मोदी-हिटलर आणि शहा-गोबेल्स ,यात साम्य कसे…? गहन सवाल!

Mumbai
मोदी-हिटलर आणि शहा-गोबेल्स

हिटलर-गोबेल्स यांच्या प्रचार तंत्राचा वापर आणि गेल्या पाच वर्षांचा मोदी आणि शहा यांच्या कारभारात काय साम्य दिसते : प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे येथील स्वायत्त संस्थांवर आपली पकड ठेवायची आणि सत्य बाहेर येऊ द्यायचे नाही. मुख्य म्हणजे लोकशाहीत ज्या विचार स्वातंत्र्याला अनन्यसाधारण महत्व आहे, त्याचा गळा आवळायचा. रिझर्व्ह बँक असो, नीती आयोग असो, न्याय व्यवस्था असो, विद्यापीठ यंत्रणा असो की फिल्म इन्स्टिट्यूट असो या सर्वांमध्ये भारताच्या इतिहासात पहिल्यांदा हस्तक्षेप करण्यासाठी पावले उचलली गेली. मोदी-शहा यांना असे का करावेसे वाटले. कारण त्यांना आपला अजेंडा राबवायचा होता.

निवडणुकीचा ज्वर सार्‍या देशभर भरून उरला आहे. जळी स्थळी, काष्टी पाषाणी एकच सवाल नरेंद्र मोदी 2014 प्रमाणे सत्ता राखणार की गमावणार? बहुमत मिळत नाही हे पाहून सत्ताधारी तोडा फोडा आणि राज्य करा ही नीती वापरून सत्ता काबीज करणार का? तर दुसर्‍या बाजूला काँग्रेस पुन्हा सत्तेवर येणार की काँग्रेससह सर्व पक्षांचे मिळून मिलीजुली सरकार स्थापन होणार ? उत्तर फार कठीण आहे. एक गोष्ट मात्र नक्की आहे की आता 2014 सारखी मोदी लाट नाही की त्यात भाजपचा टिळा लावलेले दगड धोंडे निवडून यायला… पाच वर्षांपूर्वी दिलेली आश्वासने आणि वास्तव यातला फरक लोकांच्या समोर आला आहे. मोदींच्या भीतीची पर्वा न करता उभी असलेली काही प्रसार माध्यमे आणि त्याच्या जोडीला असलेला सोशल मीडिया यांनी सत्ताधार्‍यांच्या पाच वर्षांच्या जुमलेबाजीची पोलखोल केली आहे. सत्य आणि असत्य यातला फरक जनेतेसमोर ठेवला आहे. आणि आपल्या काळजावर हात ठेवून आणि लोकशाहीचे स्मरण करून पहिल्या दोन टप्प्यात जनतेने मतदान केले असेल, अशी आशा आहे. आता आणखी दोन टप्पे बाकी आहेत आणि एक सवाल आहे : मोदी आणि हिटलर, शहा आणि गोबेल्स यात साम्य कसे?

गेले एक दोन महिने मोदी आणि शहा यांच्या प्रचारावर बारीक लक्ष द्या- काय दिसते? एकच गोष्ट दोघेही वारंवार सांगत आहेत आणि ती आहे काँग्रेस घराण्याचा भ्रष्टाचारी कारभार. आता हे लोकांना माहीत नाही का? काँग्रेस घोटाळेबाज आहेत ते. म्हणून तर लोकांनी पाच वर्षांपूर्वी भाजपच्या हातात बहुमताने देशाची सूत्रे दिली. 1977 ला इंदिरा गांधींच्या आणीबाणीविरोधात जनतेने काँग्रेसला झाडूने साफ केले तसेच हाताला बाजूला सारून आशेचे कमळ फुलवले होते. पण, आज मागे वळून बघताना चित्र काय दिसते? रोजगार नाहीत, कधी नव्हती इतके कुशल आणि अकुशल लोक हाताला कामाविना बेकार आहेत. जीएसटी विषय चांगला असूनही घिसाडघाईने राबवण्याच्या निर्णयामुळे हजारो छोटे लघु उद्योग बंद पडले. संगणक क्षेत्रातील देशातील नामवंत उद्योजक अझीज प्रेमजी यांच्या विद्यापीठाच्या सर्व्हेनुसार 50 लाख लोकांना आपले रोजगार गमवावे लागले.

नोटाबंदीच्या एका रात्रीत घेतलेल्या निर्णयामुळे लाखो लोक काही चूक नसताना रस्त्यावर आले. शेकडो लोकांना आपले जीव गमवावे लागले. काळा पैसा संपवण्याच्या नादात येथील जनता संपली, त्याचे उत्तर आजपर्यंत मिळालेले नाही आणि नोटाबंदीमुळे आज देश काळा पैसामुक्त झाला का, तर तसे ही चित्र नाही. श्रीमंतांना काही फरक पडलेला नाही, उलट गरीब माणूस संपला. शेतकरी देशोधडीला लागला. ज्याला हे सहन झाले नाही, त्याने हातात विषाचा प्याला घेऊन आणि मोदी-शहा यांच्या नावाने उर बडवत हे जीवन संपवले… ‘आपलं महानगर’ने बातमीचा पाठलाग करताना एकट्या महाराष्ट्राचा हिशोब मांडताना राज्यात सर्वाधिक 14 हजार पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे भीषण वास्तव मांडले आणि आज हेच वास्तव विरोधी पक्ष जनतेसमोर नेत आहे.

देशातला काळा पैसा संपवण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय आणि बाहेरचा काळा पैसा आणून देशातील प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख जमा करण्याची घोषणा मोदींनी केली होती. आज काय चित्र आहे. कोणाच्या खात्यावर किती पैसे आले. खोटे बोलण्याला काही मर्यादा आहेत की नाही आणि आज वर तोंड करून शहा महाशय सांगतात की मोदी तसे म्हणालेच नव्हते. लोकांची पोटे खपाटीला गेली असतील, पण अजून मेंदू काम करतोय… लोक विसरलेली नाहीत. तीच गोष्ट मुद्रा कर्ज योजनेची लाखांच्या वर कर्ज देऊन बेरोजगारी संपवायची होती. किती लोकांना कर्ज मिळाली. 30-32 हजारपेक्षा हाती कर्ज आले नाही. गरीब माणूस साधे चहा आणि भजीचे दुकान उघडू शकत नाही.

लघु उद्योग तर दूर राहिले. उज्ज्वला योजनेने घरोघरी गॅस येतील आणि आया बहिणींच्या डोळ्यातील अश्रू थांबतील, असे चित्र रंगवले. आज काय वास्तव आहे की लाकडाच्या मोळ्या उचलत पाऊल थकून गेलंय आणि डोक्यावरचे ओझे जड तर झालेच, पण डोळ्याच्या खाचा झाल्यात… कवी आरती प्रभू म्हणतात तसे : दोन डोळे, दोन काचा आणि दोन खाचा, येथे प्रश्न येतो कुठे आसवांचा! मोदी आणि शहा यांच्या खोट्या आश्वासनांचा पाढा येथे वाचता येईल, पण या लेखाचा तो उद्देश नाही. लोकांना भाजपची असत्याची डोंगराएवढी गोष्ट आता समजून आली आहे. आपण फक्त एका काळ्या इतिहासाशी मोदी आणि शहा यांच्या कारभाराचे साम्य काय दिसते, यावर एक नजर टाकणार आहोत.

एखादी गोष्ट वारंवार सांगितली तर ती लोकांना सत्य वाटू लागते. त्यामुळे आपल्या मुद्याचा सतत प्रचार करावा आणि जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा लोकांमध्ये प्रचार करत असतो, तेव्हा ती गोष्ट सोपी असायला हवी. फक्त काही ठळक मुद्दे असायला हवेत. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ती गोष्ट सातत्याने पुन्हा पुन्हा सांगायला हवी. हे जर्मनीचा हुकुमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलरचं प्रचाराबाबतचे सूत्र होते, जे प्रत्यक्षात उतरवणारा सूत्रधार होता जोसेफ गोबेल्स. गोबेल्सची ओळख हिटलरचा एक विश्वासू सहकारी फक्त एवढीच नाही, तर तो एका प्रचारतंत्राचा जनक म्हणून गोबेल्सकडे पाहिले जाते. असे म्हटले जाते की याच ‘गोबेल्सनीती’मुळेच हिटलर सत्तेवर आला आणि सत्ता टिकवू शकला. आता गेल्या पाच वर्षांतील मोदी-शहा यांच्या कारभारावर एक नजर टाका. काय साम्य दिसते?

आपल्या ‘माइन कॅम्फ’ या आत्मचरित्रात हिटलरनं राष्ट्र निर्मितीसाठी प्रॉपगेंडा किंवा प्रचाराचे काय महत्त्व आहे, हे सांगितले आहे. 1934 साली तो जर्मनीचा हुकूमशहा बनला आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत तो त्या पदावर राहिला. त्याच्यावर अनेक संकटे आली, पण जर्मन लोकांचा त्याच्यावरील विश्वास कायम राहिला. जनतेच्या पाठिंब्याच्या बळावरच तो त्या पदावर कायम होता. ज्यूंवर होणारे अत्याचार, छळछावण्या आणि एकंदरच त्यांच्याविरुद्धचा हिटलरचा द्वेष उघड होता. मग हिटलरचे लष्कर त्यांच्यावर इतके अत्याचार करत असताना इतर जर्मन लोकांनी त्याची साथ का दिली किंवा त्याला विरोध का केला नाही? याचे कारण होते हिटलरने केलेला रीतसर प्रचार.

हिटलर-गोबेल्स यांच्या प्रचार तंत्राचा वापर आणि गेल्या पाच वर्षांचा मोदी आणि शहा यांच्या कारभारात काय साम्य दिसते : प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे येथील स्वायत्त संस्थांवर आपली पकड ठेवायची आणि सत्य बाहेर येऊ द्यायचे नाही. मुख्य म्हणजे लोकशाहीत ज्या विचार स्वातंत्र्याला अनन्यसाधारण महत्व आहे, त्याचा गळा आवळायचा. रिझर्व्ह बँक असो, नीती आयोग असो, न्याय व्यवस्था असो, विद्यापीठ यंत्रणा असो की फिल्म इन्स्टिट्यूट असो या सर्वांमध्ये भारताच्या इतिहासात पहिल्यांदा हस्तक्षेप करण्यासाठी पावले उचलली गेली. मोदी-शहा यांना असे का करावेसे वाटले. कारण त्यांना आपला अजेंडा राबवायचा होता. देशाच्या घटनेने स्वायत्त संस्था बनवून जे काही अधिकार बहाल केले होते, त्याच्यावर घाला घातला गेला… सत्ताधार्‍यांना इतकी कशाची घाई लागली होती.

यातून एकच स्पष्ट आहे की त्यांना सर्व अधिकार आपल्या हाती ठेवून देशात अघोषित हुकूमशाही राबवायची आहे. इतके करून आपल्याला भारतातील लोकांचा पाठिंबा आहे हे मोदी आणि शहा यांनी सातत्याने लोकांना आपल्या हाती असलेल्या माध्यमातून दाखवण्याचा आतापर्यंत प्रयत्न केला आहे. तेच हिटलर आणि गोबेल्स यांनी केले होते. लोकांचा नाझी पक्षाला पाठिंबा आहे, हे दर्शवण्यासाठी रोड शोज आणि मोठे इव्हेंट आयोजित केले जायचे. त्या वेळी नेत्यांची भाषणे व्हायची. देशात सर्वकाही कसे चांगले आहे, अशा प्रकारच्या भाषणांची उजळणी या ठिकाणी केली जायची. हिटलरच्या वाढदिवशीदेखील मोठे कार्यक्रम आयोजित केले जायचे.

1936 मध्ये ऑलिंपिकचे आयोजन करण्यात आले होते. जर्मन सरकार कसे यशस्वी आहे, हे दाखवण्याची आयती संधीच या कार्यक्रमातून गोबेल्सच्या हाती आली होती. त्याने तिचा पुरेपूर वापर केला आणि आर्यन वंश कसा शक्तिशाली आहे, हे देखील दाखवण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून केला गेला. कला आणि कलाकार दोन्हीवर सरकारचे नियंत्रण हवे, असे या प्रचार मंत्रालयाला वाटायचे. त्यामुळे आर्ट गॅलरींमधून 6,500 चित्रं काढण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याऐवजी आर्यन वंशाच्या वीर योद्ध्यांची, सैनिकांची चित्रं तयार करण्याला प्रोत्साहन दिलं जाऊ लागलं. जर्मन सैनिक तसंच जर्मन लष्कर किती शक्तिशाली आहे, हे दाखवणार्‍या कलाकारांना विशेष प्रोत्साहन दिले जायचे.

हिटलरला स्थापत्यकलेत रस होता. त्याला वाटायचं की आपण अशा वास्तूंची निर्मिती करावी, ज्यांतून जर्मन साम्राज्याची शक्ती, समृद्धी दिसून येईल. अल्बर्ट स्पिअर या आर्किटेक्टकडून नुरेमबर्ग येथे मैदान बनवून घेण्यात आलं होतं. इथे हिटलरच्या भव्य रॅलीज व्हायच्या.

प्रचारात वस्तुस्थिती सांगण्यापेक्षा भावनाप्रधान भाषेचा वापर केला जायचा. एखाद्या प्रश्नाचं अतिशय मोघम आणि सोपं उत्तर सादर केलं जायचं. विरोधक हे नेहमीच कसे चूक आहेत आणि त्यांनी वेळोवेळी कशा चुका केल्या, त्याची आठवण करून दिली जायची त्यामुळे आर्ट गॅलरीतून आपल्याला हवी तशी आणि हवी तितकी चित्रे काढून घेण्यात आली. त्या काळात नाझी विचार सोडून कोणत्याच विचाराला मान्यता नव्हती. अंदाजे 2,500 साहित्यिकांवर बंदी घालण्यात आली होती. नाझी विचारधारेला आव्हान देणारी पुस्तकं जाळून टाकली जात होती. ज्यू धर्माविषयी तसंच शांततावादी, समाजवादी आणि साम्यवादी विचारवंतांनी लिहिलेली पुस्तकं जाळून टाकली जायची. 1933 साली अंदाजे 20,000 पुस्तकं जाळण्यात आली होती. आदर्श साहित्य कसे असावे यासाठी एक पुस्तक उदाहरण म्हणून देण्यात आले होते. ते पुस्तक गोबेल्सने स्वतः लिहिलेलं होतं. ‘मायकल’ नावाची ती कादंबरी होती, आणि त्यासारखंच साहित्य निर्माण करावं, असं तो म्हणायचा. पार्टी प्रॉपगेंडासाठी चित्रपटांचा प्रभावी वापर केला जायचा. जर हलका फुलका मनोरंजन करणारा चित्रपट असेल तर त्याआधी पक्षाने तयार केलेल्या फिल्म्स दाखवल्या जायच्या. किंवा जर्मन लष्कराच्या शौर्याच्या कथा चित्रपटातून दाखवल्या जायच्या.

आपल्याकडे आता काय दिसते : मोदी सरकार विरोधात बोलायचे नाही. मग तो कलाकार असो की प्रसार माध्यमे. त्याच्यावर देशद्रोही नावाचा एक शिक्का मारून बाजूला सारायचे. देशात सरळ दोन गट पाडलेत. एक मोदी-शहा यांच्या कारभाराचे गोडवे गाणारा मोदीभक्त गट आणि दुसर्‍या बाजूला सत्तेला प्रश्न विचारणारा तट. या तटातील 600 कलाकार मोदी विरोधक ठरवलेत आणि आपण किती महान आहोत हे दाखवण्यासाठी 900 कलाकार मोदीभक्त असल्याचे दाखवून मोदींची कलाकारांबरोबरची छायाचित्रे प्रसारित करण्यात आली… मोदी यांच्या जीवनावरील चित्रपट काढण्यात आला. त्याआधी टॉयलेट असे चित्रपट काढून सरकारी योजनांचा प्रचार प्रसार केला गेला. हे सारे कशासाठी तर लोकांना कळायला की आपण किती महान आहोत. हिटलरसाठी गोबेल्स हेच तर करत होता.

जर्मनीत नाझी पक्ष आणि हिटलरशिवाय कुणीच सक्षम नेतृत्व नाही, हे देखील लोकांना वारंवार सांगितले जात होते. एखाद्या उपक्रमात अपयश आले तर त्याचं खापर ज्यू किंवा कम्युनिस्टांवर फोडलं जायचं. देशातल्या प्रत्येक प्रश्नाचा संबंध ज्यू लोकांशी जोडून त्यांच्यामुळे तो प्रश्न कसा अस्तित्वात आला, याचा प्रचार केला जायचा. स्वस्तिक, ध्वज, गणवेश यांसारख्या राष्ट्रीय प्रतीकांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा. विरोधी विचारांचा समूळ नाश करण्यासाठी सेन्सॉरचा वापर, भव्य इव्हेंटबाजी, भाषणबाजी आणि सातत्याने नव्या, सोप्या आणि सुटसुटीत घोषणांचा वापर यामुळे गोबेल्सचे प्रचारतंत्र यशस्वी ठरले.

हिटलरप्रती असलेल्या श्रद्धेमुळे गोबेल्स हिटलरचा अत्यंत विश्वासू बनला. 1944 ला दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी त्याला हिटलरनं युद्धमंत्री बनवले. जर्मनी युद्ध हरणार, हे समजल्यानंतरही गोबेल्सने हिटलरची साथ दिली. रशियाच्या फौजा जर्मनीत घुसल्यानंतर हिटलरने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी हिटलरने गोबेल्सला जर्मनीचा चान्सलर घोषित केले आणि नंतर हिटलरने आत्महत्या केली. चान्सलर झाल्यावर जर्मनीने शरणागती पत्करावी, असा आदेश गोबेल्सनेच दिला. एका दिवसासाठी चान्सलर झालेल्या गोबेल्सने 1 मे 1945 रोजी आत्महत्या केली.
गोबेल्सच्या मृत्यूला 73 वर्षं लोटली, पण ‘गोबेल्सनीती’ हा शब्दप्रयोग नेहमी ऐकायला मिळतो. एखादा राजकीय नेता खोटा प्रचार करताना दिसला तर त्याचे विरोधक म्हणतात की हा नेता गोबेल्सचं प्रचारतंत्र वापरतोय. कारण सोपं आहे आणि सिद्ध झालेलंही – एकच गोष्ट वारंवार सांगितल्याने असत्य देखील सत्य वाटू लागतं, आणि हेच गोबेल्सच्या नीतीचे सार होते.

हेच सार घेत 5 वर्षांत भारताचा कारभार चालवला गेला आणि त्याला विकासाचे नाव दिले गेले. आता लोकांनी ठरवायचे आहे की लोकशाही हवी की ठोकशाही…!

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here