घरफिचर्स‘ग्लोबल व्हिलेज’ची लोकल व्यथा !

‘ग्लोबल व्हिलेज’ची लोकल व्यथा !

Subscribe

आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान यातून निर्माण झालेल्या वेगवान संपर्क आणि वाहतूक साधनांमुळे जगाच्या विविध भागांचे अंतर कापण्याचा वेळ आता खूपच कमी झाला आहे. व्हिडिओ कॉलसारख्या माध्यमामुळे तर अंतर हा घटकच निघून गेला आहे. माणसे कितीही अंतरावर असली तरी जणूकाही एका टेबलावर बसल्यासारख्या गप्पागोष्टी करू शकतात. त्यामुळे जगाला ‘ग्लोबल व्हिलेज’ ही उपमा देण्यात आली. पण करोना विषाणूने सगळ्यांना जागच्या जागी स्थानबद्ध केले आहे, म्हणजेच लोकलाईज केले आहे. बर्‍याच जणांना अशा वेळी आपल्या मूळ गावी किंवा मूळ देशी जावेसे वाटत आहे, ते त्यांना कठीण होऊन बसले आहे, हिच या ‘ग्लोबल व्हिलेज’ची लोकल व्यथा आहे.

गेल्या शंभर सव्वाशे वर्षांच्या काळात विज्ञान आणि तंत्रज्ञानात जी वेगवान प्रगती झालेली आहे, त्यामुळे जग जवळ आलेले आहे. आधुनिक संपर्क आणि वाहतूक साधनांमुळे अंतर हा घटक संपुष्टात आला आहे. त्यामुळेच जगाला ‘ग्लोबल व्हिलेज’ असे संबोधले जाते. पण या ग्लोबल व्हिलेजला अलीकडच्या काळात पाहू गेल्यास दणदणीत तडाखा दिला आहे तो करोना या विषाणूने. या विषाणूने जगातील विशेषत: आधुनिक राष्ट्रांना हादरवून टाकले आहे. ज्या प्रगत राष्ट्रांमध्ये अत्याधुनिक पायाभूत आणि वैद्यकीय सुविधा आहेत, त्यांनाही करोना विषाणूला रोखणे महाकठिण होऊन बसले आहे. त्याला आवर घालून त्याच्या आक्रमणामुळे होणारी मनुष्यहानी रोखताना त्यांच्या नाकी नऊ येत आहेत. लॉकडाऊनचा पर्याय अवलंबूनही त्यांना या आजाराला आवर घालणे त्यांना अवघड झाले आहे.

करोना विषाणूची सुरुवात चीनच्या वुहान प्रांतात झाली असली तरी आता तिथे त्याचा उपद्रव जवळ जवळ थांबला आहे, पण त्याचा प्रसार जगातील विविध देशांमध्ये होत आहे. विशेषत: जगातील प्रगत देशांना याचा जास्त फटका बसताना दिसत आहे. इतकेच नव्हे तर विकसनशील देशांमध्येदेखील जिथे श्रीमंत भाग आहे, त्या ठिकाणी या विषाणूचा प्रभाव जास्त दिसत आहे. अमेरिका, इटली, स्पेन, रशिया, जपान, इस्त्राईल अशा प्रगत देशांमध्ये करोनाने हाहा:कार उडवलेला दिसत आहे. भारतातही या विषाणूचा जास्त प्रभाव मुंबई, पुण्यासारख्या प्रगत भागांमध्ये दिसतो. त्यामुळे ज्या ठिकाणी आर्थिक उलाढाल मोठी आहे, त्या ठिकाणीच हा विषाणू जास्त शिरकाव करतो, असेच म्हणण्याची वेळ आलेली आहे. कारण शहरी भागातील गरीब वस्त्यांमध्ये या विषाणूचा शिरकाव झाला तरी तिथे तो फार काळ राहत नाही. तिथून तो लवकरात लवकर काढता पाय घेतो.

- Advertisement -

करोना हा विषाणू जसा माणसांच्या शरीरावर विपरीत परिणाम करत आहे, त्यापेक्षा जास्त माणसांच्या मनावर कित्त्येक पटीने जास्त धक्कादायक परिणाम करत आहे. त्यामुळे करोनाच्या संशयावरून अनेक जवळचे लोक एकमेकांना दुरावल्याचे दिसून येत आहे. प्रत्येकजण आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करत आहे. मग तो कितीही जवळचा नातेवाईक असला तरी करोनाचा संशय आला किंवा बाधितक्षेत्रात राहणारा असला तरी त्याच्यापासून दूर राहणेच पसंत केले जात आहे. जर एखाद्याला करोनाची लागण झाली असेल तर मग काय विचारूच नका, त्याच्या आजुबाजूच्यांची भीतीने गाळण उडते. ही भीतीच प्रत्यक्ष रोगापेक्षा भयानक आणि जीवघेणी ठरत आहे. रोगाची लागण होऊ नये, म्हणून काळजी जरूर घ्यायला हवी, पण करोनामुळे आपण माणसांवर बहिष्कार टाकता कामा नये, हे लक्षात घ्यायला हवे, कारण करोना आज आहे, तो उद्या जाईल, तसेच करोनाची लागण झालेली सगळीच माणसे मरत नाही, अनेक लोक बरे होतात, हे लक्षात ठेवायला हवे. कारण तुम्ही आज त्यांना जी परकेपणाची वागणूक द्याल ती ते उद्या विसरणार नाहीत. त्यामुळे सुरक्षेचे उपाय करून आपल्याला करोनासोबत जगायला शिकले पाहिजे. कारण करोना हा लंबी रेसचा घोडा आहे, तो लगेच आटोक्यात येईल, अशी स्थिती नाही.

आधुनिक संपर्क आणि वाहतूक साधनांमुळे जगाचा विस्तार मोबाईलच्या माध्यमातून हाताच्या तळव्यावर आल्याची स्थिती आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, व्हिडिओ कॉलिंग, ट्विटर यासारख्या सोशल मीडियातून जगभरात दूरवर राहणारे लोक एकमेकाच्या संपर्कात राहू शकतात. अंतर कितीही असले तरी जणूकाही ते एका टेबलावर बसले आहेत, अशा प्रकारे एकमेकांशी बोलू शकतात. अनेक कामे ही ऑनलाईन सुरू असतात. माणसाने प्रत्यक्ष प्रवास करण्याची गरज नसते. तुम्ही ऑनलाईन पाहणी करून ऑर्डर दिलीत की, वस्तू तुमच्या घरपोच होते. असे सगळे सुरू असताना चीनच्या वुहान प्रांतातून करोनाचा उद्भव झाला. त्या प्रांतात त्याने हाहा:कार उडवला. तेथील पोलीस लोकांना त्यांच्या घरात बाहेरुन कुलुपे लावून जबरदस्तीने बंद करत आहेत, लोक आपल्या खिडक्यांमधून स्वत:चा जीव वाचवण्यासाठी परमेश्वराचा धाव करत आहेत, अशी हृदय विदर्ण करणारी दृश्ये आपल्याला दिसत होती. त्यावेळी आपण फक्त त्या भयंकर आपत्तीला दूरून पाहणारे प्रेक्षक होतो. ती आपत्ती आपल्याकडे येईल, असे अनेक देशातील लोकांना वाटले नव्हते. पण त्या आजाराने सगळ्यांचेच अंदाज चुकविले. यापूर्वी महामारी आल्या तरी त्याचे स्वरुप वेगळे होते, पण या करोना विषाणूचा अंदाज काही अजबच होता. त्यामुळे सगळ्यांचेच वांदे होऊन बसले आहेत.

