दिल, दोस्ती आणि राजकारण

Mumbai

7 सप्टेंबरला नरेंद्र मोदी मुंबईत आले होते. आधीची रात्र आणि त्यानंतरची पहाट इस्त्रोतल्या शास्त्रज्ञांबरोबर घालवल्यानंतर ते मुंबईत दाखल झाले होते. आपली चांद्रयान मोहीम काहीशी अपयशी ठरल्यानंतर त्याचं दुःख, त्याची निराशा पंतप्रधानांना होणं स्वाभाविक होतं. तरीही कॅमेरासमोर इस्त्रोचे प्रमुख के.सीवन यांना त्यांनी ज्या पद्धतीचा धीर दिला ते सार्‍या जगानं पाहिलं. चंद्र मोहीम अपयशी ठरली तरी इस्त्रोतल्या वेगवेगळ्या विभागाच्या प्रमुखांना, काही तरुण शास्त्रज्ञांना- कर्मचार्‍यांना मोदींनी हस्तांदोलन केलं आणि अधिक चांगल्या यशासाठी शुभेच्छाही दिल्या. देशासाठी आणि वैज्ञानिक क्षेत्रासाठी ही गोष्ट खूपच महत्त्वाची आहे. हे सगळं केल्यावर पंतप्रधान सकाळी दहाच्या सुमारास मुंबईत उतरले आणि मेट्रो 3 च्या प्रकल्पाच्या उद्घाटनाआधी त्यांनी मुंबईत काही सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनाही प्रोत्साहित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येण्याआधी १५ तासांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विलेपार्लेचे आमदार पराग अळवणी यांना फोन केला आणि विमानतळ परिसरात कोणता ऐतिहासिक गणेशोत्सव सामाजिक भान ठेवून साजरा केला जातो याची माहिती घेतली. अळवणी यांनी दिलेल्या माहितीनुसार लोकमान्य सेवा संघाच्या शतक महोत्सवी गणेशोत्सवाची चर्चा झाली. तिथेच ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाबद्दल पराग यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि अवघ्या काही मिनिटांत हे निश्चित करण्यात आलं की, मोदी पार्ल्यातील या कार्यक्रमात सहभागी होणार. त्यानंतर सुरू झाली सुरक्षा यंत्रणांची लगबग. निवासी भागात पंतप्रधानांचा कार्यक्रम म्हणजे सुरक्षा यंत्रणेच्या अधिकार्‍यांसाठी तारेवरची कसरत असते. इथेही तसंच झालं. एसपीजीने पस्तीस लोकांनाच कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहण्याची परवानगी दिली. त्यामुळे तीन ठिकाणी होणारा कार्यक्रम १०-१० लोकांमध्ये विभागण्यात आला. पंतप्रधान निघेपर्यंत संस्थेचे अध्यक्ष आणि आमदार अळवणी हे सोडले तर कोणालाही नेमून दिलेल्या जागेच्या व्यतिरिक्त हलता येणार नव्हतं. कोणालाही पंतप्रधानांना हारतुरे देता येणार नव्हते, पाया पडता येणार नव्हतं. एसपीजीचे तसे कडक निर्देशच होते. पंतप्रधान कार्यक्रमाच्या स्थळी पोहोचल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पराग अळवणी यांची ओळख करून दिली ‘हे आपले स्थानिक आमदार पराग अळवणी. ते खूप छान काम करतात’ या दोन वाक्यांत ही ओळख करून दिल्यानंतर पराग यांनी मोदींना नमस्कार करण्यासाठी हात जोडले. प्रत्यक्षात पंतप्रधानांनी हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. या सगळ्या गोष्टी कॅमेरामनला आपल्या कॅमेरात नीट टिपता आल्या नाहीत. याचं कारण आयोजकांनी निश्चित केलेला कॅमेरामन हा एसपीजीच्या निर्बंधांमुळे तीन ठिकाणी म्हणजे लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार घालायला, पु. ल. देशपांडे कलादालनात भेट देऊन अभिप्राय लिहिणं आणि शतक महोत्सवी गणपतीचं दर्शन घेणं याठिकाणी कॅमेरामनची धावपळ झाली. मात्र इमारतीतून पंतप्रधानांचा हा धावता दौरा टिपणार्‍या पार्ल्यातील रहिवाशांनी आपल्या पंतप्रधानांचे, मुख्यमंत्र्यांचे आणि आमदारांचे फोटो आपल्या कॅमेरात क्लिक केले होते. त्या फोटोतून देवेंद्र फडणवीस यांच्या देहबोलीतून त्यांचा दिलदारपणा साफ दिसतोय. खरंतर अळवणी आणि फडणवीस हे गेल्या अनेक वर्षांपासूनचे मित्र आहेत. २०१४ ला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याच्या आदल्या संध्याकाळी भाजपा कार्यालयातून निघाल्यावर देवेंद्र यांनी पराग यांना आपल्या गाडीत बसायला सांगितलं आणि काही अंतराचा प्रवास केला. त्यात पराग यांनी फडणवीस यांना उद्यापासून आपल्यात मुख्यमंत्रिपदाचा प्रोटोकॉल असेल आणि त्यामुळे आपण अगदी मोकळेपणाने वागायचो तसं वागता येणार नाही, असं सांगितलं. मुख्यमंत्र्यांनाही ते पटलं. त्यांनी काही मिनिटं गप्पा मारल्या आणि हा प्रवास आटोपला. पाच वर्षांपूर्वीच्या संध्याकाळी जे अपूर्ण राहिलेलं ‘काहीतरी’ मुख्यमंत्री फडणवीसांनी ७ तारखेला पूर्ण केलं. त्याची दृश्यं आणि क्षणचित्रं पार्लेकरांनी आपल्या कॅमेरात कैद केली. एरव्ही विनाकारण कुणाला पत्ताही न सांगणार्‍या पार्लेकरांनी एसपीजीच्या करड्या नजरेनंतरही जे केलं तेआपल्या आमदारावर व्यक्त केलेलं प्रेम होतं. या प्रेमाची उतराई होऊ शकणार नव्हती. कारण अळवणींच्या आयुष्यातील हे ऐतिहासिक क्षण व्यावसायिक कॅमेरामनकडे नव्हते. त्यामुळेच धन्यवाद देण्यासाठी अळवणी चित्रीकरण करणार्‍या नागरिकांच्या घरी गेले. त्यांना एक छानशी भेटवस्तूही दिली. आता अवघ्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होईल. प्रत्येक राजकारणी आपली आमदारकी आणि मंत्रीपद टिकविण्यासाठी वाट्टेल त्या कुरघोड्या करतील. पक्षांतरापासून अगदी नको त्या थराला जातील, पण आपल्या राजकारणाचं हित साधतील. गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दमदार राजकारण केलं. शेतकर्‍यांच्या आत्महत्यापासून ते मराठा आरक्षणापर्यंत सगळ्याच गोष्टींत ते वरचढ ठरले, पण त्याच वेळेला त्यांनी दिल, दोस्ती आणि राजकारणाचा एक परिपाठच जणू घालून दिला. मुख्यमंत्र्यांचा पाच वर्षांपूर्वीचा वानखेडेवरील शपथविधी सोहळा यशस्वी करणार्‍या आणि मुंबईचा गड शिवसेनेच्या हातून हिसकावून घेणार्‍या अशिष शेलार यांना त्यांनी पावणे पाच वर्ष मंत्रिपदासाठी ताटकळत ठेवलं. अनेकांना शेलारांच्या ताटकळण्याचा प्रश्न पडायचा. अशिष शेलार हे सहा वर्ष मुंबईचे अध्यक्ष होते. भाजपचा हा मराठा गडी मूळचा कोकणातला. त्यामुळे कोकणी, मराठा आणि सर्वगुणसंपन्न असा मुंबईकर. गेल्या तीन दशकात मुंबईचं नेतृत्व करण्याची क्षमता, शैली, आणि चातुर्य असलेला हा नेता. खरंतर विनोद तावडे आशिष शेलार आणि पराग अळवणी हे तिघेही घट्ट मित्र. मुख्यमंत्र्यांनी तिघांनाही स्वतंत्र वागणूक दिली. शेलार मुंबईचे अध्यक्ष असताना अनेक वेळा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे मुंबईत आले. शेलार त्यांच्या गुडबूकमध्ये आहेत. त्यामुळेच शेवटच्या टप्प्यात का होईना आशिष यांना मंत्रिपदाचा टिळा लावला गेला. तेही विनोद तावडे यांच्याकडे असणारी शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी शेलार यांच्याकडे देण्यात आली. शेलारांचा जीव अडकलेलं गृहनिर्माण मंत्रालय राधाकृष्ण विखे-पाटील यांना दिलं. विखे-पाटलांना पहिल्यांदा पदाची सूत्रंं स्वीकारण्यासाठी पाठवताना मुंबई म्हाडाच्या मधू चव्हाणांना शिष्टाई देण्याऐवजी प्रसाद लाडांना धाडण्यात आलं. बीडीडीसाठी हायपॉवर कमिटी बनवताना म्हाडा उपाध्यक्षांना वगळण्यात आलं. या सगळ्या प्रकारात मुख्यमंत्र्यांनी आपल्या अंगचं राजकीय कसब दाखवून दिलं आणि कुणाला काय ‘सांगायचंय’ ते सांगून टाकलं. आपल्या सहा वर्षांच्या अध्यक्षपदाच्या काळात आशिष शेलार यांनी आपल्या चारही महासचिवांना राष्ट्रीय अध्यक्षांची साधी ओळखही करून दिली नाही. खरंतर प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याला आपल्या सर्वोच्च प्रमुखांकडून प्रशस्ती हवी असते, पण ती मिळवून देण्यासाठी क्षेत्रीय नेत्यांकडे दिलदारपणा असावा लागतो तो परवाच्या मोदींच्या मुंबई भेटीत फडणवीसांनी दाखविला. कारण अळवणींनीही ऐतिहासिक आणि सामाजिक भान जपणार्‍या गणेशोत्सवासाठी कुठल्या बिल्डर-डेव्हलपरच्या किंवा नेत्याच्या गणपतीचं स्थळ मुख्यमंत्र्यांना सुचवलं नव्हतं. उलट त्यांनी नेत्यांच्या गणपतींना बगल देऊन खर्‍याखुर्‍या ऐतिहासिक गणपतीचं दर्शन घडवलं. या गणेश उत्सवाला महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस, सावरकर, बालगंधर्व, वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे यांनी भेट दिलीय.यावरून आपण समजू शकतो अळवणींच्या प्रस्तावात प्रामाणिकपणा होता.
मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेला राजकीय कोंडमारा आणि तावडेंनी शिक्षण मंत्रालयात करून ठेवलेला निर्णयांचा गोंधळ यामुळे शेलार यांच्यावर असलेला ताणतणाव सपशेल जाणवतोय. मुख्यमंत्र्यांनी गेल्या पाच वर्षांत असं अनेकांना तणावपूर्ण ठेवलं. त्यात त्यांचे काही सहकारी, आपण सीएमचे खास मर्जीतील म्हणवणारे प्रशासकीय अधिकारी, ज्येष्ठ पोलीस अधिकारी, पत्रकार आदींचा समावेश आहे. काही पत्रकारांना त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक वजनदार खुर्च्यांवर प्रचलितेपेक्षा अधिक मोबदला देऊन बसवलं, पण त्यांचं पितळ उघडं पडताच त्यांना जावं लागलं.अर्थात हे करताना त्यांना अपेक्षित असलेल्या कुठल्यातरी धाग्याची निवड केली. मग कधी तो संघाच्या विचारधारेचा होता, तर कधी आणखी कुठला…पण धागा महत्त्वाचा होता. गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या प्रत्येक निवडीत काही ना काही साध्य करत सत्तेशी संधान साधलंय. मग ते उध्दव ठाकरे असोत की प्रसाद लाड. किंवा एखादा ज्येष्ठ सनदी अधिकारी… प्रत्येकजण मुख्यमंत्री फडणवीसांच्या हिताआड येणार नाही उलट सत्तेची उब अधिक काळ देईल याची काळजी घेतली आहे. आगामी निवडणुकीसाठी महाराष्ट्रासाठी भूपेंद्र सिंह यादव यांना निरीक्षक म्हणून धाडण्यात आलंय. ते अमित शहांच्या खास मर्जीतील आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे ही शहांचे खास आहेत. त्यामुळे येणार्‍या काळात मुकाबला दोन विरुद्ध एक असा असेल. म्हणूनच येणार्‍या दिवसांत राज्याचा राजकीय खेळ दिल,दोस्ती आणि राजकारणाभोवती फिरतानाच दिसेल.
अळवणींनीही ऐतिहासिक आणि सामाजिक भान जपणार्‍या गणेशोत्सवासाठी कुठल्या बिल्डर-डेव्हलपरच्या किंवा नेत्याच्या गणपतीचं स्थळ मुख्यमंत्र्यांना सुचवलं नव्हतं. उलट त्यांनी नेत्यांच्या गणपतींना बगल देऊन खर्‍याखुर्‍या ऐतिहासिक गणपतीचं दर्शन घडवलं. या गणेश उत्सवाला महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस, सावरकर, बालगंधर्व, वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे यांनी भेट दिलीय.यावरुन आपण समजू शकतो अळवणींच्या प्रस्तावात प्रामाणिकपणा होता.