घरफिचर्ससंताप, उद्वेग आणि आपण

संताप, उद्वेग आणि आपण

Subscribe

हैदराबादमध्ये डॉक्टर तरुणीवर झालेल्या सामूहिक अत्याचार, हत्येच्या नृशंस, अमानवी, चीड आणणार्‍या घटनेनंतर देशात संताप पसरला आहे. समाज माध्यमांवर दोषींना कठोरात कठोर आणि जलदगती न्यायालयात खटला चालवून तातडीने हा खटला निकालात काढण्याचीही मागणी होत आहे. आरोपींचा लिंगच्छेद करावा, जाहीर सभेत फाशी द्यावे, असा संतापही व्यक्त केला जात आहे. हा संताप समजून घ्यायला हवा. महिलांवरील अत्याचाराच्या घटना ही बाब देशात नवी नाही, लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, फसवणूक करून अत्याचार, कुटुंबातील सदस्याकडूनच अत्याचार, अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना, अशा बातम्या रोजच्या वर्तमानपत्रात असतात. यातील अत्याचाराच्या अनेक घटना या पोलीस दप्तरी दाखलही होत नाहीत. त्यामुळे त्यांची निश्चित आकडेवारी आणि संख्या ही झालेल्या घटनांपेक्षा कितीतरी मोठी असू शकते. अत्याचार झालेल्या महिलेला पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन दूषित असतो, त्यासाठी शील या शब्दाचा अर्थ हा शारीरिक अत्याचाराशी जोडल्यानंतर अशा घटनेनंतर महिलेला शीलभ्रष्ट करण्याचा जाहीर अधिकार पुरुषप्रधान संस्कृतीतील पुरुषांना आपसूकच प्राप्त होतो. त्यामुळे अत्याचारानंतर अनेक महिला स्वतःला संपवण्याचा आत्मघातकी मार्ग पत्करतात. महिलांना माणूस असल्याचा अधिकार पुरुषप्रधान समाजाकडून संस्कृतीच्या नावावर नाकारला जातो. अशा संस्कृतीत स्त्रीला देवत्वाचा दर्जा बहाल केल्यावर तिच्या माणूसपणाच्या अधिकारांचे आपसूकच दमन होते. स्त्रीला देवत्व नकोच असते, केवळ माणूस म्हणून निर्धोकपणे जगता यावे, इतकीच अपेक्षा तिला असते. आपल्या देशात स्त्री आणि पुरुष यातील दरी मोठी असते. स्त्री भ्रूणहत्येसाठी आपल्याला लिंगनिदान संस्थांवर नियंत्रण आणणारे कायदे करावे लागतात. सतीबंदी, केशवपन आणि विधवा पुनर्विवाहासाठी चळवळी कराव्या लागतात. मात्र, विधुरांसाठी असा कुठलाही विधिनियम इतिहासात नसतो. पुरुषी अहंकार जन्मापासूनच पुरुषांमध्ये विविध कारणांनी पेरला जातो, त्यानंतर तो वेळोवेळी पोसला आणि वाढवला जातो.‘तो मुलगा आहे, तो काहीही करू शकतो, पण तू मुलगी आहेस’ असं वाक्य मुलींना जन्मापासूनच ऐकवलं जातं. भारतालाही माता म्हणणार्‍या आपल्या देशात महिलांवरील अत्याचार ही सामान्य बाब असते, मासिक धर्म हा तिचा विटाळ असतो, असा आपला पुरुषी दांभिकपणा आपल्या अंगवळणी पडलेला असतो. इथल्या जमिनीला कौतुकाने धरणीमाय म्हटलं जातं, महिलांना माता म्हणून मखरात बसवताना आपण त्यांचे माणूसपण सोयीस्करपणे काढून घेतो. पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुषांना महिलांच्या माणूसपणापेक्षा त्यांच्या बाईपणात अधिक रस असतो. महिलांसाठी असलेल्या शासन, प्रशासनातील राखीव जागांवर महिलांची प्रतिनिधी म्हणून महिलांनी काम करावे, अशी अपेक्षा समतेच्या तत्वात असते, परंतु राजकीय क्षेत्रात एखाद्या ठिकाणी महिलांसाठीचे राखीव आरक्षण पडल्यावर त्या जागी आपल्या घरातील महिलेला निवडणुकीत बाहुलीसारखे उभे करून सत्ता पुरुषांकडून ताब्यात घेतल्या गेल्याची अनेक उदाहरणे आपल्या राजकीय व्यवस्थेत नवीन नसतात. मर्यादा पुरुषोत्तम म्हणून प्रभू रामचंद्राचे उदात्तीकरण करणारा आपला समुदाय सीतेच्या अग्निपरीक्षेसाठी कायमच आग्रही असतो. ही पुरुषी दांभिकता आपल्या इथल्या पुरुषप्रधान संस्कृतीच्या रोमारोमात खोलवर भिनलेली असते. आपल्याकडे अत्याचारांनाही जाती आणि धर्माच्या दृष्टीकोनातून पाहिले जाते. त्यामुळेच एखाद्या महिलेवर अत्याचार झाल्यावर त्या महिलेच्या जात समूहाचे मोर्चे, आंदोलने होतात. केवळ स्त्री किंवा महिला म्हणून महिलांकडून मोर्चा काढला जात नाही. त्यामुळे भारतीय महिलांचा स्त्रीवाद हा गटवादाने पोखरलेला असल्याने तो कायमच संकुचित आणि कमकुवत असाच ठरतो. महिलांवर अत्याचार करणार्‍या नराधमांचे भर चौकात हातपाय तोडायला हवेत, अशी उत्स्फूर्तपणे आलेली उद्वीग्नता आपली असते, ती योग्यही असते. मात्र, एखाद्या पाशवी घटनेनंतरच ही उद्वीग्नता जागी होते, मैदानात मेणबत्त्या पेटवल्या जातात, त्यानंतर सवयीप्रमाणे विसरले जाते. अशा परिस्थितीत राज्यातील सत्तांतराचे नाट्य माध्यमांसाठी इतर कुठल्याही घटनांपेक्षा महत्त्वाचे असते, त्यानंतर छोट्या पडद्याच्या किंवा वर्तमानपत्राच्या उरलेल्या रकान्याच्या जागेत हैदराबादमधील घटनेची चर्चा केली जाते. असे सर्व सुरू असताना यातील आरोपींना समाज माध्यमांवर त्यांच्या ‘आईबहिणीं’चा उद्धार करणार्‍याच शिव्या दिल्या जातात. बलात्काराच्या शिक्षेला आखाती देशांमध्ये ‘जशास तसे’ शिक्षा असल्याचे दाखले दिले जातात. ते त्यावेळी योग्यही असतात. मात्र, अशा देशांमध्ये महिलांची स्थिती, त्यांचे माणूस म्हणून अधिकार या विषयी आपण मूग गिळलेला असतो. केवळ गाडी चालवली, नकाब ओढला नाही, म्हणून ज्या देशात महिलांवर कठोरात कठोर भीतीदायक निर्बंध आणले जातात. शाळेत गेलेल्या मलाला युसूफझाईवर जीवघेणा हल्ला केला जातो, अशा देशांमधील महिला अत्याचारांच्या कठोर कायद्यांचे कोडकौतुक करण्याची स्पर्धा सुरू होते. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी उपाय सांगितले जातात. अत्याचारी मानसिकता मोकाट सोडून महिलांना संस्कृती, धर्म किंवा कायद्याच्या पिंजर्‍यात बंद करण्याची तयारी केली जाते. आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीला खतपाणी घालणारी ही साळसूद भूमिका असते. आखाती देशात, समाजात आणि समुदायात महिलांच्या सुरक्षेचे सर्वाधिकार पुरुषांनी आपल्या ताब्यात घेतलेले असतात, त्या समुदायांकडून महिलांच्या सन्मानाची अपेक्षा करणे बनाव करण्यासारखे असते. महिला अत्याचाराच्या घटनांना संस्कृतीवरील घाला, र्‍हास अशा दृष्टीनेही पाहिले जाते. संस्कृती रक्षणाच्या कर्तव्याची जबाबदारी इथल्या समाजाकडून कायमच महिलांवर टाकली जाते. करवाचौथ, शील, नैतिकता, वटपौर्णिमेसारख्या सणांमधून पुरुषी अहंकारासोबतच महिलांच्या सोशिकपणाचेही मोठे कौतुक होते. कौटुंबिक आणि सामाजिक कर्तव्याची जबाबदारी एकट्या महिलांवर टाकून स्वतः मोकळे राहून पुरुष त्यांना संस्कृतीच्या साखळदंडात बांधून ठेवण्यात धन्यता मानतात. महिलांनी कायम सहन करावे, त्यांनी कुटुंब, समाज आणि संस्कृतीला समजून घ्यावे, हे त्यांचे कर्तव्य बनवून अशी पुुरुषप्रधान संस्कृती महिलांचा बळी घेण्यासाठी तयार असते. घर कुटुंब आणि समाजाकडून महिलांना सोशिकपणाचे आणि महान संस्कृतीचे डोस देण्यापेक्षा पुरुषांना खरे तर संस्कृती आणि विकृतीमधील फरक शिकवण्याची गरज आहे. लहानपणापासून मुलींना, भातुकली, बाहुली आणि मुलांना बंदूक खेळण्यासाठी दिली जाते, मुलगी झाल्यावर बर्फी वाटली जाते तर मुलगा झाल्यावर लाडू, हा फरक खूप आधीपासून कौटुंबिक पातळीवरच सुरू केला जातो. ज्या देशात स्त्री भ्रूणहत्या ही नेहमीची बाब असते. महिला अत्याचारानंतर विशिष्ट समाजांचीच गटवादी आंदोलने केली जातात. हुंडा मागणे, घेणे हा अधिकार मानला जातो. तीन तलाकच्या मुद्यावर प्रश्न उपस्थित केले जातात, त्या देशात बलात्कार ही नेहमीच घडणारी सामान्य घटना असते. त्याचे पाशवी परिणाम हैदराबादसारख्या एखाद्या घटनेनंतर समोर आल्यावर निर्माण झालेला संताप आणि उद्वेगही त्यामुळेच सामान्यच असतो. कालांतराने तोही विसरला जाण्याचा धोका असतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -