ओढ लाल मातीची…

कोकणी माणसाला गणपतीत कोकणात जाण्याची ओढ प्रसंगी काहीही करायला भाग पाडते. साहेब गणपतीला गावी जायला सुट्टी देत नसेल तर हा कोकण्या नोकरी फाट्यावर मारून आपलं गाव गाठतो. ही ओढ बघून जागोजागी पुढारी आपापल्या भागातून खास गौरी-गणपतीच्या सणासाठी गाड्या सोडतात. गणपतीच्या आठ दिवस आधीपासूनच कोकणात जाणारे रस्ते गाड्यांनी आणि माणसांनी फुलतात. मला नेहमी हा प्रश्न पडतो. गणपतीला गावी जाण्यासाठी हा कोकणी माणूस एवढा का तगमगत असतो. ह्याची तगमग गावी जाण्यासाठी का असते हे कळून घेण्यासाठी त्या मातीचा कोणता गुण कोकणी माणसात भिनला गेला असावा याचा शोध घेतला पाहिजे.

गणपतीचे अकरा दिवस संपले की, पुढचा गणपती कधी आहे हे बघण्यासाठी मोबाईलवरचं गुगल कॅलेंडर नकळत उघडलं जातं. आणि पुढच्या वर्षी गणपती कधी आहे ….त्यानुसार गावी कधी जायचे याची आखणी करायला सुरु न करणारा माणूस तसा विरळाच. ही ओढ अशी का ? ….याचं उत्तर मिळवायचे असेल तर पालघरच्या खाडीपासून ते दक्षिण कोकणातील तेरेखोलच्या खाडीपर्यंत एक फेरफटका मारणं जरुरीचं आहे. हा फेरफटका मारला की कळते की, कोकणातला माणूस गावच्या गणपतीला का धावतो ?

चार महिने आधीपासून गावच्या गणपतीला जायचे म्हणून ट्रेनची बुकिंग करायला त्याने सुरुवात केलेली असते. आता ट्रेनची तिकीट जरी नाही मिळाली तरी ऐनवेळी बुकिंगच्या बोगीत घुसून तो गाव गाठतोच. ही ओढ सगळ्यांनाच, प्रसंगी मुंबई-गोवा महामार्ग गाड्यांनी भरलेला असतो. तेव्हा वरच्या मार्गाने बावडा घाटाने तो गावी पोचतो. आता एसटी किंवा ट्रेनचे मार्ग बंद झाले की, कोकणी माणूस आपली गाडी काढून वरच्या लगेजच्या ट्रॉलीत सामान बांधून आठ दिवसांसाठी गावी जायला निघतो.

गावातले लोकदेखील तेवढ्याच आपुलकीने ह्या चाकरमान्याची वाट बघतात. ही ओढ त्याला प्रसंगी काही करायला भाग पाडते. साहेब गणपतीला गावी जायला सुट्टी देत नसेल तर हा कोकण्या नोकरी फाट्यावर मारून आपलं गाव गाठतो. ही ओढ बघून जागोजागी पुढारी आपापल्या भागातून खास गौरी-गणपतीच्या सणासाठी गाड्या सोडतात. गणपतीच्या आठ दिवस आधीपासूनच कोकणात जाणारे रस्ते गाड्यांनी आणि माणसांनी फुलतात. मला नेहमी हा प्रश्न पडतो. गणपतीला गावी जाण्यासाठी हा कोकणी माणूस एवढा का तगमगत असतो.

ह्याची तगमग गावी जाण्यासाठी का असते हे कळून घेण्यासाठी त्या मातीचा कोणता गुण कोकणी माणसात भिनला गेला असावा याचा शोध घेतलाच पाहिजे. ह्या लालमातीत असणारे असे कोणते सत्व आहे जे माणसाला इथल्या मातीशी जोडून घेत असावं ? कोकणातला निसर्ग आषाढ-श्रावण पिऊन मत्त झालेला असतो. त्या निसर्गातला कण नी कण हा त्या माणसाच्या प्रत्येक रंध्रात मुरलेला असतो. त्यांचे आणि निसर्गाचे आदिम नाते त्याला त्या मातीशी जुळवून घेण्यास भाग पाडते.

त्या निसर्गाशी तादाम्य पावणारा विसावा शोधत तो गावाची वाट धरतो. शहरात हा निसर्ग जवळ नसतो. कोकणी माणूस हा मूळचा माणूस वेडा. ह्या सणाच्या निमित्ताने त्याचा गोतावळा एकत्र येतो. दशकातलं सगळं गोत्र तेव्हा एकत्र येतं. त्या अकरा दिवसात त्या सत्वाची चव पुन्हा एकदा घेण्यासाठी तो गावी पळत येतो. आपली मूळं जेथे आहे तिथे ओढ असतेच. हा निसर्गाचा नियम ….त्याला माणूस कसा अपवाद ठरणार ?

गणपतीच्या तयारीला लागणारी रानफुलं त्याला मुंबईसारख्या शहरात कुठे मिळणार? कांगला, शेरवड, हरणा, कवंडळ ही फुलं त्याला गावातच मिळतात. ह्या फुलांशी कोकणी माणसाची वेगळी दोस्ती. गणपतीचा सण हा अंगात भिणून घ्यावा लागतो. ज्याचा अंगात तो भिनला तो गणपतीच्या सणाला इथे थांबत नाही. ही ओढ काय आहे हे समजून देण्यासाठी कवी वसंत सावंत यांची देवभूमी ही कविता आठवते…

अशा लालमातीत जन्मास यावे जिचा रंग रक्तास दे चेतना
इथे नांदते संस्कृती भारताची घरातून ….दारात वृंदावना…

इथे नांदणारी संस्कृती ही अखिल भारत वर्षाचे प्रतिनिधित्व करणारी आहे. ही संस्कृतीची पाळमूळ ही कोकणी माणसाच्या आत रुजली आहेत. हे सणसोहाळे त्या संस्कृतीचे उदात्तीकरण करतात.

कोकणातली जी घरं बंद असतात ती ह्या सणाला उघडतात. मे महिन्यात उन सहन होत नाही म्हणणारे चाकरमानी गणपतीला निसर्गाच्या कुशीत असणार्‍या आपल्या गावी त्या सृष्टीचा कायापालट अनुभवण्यासाठी नक्की येतात. निसर्ग सहस्त्रहस्तांनी तुम्हाला बोलावत असतो…झाडांच्या वरून ओघळणारे ते दवबिंदू माणसाच्या मनाचा ठाव घेतात. हा निसर्ग कोकणी माणसाला गावच्या गणपतीला चार-आठ दिवस का होईना पण बोलावतो. ह्या ओढीने तो गाव गाठतो.

गणपतीच्या दिवसात प्रसाद म्हणून करण्यात येणारे मोदक म्हणा, ऋषीपंचमीच्या दिवशी करण्यात येणारी अळूची भाजी किंवा गाठीया असोत, उंदीरकीच्या दिवशी करण्यात येणारी खीर, गौरीच्या दिवशी करण्यात येणारी भाकरी आणि शेगलाची भाजी यांची गोडी काही निराळी…या संपूर्ण एक आठवड्याच्या जोरावर मुंबईचा चाकरमानी आपले वर्ष उत्साहात काढतो…हे आठ दिवस जणू त्याच्यासाठी उत्साहाचं पीस आहेत.

या दिवसात घराघरातून निघणारे आरत्यांचे सूर आणि ताल त्याच्या कानात सतत घुमत असतात. रात्री त्याच्या ओटीवर झालेल्या भजनाची लय त्याने कानात साठवून ठेवली आहे. हे सर्व अनुभवल्याशिवाय ट्रेनच्या तिकीटीच्या मागे तो का लागतो हे आपल्या लक्षात येईल. गणपतीचा उत्सव हा त्याच्यासाठी केवळ सण नसतो, त्याच्यासाठी तो सुवर्णयोग असतो. हे दिवस म्हणजे आनंदलुटीचे दिवस असतात. कोकणातला गणपती हा नैसर्गिक गणपती. आजूबाजूला आरास रानफुलांची, गणपतीला वापरण्यात येणारी माती शेतातली. एकूण माणसाच्या पंचतत्वांशी नातं सांगणारी. या कारणाने चाकरमानी गणपतीसाठी गावी धावतो.

संतत पावसाची धार, शेताच्या मेरेवरून डोक्यावर गणपतीची मूर्ती घेऊन जाताना येणारा भाताच्या केसरांचा तो मृद्गंध ….त्या वासात अव्वल दर्जाची रसना आहे. ती ज्ञानेद्रीयांना पटकन कळते. हा वास नाकात भरून राहिला आहे…हा वास कोकणी माणसाला शहरात कसा स्वस्थ बसू देईल ? त्याच्या डोळ्यासमोर गावच्या गणपतीची परिमाणे सतत येत असतात. हा सण त्याला एक वेगळा उत्साह देतो, त्याच्या शरीरातल्या गात्रांना ऊर्जा देतो… त्याच्या डोळ्यासमोर सतत शेतातून गणपतीची मूर्ती घेऊन ओटीवर होणारे गणेशाचे आगमन येत असते.

ह्या कोकणी माणसाला देवघरातल्या भिंतीवर कमळ दुडताना चाललेल्या गावगजाली अनुभवायच्या असतात, भजनानंतर समोर ठेवलेल्या तबकातलं पान जुळवत होणार्‍या गप्पा ऐकायच्या असतात. गणपतीच्या पहिल्या दिवशी केळीच्या पानावर वाढलेलं जेवण जेवायचे असते…त्याही पलीकडे त्याला घरात वास्तूदेवता नांदून ठेवायची असते. आज कोरोनाच्या वैश्विक संकटामुळे नाईलाजाने त्याला मुंबईत राहावे लागत आहे, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी चौदा दिवस विलगीकरण स्वीकारून गावी जायची तयारी केली आहे.

अशा या वैश्विक संकटातदेखील त्याला गावच्या गणपतीला जावेसे वाटते ..कारण ती ओढ तिथल्या मातीची आहे. त्याला खात्री आहे की, गावात चौदा दिवसांचा विलगीकरण काळ संपला की, येणारा गणपती उत्सव त्याला कोणतेही मोठे संकट पेलण्याची ताकद देणार आहे. त्याला मनातले नैराश्य टाकून उत्साहाचे नवीन पीस मनात रुजवून घ्यायचे आहे. पाचशे मैल तुडवून तो गावी जाऊन टपकतो कारण तिथला निसर्ग त्याला भुरळ घालतो, तिथली खाद्यसंस्कृती त्याला जवळची वाटते. तिथल्या कृषीसंस्कृतीशी त्याचे गेल्या अनेक पिढ्यांशी नाते आहे. तिथल्या आदिम संस्कृतीशी त्याची नाळ जुळली आहे ती गेल्या अनेक शतकांशी. ह्या संस्कृतीला आधुनिकतेचा स्पर्श आहे तरी ती संस्कृती पुरातन होत नाही…ती आजही तशीच टवटवीत आहे.

काही गोष्टी ह्या केवळ सांगून कळत नाही…त्याचप्रमाणे ह्या नात्याचे आहे…ते एक शब्दिक संवादाने समजून येणार नाही…ते नातं अनुभवसिद्ध आहे. हा अनुभव ज्याने घेतला त्याला जी ओढ लागते ती विश्लेषित करता येणार नाही… हेच नाते वृद्धिंगत होत जाते. त्यामुळे कोकणी माणसाला गणपतीला गावी जाण्याची ओढ लागते ती कोणत्या एका गोष्टीमुळे नसून त्यात अनेक गोष्टींचा असा उहापोह करता येईल.

पण या सर्वांच्या मागे त्याचे आणि निसर्गाचे असलेले नाते अधोरेखित करता येईल. या ओढीने तो अधिक कसा खुलतो या संबंधी एक लोकगीत कोकणात प्रसिद्ध आहे, ते असे, गणोबा आमचो देखणो, पिढ्यानपिढ्यांचो राखणो, ही गणपतीबद्दलची भावना सगळ्या कोकणी माणसांच्या मनात रूढ आहे.