घरफिचर्सऋणानुबंध!

ऋणानुबंध!

Subscribe

बाबी आणि बायो कोकणातल्या एकाच वाडीत लहानाची मोठी झाली. दोघेही एकाच शाळेत शिकली. लहानगी बायो बाबीच्या मागे मागे असायची. वाडीतली माणसे गमतीने बाबीच्या आईला म्हणायची, सून करून घे तेका. पुढे बाबी मुंबईला जातो. त्याचे दुसर्‍या मुलीशी लग्न होते. पण त्याच्या गावाला असलेल्या वृद्ध आईची सेवा बायोच करत असते. बायोला बाबीच्या आईची सून होता येत नाही, पण तिची सेवा मात्र शेवटपर्यंत करते.

आमच्या कोकणात मुलाला बाबी आणि मुलीला बायो म्हणण्याची पद्धत आहे. ही त्यांची टोपण नावे असतात. त्यांचे मूळ नाव काही तरी वेगळेच असते. त्या नावाने फक्त त्यांना शाळेतील शिक्षकच हाक मारतात. गावातले इतर लोक त्यांना टोपण नावेचे हाक मारतात. कोणतातील गावांमध्ये छोट्या छोट्या वाड्या असतात. त्या वाडीत आठ दहा घरे असतात. अशाच एका वाडीत आमचा मित्र बाबीचा जन्म झाला. त्याच्या वाडीच्या बाजूने नदी वहायची. पावसाळ्यातील हिरवळ, हिवाळ्यातील छान गुलाबी थंडी आणि उन्हाळ्यात आंबे, फणस, करवंदांनी पिकणारा भोवतालचा परिसर अशा वातावरणात बाबी लहानाचा मोठा झाला. त्याच्या वाडीच्या जवळच शाळा होती. त्या शाळेत तो जायचा. वाडीतली इतर मुलेमुलीही त्याच्यासोबत असत. त्यात बायो नावाची एक बाबीच्याच वयाची मुलगी होती.

बाबीच्या आईला वाडीतले लोक अनी आणि वडिलांना आबा म्हणत असत. बाबी हा त्यांचा लाडका मुलगा. बाबीच्या घरची परिस्थिती चांगली होती. त्याची वर्गमैत्रीण बायो गरीब घरातली होती. एकाच वाडीत राहत असल्यामुळे तिचे बाबीच्या घरी येणे जाणे असायचे. वाडीतली मुले एकत्र खेळत असत. लहानगी बायो बीबीच्या मागे मागे असे. बाबीची आई अनीदेखील तिला माया लावी. बाबी आणि बायो मोठे होत होते. वाडीतली काही माणसे त्यांना चिडवत असत. काहीजण गमतीने अनीला म्हणत, सून करून घे तेका. हे ऐकल्यावर बाबी खूप लाजायचा. अशी सगळी गंमत जंमत चालेली होती. पुढे दोघेही दहावीत गेले. बाबी अभ्यासात हुशार असल्यामुळे चांगल्या मार्कांनी पास झाला. बायोचे दोन विषय राहिले. मग तिची आई म्हणाली, आता बस झाला शिक्षान. खय जावचा हा तुका. घरात काय कामा कमी हत. शेतात तरी खय मानसा मिळतत. मॉप काम हा. बायोच्या घरचीही परिस्थिती बेताची होती. त्यामुळे बायोचे शिक्षण तिथेच थांबते.

- Advertisement -

बाबी दहावीत शाळेतून पहिला येतो. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी त्याला त्याचे वडील तालुक्याच्या ठिकाणी पाठवतात. बाबी अधून मधून घरी यायचा. शेतीच्या कामात मदत करायचा. तेव्हा बायोसुद्धा त्याच्या घरी येत असे. बाबीच्या आईवडिलांना जास्त मदत बायोचीच होत असे. एका बाजूला बाबी शिक्षण घेत होता. तर दुसरीकडे बायो गावाला आपल्या घरातील आणि शेतातील कामे करत असे. पुढे बाबी मुंबईला जातो. एका चांगल्या कंपनीत कामाला लागतो. स्वत:चा फ्लॅट घेतो. आईबाबा त्याला लग्नाविषयी सांगतात. बाबीसाठी मुलगी बघण्याचा कार्यक्रम होतो. बाबीच्या मनात कुठे तरी बायोच्या आठवणी डोकावत असतात. पण आता बाबी उच्च शिक्षित आणि आर्थिकदृष्ठ्या संपन्न झालेला असतो. बाबी आणि बायो यांच्यात बरेच अंतर पडलेले असते. बाबीचे मुंबईतीलच एक मुलीशी लग्न ठरते. मुलगीही चांगल्या कंपनीत कामाला असते. लग्नासाठी बाबी आईवडिलांना मुंबईला घेऊन येतो. बाबीची आई मुंबईला निघण्यापूर्वी,घराकडे लक्ष दे गो, असं म्हणत, घराची चावी बायोकडे देते. मुंबईत बाबीचे लग्न थटामाटात होते.

बाबी लग्न झाल्यानंतर अधूनमधून गावाला जायचा. बाबीला दोन मुले होतात. दरम्यानच्या काळात बायोच्या घरचे तिचे लग्न लावून देतात. पण दुर्दैवाने तिचा नवरा दारूडा निघतो. तो घराकडे लक्षच देत नसतो. त्या दोघांना काही मुलबाळही होत नाही. शेवटी बायो कंटाळून माहेरी येते. दरम्यानच्या काळात बाबीचे वडीलही वारलेले असतात. बाबीची आई गावाला एकटीच राहत असते. तिच्या मदतीला बायो जात असे. तिला दुकानातून वस्तू आणून देणे, आजारी पडल्यावर औषध देणे, बाबीने पाठवलेली पत्रे वाचून दाखवणे या सगळ्या गोष्टी बायो करत असे. आता बाबीच्या आईचे वयही बरेच झालेले असते. बाबी गणपतीला गावी जायचा. बायको आणि मुले कधी कधी त्याच्यासोबत असायची.

- Advertisement -

बाबीची आई आता बरीच थकली होती. बायो तिची सेवा करत असते. एकदा बाबीची आई बायोला म्हणते, किती सेवा करतंस गो माझी. कसे फेडू तुजे ऋण ? माज्या सूनेक काय येळ मिळालो नाय. असे म्हणून आपल्या कनवटीतून एक सोन्याचा दागिना काढून म्हणते, ह्यो ठेव तुका. त्यावर बायो मागे सरून म्हणते, अनी ह्येच्यासाठी मी नाय केलंय तुजी सेवा. मी बाबीसाठी तुजी सेवा केलंय. माजा नशीबच फुटका. घोव नशिबातच नाय माज्या, असे बोलून बायो हमसून हमसून रडू लागते. बाबीची आई तिला जवळ ओढते आणि मिठीत घेते. दोघीही ढसाढसा रडू लागतात. बाबीच्या आईला वाडीतल्या लोकांचे बायो लहान असतानाचे ते शब्द आठवतात, अनी, सून करून घे तेका.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -