गोवर, रुबेला लसीकरण : समज – गैरसमज

एमआर म्हणजेच मिसेल रुबेला लसीकरण. गोवर आणि रुबेला या आजारांपासून 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील मुलांचा बचाव व्हावा यासाठी राज्यात 27 नोव्हेंबरपासून ही लसीकरण मोहीम राबवली जात आहे. पण, सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांमुळे या लसीकरणाला मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. मात्र यातील तथ्य काय आहे. याचा उहापोह करणारा हा लेख

mumbai
Gover - rubella vaccination
गोवर-रुबेला लसीकरण

गोवर, रुबेला लसीकरण केल्यामुळे आपला मुलगा किंवा मुलगी नपुंसक होईल या उठलेल्या अफवेतून पालकांनी ही लस देण्यास नकार दिला. पण, ही लस दिल्याने मुलांची आजाराशी लढण्यासाठी हवी असलेली प्रतिकारशक्ती आणखी चांगली होणार असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांनी स्पष्ट केले आहे. या लसीकरणात आतापर्यंत राज्यातील 1 कोटी 8 लाख मुलांना लस देण्यात आली आहे. तर, मुंबईतील मुंबईतील सव्वा कोटी लोकसंख्येपैकी 1 हजार 495 शाळांतील 4 लाख 95 हजार 60 मुलांना लसीकरण करण्यात आलं आहे.

लहान बाळांचा पोलिओ पासून बचाव व्हावा यासाठी पोलिओ लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली होती. तशीच ही गोवर – रुबेलाला प्रतिबंध घालण्यासाठी ही मोहीम राज्यभरात राबवली जात आहे. या लसीकरणात सर्व प्रकारचे घटक आणि संस्था सहभागी आहेत. विशेषत: पालिका शाळेतील मुलांना ही लस दिली जाणार आहे. खासगी हॉस्पिटल्स किंवा खासगी क्षेत्रात ही लस उपलब्ध करुन दिली गेलेली नाही. त्यामुळे ही लस पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे.

गोवर – रुबेला लसीकरण हा भारत सरकारचा उपक्रम आहे. ज्या मुलांना आधी ही लस दिली असेल अशा मुलांनाही ही लस द्यावी असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे. आतापर्यंत 12 पेक्षा अधिक देशांमध्ये ही लसीकरण मोहिम राबवण्यात आली आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नये
गोवरमुळे भारतात दरवर्षी जवळपास 50 हजार बालकांचा मृत्यू होतो. तर, रुबेलचा ही संसर्ग आता मोठयाप्रमाणात वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर ही लसीकरण मोहिमेसाठी राज्यसरकारच्या आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. त्यामुळे, सोशल मीडिया वर फिरणारे मेसेजेस आणि अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या मुलांना ही लस नक्की द्या, असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी केलं आहे.

गोवर आणि रुबेला लसीकरणाबाबतच्या अफवा
रुबेला जर गर्भवती मातेला झाला तर त्यामुळे तिचा गर्भपात होऊ शकतो. त्यामुळे या दोन्ही आजारांची गंभीरता आणि दाहकता निश्चितच अधिक आहे. पण मागील काही दिवसांपासून या लसीबाबत अनेक तक्रारी आणि अफवा पसरत आहेत. ही लस घेतल्यानंतर नपुसंकत्व येत अशी अफवा पसरली जात आहे. ही लस देऊन मुस्लिम समाजातील मुलांना नपुंसक करण्याचा सरकारचा कट असल्याचा खोटा गैरसमज पसरवला जात आहे. त्यामुळे या सर्व खोट्या अफवांना कस रोखता येईल, याबाबत सरकारी पातळीवर आता जनजागृती मोहीम सुद्धा राबवली जात आहे.

का आहे लसीकरणाची गरज ?
एमआर ही लस नव्याने दिली जात नाही आहे. पूर्वी ही लस खासगी हॉस्पिटल्समध्ये दिली जायचं. गोवर हा आजार जास्त प्रमाणात लहान मुलांना होतो. अंगावर पुरळ येणे, ताप येणे त्यासोबतच न्यूमोनिया होणं अश्या लक्षणांचा हा आजार आहे. रुबेला आजार गर्भवती मातेला झाला तर जन्माला येणार जे बाळ असते ते शारीरिक व्यंग घेऊन जन्माला येते, म्हणजे त्याची दृष्टी कमी असते, त्याचा हृदयाला छिद्र असू शकते. सेलिब्रल पाल्सी हा देखील आजार असू शकतो. यातून मार्ग काढण्यासाठी केंद्र शासनाने एम आर लसीकरण सुरु केले आहे. त्यामुळे सरकारी पातळीवरच ही लस दिली जाणार आहे. यासाठी केंद्र तयार करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात राज्यातील शाळांमधील मुलांना ही लस दिली जात आहे. तर दुसर्‍या टप्प्यात अंगणवाडी, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही लस दिली जाणार आहे. या लसी बाबतीत आरोग्य सेविकांना प्रशिक्षण दिले गेले आहे. आतापर्यंत 149 देशांमध्ये ही मोहीम राबवली गेली आहे. तर याआधी 20 राज्यात ही मोहीम राबवली गेली आहे.

लस पूर्णपणे सुरक्षित
ऑटो डिस्पोझेबल सिरिंज वापरली जात आहे. एका वेळी एकाच बालकाला या सिरिंज द्वारे इंजेकशन दिल जात आहे, त्यानंतर ती सिरिंज आणि सुई डिस्पोज म्हणजे फेकून दिली जाते. एकदा का या सीरींजला ओपन केलं. तिला आतमधल्या बाजूला ओढलं आणि त्यात 0.5 डोस इंजेक्शन भरलं की, ते त्या मुलाला टोचलं जात. एकदा का मुलाला इंजेक्शन टोचलं की ती सीरींज लॉक होते. त्यामुळे, या सिरींजचा पुर्नवापर होऊ शकणार नाही. त्यामुळे ही सर्वात सुरक्षित अशी लसीकरण मोहिम आहे. शिवाय, ज्यावेळेस या वॅक्सिन्सच्या बॉक्सची ने-आण होईल तेव्हा त्यांना बर्फामध्ये पॅक करुन ठेवलं जात.

तर, या कालावधीदरम्यान वॅक्सिनचा सफेद रंग लाल झाला तर ते वॅक्सिन खराब झालं आहे असं समजून वैद्यकीय अधिकारी ते फेकून देतात. ते वापरात घेत नाहीत असे सार्वजनिक आरोग्य विभागाचे संयुक्त आरोग्य संचालक डॉ.संतोष रेवणकर यांनी स्पष्ट केलं आहे. त्यासोबतच जागतिक आरोग्य संघटनेनी या लसीचा दर्जा प्रमाणित केला आहे. त्यामुळे प्रत्येक मुलाला प्रत्येक वेळी नवीन सीरींज द्वारे ही लस दिली जाणार आहे. त्यामुळे पालकांनी कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता ही लस मुलांना द्यावी असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे. एखाद्या मुलाला जर लस दिल्यानंतर काही त्रास झाला तर आपत्कालीन किट देखील उपलब्ध करून देण्यात आलं आहे.

पालकांसाठी आश्वासन
मुलांना इंजेक्शन दिल जाणार आहे. या भीतीनेच अनेकदा टेन्शन येत. त्यामुळे काही लक्षण दिसून येतात. त्यातून मुलांना उलटी होणं , मळमळणे अशी लक्षण दिसून येतात. त्यामुळे या लक्षणासाठी घाबरून जायचं काही कारण नाही आहे. अशी काही लक्षण मुलांना दिसली तर त्यासाठी आपत्कालीन किट आहेत, डॉक्टर्स आहेत. बालरोगतज्ज्ञ आहेत. या लसीकरणाचा फायदा 3 कोटी 37 लाख बालकांना होणार आहे. या लसीमुळे भविष्यात शारीरिक दुर्बलता किंवा नपुंसक होऊ शकतो अश्या अफवा सध्या सोशल मीडियावर पसरल्या जात आहेत. पण अश्या प्रकारच्या कोणत्याही लसीने या गोष्टी होत नाहीत हे वैद्यकीय अभ्यासात स्पष्ट झालं आहे. त्यामुळे अश्या प्रकारचा गैरसमज का पसरवला जात आहे याचा शोध घेतला जात आहे असं ही डॉ. रेवणकर यांनी स्पष्ट केलं आहे.

शाळाबाह्य मुलांना कशी होईल लस उपलब्ध ?
साधारणपणे लस दिल्यानंतर जर लक्षण दिसत असतील तर किमान 40 किंवा एका तासातच दिसतील. त्यामुळे ही लस दिल्यानंतर ताबडतोब त्या जागेवरून मुलांना हलवलं जात नाही. त्याला तिथेच बसवून त्याच निरीक्षण केलं जात. जर त्याला अशी काही लक्षण वाटली तर त्याच्यावर तात्काळ उपचार देखील केले जातात. यासाठी ऑल इंडिया पेडिऍट्रिक असोसिएशन , आयएमए, त्यासोबतच एनजीओ लायन्स , रोटरी क्लब या सर्वानी पुढाकार घेतला आहे. त्यासोबतच कुठल्याही हॉस्पिटल्समध्ये विनामूल्य व्यवस्था केली गेली आहे. शाळाबाह्य मुलांना दुसर्‍या टप्प्यात म्हणजे अंगणवाडी , उपकेंद्रात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात 6 आठवड्यानंतर मिळण्याची सोया करण्यात आली आहे. ही लस सर्वत्र उपलब्ध असून सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया मार्फत ही लस तयार केली गेली आहे.

शाळांनी एनओसी मागितला तर भरून द्या
काही शाळांमध्ये या लसीकरणासाठी पालकांकडून एनओसी म्हणजे कॉन्सेंट फॉर्म भरून घेतला जात आहे. त्यामुळे पालकांनी निर्धास्तपणे हा फॉर्म भरून द्यावा. कारण ही लस गेले 40 वर्ष उपलब्ध आहे. ही लस जर आधीपासून उपलब्ध आहे तर पुन्हा ही लस देण्याची काय गरज असल्याचा प्रश्न पालक विचारतात. एखादी लस जेव्हा दिली जाते तेव्हा तिची प्रतिकार शक्ती ही पहिल्या डोस मध्ये 80 ते 85 टक्के एवढी असते. जसा पोलिओचा डोस वारंवार दिला जातो त्याच कारण म्हणजे शरीरात प्रतिकारशक्ती ही आजारांसोबत लढण्यासाठी निर्माण होते. त्यामुळे दुसर्‍यांदा जर ही लस दिली तर 100 टक्के प्रतिकार शक्ती शरीरात तयार होते. म्हणून या लसीला ही पुन्हा दिली जात आहे. शिवाय ज्या बालकांनी ही लस घेतली नाही त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते. ती बालक दुसर्‍या मुलांनाही संसर्ग देऊ शकतात. त्यामुळे ही लस जर एकाच वेळी सर्वाना दिली तर सर्व बालक संपूर्णपणे सुरक्षित होतील आणि या विषाणूची जी साखळी आहे ती कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. ज्याप्रमाणे देवी आणि पोलिओ हा आजाराला कायम स्वरूपी प्रतिबंध घालता आलं आहे. त्याचप्रमाणे गोवर आणि रुबेलाला ही प्रतिबंध घालायचा आहे.

खासगी हॉस्पिटलमध्ये लस उपलब्ध नाही
ही लस फक्त शासकीय हॉस्पिटल्समध्येच उपलब्ध करून देण्यात आली आहे. साधारणपणे ही लस 200 रुपयांना मिळू शकते. पण खासगी हॉस्पिटल्समध्ये ही लस देण्यात आलेली नाही, फक्त नि फक्त सरकारी हॉस्पिटल्समध्येच ही लस उपलब्ध असून पूर्णपणे मोफत आहे. कारण ही जबाबदारी पूर्णपणे शासनाची असल्याचं राज्य कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितलं आहे. 27 नोव्हेंबरपासून एमआर म्हणजेच गोवर-रुबेला लसीकरण मोहिम संपूर्ण भारतात राबवली जात आहे. त्यानुसार, मुंबईत 4 लाख 95 हजार मुलांचं लसीकरण करण्यात आलं आहे. लसीकरणानंतर काही मुलांना किरकोळ ताप आणि उलट्या येण्याच्या केसेस आढळल्या आहेत. पण, ही लस सुरक्षित आहे. एकदा वापरलेली लस पुन्हा कधीच वापरता येऊ शकत नाही. त्यामुळे पालकांनी अजिबात घाबरुन न जाता ही लस मुलांना द्यावी. अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाचे संयुक्त आरोग्य संचालक डॉ. संतोष रेवणकर यांनी दिली.

संकलन ः भाग्यश्री भुवड

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here