घरफिचर्सपहिले पाढे पंचावन्न...

पहिले पाढे पंचावन्न…

Subscribe

बलात्काराच्या या घटना कशा टाळता येतील यादृष्टीने कुटुंब आणि समाज म्हणून आपण जे प्रयत्न करायला हवे आहेत ते म्हणावे तितके पुरेसे ठरले नाही आहेत. याचे कारण काय असावे? तर ते हे की कुटुंब काय किंवा समाज काय किंवा संस्कार काय...या सगळ्या मानवी सहजीवनाच्या प्रवासात माणसाने निर्माण केलेल्या व्यवस्था आहेत. अशा व्यवस्था ज्या माणूस नावाच्या प्राण्याला नियंत्रणात ठेवत त्याचा भौतिक आणि आध्यात्मिक विकास साधायला मदत करतील. या व्यवस्थांच्या अंगभूत उद्दिष्टांना हरताळ फासत ही व्यवस्था चालविणारी माणसेच जर आपल्या श्वापदी गुणसूत्रांवर मात करू शकत नसतील तर त्या समाजात बलात्कारासारख्या घटना सर्रास होत राहतील. त्यामुळे पहिले पाढे पंचावन्न हा प्रकार पुढे होत राहील.

गेल्या पंधरवड्यापासून हैदराबाद येथे घडलेल्या डॉ. प्रियांका रेड्डी यांच्यावरील बलात्कार आणि हत्येच्या घटनेने संबंध देशभर जो उद्रेक झाला आणि ज्या प्रतिक्रिया माध्यमांतून, विशेषत: समाजमाध्यमांतून उमटल्या, त्या पाहून खरं तर मन विषण्ण व्हायला हवे. पण आताशा ते तसं विषण्ण होण्याइतकीही संवेदनशीलता आपल्यात उरलीय की नाही असा प्रश्न पडावा. इतक्या सातत्याने एकापाठोपाठ एक बलात्कार आणि हत्येच्या घटना समोर येत आहेत आणि या घटनांनी जणू आपल्या जाणिवा उरलेल्या संबंध आयुष्याकरता बोथट करून टाकल्या आहेत. आधी खैरलांजी. मग निर्भया प्रकरण, मग हैदराबाद, मग उन्नाव. या घटनांच्या आधी, अधेमध्ये आणि नंतरही घडलेल्या; पण उजेडात न आलेल्या आणखी कितीतरी घटना….हे असे का व्हावे किंवा होते? याचा विचार मी जेव्हा करतो तेव्हा स्पष्ट जाणवते ते हे की असा प्रसंग माझ्या परिचयातल्या कुणाही व्यक्तीवर कधी ओढवलेला नसतो.

बलात्कारातल्या भीषणतेची, त्यातल्या भयाणतेची इतकीशीही झळ माझ्यापर्यंत पोहोचलेली नसते. साहजिकच, मी रोजचीच बातमी असल्यासारखं वृत्तपत्राचं पान निर्विकारपणे उलटत राहतो. समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया देत आपला आभासी राग व्यक्त करत राहतो. मेणबत्त्या पेटवून यात्रेत सहभागी होत राहतो आणि काहीच न घडल्यासारखं विस्मरणाच्या नशेत पुढे पुढे जगत राहतो. बलात्कारासारख्या घटनेचं चित्र डोळ्यांसमोर उभे राहताच सुरुवातीला वाटत होती ती घृणा, किळस, द्वेष आणि रागाच्या भावनांचं रूपांतर कधी बोथट झालेल्या जाणिवांमध्ये झालं हे आमचं आम्हाला कळलंदेखील नाही. कारण एकच….या सगळ्या घटनांचा बळी प्रत्यक्ष मी नव्हतो.

- Advertisement -

असे असले तरी मी स्वत:ला समाजातल्या विचारी समूहाचा एक भाग समजत असतो. या माझ्या स्वत:विषयीच्या समजातूनच मला माणसामाणसांमध्ये सुप्तपणे वास करीत असलेल्या आदिम ठिणगीचा धांडोळा घ्यावासा वाटतो. त्या ठिणगीचा भडका उडून तिच्या बलात्कारासारख्या हिंसक कृतीपर्यंत होणार्‍या प्रवासाचा मागोवा घ्यावासा वाटतो.

बलात्काराच्या घटनांच्या मुळाशी जाता जाता एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समजून घ्यावीशी वाटते, ती म्हणजे बलात्काराचे मूळ हे व्यक्तीच्या निकोप नसलेल्या मानसिक, सामाजिक, लैंगिक आणि अर्थातच पर्यायाने त्याच्या सांस्कृतिक जगण्यात आहे. कसे ते समजून घेण्यासाठी माणूस नावाच्या प्राण्याचा अगदी आदिम काळापासून ते आजच्या अत्याधुनिक तंत्रयुगापर्यंत झालेला प्रवास पाहायला हवा. मधल्या अनेक टप्प्यांमध्ये त्याच्या माणूस किंबहुना ‘पुरुष’ म्हणून वर्चस्व राखण्याच्या प्रवृत्तीला आपल्याकडील कौटुंबिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यावरणाने जे पाठबळ दिलेले आहे, त्याचा बलात्काराच्या कृतीशी खूप जवळचा आणि अन्योन्य संबंध आहे.

- Advertisement -

माणसाची आदिम काळापासूनची वाटचाल पाहा. दोन पायांवर चालू शकणारा होमो सेपियन हा जरी इतर प्रजातींच्या तुलनेत अधिक प्रगत असला तरी त्याची गुणसुत्रे मात्र तेव्हाही श्वापदांचीच होती आणि आज इतक्या प्रदीर्घ प्रवासानंतरही त्या गुणसूत्रांमध्ये तसूभरही फरक झालेला नाही. काही फरक असलाच तर तो इतकाच की त्या गुणसूत्रांवर तकलादू आणि फोलकट सांस्कृतिकपणाची पुटं चढलेली आहेत. आपल्यासारख्याच दुसर्‍या माणसावर वर्चस्व गाजवण्याची संधी मिळताच ती श्वापदी गुणसुत्रे केव्हाही उफाळून येत आपला मूळ खाक्या दाखवू शकतात. किंबहुना दाखवतात. मानववंशशास्त्राच्या दाखल्यानुसार सुरुवातीला जंगलात राहणारा माणूस हळूहळू टोळ्या करून इतर माणसांसोबत समूहासमूहाने राहू लागला. या अशा राहण्यामागे माणसाचे ‘सोशल अ‍ॅनिमल’ असणं हे एक महत्त्वाचं कारण होतं. इथेही त्याचं अ‍ॅनिमल म्हणजेच प्राणी असणं ही बाब आवर्जून लक्षात घ्यावीशी वाटते. प्राणी म्हटला की आपल्यापेक्षा वेगळ्या प्रजातीतल्या आणि पुढे जाऊन आपल्याच प्रजातीतल्या इतर प्राण्यांशी संघर्ष हा ओघाने आलाच. या संघर्षामागची प्रमुख प्रेरणा होती आणि आहे ती म्हणजे डार्विनचा जगप्रसिद्ध सिद्धांत – सर्व्हायवल ऑफ दी फीटेस्ट. आपल्या भवतालच्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर आणि पुढे जाऊन आपल्यासारखेच टोळीने राहणार्‍या इतर माणसांवर जास्तीत जास्त अधिकार असण्याच्या, वर्चस्व असण्याच्या लालसेतून माणूस अधिकाधिक क्रूर होत गेला.

आज आपण ज्या बलात्कार आणि त्यानंतर होणार्‍या हत्यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे साक्षी आहोत, त्याचे धागेदोरे आपल्याला माणसाच्या या क्रौर्यामध्ये सापडतात. निदान मला तरी माणसाच्या ठायी असलेला हा क्रूरपणाच या घटनांच्या मूळाशी जाणवतो. तो कसा? तर त्याची कारणमीमांसा मला अशी करावीशी वाटते. पुन्हा एकदा मानववंशशास्त्राचे दाखले आपण इथे विचारात घेऊ. या दाखल्यांनुसार मानवी सहजीवनाच्या अगदी सुरुवातीच्या काळात आपल्याकडे स्त्रीसत्ताक कुटुंबपद्धती अस्तित्वात होत्या. सगळ्याच कुटुंबाचे आणि टोळ्यांचे नेतृत्व या स्त्रिया करीत असत. पुढे माणसाने शेतीचा शोध लावला आणि ही स्त्रीसत्ताक कुटुंबपद्धती हळूहळू लयास जाऊन तिची जागा पुरूषसत्ताक कुटुंब पद्धतीने घेतली. हे असे होण्यास कारण सांगितले जाते की शेतीसारखी अवजड कामे स्त्रियांच्या नाजूक देहयष्टीला सोसणार नाहीत. सबब, त्यांनी घरीच राहून मुलाबाळांची देखभाल करावी आणि त्यांच्या पुरुषांनी शेतात जाऊन कष्टाची कामे करत अर्थार्जन करत आपल्या कुटुंबाचे भरणपोषण करावे. साहजिकच, अर्थार्जनासारखी महत्त्वाची बाब आता पुरुषाच्या अखत्यारित आल्याने कुटुंबकबिल्याची मालकीही ओघाने त्याचीच झाली. याच मालकीहक्कामुळे पुरुष आपणास सार्वभौम समजू लागला आणि हे एकाच वेळी समांतरपणे पृथ्वीच्या पाठीवर जवळजवळ सगळीकडेच सुरू राहिल्याने तिचे कालांतराने परंपरेत रूपांतर झाले.

पुरुष समस्त मानवजातीत बलाढ्य समजला जाऊ लागला. किंबहुना तो तसा समजला जावा याच दिशेने त्याची वाटचाल होऊ लागली. जसजसा पुरुष हा जगण्याच्या व्यवहारात अधिकाधिक बलशाली होत गेला तसतसं त्याने आपल्या अखत्यारित येणार्‍या सगळ्याच गोष्टी ताब्यात घेण्यास सुरुवात केली. या ताबेदारीच्या अनेक गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे स्त्रियांची ताबेदारीही होय. कारण तोपर्यंत स्त्रिया पुरुषांसाठी त्याच्यासारख्या हाडामांसाचा माणूस न राहता इतर वस्तुंसारख्याच उपभोगाची साधने झाल्या होत्या. या उपभोगाच्या साधनांवर आपला मालकीहक्क राहावा आणि तो तसाच सदोदित अबाधित राहावा या एका इच्छेत माणसाच्या ठायी असलेल्या क्रौर्याचे सुक्ष्म दर्शन घडते. बलात्कारासारख्या क्रूर घटनेची पाळेमुळे या बाईवरील मालकी हक्काच्या भावनेत आणि त्या भावना अबाधित राहाव्यात म्हणून जगण्यावागण्यात आणलेल्या क्रौर्यात आहे.

काळ जसजसा पुढे जात राहिला तसतसा माणूस भौतिक प्रगतीच्या वाटेवर चालू लागला. अनेक वैज्ञानिक शोधांच्या आधारावर माणूस आधुनिक युगाची वाट चालत राहिला. या वैज्ञानिक प्रगतीला समांतर अशा सामाजिक सुधारणांच्या वाटेवरही माणूस चालत राहिला. पण या सामाजिक सुधारणांचा वेग मात्र वैज्ञानिक प्रगतीच्या तुलनेत खूपच कमी होता. विज्ञान तंत्रज्ञान आणि त्याद्वारे साधलेल्या प्रगतीने माणसांना, ज्यात स्त्रियाही आल्या, मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य दिले. परंतु, ते स्वांतत्र्य उपभोगण्यासाठी म्हणून लागणारे जे जगण्यावागण्यातले स्वातंत्र्य हवे ते मात्र पुरूषसत्ताक समाजव्यवस्थेने आजही स्त्रियांना हवे तितके दिलेले नाही. त्यांनी स्त्रिया नेहमी आपल्या हुकूमाच्या ताबेदार कशा राहतील याकडे अधिक लक्ष पुरविले. मघाशी मी जो पुरुषाच्या स्त्रियांवरच्या मालकीहक्काचा उल्लेख केला, तो हक्क आजच्या आर्थिक स्वावलंबनाच्या काळातही पुरुष स्त्रियांवर गाजवू पाहतो. अशा परिस्थितीत एखादी धाडसी स्त्री या मालकीहक्काचा विरोध करू पाहते आणि नेमके तेच पुरुषाच्या ठायी असलेल्या क्रौर्याच्या ठिणगीला हवा दिल्यासारखे होते.

खरं तर माणसाने आता इतकी भौतिक प्रगती साधली आहे की त्याच्या बळावर तो संबंध विश्व काबीज करू पाहतो आहे. तो चंद्रावर पाय ठेवून आला. तो मंगळावर राहण्यासाठी पर्यायी जागेचा शोध घेण्यापर्यंत येऊन ठेपलाय. पण आपल्या आत असलेल्या आदिम क्रौर्याच्या, आदिम हिंसेच्या भावनांवर विजय प्राप्त करणे काही माणसाला अजून शक्य झालेलं दिसत नाही. आणि त्याचं कारण कुठलं असेल तर ते या लेखाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे त्याच्या ‘अ‍ॅनिमल’ असण्यात आहे. या प्राण्याला माणसाळविण्याचे अधिकाधिक प्रयत्न वेगवेगळ्या मानवी संस्कृतींनी केले. पण आजही त्या प्रयत्नांत त्यांना पुरते यश आल्याचे दिसत नाही. तसे ते आले असते तर बलात्कारासारख्या अतिहिंसक आणि क्रौर्याची परिसीमा गाठणार्‍या घटना अजूनही घडल्या ना. इथे माणसांची श्वापदी गुणसूत्रे ही मानवी चांगुलपणापेक्षा अधिक प्रभावी असल्याचे आणि ती आणखीनच घट्ट होत गेल्याचे दिसते आहे. स्त्री ही अंगाखाली घेण्याची केवळ एक उपभोग्य वस्तू आहे आणि तिने येनकेनप्रकारे या तिच्या पुुषांच्या सोयीच्या भूमिकेतून बाहेर येत कुठलाही विरोध केलाच तर तिला तसेच जोरजबरदस्तीने पुन्हा अंगाखाली घेण्यातच बलात्कारासारख्या घृणास्पद गोष्टीची पाळेमुळे आहेत.

बलात्काराच्या या घटना कशा टाळता येतील यादृष्टीने कुटुंब आणि समाज म्हणून आपण जे प्रयत्न करायला हवे आहेत ते म्हणावे तितके पुरेसे ठरले नाही आहेत. याचे कारण काय असावे? तर ते हे की कुटुंब काय किंवा समाज काय किंवा संस्कार काय…या सगळ्या मानवी सहजीवनाच्या प्रवासात माणसाने निर्माण केलेल्या व्यवस्था आहेत. अशा व्यवस्था ज्या माणूस नावाच्या प्राण्याला नियंत्रणात ठेवत त्याचा भौतिक आणि आध्यात्मिक विकास साधायला मदत करतील. या व्यवस्थांच्या अंगभूत उद्दिष्टांना हरताळ फासत ही व्यवस्था चालविणारी माणसेच जर आपल्या श्वापदी गुणसूत्रांवर मात करू शकत नसतील तर त्या समाजात बलात्कारासारख्या घटना सर्रास होत राहतील.

मूल्यव्यवस्थेचे शिक्षण, पुरुषाने बाईचा एक माणूस म्हणून आदर राखणे, परस्पर सौहार्दता, सामंजस्य, मानवी सहजीवनातील स्वातंत्र्य तसेच प्रत्येक स्त्रीपुरुषाचे माणूस म्हणून असलेले मूलभूत स्वातंत्र्य या गोष्टी नंतरच्या झाल्या. आधी प्रत्येक माणसाने वैयक्तिक पातळीवर आपल्यातील आदिम श्वापदी गुणसूत्रांना नीट समजून घेत, स्वत:वर अगदी वैयक्तिक पातळीवर एक संवेदनशील माणूस होण्याच्या दृष्टीने काम करत राहणे हा एक उपाय माझ्या अल्पमतीला जाणवतो. कारण माणूस संवेदनशील असेल तरच बलात्कारासारख्या हिंसक घटनांना आपोआपच पायबंद बसेल. अन्यथा पहिले पाढे पंचावन्न या न्यायाने बलात्कार होत राहतील आणि क्रौर्याचे मानवी जीवनातील अधिष्ठान अधिकाधिक घट्ट होत राहील.

-समीर दळवी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -