बोगस डॉक्टर: आरोग्य सेवा पोखरणारा कर्करोग

ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी डॉक्टर नकार देत असताना मुंबईतील झोपडपट्टीतील लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन अनेक बोगस डॉक्टर त्यांची सर्रास फसवणूक करतात. मानखुर्द, कुर्ला, दहिसर, बोरिवली व घाटकोपर यासारख्या मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या असलेल्या भागात बोगस डॉक्टर मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हे डॉक्टर आपली क्लिनिक्स सुरू करतात. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात साथीचे आजार पसरत असल्याने गोरगरीब डॉक्टरांची योग्यता न तपासता त्याच्याकडे रांग लावतात.

Mumbai
प्रातिनिधिक फोटो

एखादी अवघड शस्त्रक्रिया, उपचार करून व्यक्तीला जीवदान देण्याचे काम डॉक्टर करतात. त्यामुळे आपल्या देशात डॉक्टरला देवाचे स्थान दिले जाते. तसे पाहता डॉक्टर हा लॅटीन भाषेतील शब्द आहे. बदलत्या जमान्यानुसार आपल्याकडे वैद्यकीय सेवेचाही व्यवसाय झाला. वैद्यकीय सेवेमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा असल्याने अनेक तरुणांचा डॉक्टर होण्याकडे कल वाढत आहे. ही सकारात्मक बाब आहे. मात्र, वैद्यकीय सेवा, व्यावसायातील पैसा, मानसन्मानामुळे या क्षेत्रातही बोगस डॉक्टर्सनी शिरकाव केला आहे. या बोगस डॉक्टर्समुळे वैद्यकीय सेवेसारख्या उदात्त क्षेत्रालाही धोका निर्माण झाला आहे. या बोगस डॉक्टर्सनी शहरात ठिकठिकाणी छोटेछोटे क्लिनिक सुरू केले आहे. असे क्लिनिक विशेषत: पावसाळ्यामध्ये उकिरड्यावर उगवणार्‍या अळंबीप्रमाणे झोपडपट्टी, किंवा ज्या ठिकाणी एकूणच निरक्षरतेचे प्रमाण जास्त असते अशा लोकवस्ती परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू होतात. अशा बोगस डॉक्टरांवर कारवाई अधून मधून होत असली तरी तिचे प्रमाण फार कमी असल्याने बोगस डॉक्टर ही वैद्यकीय क्षेत्रासाठी एक गंभीर समस्या ठरत आहे.

एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्व डॉक्टरांना ग्रामीण भागामध्ये वैद्यकीय सेवा देणे बंधनकारक केले आहे. परंतु ग्रामीण भागात सेवा देताना फारसे उत्पन्न मिळत नाही. डॉक्टरकीच्या अभ्यासासाठी अनेकवर्षे अभ्यास केल्यानंतर पुन्हा ग्रामीण भागात सेवा देणे म्हणजे आर्थिक नुकसान करून घेण्यासारखे आहे. असा समज करून अनेकजण डॉक्टरकीचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर ग्रामीण भागात सेवा देण्यास टाळाटाळ करतात. काहीजण नावापुरते ग्रामीण भागामध्ये जातात.

मात्र त्यांची प्रॅक्टिस शहरी भागातच सुरू करतात. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी 80 च्या दशकात सरकारने ग्रामीण डॉक्टरांसाठी डिप्लोमा इन मेडिसिन अ‍ॅण्ड सर्जरी (ग्रामीण) अभ्यासक्रम सुरू केला होता. जेणेकरून डॉक्टरांकडून उत्तम आरोग्य सेवा मिळण्यास मदत होईल. डॉक्टरांना योग्य प्रकारे प्रशिक्षण मिळावे, यासाठी जिल्हा शल्य चिकित्सा हॉस्पिटलमध्ये हा अभ्यासक्रम शिकवण्यात आला. तसे प्रमाणपत्रही त्यांना दिले. या अभ्यासक्रमांतर्गत डॉक्टरांना ग्रामीण भागात आरोग्य सेवा देणे बंधनकारक असतानाही अनेक डॉक्टर ग्रामीण भागात सेवा देण्याचे नाकारत शहरात सेवा देत आहेत. नुकतेच अशाप्रकारे सेवा देणार्‍या डॉक्टर्सवर महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने त्याच्यावर कारवाई केली आहे.

ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी डॉक्टर नकार देत असताना मुंबईतील झोपडपट्टीतील लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन अनेक बोगस डॉक्टर त्यांची सर्रास फसवणूक करतात. मानखुर्द, कुर्ला, दहिसर, बोरिवली व घाटकोपर यासारख्या मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या असलेल्या भागात बोगस डॉक्टर मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हे डॉक्टर आपली क्लिनिक्स सुरू करतात. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात साथीचे आजार पसरत असल्याने गोरगरीब डॉक्टरांची योग्यता न तपासता त्याच्याकडे रांग लावतात. हे बोगस डॉक्टरही जास्त पॉवरचे इंजेक्शन व गोळ्या रुग्णांना देत असल्यामुळे त्यांना लगेचच आराम पडतो. परंतु हे जास्त पॉवरचे इंजेक्शन किंवा औषधे हे आरोग्यासाठी हानीकारक असण्याची शक्यता असते. परंतु त्याच्याशी या डॉक्टरांना काहीही देणेघेणे नसते. या बोगस डॉक्टरांवर महापालिका व पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. परंतु एका डॉक्टरवर कारवाई केल्यावर उरलेले बोगस डॉक्टर आपला गाशा गुंडाळून फरारी होतात. त्यामुळे त्यांचे रॅकेट उद्ध्वस्त करणे अडचणीचे ठरत असते.

खासगी हॉस्पीटल्सशी संधान
बोगस डॉक्टर त्यांनी क्लिनिक सुरू केलेल्या भागातील खासगी मोठ्या हॉस्पिटलशी संधान बांधून ठेवतात. त्यामुळे त्यांच्याकडे एखादा गंभीर रुग्ण आल्यास त्याला तातडीने त्या खासगी हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगतात. अनेकदा बोगस डॉक्टर्सनी दिलेल्या औषधाने रुग्णाला बरे वाटत नसेल तर किंवा काही मोठा आजार झालेली व्यक्ती आली तर त्याला तो त्या खासगी हॉस्पिटलमध्ये जाण्याची चिठ्ठी लिहून देतो. त्यामुळे त्या बोगस डॉक्टरला त्या हॉस्पिटलकडून प्रत्येक रुग्णामागे एक ठरावीक रक्कम मिळत असते. हे बोगस डॉक्टर असे दिवसाला सहा ते सात रुग्ण हॉस्पिटलकडे पाठवत असतात. एखाद्या परिसरात 10 ते 12 बोगस डॉक्टर असतील तर प्रत्येक डॉक्टरकडून सहा ते सात रुग्ण हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात येत असतील तर त्या हॉस्पिटलचा व्यवसायही तेजीमध्ये चालतो. हे हॉस्पिटल या रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळत असतात. त्यामुळे सर्वसामान्य रुग्ण म्हणजे खासगी हॉस्पिटल व बोगस डॉक्टरांसाठी एक प्रकारचे पैसे खाण्याची कुरणच असते.

बोगस डॉक्टर आणि बनावट प्रमाणपत्रे
राज्यामध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या क्षेत्रानुसार नोंदणी करण्यासाठी विविध काऊंन्सिल आहेत. बीएएमस, बीयूएमएससाठी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडिया, एमबीबीएससाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल, बीएचएमएस (पूर्वीचा डीएचएमएस)साठी महाराष्ट्र होमिओपॅथी कौन्सिल, तर बीडीएस, एमडीएससाठी महाराष्ट्र दंत परिषद आहे. राज्यात कोणत्याही वैद्यकीय व्यवसायिकास वैद्यकीय व्यवसाय करायचा असल्यास त्याने ज्या विषयातून शिक्षण घेतले त्या परिषदेत नोंदणी करणे बंधनकारक आहे. ते नोंदणीप्रमाणपत्र असल्याशिवाय त्याला वैद्यकीय व्यवसाय करता येत नाही.

महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन व महाराष्ट्र होमिओपॅथी कौन्सिलची बर्‍याच जणांकडे बोगस नोंदणी प्रमाणपत्र आहेत. त्यामुळे ज्यावेळी एखादी बोगस वैद्यकीय व्यवसायिक शोध समिती तपासणी करायला त्या ठिकाणी जाते त्यावेळी ते बोगस डॉक्टर हे खोटे प्रमाणपत्र दाखवतात. तर राज्यात अशा बोगस डॉक्टरांवर आळा घालण्यासाठी महापालिका, जिल्हास्तरीय, नगरपालिकास्तरीय, पंचायत समिती स्तरीय समित्या आहेत आणि यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पुनर्विलोकन समिती आहे असे असतांना या समितीच्या वर्षानुवर्षे बैठकाच झालेल्या नाहीत. त्यामुळे बोगस डॉक्टरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी असलेल्या या समिती नावापुरत्याच आहेत.

कारवाईचा फार्स
बोगस डॉक्टरांविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाते असा दावा करण्यात येतो. परंतु मुंबई महापालिका व मुंबई पोलिसांनी तीन वर्षांमध्ये अवघ्या 58 बोगस डॉक्टरांवर कारवाई केली आहे. बोगस डॉक्टर शोधणे हे वैद्यकीय अधिकारी व पोलिसांसाठी फार अवघड काम असल्याने या कारवाईमध्ये अडचणी येत असल्याचे सांगण्यात येते. कारण कोणत्याही डॉक्टरची पुराव्याअभावी पोलिसांना बोगस डॉक्टर ठरवून चौकशी करता येत नाही. तसेच त्यांनी सादर केलेले प्रमाणपत्र हे खरे आहेत की खोटे आहेत हे तात्काळ पडताळून पाहण्याची व त्या डॉक्टरने संबंधित काऊंन्सिलकडे नोंद केली आहे की नाही हे पाहण्याची कोणतीही सोय पोलिसांकडे नाही. त्यामुळे एखाद्या डॉक्टरसंदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यास पोलिसांना सर्व प्रथम त्या डॉक्टरचे प्रमाणपत्र घेऊन ते संबंधित काऊंन्सिलकडे तपासणीसाठी पाठवावे लागते. हे पाठवल्यानंतर त्याची तपासणी होऊन येईपर्यंत त्याला वेळ लागतो. तोपर्यंत बोगस डॉक्टरला पळून जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. त्यामुळे बोगस डॉक्टरांवर होणारी कारवाई करण्यासाठी कठोर नियमच नव्हे तर सक्षम यंत्रणा उभारणे आवश्यक आहे.

तपास यंत्रणांची उदासीनता
आयुर्वेद व युनानी डॉक्टरांची नोंद होत असलेल्या महाराष्ट्र काऊन्सिल ऑफ इंडियन मेडिकलच्या एका प्रकरणात काही लोकांना बोगस नोंदणीपत्र देण्यात आले होते. त्याबाबत कुलाबा पोलीस स्टेशनला ५६/०१ हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढे तो तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. याबाबत एका पत्रव्यवहारात पोलीस महासंचालक कार्यालयाने ५००० बोगस डॉक्टर राज्यात असल्याचा उल्लेख केला होता. तर महाराष्ट्र काऊन्सिल ऑफ इंडियन मेडिकलने १३०० बोगस डॉक्टर असल्याचे म्हटले होते. मात्र या घटनेला 18 वर्षे झाली तरी त्या प्रकरणात काहीच प्रगती नाही. तसेच यातील अनेक बोगस डॉक्टर गायबही झाले आहेत. असाच प्रकार होमिओपॅथी कौन्सिलच्या बाबतही घडला होता. याप्रकरणी माता रमाबाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु या प्रकरणातही कोणतीच प्रगती झालेली नाही.

-विनायक डिगे
(लेखक आपलं महानगरचे आरोग्य प्रतिनिधी आहेत)