घरफिचर्सथोरांघरचे लग्न!

थोरांघरचे लग्न!

Subscribe

आपण सगळे बाकी कुठलेही वादी असू-नसू, समाज म्हणून आपण लग्नवादी आहोत... मुलांचं लग्न अगदी झोकात झालं पाहिजे, असं आपल्याला वाटतं. त्या लग्नात आपलं सगळं खरंखोटं ऐश्वर्य झळकलंच पाहिजे, लग्नाने जमतील तेवढ्यांचे डोळे दिपवले पाहिजेत असा आपला आग्रह असतो... एरवी अतिशय पुढारलेले सामाजिक विचार असणारी मंडळीही लग्नातला झगमगाट टाळू शकत नाहीत... आपल्या देशात ‘मेक इन इंडिया’ योजनेअंतर्गत बाकी काहीही झालं नाही, तरी नुसती लग्नं जरी देशांतर्गत झाली तरी कितीतरी लोकांना रोजगार मिळेल, देशाच्या कुंठित अर्थव्यवस्थेला केवढी चालना मिळेल.

भारतात, मुंबईत नुकतंच एक लग्न झालं… त्यात आपले महानायक वाढपी म्हणून काम करतायत, असा एक व्हिडिओ एव्हाना तुमच्यापर्यंत आला असेलच… अशाच एका सोहळ्यात देशातले सगळे सुपरस्टार एका कट्ट्यावर अंग चोरून बसले होते याच राजमहालात. देशाच्या पंतप्रधानांच्या पाठीवर ज्यांचा हात, त्यांना माजी राष्ट्रपतींच्या खांद्यावर (निव्वळ जिव्हाळ्याने) हात टाकणंही अवघड नसतं, तिथे प्रोटोकॉल वगैरे काही आडवा येत नाही, याचंही हृद्य दर्शन याच सोहळ्यात घडलं आणि ‘सब अपनी दुकाने हैं’ या प्रसिद्ध उद्गारांची आठवण ताजी झाली. ही सगळी थोरांच्याच हातांवर उमटणारी भाग्यरेषा; नाहीतर देशाच्या अर्थमंत्रीपदाचा भार सांभाळलेल्या ज्येष्ठतम राजकारणी नेत्याशी अशी सलगी करायला लहानपणी त्यांच्याबरोबर शाळेत वर्गमित्र असण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.

या लग्नाच्या खर्‍याखोट्या फोटोंनी सध्या इंटरनेट व्यापलं आहे. कुठे लग्नात मोजक्याच (म्हणजे काही हजार) लोकांना पाठवलेली दीड लाख रुपये किंमतीची पत्रिका दिसते, कुठे नीता अंबानींनी मुलीला की सुनेला भेट दिलेला दोन कोटी रुपयांचा ब्लाउझ, कुठे दागिन्यांचा खर्च, कुठे कपड्यांचा खर्च, कुठे लग्नाला उपस्थितांची यादी… म्हणजे या देशात आपली काहीतरी किंमत आहे, असं ज्याला म्हणून वाटत असेल, त्याच्यासाठी ते तपासून घेण्याची जागा एकच… वधूपित्याचा 27 मजली इमला! लग्नाच्या दिवशी, रिसेप्शनच्या दिवशी तुम्ही निमंत्रितांच्या रांगेत समाविष्ट नसाल, तर अजून तुम्हाला या देशात काही फारशी किंमत नाही, हे अगदी स्पष्टच आहे.

- Advertisement -

या लग्नात फार नाही, सातआठशे कोटी रुपये उडाले म्हणतात. आपल्यासारख्या दहापंधरावीसतीसपन्नास हजारी विचार करणार्‍या आणि एक करोडचा टर्म इन्शुरन्स खरेदी करणे हीच कोटीच्या आकड्यांशी संबंध येण्याची एकमात्र संधी लाभणार्‍या माणसांना… सॉरी ‘सर्वसामान्य’ माणसांना हा आकडा फार मोठा वाटतो. पण, मुंबईत एखाद्या पंचवीस मजली टॉवरमध्ये प्रत्येक मजल्यावर चार लक्झरी रेसिडेन्सेस असतील आणि प्रत्येकाची किंमत चार कोटी रुपये असेल, तर अशा दोन टॉवरांमधल्या घरांच्या विक्रीतून मिळणार्‍या रकमेइतकीच ही रक्कम आहे. पाच वर्षांच्या टर्ममध्ये मंत्री याहून अधिक पैसा कमावतात म्हणे. बारापंधरा चांगल्या पदांवरचे सरकारी अधिकारी एकत्र करून त्यांचे खिसे झाडले तरी यापेक्षा जास्त रक्कम रोखीत खाली पडेल, असं सांगतात जाणकार लोक. मुंबईच्या परिसरात रस्त्यावर प्लास्टिकच्या वस्तू विकण्यापासून सुरुवात केलेले फेरीवाले, रिक्षावाले, भुर्जीवाले, प्रभावशाली नेत्यांचा हरकामी पोर्‍या असलेले हुन्नरी लोक पुढे आमदार वगैरे बनून बसले, त्यांच्यापैकी एकेकाकडे एवढी माया सहजच जमली असेल. वधुपित्याचं एकंदर साम्राज्य, बाजारातली पत वगैरे लक्षात घेतली तर त्याच्यासाठी ही रक्कम किती किरकोळ आहे, ते कळून येतं. बायकोला वाढदिवसाची भेट म्हणून प्रायव्हेट जेट भेट देऊ शकणार्‍यांच्या लाडक्या मुलीच्या लग्नात एवढा खर्च होणारच.आपल्याला तर हे अगदी बिनशर्तच मान्य आहे.

आपण सगळे बाकी कुठलेही वादी असू-नसू, समाज म्हणून आपण लग्नवादी आहोत… मुलांचं लग्न अगदी झोकात झालं पाहिजे, असं आपल्याला वाटतं. त्या लग्नात आपलं सगळं खरंखोटं ऐश्वर्य झळकलंच पाहिजे, लग्नाने जमतील तेवढ्यांचे डोळे दिपवले पाहिजेत असा आपला आग्रह असतो… एरवी अतिशय पुढारलेले सामाजिक विचार असणारी मंडळीही लग्नातला झगमगाट टाळू शकत नाहीत… आपल्या देशात ‘मेक इन इंडिया’ योजनेअंतर्गत बाकी काहीही झालं नाही, तरी नुसती लग्नं जरी देशांतर्गत झाली तरी कितीतरी लोकांना रोजगार मिळेल, देशाच्या कुंठित अर्थव्यवस्थेला केवढी चालना मिळेल.

- Advertisement -

कोणताही सीझन असला, वातावरण काहीही असलं तरी दारूचा धंदा नेहमीच तेजीत असतो, असं म्हणतात. लोक आनंद साजरा करायलाही दारू पितात आणि दु:ख विसरायलाही दारूचाच आधार घेतात. त्याचप्रमाणे देशात तेजी असो, मंदी असो, अर्थव्यवस्था उत्कर्षरत असो की खड्ड्यात गेलेली असो, लग्नं जमेल तेवढ्या दिमाखात साजरी होतच असतात. त्यात अशा पथदर्शक लग्नांमधून साड्यांची, दागिन्यांची डिझाइन्स, वरवधूंचे कपडे, वर्‍हाड्यांच्या नव्या फॅशन्स, फुलांच्या सजावटी, व्हिडिओ कार्डं, डेस्टिनेशन संगीत वगैरे किती तरी प्रकारच्या नव्या उपक्रमांना चालना मिळते… या वेडिंग प्लॅनर्सना एखाद्या वर्षी देशाचं सगळं बजेट उपलब्ध करून दिलं तर ते देशव्यापी लग्नसोहळा उभा करतील आणि सगळा देश सजवतील (नंतर आपण नासाने टिपलेला फोटो जगभरात फॉरवर्ड करू), याची खात्री देता येईल. ते साताठदहा दिवस तरी देशातले सगळे गोरगरीब लोकही आनंदात पंचपक्वान्नांवर ताव मारू शकतील.

या लग्नसोहळ्याच्या आसपासच एक फोटो काही वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाला होता…

त्यात बिल गेट्स आणि वॉरेन बफे हे दोन अब्जाधीश एकत्र दिसत होते…

…या दोघांची एकत्रित संपत्ती 11 हजार कोटींपेक्षा अधिक आहे…

…तरी बफे हे दोन बेडरूमच्या एका उच्च मध्यमवर्गीय अपार्टमेंटमध्ये राहतात… बिलचं घरं त्या मानाने बरं आहे, मात्र, आपल्या 27 मजली इमल्यापुढे तेही काही नाही…

या दोघांच्या त्या साध्या कपड्यातल्या फोटोमध्ये साधा गुचीचा बेल्टही दिसत नाही… आपल्याकडे एखाद्या बिल्डरच्या अंगरक्षकाकडेही सापडेल तो डिझायनर बेल्ट…

…या दोघांनी आपली बरीचशी संपत्ती सामाजिक कार्यांसाठी दान दिलेली आहे, बफे यांनी जवळपास 71 टक्के संपत्ती दान केली आहे, तर बिल गेट्सने 22 टक्के संपत्ती दान केली आहे… ते भारतासारख्या देशांमध्ये गरीबांसाठी अनेक प्रकल्प चालवत असतात…

…त्यापेक्षा आपल्या मुलाबाळांची लग्नं थाटात साजरी करणं हा गोरगरिबांच्या उत्थानाचा किती सोपा आणि ग्लॅमरस मार्ग आहे, याची त्या बिचार्‍यांना काही कल्पनाच नाही!

-मुकेश माचकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -