घरफिचर्सगणपतीशाळा गजबजल्या...

गणपतीशाळा गजबजल्या…

Subscribe

हल्ली गणपतीशाळेत ती मजा राहिली नसली तरी गणपतीबद्दल असणारी उत्सुकता आबालवृद्धामध्ये कायम आहे. त्या उत्साहात तिळभरदेखील फरक पडला नाही. गणपतीशाळा म्हणजे सृजनशीलता प्रकट करणारी कवाडं आहेत. कोकणातल्या या गणपतीशाळांना एक ऐतिहासिक नव्हे तर सामाजिक परंपरा आहे. गावागावातून अशा घरगुती गणपती बनवणार्‍या मूर्तिकारांची एक मोठ्ठी परंपरा आहे.

अष्टमीची गोकळं एकदा विसर्जित केली की, तो पाट घेऊन थेट सुतारवाडी गाठायची. सुतारशाळेत एव्हाना गणपतीशाळा सजलेली असते. अर्धवट रंगवलेले, अर्धवट डोळे उघडलेल्या अनेक मूर्ती गणपतीशाळेच्या फळ्यांवर विराजमान झालेल्या असतात. सुतारलोक तोंडात ब्रश किंवा पेन्सिल घेऊन अर्धवट राहिलेल्या मूर्तींना शेवटचा हात देण्यात मग्न झालेले असतात. श्रावणातला उन-पावसाचा खेळ चालू असतो. आणि अशाच कुंद वातावरणात गणपती उत्सवाची चाहुल लागते.
गावागावात गणपती बनवण्याचे काम गावातले सुतार लोक करतात. श्रावण महिन्यात शेतीची काम आटोपली असतात. पूर्वी सोमवारच्या भजनाच्या निमित्ताने गावकरी देवळात जमले की, कोणाच्या हातात कॅलेंडर बघून कोणतरी गावकरी विचारायचा हातात क्यालेंडर कशाक रे ?

त्यावर तो गावकरी रे झिलान पत्र धाडल्यान आसा. या वर्सा या फोटूतल्या गणपतीसारो गणपती हाडूया. म्हणान देवा सुताराकडे जावचा आसा. पूर्वी गावागावातून हे दृश्य पहायला मिळायचं. मुंबईतला चाकरमानी गणपती आणायचा म्हणून अधिकचे पैसे मनिऑर्डर करून आपल्या गावी पाठवायचा. गावातले सगळे म्हणजे अगदी आठीपासून साठीपर्यंत सर्वजण गणपतीशाळेत जमा व्हायचे. मुलांच्या चर्चा वेगळ्या, मध्यमवयाच्या माणसांच्या चर्चा वेगळ्या. आणि म्हातार्‍यांच्या चर्चा अगदीच वेगळ्या. लहान मुलं त्या अर्धवट रंगवलेल्या मूर्तीकडे बघत ह्यो बगा, ह्यो आमचो गणपती…रे तेची सोंड बगा…..तेचा प्वाट बगा. अशा अनेक कुरापती काढत गणपतीच्या अवतीभवती दिवस जातात.

- Advertisement -

हल्ली गणपतीशाळेत ती मजा राहिली नसली तरी गणपतीबद्दल असणारी उत्सुकता आबालवृद्धामध्ये कायम आहे. त्या उत्साहात तिळभरदेखील फरक पडला नाही. गणपतीशाळा म्हणजे सृजनशीलता प्रकट करणारी कवाडं आहेत. कोकणातल्या या गणपतीशाळांना एक ऐतिहासिक नव्हे तर सामाजिक परंपरा आहे. गावागावातून अशा घरगुती गणपती बनवणार्‍या मूर्तिकारांची एक मोठ्ठी परंपरा आहे. हे कलाकार लौकिकदृष्ठ्या पुढे आलेले नाहीत. या गणपतीशाळेतील गजालींना या दिवसात उत येतो. या गजालीदेखील गावकुसाच्या गजालीपेक्षा वेगळ्या असतात. एका गावात दोन-चार गणपतीशाळा असतील तर त्यांच्यामध्ये एक प्रकारची शर्यत असते. कोणत्या शाळेतील गणपती सरस असतील याची.

या दिवसात गणपतीशाळा रंगून गेलेल्या असतात. सुतार संपूर्ण मातीत रंगून पांढरेधोप दिसायला लागतात. एका बाजूला माती मळतामळता दुसर्‍या बाजूने तोंडाचा पट्टा चालू असतो. आमच्या वयाच्या मुलांचा या दिवसात उद्योगच हा. शाळा सुटली की, दोन घास इकडे तिकडे फिरवून थेट नदीवर बांधलेल्या साकवावरून गणपतीशाळा गाठायची. एरवी साकवावरून भराभर चालता येत असे, पण श्रावणात आणि भाद्रपद महिन्यात या निसरड्या साकवावरून चालताना मनात देवाचा धावा सुरु करावा लागे. खाली खळखळ वाहणारी नदी आणि वर मोडका साकव. हा साकव दोन गावांना नाही तर दोन संस्कृतींना जोडत असतो.

- Advertisement -

हा सांस्कृतिक वारसा पिढ्यानपिढ्या चालत आलेला असतो. खाकी पॅन्ट आणि वर बनियन चढवून दामू सुतार आमच्यासारख्या पोरांना रंग मिसळायला सांगे. रंगात बोटं बुडाली की, समाधान वाटायचे. आमच्यापेक्षा काही मोठ्या मुलांना माती मळून साच्यात बसवायला सांगे. त्यावेळी आमच्यातला कलाकार जागा होत असे. आम्हीदेखील आमच्यातला मूर्तिकार जागृत करून त्याला मुक्तहस्ते कारागिरी करायला वाव देत असू. नाना, ह्यो गणपती शंकराच्या मांडीवर बसवतलंस की पार्वतीच्या? आमचा हा भाबडा प्रश्न समजून न घेता गणपतीशाळेत बसलेली म्हातारी माणसं उगाच आमच्यावर ओरडत. आता गणपतीक खय बसवुचो तो दामू ठरवीत, तुमी रंग मिसळूचा काम करा. त्यावर आम्ही हिरमुसले होऊन रंगात बोटं बुडवून घेत असू.

देवासुतार मूर्ती बनवताना अगदी तल्लीन होताना मी पहिला आहे.आपल्या अंगातले सारे कसब तो मूर्ती बनवताना लावे. वाडीतल्या नव्हे तर गावातल्या एकूणेक कुटुंबाचे गणपती हा एकटा माणूस आपल्या अंगातल्या हुन्नरीवर पार पाडत असे. तेसुद्धा सात-आठ वर्षाच्या बारक्या अकुशल मुलांना सोबत घेऊन. बाकीचे रिकामटेकडे गावकरी येत आणि आपापल्या गणपतीचं काम कुठवर आलं आहे ते बघून जात. त्यांचा कारागिरीला काही उपयोग नसे. त्यांचा उपयोग फक्त गप्पा मारायला आणि जमलेल्यांना गजाली सांगायला. ही रिकामटेकडी माणसं एक उद्योग मात्र आवडीने करतात. तो उद्योग म्हणजे गणपतीच्या मूर्तीच्या ऑर्डरवरून या वर्षाच्या आर्थिक परिस्थितीचा. म्हणजे गणपती थोडा मोठा असेल तर या वर्षी घरमालकाचा मुलगा नोकरीला लागला याचा अंदाज गणपतीशाळेत बांधला जाई, किंवा गणपतीची मूर्ती नेहमीपेक्षा लहान असेल तर या वर्षी घरमालकाच्या मुलाच्या नोकरीचं काही खरं नसावं किंवा धंदा बुडीत निघाला असणार याचा अंदाज इकडेच बांधला जातो. काही महाभाग तर मग घरमालकाच्या मुलाची बायको आपल्या नवर्‍याला गावी द्यायला कमी पैसे देत असणार म्हणून मूर्तीची साईज कमी केली असेलत, असादेखील अंदाज बांधून मोकळे होतात. जगातल्या अनेक अंदाजाची उत्पत्ती गणपतीशाळेतून होते की, काय असेच कोणाला वाटेल.

या गणपतीशाळेच्या वातावरणात महिने कधी निघून जायचे याचा अंदाज बांधता येत नसे. जसजसे दिवस जवळ यायचे तसतसा हाताला वेग यायचा. तसतशी गणपतीशाळेतली लोकांची गर्दी वाढायची. कोणीतरी मग चहा पावडर आणि साखर घेऊन यायचा. त्या गणपतीशाळेच्या एका कोपर्‍यात तीन दगडाची चूल मांडून येणारा जाणारा स्वतः चहा बनवायचा आणि देवा, ही वायच चाय घी म्हणत देवाला आपल्या गणपतीत काही बदल सुचवायचा प्रयत्न करायचा. कोण म्हणायचं गणपती कमळावर बसव. कोण म्हणायचा गणपतीच्या समोर मोदक बनवून दे. पण देवा तेवढाच कुशल. सगळ्यांना हो म्हणायचा, पण करायचा स्वत:ला पटेल तेच.

हळहळू गणपतींना रंग चढायचा. त्यांचे डोळे उघडले जायचे. एकेक मूर्ती पाहून समाधान वाटायचं. गाववाले आता घरी जायला मागत नसत. घरात जाऊन दोन घास खाऊन पुन्हा गणपतीशाळा जवळ करीत. गणपती बनवायच्या ठिकाणाला शाळा का म्हणतात या प्रश्नाचं उत्तर मला अजूनही कळत नाही. कोणी काही म्हणो, पण त्याला शाळा म्हणणं योग्य आहे. शाळेत मुलांवर संस्कार करतात. या ठिकाणी मूर्तीवर संस्कार करून तिला देवत्व प्राप्त करून दिले जाते.

गणपतीशाळा ही एक मोठी किमया आहे. या किमयागारांनी आपल्या सृजनशीलतेने अनेक मूर्ती घडवल्या. त्या मूर्ती घडवताना त्यांनी तन मन खर्ची पाडलं. एकदा गणपतीशाळेत गेलं की आपण तिथे गुंतून जातो. याला कारण त्या मूर्तिकाराने त्या कलेला साधनेचे रूप दिले आहे. त्याने त्या कलेत आपलं आयुष्य वेचले आहे. आपली सृजनशीलता पणाला लावली आहे.

पूर्वीसारखं आताही गोकळं सोडायला नदीवर गेलं की गणपतीशाळेकडे जाणारा साकव बोलावतो. आता साकव बांधून व्यवस्थित केला आहे. एखादा गावातला म्हातारा माणूस सुताराकडे जाऊन ‘देवा, यावर्साक मोटो गणपती व्हयो, झिलांन लागती तितके पैशे देवक सांगल्यान हत’, त्यावर देवादेखील ‘रे तू माका सांगा नुको, झिलान गणपती कसो व्हयो त्याचो फोटू माका व्हॉट्सअ‍ॅप केल्यान आसा. कल तेना पैशेपन पाठवल्यान माका बँकेचो मेसेज इलो’. म्हातार्‍याला यातलं काही कळत नाही. हल्ली पूर्वीसारखी गणपतीशाळा महिनाभर गजबजत नाही. फार तर गणपतीच्या आधी दोन दिवस. पण हा सृजनशील सोहळा याची डोळा बघायला मिळतो हे काय थोडं आहे. गणपतीशाळा इतर वेळी सुनसान असतात. देवा आणि शामा सुतार दोघेच शाळेत महिनाभर पडीक असतात.

गावातील पोरदेखील हल्ली टीव्हीच्या कार्टून समोरून उठत नाहीत. पावसापाण्याचं गणपतीशाळेत कोण जातंय हल्ली. तरी गणपतीशाळा प्रत्येकाच्या मनात गजबजलेली असतेच.

– प्रा. वैभव साटम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -