नको नको रे पावसा…

मॉन्सून सप्टेंबरमध्ये परतीच्या प्रवासाला निघतो, यंदा मात्र पावसाने आपला निरोप घेण्याचा वेळ लांबवला आहे. ऑक्टोबरचा मध्य उजाडला तरी पावसाने निरोप घेतलेला नाही. मान्सूनसा परतीचा प्रवास मागील काही वर्षात लांबवला आहे. गौरी गणपतीनंतर पावसाच्या परतीचे वेध लागतात. नवरात्र उत्सवात पावसाचा शिडकावा होतो. तर दिवाळीपर्यंत पावसाने रजा घेतलेली असते. मुंबई आणि कोकणातील पावसाचा हा शिरस्ता बसलेला आहे. मागील चार ते पाच वर्षापासून मान्सून राज्यात उशिराने दाखल होतो आणि अधिक काळ मुक्काम ठेवतो. साधारण चार महिने थांबल्यावर मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो. पण अलीकडे तसे होत नसून नुकसानच होत आहे, त्यामुळे नको नको रे पावसा, असे म्हणण्याची वेळी आली आहे.

केरळात दाखल झाल्यावर आठवडाभरात मान्सून महाराष्ट्रात येणार असतो. मागील कित्येक वर्षापासून मान्सूच्या ऋतुचक्रात बदल झालेला आहे. पाऊस जवळपास महिनाभर उशिराने राज्यात दाखल होत आहे. ऋतुचक्र एक महिना पुढे सरकल्याचा हा परिणाम आहे. तसेच हा जागतिक तापमानवाढीचाही परिणाम मानला जात आहे. संशोधक या बदलाचा अभ्यास करत आहेत. ऋतुचक्राचा कालावधी एक महिन्याने पुढे सरकल्याने पाऊस पर्यायाने शेतीची कामेही पुढे ढकलली गेली आहेत. परंतु वळवाचा पावसाचे गणित जवळपास जैसे थे असल्याने मराठवाडा तसेच ग्रामीण भागातील शेतक-यांमध्ये पावसाच्या गणिताबाबत गोंधळ होत असतो. अल्पभूधारक शेतकरी आजही जुन्या परंपरागत वातावरण, हवामानबदलाचा अंदाज घेऊनच शेतीच्या कामाची सुरुवात करतात. मिरग बरसल्यावर पहिली रानओल झाल्यास पेरणी करण्याचे ठरवले जाते. परंतु रान भिजल्यावरही त्यानंतर पावसाने जवळपास एक ते दीड महिना ओढ दिल्याचा अनुभव अलिकडच्या काळातला आहे. सात जूनला न चुकता दाखल होणारा पाऊस यंदा 28 जूनपर्यंतही पुरेसा बरसला नव्हता. पुढे जुलैमध्ये त्याने उशिरा आलेल्या कामाची बरसण्याची कसर भरून काढली. परंतु अचानकपणे बरसण्याच्या पावसाच्या बिघडलेल्या सवयीमुळे शेतकरी मात्र धास्तावला आहे. उशिराने जेवण केल्यावर पोटात चार घास जास्त जातात असं जेवणाच्या बाबतीत म्हटलं जातं. मात्र जास्तच उशीर झाल्यास भूकही मरून जाते. उशिराने दाखल होणा-या आणि त्यामुळे उशिराने निरोप घेणा-या पावसाचं असंच काहीसं झालेलं आहे.

दिवाळीत सुगी असते, या सुगीला शेतक-याची कापणी, मळणीची कामं होऊन धान्यानं त्याचं घरदार भरलेलं असतं. खरेदी केंद्रांच्या आणि गोदाम तसेच धान्य स्टोरेज करण्याची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे दर वर्षी हजारो टन धान्य खराब होत असल्याच्या बातम्या जुन्या झालेल्या असतात. हमीभाव, वीज बिल, धान्याचा काळाबाजार करणारे, साठेबाजी अशा कित्येक अडचणींवर मात करून शेतकर्‍याला धान्याचा दाणा दाणा बाजारापर्यंत नेण्यासाठी कसरत करावी लागते. पावसाने उशिराने येण्याजाण्याचा शिरस्ता यंदाही कायम ठेवल्यामुळे दुबार पेरणीचे संकट दरवर्षीसारखेच कायम आहे. वळीव बसरल्यावर त्यानंतर आलेल्या पावसाने पुन्हा ओढ देण्याचा शिरस्ता यंदाही कायम ठेवला होता. अगदी ठाणे, रायगड जिल्ह्यातील मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव ऑगस्टपर्यंतही पुरेसे भरलेले नव्हते. दोन वर्षापूर्वी पावसाने ओढ दिल्याने महाराष्ट्रात दुष्काळसदृष्य स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी ओला परवडला पण कोरडा दुष्काळ नको, ओलाव्याला गवत तरी मिळतंय, कोरड्या दुष्काळाचं काय करावं, अशी वेदना मराठवाड्यातील शेतकरी बोलून दाखवत होता. जनावरांसाठी चारा छावण्या आणि त्यात काटकुळीला आलेली मरणासन्न जनावरं असं विदारक चित्र होतं. यंदा कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी धास्तावला होताच. उशिरानं आलेल्या पावसाने उभं पिक आडवं केलं. बालाघाटावरील उस्मानाबाद जिल्हा हा कायम अवर्षणप्रवण जिल्हा, कालच्याच जोरदार पावसामुळे भोगावती नदी दुथडी भरून वाहू लागल्याने शेतकरी आनंदला नाही. हा पाऊस शेतकर्‍याच्या बुडवणारा ठरला असून हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला आहे.

गरजणारे बरसत नाहीत, हा समज पावसाने साफ खोटा ठरवला आहे. परतीच्या पावसामुळे किडीचा प्रादुर्भाव नवा नाही. कोवळ्या पिकाला ढगाळ वातावरणामुळे कीड पकडते. यंदा किडीच्या संकटातून शेतकरी बाहेर पडला नव्हता तेवढ्यातच परतीच्या पावसाचा फटका शेतकर्‍यांना बसला. शेती पाण्याखाली जाण्याचा प्रकार कोकणात पाहायला मिळतो. यंदा हे चित्र मराठवाड्यातील उस्मानाबादेत पहायला मिळत आहे. पावसामुळे कापणी केलेल्या धानाचे भारे भिजण्याचा प्रकार ठाणे, रायगड आणि कोकणातील भागात दरवर्षी घडतो. त्यामुळेच शेतकरी तातडीने कापणी करून धान खरेदी केंद्रावर नेण्याच्या चिंतेत असतो. एकदा का धान खरेदी केंद्रावर दिले की शेतकरी एका मोठ्या दिव्यातून सुटल्याचा सुस्कारा सोडतो, परतीच्या पावसाचा फटका भाताला दरवर्षी थोड्या अधिक प्रमाणात बसतोच बसतो. परंतु यंदा हे लोण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यापर्यंत पोहचलं आहे. लातूर, सोलापूर, उस्मानाबादेत डाळींबाचं नुकसान अवकाळी पावसाने केलं होतं. त्यानंतर उरलं सुरलं सोयाबीनही पावसाने बुडवून टाकलं. मराठवाड्यात तूर, भुईमूग, गळीताच्या धान्याचं प्रमाण कमालीचं रोडावलं आहे. जास्तीत जास्त क्षेत्र सोयाबिनने व्यापलेलं आहे. या शिवाय अल्पभूधारक शेतकर्‍याला सोयाबिन हे हुकूमी फायदा करून देणारं पीक असल्याने त्याकडे शेतकर्‍यांचा ओढा आहे. यंदा परतीच्या पावसाने सोयाबिनचही नुकसान केलं असून शेतकर्‍यासाठी यंदाच्या दिवाळी अंधारात लोटणारी आहे. बीड आणि विदर्भात कापसाचंही मोठं नुकसान झालं आहे. महाराष्ट्रात, पुणे, सातारा, सांगली, लातूर, उस्मानाबाद, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिकमध्येही जोरदार सरी कोसळत आहेत. या परतीच्या पावसामुळे शेतकरी पुरता संपलेला आहे. बंगलच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हे ओलं आरिष्ट्य कोसळतंय. हवामान विभागातील नोंदीनुसार मागील काही वर्षापासून ऑक्टोबर महिन्यात जोरदार सरी कोसळल्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे ऋतुचक्र एक महिन्याने किंवा त्याहून अधिक काळ पुढे सरकल्याची शक्यता गडद झाली आहे. कमी दाबाचे क्षेत्र ओसरल्यावर पाऊस राज्यातून काढता पाय घेईल, असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. परंतु तोपर्यंत हा पाऊस कित्येक शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी ठेवून जाणार आहे.

कांदा निर्यामुळे नाडलेल्या शेतकर्‍यानंतर अवेळी पावसामुळे नाशिकमध्ये द्राक्षाचे नुकसान केले. त्याच्या विम्याचा प्रश्न कायम आहे. तर सोलापुरात पावसाचा पाचवा दिवस कायम आहे. पंढरपूर, माळशीरस, सांगोला, बार्शी, मंगळवेढ्यात मुसळधारेने उभी पिकं पाण्यात गेली आहेत. सोयाबिन, मूग, उडीद, ऊस, कांदा, डाळींब, द्राक्षाला मोठा फटका बसला आहे. शेतातच शेततळी झाल्याने कांदा बुडाला आहे. नगरमध्येही पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. कोल्हापूर, सोलापूरमध्ये उसाचे क्षेत्र वाढल्यानंतर पावसाने या भागात पिकांना फटका दिला आहे. कोरोनामुळे उसतोडणी कामगार कामाच्या शोधात मुंबई पुण्याकडे गेल्यानंतर पावसाळ्यात खरीपानंतर कामाच्या आशेने गावी परतले होते. पावसामुळे तोडणीची कामेही लांबवल्यामुळे आणि शेतात पाणी भरल्याने यंदा कोल्हापूर, सोलापूरची साखर आणि गूळही कडू होणार आहे. लातूर, उस्मानाबादमध्ये 35 मंडळात अतीवृष्टी झाली आहे. तर दहा मंडळात 100 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याला परतीच्या पावसाने रडवले आहे. पावसाचे हे संकट आणखी आठवडाभर महाराष्ट्रावर कायम आहे. परतीच्या पावसाने निरोप घेताना महाराष्ट्राचे डोळे ओले केले आहेत. हे ओले डोळे पुसून पुन्हा नव्या दमाने महाराष्ट्राला उभं राहावं लागणार आहे.