी इशरत जहाँ हिची पाठराखण करणे आणि तिच्या नावाने मुंब्य्रात रुग्णवाहिकाही चालू करणारे याच पक्षातील होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांनी संधी असतानाही दाऊदचे प्रत्यार्पण करून घेतले नाही आणि त्यामुळे तो पसार झाला, असा गंभीर आरोप केला होता. अवैध मालमत्ता गोळा केल्याच्या प्रकरणात छगन भुजबळ यांनी तुरुंगवास भोगला असून सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. याच पक्षाचे विधिमंडळ नेते अजित पवार यांच्यावर ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप आहे. याच मालिकेत आता नक्षलवादाचे समर्थक म्हणून राष्ट्रवादीचा पदाधिकारी रामचंदानी याच्यावर आरोप झाला आहे. हा नुसता आरोप झालेला नाही, तर या आरोपाखाली रामचंदानी सध्या अटकेत आहे. त्यामुळे या पक्षातील पदाधिकार्‍यांचे मार्गक्रमण खरोखरीच समाजासाठी पर्यायाने देशासाठी चिंतेचा विषय बनला आहे. अर्थात याला वैयक्तिक संस्कारांसह पक्षातील विचारधारेचा प्रभावही कारणीभूत असतोच.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसर्‍यांदा जेव्हा पंतप्रधानपदाची शपथ घेतली, तेव्हा त्यांनी देशातील सुरक्षेचा विषय प्राधान्याने हाती घेतला. पहिल्या टर्ममध्ये स्वच्छ भारत अभियान राबवणारे पंतप्रधान २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रचारदौरे करत होते, तेव्हाच गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून १५ पोलिसांचा बळी घेतला. त्यामुळे अर्थातच नरेंद्र मोदी यांची दुसरी टर्म सुरू झाली तेव्हा त्यांनी त्याची सुरुवात देशातील सुरक्षेच्या प्रश्नांवरून केली आहे, त्यासाठी देशाबाहेर दहशतवादासह देशांतर्गत नक्षलवाद हा विषय त्यांच्या रडारवर आला आहे. म्हणूनच भीमा-कोरेगावचा विषय जसा पोलिसांच्या रडारवर आलेला आहे, तसाच गडचिरोलीचा विषयही पोलिसांनी गांभीर्याने घेतलेला आहे. त्यात झालेल्या धरपकडीतून आता या नक्षलवादी हल्ल्याचे धागेदोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापर्यंत पोहोचले आहेत.

- Advertisement -

पंतप्रधान मोदी यांच्या आदेशावरून नक्षलवादाची पाळेमुळे खोदण्यासाठी देशातील गृहखात्याने कंबर कसली आहे. नुकतेच इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्रात धक्कादायक वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यामध्ये शरणागत माओवादी नेता कुमारसाई पहाडसिंग याने छत्तीगड पोलिसांनी धक्कादायक माहिती दिली. यावरून शहरी नक्षलवाद किती फोफावला आहे, याची प्रचिती येते. ७ नोव्हेंबर २०१० रोजी पुण्यातील भवानी पेठ येथील कासेवाडी झोपडपट्टीतून संतोष शेलार नावाचा तरुण मुंबईत नोकरी करायला जातो, असे सांगून घरातून निघून गेला. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क झाला नाही, म्हणून संतोषच्या कुटुंबियांनी पोलिसांत ‘तो हरवल्या’ची तक्रार केली. पुढे २५ मार्च २०१९ मध्ये छत्तीसगड पोलिसांनी राजनंदगाव जिल्ह्यात कार्यरत माओवाद्यांची यादी बनवली, ज्यामध्ये संतोष शेलारचे नाव होते, माओवाद्यांनी त्याचे ‘विश्वा’ असे नामकरण केले होते आणि त्याला तांडा एरिया कमेटीचा डेप्युटी कमांडर म्हणून नियुक्त केले, सशस्त्र नक्षलवादी पेहरावातील संतोष शेलार उर्फ विश्वा याचा फोटो पाहून पहाडसिंग याने त्याला ओळखले. संतोष उर्फ विश्वा हा माओवाद्यांची प्रमुख संघटना कबीर कला मंचच्या संपर्कात आला होता. २०१० साली त्याला मिलिंद तेलतुंबडे यांच्या सांगण्यावरून गडचिरोली जिल्ह्यात पाठवण्यात आले. तेव्हा तेलतुंबडे हे सीपीआय-माओइस्टच्या केंद्रीय समितीचे सदस्य होते. माओवादी बनलेल्या तरुणांची ओळख होऊ नये म्हणून त्यांचे नामकरण केले जाते, तसे संतोष शेलारचे ‘विश्वा’ म्हणून नामकरण करण्यात आले. मात्र, तेलतुंबडे यांची पत्नी अँजेला सोनटक्के यांना २०११ मध्ये दहशतवाद विरोधी पथकाने अटक केल्यानंतर कबीर कला मंचचे काही कार्यकर्ते भूमिगत झालेे. अँजेला या शहरी भागात कबीर कला मंचमध्ये कार्यरत तरुणांना माओवादी चळवळीत आणत. त्यानंतर भूमिगत तरुणांना माओवादी अरुण भेलके उर्फ राजन याने गडचिरोलीत आणले. त्यामध्ये संतोष उर्फ विश्वा हाही होता. पुढे या तरुणांनी गडचिरोलीच्या जंगलात पहाडसिंग याच्या समक्ष पाच महिने शस्त्र प्रशिक्षण घेतले व माओवादी संघटनेसाठी अन्य कामे केली, अशी माहिती पहाडसिंग याने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ ला दिली. माओवादी अरुण भेलके व त्याची पत्नी यांना पुण्यातून 2014 ला अटक करण्यात आली.

शहरी नक्षलवादाचा जंगलातील नक्षलवादाशी कसा थेट संबंध असतो, हे स्पष्ट व्हावे याकरता ही सविस्तर दिलेली माहिती आहे. ज्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकार्‍यांचाही सहभाग दिसून आला आहे, यावरून नक्षलवाद आपल्या घरात येऊन पोहोचला असल्याचा प्रत्यय येतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नक्षलवादाची पाळेमुळे खणून काढण्यासाठी घेतलेली भूमिका यामुळेच स्वागतार्ह वाटते. यामुळे भविष्यात शहरातील हजारो तरुण नक्षलवाद आणि माओवादाच्या विळख्यात सापडणार नाहीत.

Nityanand Bhise
Nityanand Bhisehttps://www.mymahanagar.com/author/bnityanand/
राष्ट्रीय भावना अधिक असलेला तितकाच सामाजिक जाणिवांबाबत हळवा असलेला मी धर्म, देव, श्रद्धा या बुरसटलेल्या, थोतांड गोष्टी मानणार्यामधला नाही, मी पुरोगामी नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -