बॉलीवूडच्या नायिकांचं वय किती ?

नायिका प्रधान सिनेमांच्या संख्येत वाढ झाल्यानंतरदेखील एखादी अभिनेत्री 15/20 वर्षे सलग प्रेक्षकांच्या मनावर ताबा का मिळवू शकत नाही? ऐन यशाच्या शिखरावर असतानाच अभिनेत्री कुठे गायब होतात, 4 सिनेमे करून एखाद्या पैशावाल्या प्रोड्युसर किंवा उद्योगपती बरोबर लग्न करून उर्वरित जीवन आनंदात जगणं हेच काहींचे ध्येय आहे का? की लग्न झाल्यावर आपल्याला लोक पाहणार नाहीत, या भीतीपोटी अनेक अभिनेत्री पुन्हा कमबॅक करत नाहीत...प्रश्न अनेक आहेत आणि याच उत्तर दडलंय पुन्हा इंडस्ट्रीत. मेकअपचे कितीही थर चढवले तरी वाढलेलं वय लपवता येतं नाही, तो नायक असो किंवा मग नायिका, परंतु नायिकांच्या बाबतीत बर्‍याच वेळा हे मान्य केलेलं दिसून येत नाही.

madhubala
अभिनेत्री मधुबाला

नायिका म्हटलं कि काय आठवतं ? सिनेमाच्या कथेत एक अशी स्त्री जिला गुंडे पकडून ठेवतात, अशी स्त्री जिला केवळ हिरोचा आधार असतो, डान्स करणारी, रडणारी आणि नेहमी हिरोच्या मागे उभी राहणारी, एकूणच काय तर सिनेमात ग्लॅमर असावं यासाठी जी बाई सिनेमात असते ती म्हणजे हिरोईन असा मोठा समज आपल्यामध्ये आजही आहे. ज्या सिनेमात अशी बाई नाही, एखादा आयटम साँग किंवा किसिंग सिन नाही, ते सिनेमे म्हणजे सिनेमेच नाहीत,अशी मानसिकता असणार्‍या देशात खरंच ती स्त्री सिनेमाची नायिका असते का? की केवळ शोभेची वस्तू म्हणून तिचा वापर केला जातो ? असे अनेक प्रश्न आहे. अशातच एकीकडे नायिका प्रधान सिनेमांची यादी वाढत जाते आहे, तर दुसरीकडे मात्र लोकप्रिय नायिकांच्या यादीत नावं आपोआप कमी होत जाताय. कला सादर करण्याचं कलाकारचं काही वय असतं का? कदाचित हो, म्हणजे एखादा कलाकार आयुष्यभर बालकलाकार राहू शकत नाही, अगदी तसंच एखादी स्त्री किंवा पुरुष कायमस्वरूपी तरुण राहू शकत नाही.

नायिकेचे तारुण्य गेले किंवा लग्न करून तिला मुलंबाळं झाली तर तिच्यातला लोकांचा इंटरेस्ट संपतो का? नायिका केवळ सुंदर आणि तरुणच हवी असते का? कदाचित म्हणूनच नायिका म्हातारी झाली की तिला काम मिळत नसावं, मग पुरुषांना वय झालं तरी भूमिका कशा मिळतात. माफ करा, मी इथे स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा मारत नाहीये, तर केवळ आपलं सत्य दाखवतोय जे समोर असतानादेखील आपण बघू शकलो नाही. एखादी हिरोईन येते 4/5 वर्षे तरुणांच्या गळ्यातला ताईत बनते, कुणाच्या स्वप्नांची राणी बनते आणि नंतर अचानक ती गायब होते. तिला सिनेमे मिळत नाही किंवा मग तिचं लग्न होतं. मग ती नायिका पुन्हा सिनेमाकडे येत नाही, आली तरी तिला तेवढा रिस्पॉन्स मिळत नाही. कारण लोकांनी त्या सुंदरीवर प्रेम केलेलं असतं, मग ती शोधते दुसरा मार्ग या ग्लॅमरमध्ये टिकून राहण्याच्या, कुठल्यातरी रिअलिटी शोचा जज बनून तिथेच आपलं अस्तित्व जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करते. बर्‍याच नायिकांच्या आत तर तेवढीदेखील हिंमत शिल्लक नसते म्हणून सुखाचा संसार निभावण्यातच त्यांना धन्यता वाटते. कधी काळी 15 वर्षांचं करियर असलेल्या अभिनेत्री आज 2/3 वर्षातच गायब कुठे होताय? त्यांना काम मिळत नाहीये की करत नाहीयेत? बॉलीवूडमध्ये अशा अभिनेत्रींच्या करियरचे नेमके वय तरी किती? अशाच प्रश्नांबद्दल चर्चा करुया.

भारतीय सिनेसृष्टीत आज अनेक बदल झाले आहेत. 2000 आधीच्या काळात आणि नंतरच्या काळात अशा दोन भागात जरी इंडस्ट्रीकडे पाहिले तरी या बदलांची व्याप्ती लक्षात येते. नायिका प्रधान सिनेमात झालेली वाढ असू देत किंवा सिनेमात नायिकेचं बदललेलं स्थान असो, कथानकाला आलेलं महत्व यामुळे आता नायिकेलादेखील तेच स्थान मिळतंय. याआधी ते नव्हतं असं नाही, पण सिनेमात अमिताभ-रेखाची जोडी असावी असे अट्टाहास आता फार पाहायला मिळत नाहीत. श्रीदेवी नंतर हिंदी सिनेसृष्टीत दुसरी फिमेल सुपरस्टार जन्माला आलीच नाही, हे सत्य आहे. पण कथेला महत्व आल्यानंतर, नायिका प्रधान सिनेमांच्या संख्येत वाढ झाल्यानंतरदेखील एखादी अभिनेत्री 15/20 वर्षे सलग प्रेक्षकांच्या मनावर ताबा का मिळवू शकत नाही? ऐन यशाच्या शिखरावर असतानाच अभिनेत्री कुठे गायब होतात, 4 सिनेमे करून एखाद्या पैशावाल्या प्रोड्युसर किंवा उद्योगपती बरोबर लग्न करून उर्वरित जीवन आनंदात जगणं हेच काहींचे ध्येय आहे का? की लग्न झाल्यावर आपल्याला लोक पाहणार नाहीत, या भीतीपोटी अनेक अभिनेत्री पुन्हा कमबॅक करत नाहीत…प्रश्न अनेक आहेत आणि याच उत्तर दडलंय पुन्हा इंडस्ट्रीत.

मेकअपचे कितीही थर चढवले तरी वाढलेलं वय लपवता येतं नाही, तो नायक असो किंवा मग नायिका, परंतु नायिकांच्या बाबतीत बर्‍याच वेळा हे मान्य केलेलं दिसून येत नाही. नायक वय झालं की म्हातार्‍याच्या भूमिका करायला तयार असतो, पण नायिकांमध्ये हे प्रमाण फार आढळून येत नाही. कदाचित त्यांना तसे रोल्स ऑफर होतदेखील नसावे, पण तरीही त्या तारुण्याच्या वयातून बाहेर पडायची इच्छा नसल्याने असे रोल्स स्वीकारले जात नाही. अजून एक कारण म्हणजे नायकाचं वय झालं की जसं त्याच्या वयाला साजेशी कथा लिहिली जाते, अगदी तसंच नायिकेच्या बाबतीत पाहायला मिळत नाही. म्हणून चांगली भूमिका मिळत नसल्यानेदेखील नायिका पुन्हा या इंडस्ट्रीत येऊ इच्छित नाहीत.

वैजयंतीमाला, मधुबाला, वहिदा रहमान, मुमताज, मीना कुमारी, आशा पारेख, शर्मिला टागोर, झीनत अमान, यांसारखी नावं भारतीय प्रेक्षकांना आजही लक्षात राहतात याच कारण काय? या सर्व अभिनेत्रींची कारकीर्द किमान 15 वर्षांची तरी होती. आता त्या काळात खूप जास्त ऑप्शन नसल्याने कदाचित यांना काम मिळत होतं. हे एकवेळ मान्यदेखील करू तरी पण 22 वर्षे 25 वर्षे सलग काम करणार्‍या अभिनेत्री नंतरच्या काळात का आढळत नाहीत ? अगदी सेकंड इनिंगबद्दल जरी विचार केला तरी अलीकडच्या काळातील अभिनेत्रींना तितकं यश मिळालं नाही. माधुरी दीक्षित, रेखा, जुही चावला, प्रीती झिंटा, रविना टंडन आणि ऐश्वर्या रायसारख्या अभिनेत्रींना आपल्या दुसर्‍या इनिंगमध्ये तितकं यश मिळालं नाही. एकंदरीत काय तर आताच्या काळात खूप सारे ऑप्शन्स उपलब्ध असल्याने, अभिनेत्रींना सलग इतकी वर्षे काम मिळत नाही.

काही अभिनेत्री अशाही आहेत ज्यांना दुसर्‍या इनिंगमध्येदेखील यश मिळालं, मॉम आणि इंग्लिश विंग्लिशसारख्या सिनेमातून श्रीदेवी पुन्हा एकदा चर्चेत आली होतीच, पण अकाली एक्सिटने तिचा प्रवास थांबला. बाकी राणी मुखर्जीने मर्दांनीच्या माध्यमातून प्रयत्न केलाय ज्याला यशदेखील मिळालंय. असिन, प्राची देसाई, डेझी शाह, जरीन खान यांसारख्या अनेक नायिका इंडस्ट्रीत आल्या आणि गायब झाल्या. कुणी एक सिनेमा केला तर कुणाला पुढे सिनेमेच मिळाले नाही. काहींची लग्न झाली तर काहींनी आधीच इंडस्ट्री सोडली, नायिका सिनेमाचा प्राण आहेत, आशयकेंद्री सिनेमात त्यांना महत्व आहे. जितकी कारकीर्द नायकाची तितकीच नायिकांची असायला हरकत नाही, तरीही एका सरकारच्या कारकिर्दीपेक्षाही छोटी कारकीर्द काही नायिकांना मिळाली, म्हणून आता बॉलिवूडच्या नायिकांच नेमकं वय किती ? असा प्रश्न सतावतो आहे.

-अनिकेत दिगंबर म्हस्के