- Advertisement -

भारतात या विषाणूने विदेशातून आलेल्या प्रवाशांच्या माध्यमातून शिरकाव केला. पण पुढे तो इतका फैलावत जाईल, असे वाटत नव्हते. पण त्याने भारतातील जवळजवळ सर्व राज्यांना आपला इंगा दाखवला आहे. त्या विषाणूची लागण शहरी भागातून झाली. कारण विदेशातून प्रथम लोक शहरी भागात विमानाने येतात. त्यामुळे शहरातून या विषाणूचा प्रसार छोट्या शहरांमध्ये तसेच ग्रामीण भागात होऊ नये, म्हणून सुरुवातीला जिथे आहात, तिथे थांबा, असे सरकारकडून लोकांना सांगण्यात आले. त्या मागे उद्देश असा होता की, समजा शहरात या विषाणूची लागण झाली तर त्यावर उपचार करण्साठी लागणारी औषधे आणि सुविधा या शहरी भागात उपलब्ध होऊ शकतात, त्या ग्रामीण भागात मिळणार नाहीत, पण हा हेतू चांगला असला तरी पुढे करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन वाढविण्यात आला. त्यामुळे लोकांची जागच्या जागी कोंडी झाली. ज्या लोकांचे हातावर पोट आहे, तसेच ज्यांची घरे खूपच लहान आहेत, त्यांची मात्र मोठी कोंडी झाली. काही लोक तर मुंबईसारख्या शहरांमध्ये मोठ्या संख्येने झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. हा सगळा मजूर वर्ग आहे.

शहरातील कामधंदे बंद झाल्यामुळे सगळेच व्यवहार ठप्प झाले. लॉकडाऊनची मुदत वाढत गेली. त्यामुळे एकाच ठिकाणी रहायचं कसं आणि खायचं काय, असा प्रश्न अनेकांसमोर उभा राहिला. सरकारने जरी जेवणाखाण्याची सोय केली असली तरी लोकांना ही कोंडी असह्य वाटू लागली. त्यामुळे त्यांनी वाट फुटेल त्या दिशेने पायी चालण्याचा पर्याय निवडला आणि तो आपल्या गावांच्या दिशेने चालू लागले. बर्‍याच जणांना वाटेत पोलिसांनी अडवले. त्यांना परत पाठवले. पण काहीजण त्यातूनही मार्ग काढून पुढे चालत राहिले. ४००, ५००, तर कुणी हजार मैल चालले. पण इतके अंतर चालून तरी काय उपयोग होत होता. कारण गावी पोहोचल्यानंतरही काही जणांना गावाच्या बाहेर अडविण्यात आले. त्यांना घरात थेट घरात घेण्यात आली नाही. त्यांना काही दिवस गावाच्या बाहेर क्वारंटाईन करून ठेवण्यात येत आहे.

विविध कारणांमुळे, कामाधंद्यासाठी देशाच्या आणि जगाच्या विविध भागात गेलेल्या लोकांना आता आपल्या मूळगावी किंवा मूळदेशी परतायचे आहे. त्यासाठी ते सरकारांकडे विनवण्या करत आहेत. आधुनिक साधने, सोयी सुविधा, आणि संधी यांच्या शोधात निघताना ग्लोबल झालेले लोक आता पुन्हा लोकल होत आहेत. त्यांच्या मूळ ठिकाणी म्हणजे लोकल ठिकाणी परतण्यासाठी धडपडत आहेत. करोनाने त्यांची अवस्था गड्या आपला गाव बरा अशी केली आहे. थोडक्यात, काय तर करोना या विषाणूने माणसांना ग्लोबलपासून पुन्हा लोकल केले आहे. लोकलाईज म्हणजे एकाच ठिकाणी स्थानबद्ध करणे, असा इंग्रजी अर्थ आहे. करोनाने असेच सगळ्यांना ग्लोबलाईजचे लोकलाईज केले आहे.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -