घरफिचर्सकोरोनासोबतच आता नाटक

कोरोनासोबतच आता नाटक

Subscribe

मुंबईच्या, महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने देशभरातल्या रंगभूमीवर कुठे नवं नाटक होऊ पाहतेय का याची चाचपणी करणे, नाटकाशी संबंधित उपक्रमांची दखल घेत ती या स्तंभाच्या वाचकांपर्यंत पोहचती करणे हा या लेखमालेचा हेतू आहे. त्या अनुषंगाने या वर्षाच्या सुरूवातीच्या अडीच महिन्यांत बाळसं धरत असतानाच अचानक एकेदिवशी कोरोनाचे संकट उद्भवलं आणि सगळंच थांबलं. त्यानंतर काय उलथापालथ झालीय हे तुम्हा सगळ्यांना नव्याने सांगण्याची गरज नाहीय. पण आता त्यातून आपणच आपल्याला सावरायची वेळ येऊन ठेपलीय. कोरोनासोबतच आता यापुढील वाटचाल करावी लागणार आहे. मग ते जगणे असो वा नाटक...

जवळ-जवळ साडेतीन महिन्यांच्या दीर्घ अवकाशानंतर या स्तंभलेखनाच्या माध्यमातून आज पुन्हा एकदा आपणा सर्वांची भेट होत आहे, याचा मला खूप आनंद होतोय. गेले साडेतीन महिने आपण सगळेच एका मोठ्या संकटाशी मुकाबला करत आहोत. संकटसुद्धा असे तसे नाही तर जीवघेणे. अशा परिस्थितीत आपसुकच आपल्या प्रत्येकाचे जगणे कोरोना या विषाणूच्या अवतीभवतीच घडते आहे. उठता बसता खाता पिता झोपता जागता कोरोना एके कोरोनाचाच बोलबाला आहे. कोरोना सध्यातरी आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा केंद्रबिंदू झाला आहे. जीवनाचे असे एकही क्षेत्र नाही ज्याची कोरोनाच्या प्रभावातून सुटका झालीय. अगदी माणसांचं दैनंदिन रहाटगाडगं असो वा समाजकारण, राजकारण, अर्थव्यवस्था, मनोरंजन, कलाक्रीडेचे क्षेत्र असो…कोरोना जळी स्थळी काष्ठी पाषाणी व्यापून राहिला आहे. सगळ्यांनाच आणि सगळंच कवेत घेऊन बसला आहे. मग आपले नाटक याला कसे अपवाद असेल ? त्यातही जेव्हा जगण्यामरण्याचा प्रश्न उद्भवतो, तेव्हा आवश्यकतेच्या अनुषंगाने सर्वात शेवटचे प्राधान्य कशाला असेल तर ते कलेच्या क्षेत्राला. खरं तर या स्तंभलेखनाची टॅगलाईन आहे ‘नाटकाच्या अंगाअंगाने’. त्यानुसार, नाटक आणि त्याच्याशी संबंधित अंगांचा परिचय वाचकांना या लेखमालिकेतून घडविण्याचा मानस आहे.

मुंबईच्या, महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने देशभरातल्या रंगभूमीवर कुठे नवं नाटक होऊ पाहतेय का याची चाचपणी करणे, नाटकाशी संबंधित उपक्रमांची दखल घेत ती या स्तंभाच्या वाचकांपर्यंत पोहचती करणे हा या लेखमालेचा हेतू आहे. त्या अनुषंगाने या वर्षाच्या सुरूवातीच्या अडीच महिन्यांत बाळसं धरत असतानाच अचानक एकेदिवशी कोरोनाचे संकट उद्भवलं आणि सगळंच थांबलं. त्यानंतर काय उलथापालथ झालीय हे तुम्हा सगळ्यांना नव्याने सांगण्याची गरज नाहीय. पण आता त्यातून आपणच आपल्याला सावरायची वेळ येऊन ठेपलीय. कोरोनासोबतच आता यापुढील वाटचाल करावी लागणार आहे. मग ते जगणे असो वा नाटक…

- Advertisement -

मधल्या साडेतीन महिन्यांत प्रत्यक्ष रंगभूमीवर काहीच घडले नसले तरी तिच्यापलीकडे तिला सदैव जिवंत ठेवण्यात मोलाचे योगदान देणार्‍या रंगकर्मींच्या जगण्यावर कोरोनाच्या प्रादुर्भावाचे खूप गंभीर परिणाम झाले. मुख्य म्हणजे नाटकांचे प्रयोगच थांबल्याने त्यांचे अर्थचक्रच मंदावले आणि मग एका क्षणी ते पूर्णपणे थांबले. प्रायोगिकतेच्या पलीकडे नाटक हासुद्धा एक व्यवसाय आहे. जिथे व्यवसाय असतो तिथे नफा-तोटा-नुकसानीच्याही शक्यता असतात. अशाच नुकसानीचा एक भाग म्हणजे रंगमंच कामगारांच्या (बॅकस्टेज आर्टिस्ट) उत्पन्नावर संकट येणे. कोरोनामुळे सर्वात जास्त फटका कुणाला बसला असेल तर तो या हातावर पोट असलेल्या आमच्या रंगमंच कामगारांना. त्यांना या संकटकाळी मदत मिळणे सर्वात निकडीचे होते. त्याकामी पुढाकार घेत माझ्या परिचयातल्या आशीर्वाद मराठे आणि त्यांच्या सहकारी कलावंतांनी स्थापन केलेल्या ‘मराठी नाटक समूह’, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि नाट्यनिर्माते मंदार शिंदे या सगळ्यांनी मिळून आपापल्या परीने जी होता होईल ती मदत बांधिलकीच्या भावनेतून उभी केली, ती बहुमोल अशीच म्हणता येईल. या स्तंभाच्या माध्यमातून मला या सगळ्यांप्रती जाहीर कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते.

त्याशिवाय, या साडेतीन महिन्यांत काही ज्येष्ठ रंगकर्मींना आपण कायमचे गमावले. या आपल्या दृष्टीने खूप दु:खद अशा घटना आहेत. ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी, कायमच पडद्यामागे राहून काम करणारे रंगधर्मी सुहास वीरकर आणि ज्येष्ठ अभिनेते लीलाधर कांबळी ही त्यांपैकी काही ठळक व्यक्तिमत्वे. त्यातही मतकरी सरांचे जाणे मला व्यक्तीश: खूप वेदनादायक वाटते. बालरंगभूमी, प्रौढांची रंगभूमी, वंचितांची रंगभूमी, नाट्यलेखन, गुढकथा, कादंबरी, ललित तसेच रंगभूमीविषयक लिखाण अशा विविध प्रांतात मतकरी सरांचा हात शेवटपर्यंत अथकपणे लिहिता राहिला होता. त्यांच्या ‘गांधी :अंतिम पर्व’ या नाटकाचे अभिवाचन मी फेब्रुवारीच्या अखेरीस ऐकले होते आणि एका समर्थ नाटकाची नांदी मला त्या अभिवाचनात दिसत होती. त्यांच्या इच्छेप्रमाणे आता या नाटकाचे प्रयोग कुणीतरी करण्याचे मनावर घेतले तर एका उत्तम नाट्यकृतीचा लाभ मराठी रंगभूमीला होईल, यात काही शंका नाही. अर्थात, येत्या काळात कोरोना गेला तरच हे शक्य आहे.

- Advertisement -

19 मार्चपासून आजवर आपण लॉकडाऊनमध्ये आहोत. अजून किती काळ तसं राहावं लागणार आहे, याबद्दलही शंका आहेच. तर या काळात सगळ्यांच्याच अंतरंगात एकप्रकारची अस्वस्थता घर करून आहे. सगळ्यांनाच या अस्वस्थतेचा निचरा करता येतो असं नाही. काही शांतपणे बसून आहेत. काहींची झटापट होतेय, पण काही करता येत नसल्यामुळे चरफडत बसून आहेत. काहींना ती सहन होत नसल्याने लॉकडाऊनमधली सगळी बंधने नाइलाजाने मोडत बाहेर फिरत आहेत. ज्यांना तिचा निचरा करता येतो त्या कलावंतांनी विधायक मार्गांचा अवलंब केला आहे. कुणी कविता लिहितोय. कुणी कथा लिहितोय. कोण पूर्वसुरींच्या साहित्याच्या अभिवाचनाचे ऑनलाईन प्रयोग करतो आहे. प्रत्येकाने आपापला मार्ग शोधत या अस्वस्थतेची निरगत लावायचा प्रयत्न केला आहे. हे सगळं मला खूप स्तुत्य वाटतं. पण हा काही प्रत्यक्ष रंगभूमीवर खेळल्या जाणार्‍या प्रयोगांना पर्याय होऊ शकत नाही, हेही मला नम्रपणे नमूद करावेसे वाटते.

त्याचवेळेस मनात एक विचार असाही येतो की, कोरोना प्रादुर्भावाच्या या कष्टप्रद काळाने लिहित्या लेखकांना, विशेषत: नाटककारांना आणि रंगकर्मींना एक अवसर दिला आहे. अंतरंगात जे दिवसेंदिवस साचत आहे त्याचा दैनंदिन पातळीवर निचरा न करता ते जपत एकत्र करावे आणि त्यातून सद्य:स्थितीतल्या अस्वस्थतेला एक जोरकस प्रतिक्रिया देईल असे नाटक नजिकच्या भविष्यकाळात रंगभूमीवर सादर व्हावे, असे मला मनापासून वाटते. शेवटी नाटक म्हणजे सगळ्यांनी मिळून जगलेल्या व्यापक सार्वजनिक अस्वस्थतेच्या कालखंडाचे एक प्रातिनिधिक, सर्जनशील आणि सृजनात्मक अर्करूपसुद्धा असतेच. म्हणूनच मला माझ्या नाटककार असलेल्या लेखक आणि रंगकर्मी मित्रांकडून खूप अपेक्षा आहेत. या सगळ्यांनी मिळून एखादं नाटक असं करायला हवंय जे या अस्वस्थतेचा दस्तावेज असेल. जेव्हा आपण या लॉकडाऊनमधून बाहेर येऊ (येऊ अशी आशा व्यक्त करणं इतकंच सध्या हातात असताना) तेव्हा जगून झालेल्या अस्वस्थतेचा निचरा एखाद्या नाटकातून नाही झाला तर, या अस्वस्थ काळात दडलेली सृजनशीलता समाजमाध्यमांनी नासवली असं वाटण्याइतपत निराशा वाट्याला येऊ नये, या एकमेव आशेसोबत मी या लेखापुरती आपली रजा घेतो. पुनःश्च हरिओम करत भेटत राहूच…

-समीर दळवी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -