घरफिचर्सहम्पी... एक भव्यदिव्य, पाषाणकाव्य!

हम्पी… एक भव्यदिव्य, पाषाणकाव्य!

Subscribe

हम्पीचं नातं थेट रामायणाच्या काळापर्यंत जातं. वानरांची किष्किंधा नगरी म्हणजेच आजचं हम्पी. रामभक्त शबरी प्रभू रामचंद्रांना इथल्याच पंपा सरोवराशी भेटली होती. ते सरोवर आजही येथे आहे. त्यावेळी ‘पंपाक्षेत्र’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या तीर्थाच्या नावाचा अपभ्रंश होऊन आता ‘हम्पी’ हे नाव रूढ झालंय.

-आदित्य नीला दिलीप निमकर

सिनेमात भाव खाऊन गेलेल्या अल्लाउद्दिन खिल्जीने भारतावरील आक्रमणादरम्यान दक्षिणेचा घास गिळंकृत केला होता, तेव्हाची ही गोष्ट. आधी काकतीयांच्या कोषागारात आणि नंतर कंपली राज्यात सेवा करणारे हरिहर आणि बुक्क या संगमपुत्रांना युद्धात कैद केलं गेलं. धर्मांतर करवून कालांतराने दक्षिणेतच त्यांची अधिकारी पदावर नेमणूक करण्यात आली. दक्षिणेतल्या अनेगुंदीचा राज्यकारभार करत असताना या बंधूंची भेट झाली ती श्रृंगेरी पीठाच्या माधव विद्यारण्यस्वामींशी. ‘घरवापसी’ करून दोघांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला आणि ते योग्य वेळेची वाट पाहू लागले. तुघलकाच्या काळात सत्ताकेंद्र दुबळे झाल्याचा फायदा घेऊन दोघांनी सुलतानाविरोधात बंड पुकारले आणि इ.स. १३२६ मध्ये तुंगभद्रेच्या काठावर स्वतंत्र राज्य स्थापित केले. विद्यारण्यांच्याच नावावरून या राज्याचं नाव विद्यानगरी ठेवलं. कालांतराने या राज्यावर संगम, साळुव, तुळुव, अरविदु अशा विविध घराण्यांनी शासन केलं. विद्यानगरीचं अजिंक्य साम्राज्य ‘विजयनगर’ नावाने प्रसिद्ध झालं. या विजयनगराचा पराक्रमी शासक कृष्णदेवराय आणि त्याच्या दरबारातील तेनालीरामनच्या कथा आजही प्रचलित आहेत. विजयनगरचा विस्तार बंगालच्या उपसागरापासून ते श्रीलंकेपर्यंत झाला होता. याच विजयनगरच्या राजधानीचे भव्य भग्नावशेष हम्पीमध्ये पाहायला मिळतात.

- Advertisement -

इराणच्या अब्दुर रझ्झाक या राजदुताने तर विजयनगरला भेट दिल्यावर असे वैभव जगात कधीही पाहिले वा ऐकले नसल्याचा निर्वाळा दिला होता. अजिंक्य असणा-या विजयनगरचा अखेर आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही आणि बरीदशाही यांनी एकत्रित हल्ला करून पाडाव केला. मूर्तीभंजन केलं, विद्ध्वंस केला. हम्पी एवढं वैभवशाली होतं, की येथील रत्नं आणि संपत्ती लुटायला सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ लागला.

कर्नाटकात वसलेल्या हम्पीला मुंबई, पुण्याहून बसेस जातात. १२ ते १४ तासांत हम्पीलगतच्या हॉस्पेटला आपण पोहोचतो. इथून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर हम्पी आहे. हम्पीचं नातं थेट रामायणाच्या काळापर्यंत जातं. वानरांची किष्किंधा नगरी म्हणजेच आजचं हम्पी. रामभक्त शबरी प्रभू रामचंद्रांना इतल्याच पंपा सरोवराशी भेटली होती. ते सरोवर आजही येथे आहे. त्यावेळी ‘पंपाक्षेत्र’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या तीर्थाच्या नावाचा अपभ्रंश होऊन आता ‘हम्पी’ हे नाव रूढ झालंय. पंपा सरोवरानजीकचा अंजनाद्रि हनुमानाचं जन्मस्थळ म्हणून भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे. येथून विस्तीर्ण पसरलेल्या हम्पीचं विहंगम दृश्य दिसतं.आजही हम्पी पाहिल्यावर हे नगर म्हणजे भव्य शिळांचं महाकाव्य असल्याचं जाणवतं. अजस्र पाषाण, सुमारे दोन हजार दगडी मंडप, भव्य पण भग्न मंदिरं आणि चमत्कृतीपूर्ण प्रस्तरवैभवाने आजही हम्पी जगभरातल्या पर्यटकांना आकर्षित करतंय. राजप्रासाद, विस्तृत प्रांगणं, पुष्करिणी अशा एक ना अनेक प्रेक्षणीय वास्तू इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. येथील विरूपाक्ष मंदिर आजही विधीवत सुरू असणारं मंदिर. येथील लक्ष्मी हत्तीणीचा आशीर्वाद हे एक आकर्षण आहेच. याशिवाय विरूपाक्षच्या गोपुराचं दिसणारं उलटं प्रतिबिंब हे तत्कालीन स्थापत्यशैलीचं प्रेक्षणीय रूप. विजय विठ्ठल मंदिर, त्या समोरील पाषाणरथ, चमत्कृतीपूर्ण नादमयी दगडी खांब अशी नानाविध अनेक वैशिष्ट्यं मन मोहून जातात. डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या वादग्रस्त ‘आवरण’ पुस्तकात वर्णन केलेला उग्र नृसिंह येथे खंडित तरी त्याच्या चित्ताकर्षक रूपात भेटतो. अच्युतराय बाजारपेठ गतवैभवाची साक्ष देत असते. इस्लामी राजवटींनी हे हिंदू नगर उद्ध्वस्त केल्याचं गाईड्स सांगत नसत. आता मात्र सरकारी गाईड्ससुद्धा याबाबत जाहीरपणे माहिती देतात. मात्र तत्कालीन देहविक्रय बाजाराबद्दल गाइड्स बोलायला फारसे तयार नसतात.

- Advertisement -

तुंगभद्रेच्या पात्रातून टोपलीवजा नावेतून हम्पीचा वेगळा किनारा अनुभवता येतो. ही नाव जलमंदिरं, कोटीलिंगं यांसारख्या थोड्या दूरच्या जागांचं दर्शन घडवते. हम्पी वर्ल्ड हेरिटेज साइट असल्यामुळे अजूनही उत्खननातून उभं राहात असणारं एक मध्ययुगीन नगर येथे अनुभवता येतं. हेमकुट, मल्यवंत, अंजनाद्री सारखे डोंगर सूर्योदय आणि सूर्यास्ताचं विहंगम दर्शन घडवतात. हम्पीचा असा मध्ययुगीन चेहरामोहरा नदी ओलांडताच बदलून जातो… पलिकडच्या काठावरील विरूप गड्डे गाव आता हिप्पी आयलंड बनलंय. हिप्पी आयलंड असलं, तरी ते घाबरवणारं किंवा अंगावर येणारं नाही. गोव्याच्या गजबजाटापासून शांत जीवन व्यतीत करण्यासाठी परदेशी पर्यटक येथे येऊन राहातात. या भागात कॅफेज मोठ्या प्रमाणावर आहेत. कॅफेजमध्ये बुद्धिबळ, पत्ते वगैरे गेम्स ठेवलेले असतात. कुणी झोपाळ्यावर शांतपणे पुस्तक वाचत असतं. हॉलिवूडच्या क्लासिक मुव्हीजचे शो असतात. रात्री शेकोटी पेटवलेली असते. लाइव्ह आफ्रिकन किंवा ट्रान्स-म्युझिक सुरू असतं. केसांच्या जटा, अंगभर टॅटू, तंत्रा पद्धतीचे कुर्ते अशा अवतारातले हिप्पी जगण्याची मौज लूटत असतात. स्थानिक पदार्थांपेक्षा पाश्चात्य खाद्यपदार्थांना येथे प्राधान्य आहे. तरीही हम्पीतील वास्तव्यादरम्यान येथील बनाना फ्लॉवर करीची चव आवर्जून चाखावी.

हम्पी आता पर्यटकांनी गजबजू लागलंय… हिवाळ्याचा काळ येथे फिरायला चांगला असला, तरी पर्यटकांची वर्दळ येथे बारमाही बनून गेलीय.. होमस्टेपासून ते रिसॉर्ट्सपर्यंत सगळे पर्याय उपलब्ध असतात. हम्पी फिरण्यासाठी रिक्षा, सायकलसारखे पर्याय आहेत. गाईड्स बख्खळ पैसे घेऊन थोडीशी माहिती देत असतात… या सगळ्या व्यावसायिकरणाचं आश्चर्य वाटायचं कारण नाही… हम्पीच्या निर्मितीपासूनच व्यापारी नगरीचंच रूपडं ल्यालं आहे. शत्रूंचे आणि काळाचे हल्ले सोसूनही हम्पीने आपलं चिरंतन शिल्पवैभव अबाधित राखलंय. नदीच्या पाय सोडून बसलेली ही विजयनगरची राजधानी तीरावर आपल्या पाऊलखुणा शाश्वतरूपात टिकवून आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -