HUG DAY SPECIAL – आठवणीतील तुझी शेवटची मिठी

आजही मला तितक्याच वेदना होतायेत जितक्या वेदना तू मला मारलेल्या शेवटच्या मिठीमध्ये झाल्या होत्या. त्या मिठीच्या आठवणी दररोज ताज्या होतात आणि मी तळपत्या आठवणींच्या ज्वालांमध्ये पेटत राहतो. या आगीची धग मला आयुष्यभर तुझ्या कुशीची जाणीव करून देत राहील, हे मात्र तितकच खरंय!

Mumbai
Happy Hug Day 2019
आठवणीतील तुझी शेवटची मिठी

काल अचानक रद्दीमध्ये माझ्या कवितांची जुनी डायरी सापडली. मी कविता लिहित राहावं, असा तुझा नेहमी हट्ट असायचा. परंतु, तू निघून गेलीस. तुझ्या जाण्याची मनावर झालेली जखम आजही भळभळती आहे. त्यामुळे डायरीवर कविता लिहिण्याची पुन्हा हिंमत झाली नाही. परंतु, नियतीच्या मनात नेमकं काय आहे ते कोण जाणे? ही कवितांची डायरी काल पुन्हा हातात पडली. मी रात्रभर चाळत राहीलो ही डायरी. यातल्या प्रत्येक कवितेमध्ये तूच दिसत होती. त्यामुळे अश्रूंना व्यक्त होण्यासाठी पुन्हा वाट मिळाली. ते ओसंडून वाहिलेही. ही डायरी थांबली ती तुझ्या शेवटच्या मिठीमध्ये! ती मिठी आजही आठवतेय आणि मी शोकाकूळ होतोय. मिठीतले शब्द जणू शेवटचेच होते आणि तू अलविदा न म्हणता निघून गेलीस. पण, मिठीची आठवण आजही आहे.

तुझी ती शेवटची मिठी मला आयुष्यभर पुरणारी आहे. मला तुझा रोज आभास होत असतो. त्या आभासामध्ये मी रोज तुला मिठी मारत असतो. मी दररोज प्रेमाच्या सरितेत डुबकी मारतो आणि त्यामध्ये न्हाऊन निंघतो. पण अचानक या स्वप्नांना ठेच लागते आणि मी खळबळून जागा होतो. आजही मला तितक्याच वेदना होतायेत जितक्या वेदना तू मला मारलेल्या शेवटच्या मिठीमध्ये झाल्या होत्या. त्या मिठीच्या आठवणी दररोज ताज्या होतात आणि मी तळपत्या आठवणींच्या ज्वालांमध्ये पेटत राहतो. या आगीची धग मला आयुष्यभर तुझ्या कुशीची जाणीव करून देत राहील, हे मात्र तितकच खरंय!

खरं सांगायचं तर रोजच्याप्रमाणे काल रात्री तू पुन्हा एकदा माझ्या स्वप्नात आली होतीस. मी स्वप्नातही कल्पना सागरात डुबलो होतो. मी कल्पनेच्या विविध पटलांवर उड्या मारत होतो. शब्दांशी नातं जोडत होतो. भावना वेचत कविता करत होतो. अचानक तुझी हाक ऐकू आली. मी सैरभैर झालो. तुला पाहू लागलो, तुला शोधू लागलो. परंतू, माझे पाय वाळवंटातील वाळूमध्ये रूतले होते. तुझ्या शोधात मी वाळंवंटी पोहोचलो आणि तू वाळू होऊन मला स्पर्शून गेली. हा स्पर्श मला तुझ्या त्या शेवटचा मिठीतला स्पर्श असल्याची जाणीव मला झाली आणि अचानक मला जाग आली. यावेळी दोन ओव्या नकळत सुचल्या:

स्पर्श तीचा जणू मखमल,
फुलपाखरूहूनही किती चंचल,
तैनात नजर, हुरहून्नर,
व्यर्थ सारं, ओघळतं हे मन

मिठीमध्ये प्रेमाचा ओलावा आहे. जिंदगाणीचे खरेखुरे सामर्थ्य आहे. मायेची ऊब आणि प्रेमाची कधीही न विझणारी ज्योत सामावलेली आहे. कधी ही मिठी फार साधीभोळी आणि भाबडी बनते, तर कधी श्वास संमेलन ठरते. डोंगराच्या एखाद्या कड्यावरून नदिने धबधबा होऊन दरीत कोसळावं, अगदी तशीच ही मिठी असते. या मिठीसोबत प्रत्येकाचं नातं जुळलेलं असतं. मिठीबद्दल खरं सांगायचं झालं तर ती मला कधीकधी ओढूनताणून बनलेल्या कवितेसारखी भासते तर कधी अस्खल शब्दसंमेलनी!