घरफिचर्सनरेंद्र मोदींच्या उत्तराधिकार्‍याचा उदय

नरेंद्र मोदींच्या उत्तराधिकार्‍याचा उदय

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच सभा गाजवत होते. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत प्रथमच अमित शहा यांना पुढील योजना, संकल्पांचा विचार करून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान झालेल्या सभा अमित शहा यांनी संबोधित केल्या होत्या. त्यांनी स्वत:च्या बळावर तेथे लाखोंच्या सभा घेऊन दाखवल्या. देशाच्या एका कोपर्‍यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचार करत असताना अमित शहा हे दुसर्‍या कोपर्‍यात सभा गाजवत होते. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ३०३ जागा मिळाल्या. ते श्रेय अर्थातच पडद्यापुढील नरेंद्र मोदी आणि पडद्यामागील अमित शहा यांचे होते.

काश्मीरमधील कलम ३७० आणि ३५ -ए रद्द करण्यात आले. सोमवारी राज्यसभेत त्याबाबतचे विधेयक मांडण्यात आले. राज्यसभेत हे विधेयक मांडण्याची आणि त्याचे समर्थन करताना विरोधी पक्ष सदस्यांच्या आरोप-प्रत्यारोपाला उत्तर देण्याची सर्व जबाबदारी गृहमंत्री या नात्याने अमित शहा यांना देण्यात आली होती. अमित शहा यांनीही अतिशय प्रभावीपणे विधेयकाबाबत सरकारची बाजू मांडली. विरोधी पक्षांचे प्रश्न, आरोपांना उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत उपस्थित होते. मात्र, त्यांनी चक्कार शब्द उच्चारला नाही. ते अमित शहा यांचे भाषण लक्ष देऊन ऐकत होते. विधेयकावर मतदान होऊन ते पारित झाल्यानंतर मोदींनी भरसभागृहात अमित शहा यांची पाठ थोपटली. काश्मीरमधील कलम ३७० आणि ३५-ए रद्द करण्याचे सर्व श्रेय अमित शहांनाच मिळेल, आपल्याकडे येणार नाही, याची काळजी मोदींनी घेतली. त्यातून मोदींना अमित शहा यांना जनतेपुढे आणायचे होते. त्यांंना नेता म्हणून प्रोजेक्ट करायचे नव्हते का? २०१४ सालच्या निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी हे भाजपचा पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे येत होते. त्यावेळी मोदींनीच अमित शहा यांना भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बसवले. मोदी चेहरा असले तरी पडद्यामागे अमित शहा काम करत होते. त्यामुळे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले. त्यानंतरही अनेक राज्याच्या विधान सभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाचे श्रेय अमित शहा यांच्याकडेच जाते. मात्र, या निवडणूक प्रचारादरम्यान अमित शहा फारशा प्रचारसभा घेत नव्हते. पक्ष संघटनेच्या स्तरावर काम करून शहा भाजपच्या विजयासाठी पोषक वातावरण तयार करत होते, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच सभा गाजवत होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रथमच अमित शहा यांना पुढील योजना, संकल्पांचा विचार करून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान झालेल्या सभा अमित शहा यांनी संबोधित केल्या होत्या. त्यांनी स्वत:च्या बळावर तेथे लाखोंच्या सभा घेऊन दाखवल्या.

देशाच्या एका कोपर्‍यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचार करत असताना अमित शहा हे दुसर्‍या कोपर्‍यात सभा गाजवत होते. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ३०३ जागा मिळाल्या. ते श्रेय अर्थातच पडद्यापुढील नरेंद्र मोदी आणि पडद्यामागील अमित शहा यांचे होते. शहा यांची पक्ष संघटनेवर असलेली मांड आणि त्यांच्याकडे असलेली निवडणूक लढवण्याची मास्टरी यामुळे भाजपला हे यश मिळाले होते. त्यामुळे २०१९ नंतरही अमित शहा यांच्याकडे कोणतेही मंत्रीपद न देता त्यांचा संघटनात्मक कामांसाठीच वापर करून घेण्यात येईल, असे मानले जात होते. मात्र, मोदींनी त्यांच्याकडील भाजपाध्यक्ष पद कायम ठेवताना त्यांना देशाचे गृहमंत्रीपद दिले. त्यावेळी अनेक विश्लेषक, राजकीय तज्ज्ञांना आश्चर्य वाटले होते. पक्ष संघटनेचा विस्तार आणि निवडणूक जिंकण्याचे कौशल्य असलेल्या अमित शहा यांना मंत्रीपदाच्या साखळदंडात का अडकवण्यात आले, असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र, मोदींच्या मनात काही तरी वेगळेच शिजत होते. पक्ष संघटनेची जबाबदारी शहा यांच्यावरच ठेवताना त्यांचाही पाठिराखा देशात तयार व्हावा, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची योजना होती. अमित शहा हे नरेंद्र मोदींचे अतिशय जवळचे सहकारी मानले जातात. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना अमित शहा यांना गुजरातचे गृहमंत्रीपद देण्यात आले होते. मोदी देशाच्या राजकारणात आले तेव्हा त्यांनी आपल्या सोबत अमित शहा यांनाही राष्ट्रीय राजकारणात आणले. आज तेच मोदी आपल्या पदाची चिंता न करता अमित शहा यांना प्रोजेक्ट करत आहेत. २०२५ हे वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष आहे. तोपर्यंत मोदी निश्चितच पंतप्रधान पदावर राहतील. मात्र, २०२६ मध्ये ते आपल्या वयाची ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे राजकारणापासून संन्यास घेतील आणि आपले उत्तराधिकारी म्हणून अमित शहा यांच्याकडे पदभार सोपवतील, अशी शक्यता आहे. त्याची तयारी आतापासूनच सुरू आहे.

- Advertisement -

शत-प्रतिशत भाजपची भूमिका घेऊन नेतृत्व करणार्‍या अमित शहांना भाजपचा विस्तार करायचा आहे. म्हणूनच त्यांच्या राजकारणात भाजपलाच प्राधान्य आहे. वाजपेयी पंतप्रधान असताना भाजपचे संपूर्ण बहूमत नव्हते आणि अन्य पक्षांची मर्जी राखून त्यांना काम चालवावे लागत होते. खेरीज लालकृष्ण अडवाणी सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे पक्ष संघटना पूर्णत: पोरकी झालेली होती. कोणालाही नाममात्र अध्यक्षपदी बसवून सत्तेतले नेतेच पक्ष चालवित होते, पण मोदी पंतप्रधान झाल्यावर आणि अमित शहा पक्षाध्यक्ष झाल्यापासून ते चित्र पूर्णपणे बदललेले आहे. शहा पूर्णवेळ पक्ष संघटनेला वाहून घेतल्यासारखे काम करत राहिले आणि जिथे गरज असेल, तितक्यापुरती मोदींची मदत घेत होते. मित्रपक्ष वा आघाड्या जमवताना शहांनी विषय सहसा पंतप्रधानांपर्यंत जाऊ दिलेला नाही. वेळोवेळी पक्षाचे राज्यातील वा केंद्रातील मंत्री नेते, यांची झाडाझडती घेण्याची कामगिरी शहांनी स्वत: पार पाडली. त्यातून सत्तेवर पक्षाचे प्रभूत्व त्यांनी सिद्ध केलेले आहे. मोदींच्या लोकप्रियतेवर स्वार होऊन पक्षाची संघटनात्मक शक्ती विस्तारीत करण्यासाठी शहा अखंड राबत राहिले. त्यात सहाय्यभूत होऊ शकतील असे सहकारी त्यांनी निवडलेले आहेत.

त्या प्रत्येकाला तितके अधिकार दिलेले आहेत. म्हणूनच राज्य असो वा केंद्रातील सत्ता असो, त्यातले फ़ेरबदल करताना पक्षाच्या भूमिकेला महत्त्व आलेले आहे. अन्यथा वाजपेयींच्या कारकिर्दीत पक्षाला फारशी किंमत नव्हती. बंगारू लक्ष्मण वा जना कृष्णमूर्ती असे अध्यक्ष कुठलाही ठसा राजकारणात उमटवू शकले नव्हते. व्यंकय्या नायडूही पक्षाध्यक्ष होते, पण त्यांनी संघटनेवर मांड ठोकून कधी काहीही सिद्ध केलेले दिसले नाही. अमित शहांनी पक्षाध्यक्ष झाल्यापासून सत्ता पक्षाची आहे, म्हणूनच सत्तेवरही पक्षाचा वरचष्मा प्रस्थापित करून दाखवला आहे. मोदींनी आपला विश्वासू सहकारी म्हणून तीन वर्षांपूर्वी शहांना कायमचे दिल्लीत आणले. त्यांच्यावर पक्षाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. त्यानंतर त्यांनी भाजपला मिळवून दिलेले यश लक्षणीय आहे. महाराष्ट्र व हरयाणात लोकसभेतली युती मोडून सत्ता संपादन करणे असो, अथवा उत्तर प्रदेश या देशातील सर्वात मोठ्या राज्यात तीन वर्षांनी पुन्हा दैदिप्यमान यश मिळवून दाखवणे असो, त्याचे श्रेय मोदींच्या लोकप्रियतेला दिले जाते, पण व्यवहारात त्या लोकप्रियतेचे फ़लस्वरूप उभे करण्याचे श्रेय कोणी कधी शहांना दिलेले नाही. मात्र, मोदींना आपले यश कोणामुळे आहे हे पक्के ठाऊक आहे.

- Advertisement -

सत्ता व राजकारण सांभाळणार्‍या मोदींना अतिशय मोलाची अशी संघटनात्मक मदत देणारा अत्यंत विश्वासू सहकारी, अशी शहा यांची भूमिका आहे. ती पार पाडताना शहांनी इतका पल्ला गाठला आहे की पक्ष पातळीवर जे काही व्हायला हवे त्याकडे मोदींना ढुंकूनही बघावे लागलेले नाही. त्यातून भाजप आज निवडणुका जिंकणारी एक यंत्रणा बनून गेला आहे. सहा महिने वर्षभर आधी कामाला लागायचे आणि प्रत्यक्ष मतदानाचा दिवस उजाडेपर्यंत युद्धसज्ज फौज मैदानात आणायची; अशी स्थिती अमित शहांनी निर्माण करून ठेवलेली आहे. त्यांच्यासमोर लढायला उभे रहायचे तरी अफ़ाट संघटनात्मक शक्ती आवश्यक आहे. मिरवणारे चेहरे आणि झुंजणारे नेते अशी विभागणी करून, शहांनी ही यंत्रणा उभी केलेली आहे. म्हणूनच निवडणुका जिंकण्याची चिंताच मोदींना करावी लागलेली नाही. मात्र, कोणतीही गोष्ट शाश्वत नसते याची पंतप्रधान मोदींनाही कल्पना आहे. उत्तराधिकारी नेमण्याची प्रक्रियाही त्यांनी भाजपमध्ये सुरू केली आहे. त्यात अमित शहा खरे उतरले आहेत.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -