घरफिचर्सखंजीर! शरद पवारांनी पेरले ते उगवले

खंजीर! शरद पवारांनी पेरले ते उगवले

Subscribe

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल असे वाटत असताना शनिवारी पहाटे भाजपने अजित पवार यांनाच फोडून शरद पवारांना धक्का दिला. हा धक्का इतका मोठा होता की, सुप्रिया सुळे यांच्या डोळ्यात पाणी आले. पवार घराण्यात उभी फूट पडल्याचे दुःख त्यांच्या बोलण्यातून दिसले. त्यांचा अजितदादा असे काही करेल अशी त्यांना कल्पना नव्हती. पण, आता त्यांच्या डोळ्यात पाणी आले असले तरी त्यांच्या वडिलांच्या बेभरवशाच्या राजकारणाने वसंदादादा यांच्यासह गेल्या पाच दशकांच्या काळात अनेकांच्या डोळ्यात पाणी आणले होते, त्याचा हा नियतीने उगवलेला सुड आहे, असेच म्हणावे लागेल.

जो महाराष्ट्र तलवारीसाठी प्रसिद्ध होता, तो आता महाराष्ट्र खंजिरासाठी प्रसिद्ध झाला… आज सर्व राज्यात लोकांची हीच भावना आहे. महाविकास आघाडीचे सरकार येणार, असे शुक्रवारी रात्री ठरले होते. तीच रात्र संपून शनिवारची पहाट उगवत असताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन सर्वाना मोठा धक्का दिला. हा राजकीय भूकंप असल्याची सर्वत्र प्रतिक्रिया असली तरी हा पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार झाला. शरद पवार यांनीच महाराष्ट्रात पाठीत खंजीर खुपसण्याचे बीज पेरले होते. ते आज त्यांच्या पुतण्याच्या रूपाने उगवले आहे.
शरद पवार यांनी १९८० मध्ये वसंतदादा यांच्या पाठीत खंजीर खुपसून पुलोद सरकार बनवले होते. समाजवादी, शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेसचा एक गट घेऊन त्यांनी सरकार स्थापन केले. वसंतदादा यांच्यासारखा सर्वांना सोबत घेऊन जाणारा आणि विशेष म्हणजे प्रत्येकाला मदत करणार्‍या या मोठ्या मनाच्या नेत्याचा हा विश्वासघात सर्वांच्या जिव्हारी लागला. मात्र, त्यावेळी शरद पवार त्यांच्या खास शैलीत मिश्किल हसत होते. आज त्यांचा पुतण्या त्यांच्यावर हसत आहे.

इंदिरा गांधी यांच्या हुकूमशाही राजकारणाच्या विरोधात देशभर लाट उसळली होती. याचा परिणाम होऊन विधानसभेच्या १९७८ साली झालेल्या निवडणुकांत जनता पक्षाला सर्वाधिक १०२ जागा मिळाल्या. इंदिरा काँग्रेसला ६८ तर यशवंराव चव्हाणांच्या रेड्डी काँग्रेसला ६४ जागा मिळाल्या. पण महाराष्ट्रात विरोधकांच्या हाती सत्ता जाऊ नये, यासाठी दोन्ही काँग्रेसने एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले आणि इंदिरा काँग्रेसचे नाशिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री झाले. यावेळी प्रथमच राज्यात उपमुख्यमंत्रीपद निर्माण करण्यात आले होते. दोन काँग्रेसच्या सरकारचा शपथविधी झाला खरा, पण शपथविधी झालेल्या दिवशीच तिरपुडे यांनी थेट चव्हाणांवर टीका केली. त्यामुळे पहिल्या दिवसापासून सरकारमध्ये विसंवाद सुरू झाला. यशवंतराव चव्हाण काँग्रेसमधील दुखावलेले कार्यकर्ते शरद पवार यांच्याभोवती जमा होऊ लागले होते. चव्हाण द्विधा मनःस्थितीत होते. चव्हाणांवर निष्ठा असलेले किसन वीर यांच्यासारखे नेते आणि एकूणच कार्यकर्ते हे सरकार पाडले पाहिजे, या मतापर्यंत आले होते. अखेर पवार ३४ आमदारांना घेऊन सरकारमधून बाहेर पडले. जनता पक्ष काँग्रेसेतर सरकार स्थापन करण्यासाठी उत्सुक होता. पवार मुख्यमंत्री झाले आणि राज्यात पुरोगामी लोकशाही दलाचे (पुलोद) सरकार स्थापन झाले. स्वातंत्र्योत्तर काळात प्रथमच राज्यात पूर्वाश्रमीचे जनसंघाचे आणि समाजवादी पक्षाचे लोक सत्तेत आले होते.

- Advertisement -

याच दरम्यान केंद्रात जनता पक्षाचे तीनतेरा वाजले होते. पूर्वाश्रमीच्या जनसंघीयांनी भारतीय जनता पक्ष स्थापन केला. इंदिरा गांधी पुन्हा एकदा पंतप्रधान झाल्या. त्यांनी महाराष्ट्रातील शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखालील पुलोद सरकार बरखास्त केले आणि कधी नव्हे ती प्रथमच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली आणि आता २०१९ मध्ये महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आल्यानंतर पुन्हा एकदा विश्वासघातकी राजकारण दिसून आले. विशेष म्हणजे ४० वर्षांनंतरही हेच राजकारण पुन्हा महाराष्ट्राला दिसले आणि त्याचा केंद्रबिंदू पवार आणि त्यांचे घराणे ठरले आहे.

राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सोनिया गांधी यांच्या हाती काँग्रेसची सूत्रे आल्यानंतर शरद पवार यांना पंतप्रधानपदाची स्वप्ने पडू लागली. काँग्रेसमध्ये राहून आपण कधीच पंतप्रधान होणार नाही, असे लक्षात घेऊन परकीय जन्माची व्यक्ती पंतप्रधान बनण्यास आपला विरोध असल्याचे जाहीर केले. त्यांनी थेट सोनिया यांच्या विरोधातच पवित्रा घेतल्याने काँग्रेसने त्यांची हकालपट्टी केली. आणि आता असाच बेभरवशाच्या राजकारणाचा त्रास काय असतो हे शरद पवार अनुभवत आहेत.

- Advertisement -

शुक्रवारपर्यंत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे तीन पक्ष मिळून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार बनवणार होते. काँग्रेस आघाडी सरकारचा २०१४ च्या आधीचा पंधरा वर्षांचा करपलेला कारभार पाहून जनतेने त्यांना धडा शिकवत भाजप आणि शिवसेनेच्या युतीच्या हातात सत्तेची धुरा दिली. काही तरी नवीन बदल होईल अशी मोठी आशा होती, पण कामांपेक्षा बोंगा मोठा असेच दिसले. देवेंद्र फडणवीस सरकारच्या गोष्टी लाखाच्या होत्या, पण बघायला गेले तर हजार सोडा, शंभराच्या कहाण्या पूर्ण होताना नाकी नऊ आले. भाजपची गाडी १०५ आमदारांपर्यंत थांबल्यानंतर फडणवीस यांनी आपल्या पक्षाच्या स्ट्राईक रेटची जी काही गोष्ट सांगितली ती मती गुंग करणारी होती. अशाच त्यांनी गेल्या पाच वर्षात आपल्या कामांच्या रेट कार्डच्या कहाण्या लोकांना सांगितल्या होत्या. लोकांना याआधी बेरीज, वजाबाकी, भागिले आणि गुणिले माहीत होते, ही स्ट्राईक रेटची भाषा काही समजली नाही आणि मतदान करताना त्यांनीसुद्धा रेट कार्ड बाहेर काढत भाजपचा फुगा फोडला. पण, शिवसेनेलाही त्यांची जागा दाखवून दिली आणि काँग्रेस, राष्ट्रवादीला वेशीवर बसवले! आता हे जागा दाखवलेले आणि वेशीवरचे एकत्र येऊन सरकार बनवत आहेत.

मात्र, महाविकास आघाडी पुढे आव्हानांची मोठी घडी असेल. मुख्य म्हणजे भाजप शांत बसणार नाही. आघाडीत बिघाडी करून ते हे सरकार पाडण्याची एकही संधी सोडणार नाही आणि शनिवारी सकाळी भाजपने अजित पवार यांनाच फोडून शरद पवारांना धक्का दिला. हा धक्का इतका मोठा होता की, सुप्रिया सुळे यांच्या डोळ्यात पाणी आले. पवार घराण्यात उभी फूट पडल्याचे दुःख त्यांच्या बोलण्यातून दिसले. त्यांचा अजितदादा असे काही करेल अशी त्यांना कल्पना नव्हती. पण, आता त्यांच्या डोळ्यात पाणी आले असले तरी त्यांच्या वडिलांच्या बेभरवशाच्या राजकारणाने वसंदादादा यांच्यासह गेल्या पाच दशकांच्या काळात अनेकांच्या डोळ्यात पाणी आले होते त्याचा हा नियतीने उगवलेला सुड आहे.

गेल्या तीन आठवड्यांपेक्षा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे चर्चेचे फेर्‍यांवर फेर्‍या सुरू होत्या. याच दरम्यान भाजप पडद्यामागे पवार यांचा पक्ष फोडण्याच्या तयारीला लागले होते आणि यात अलगद अजित पवार सापडले. अजितदादा यांचा स्वभाव हा कुठलीही गोष्ट भिजत ठेवणारा नाही. त्यांना झटपट निर्णय घ्य्यायचा असतो. आपल्या काकांच्या बैठकांवर बैठकांचा त्यांना राग आला असावा आणि कदाचित भविष्यात काकांबरोबर राहून आपले भले होईल की नाही, अशी शंका त्यांना खात असावी आणि या सार्‍यामधून त्यांनी हा निर्णय घेतला, असे दिसत आहे. अमित शहा यांनी यासाठी त्यांना आपल्या नेहमीच्या शैलीत आश्वासनांची गाजरे दाखवली असतील, पण त्याचे मोठे परिणाम अजित पवार यांना सहन करावे लागतील. शिवसेनेने सोबत जायचे नाकारल्यानंतर फडणवीस सरकार पुन्हा येणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आणि याचा केंद्रबिंदू दिल्लीत अमित शहा होते. फडणवीस आणि भाजप नेत्यांना शांत बसवून शहा यांनी थेट पवारांच्या पुतण्याला फोडण्याचे कारस्थान केले.

शरद पवार यांनी काँग्रेसला विश्वासात घेऊन शिवसेनेला पाच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्याची तयारी दोघांनी दाखवली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनात अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची सुप्त आस होती. या पदासाठी अजित पवार हे उत्सुक होते. पण, शरद पवारांच्या मनात काय सुरु आहे, हे एका घरात राहून बाकी पवारानांही समजणार नव्हते. कदाचित ते सुप्रिया सुळे यांनाही हे पद देऊन महाराष्ट्रात प्रथमच एका महिलेला मुख्यमंत्री होण्याची संधी देतील आणि वर सांगतील मला नको हे पुरोगामी महाराष्ट्राला हवे आहे. कदाचित या सर्वांची कल्पना अजित पवार आली असावी आणि काकांनी पुढे आपल्याला दूर करण्यापेक्षा आपणच दूर होऊन मोठे झालेले बरे. मात्र त्यांना वाटते तेवढे सत्ताकारण सोपे जाणार नाही. फडणवीस सरकार स्थापन करण्यासाठी प्रसंगी विरोधकांचे आमदार फोडण्याची आपली तयारी आहे, अशी दादागिरी नेहमीप्रमाणे नारायण राणे यांनी केल्यानंतर अजितदादा म्हणाले होते की, अशा विश्वासघातकी आमदारांनी पुन्हा निवडणुकीला उन्हे राहून दाखवाच. त्यांना आम्ही सर्व मिळून कसे आडवे करतो ते पाहा. आता अजितदादा तुमच्या बाबतीत काय करायचे, असा जनतेचा सवाल आहे.

देशातील बहुतांशी आमदार हे भाजपच्या शोभेच्या बाहुल्या आहेत. तसेच महराष्ट्रातील भगतसिंह कोश्यारी ठरले आहेत. केंद्राच्या तालावर त्यांनी आधी राष्ट्रपती राजवट जाहीर केली आणि आता भाजपच्या सोयीने ती उठवून फडणवीस आणि अजित पवार यांना पदाची शपथ दिली. हे सारे अमित शहा यांच्या तालावर सुरु आहे. आम्ही घोडेबाजर करणार नाही, असे नाकाने कांदे सोलणार्‍या भाजपचा खरा चेहरा हा विश्वासघातकीच आहे. ते आपल्या मित्रपक्षांनाही सोडत नाही, ते विरोधकांना कसे सोडतील. अजित पवारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्यासाठी पुढे निघालेल्या फडणवीस यांची बहुमताचे सरकार स्थापन करण्यासाठी दमछाक होणार हे निश्चित आहे. अशा वेळी घोडेबाजाराला ऊत येणार आणि तो करण्यासाठी भाजप साम, दाम, दंड, भेद वापरणारच. एकवेळ आम्ही अविवाहित राहू, पण राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा करणार नाही. नाही…नाही आणि नाही… असे देवेंद्र फडणवीस तुम्ही बोलला होता. आता तुम्ही काय करत आहात ते आता रात्रीच्या खेळानंतर दिवसा लोकांना सांगण्याची वेळ आली आहे.

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -