मूत्राशयाच्या कॅन्सरची लक्षणे वेळीच ओळखा

मूत्राबरोबर रक्तप्रवृत्ती होणे किंवा रक्ताच्या गाठी पडणे, वारंवार मूत्रप्रवृत्ती होणे, मूत्रप्रवृत्तीच्या वेळी वेदना होणे, पोटात किंवा पाठीत दुखणे, भूक मंदावणे, वजन कमी होणे अशी लक्षणे चिकित्सेने बरी होत नसल्यास व वारंवार उद्भवत असल्यास मूत्राशयाच्या कॅन्सरच्या निदानासाठी मूत्रपरीक्षण, सोनोग्राफी, सी.टी.स्कॅन, सिस्टोस्कोपी, बायॉप्सी या तपासण्या वैद्यकीय सल्ल्याने करणे योग्य ठरते.

Mumbai

मागील लेखात आपण मस्तिष्काचा ट्युमर (ब्रेन ट्युमर), मुख व गलभागाचे कॅन्सर, थायरॉईड कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर, फुप्फुसाचा कॅन्सर तसेच पचनसंस्थेशी निगडित अवयवांच्या कॅन्सरची लक्षणे व तत्संबंधी तपासण्या यांची माहिती घेतली. आजच्या लेखात आपण अन्य कॅन्सर प्रकारांची लक्षणे व त्या संबंधीच्या तपासण्या याबाबत जाणून घेणार आहोत. मलप्रवृत्तीच्या बदलत्या सवयी, मलप्रवृत्ती सोललेल्या केळ्यासारखी बांधून न होणे, मलप्रवृत्ती वारंवार व अतिशय पातळ होणे, बद्धकोष्ठता, मलासह रक्त पडणे, काळ्या रंगाची मलप्रवृत्ती होणे, पोटात जडपणा- वातसंचिती, पोटात दुखणे, पोटात गाठ लागणे, भूक मंदावणे, वजन घटणे, अशक्तपणा, पांडुता ही लक्षणे अधिक दिवस दिसल्यास व वैद्यकीय उपचारांनीही बरी न झाल्यास आतड्याच्या किंवा गुदभागाच्या कॅन्सरची संभावना असू शकते. अशावेळी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने गुदपरीक्षण, मलाची तपासणी, बेरियम एनिमा, कोलोनोस्कोपी, सिगमॉयडोस्कोपी, बायॉप्सी, सी.टी. स्कॅन, एम.आर.आय, पेट स्कॅन व सी.इ.ए. ही रक्ताची ट्यूमर मार्कर तपासणी यापैकी योग्य त्या तपासण्या करणे हितकर ठरते.

मूत्रातून रक्तप्रवृत्ती होणे, डाव्या किंवा उजव्या कुशीत जडपणा जाणवणे, पायांवर सूज येणे, भूक मंदावणे, वजन कमी होणे, ताप येणे ही लक्षणे दिसल्यास मूत्रपिंडाच्या कॅन्सरची संभावना असू शकते. निदान निश्चित करण्यासाठी मूत्रतपासणी, रक्त तपासणी, सी.टी.स्कॅन, एम.आर.आय, पेट स्कॅन, रिनल स्कॅन, बोन स्कॅन व बायॉप्सी या तपासण्या केल्या जातात.मूत्राबरोबर रक्तप्रवृत्ती होणे किंवा रक्ताच्या गाठी पडणे, वारंवार मूत्रप्रवृत्ती होणे, मूत्रप्रवृत्तीच्या वेळी वेदना होणे, पोटात किंवा पाठीत दुखणे, भूक मंदावणे, वजन कमी होणे अशी लक्षणे चिकित्सेने बरी होत नसल्यास व वारंवार उद्भवत असल्यास मूत्राशयाच्या कॅन्सरच्या निदानासाठी मूत्रपरीक्षण, सोनोग्राफी, सी.टी. स्कॅन, सिस्टोस्कोपी, बायॉप्सी या तपासण्या वैद्यकीय सल्ल्याने करणे योग्य ठरते.

स्त्रियांमध्ये दोन मासिक पाळीच्यामध्ये अथवा मासिक पाळी निवृत्तीनंतर योनीगत रक्तस्त्राव होणे, पोटात दुखणे, अशक्तपणा, वजन कमी होणे ही लक्षणे स्त्रीबीजकोशाच्या कॅन्सरची (ओव्हरियन कॅन्सर) किंवा गर्भाशयाच्या कॅन्सरची असू शकतात. अशी लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ल्याने ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफी, सी.टी. स्कॅन, पेट स्कॅन, लॅपॅरोस्कोपी, बायॉप्सी, सी.ए. १२५ ही रक्त तपासणी करून कॅन्सरचे निदान निश्चित केले जाते. अशाच स्वरूपाची लक्षणे गर्भाशयमुख कॅन्सर (सरव्हायकल कॅन्सर) मध्येही दिसतात. योनीचे प्रत्यक्ष परीक्षण, पॅप स्मियर, कॉलपोस्कोपी, गर्भाशयमुखाची बायॉप्सी, पोटाची सोनोग्राफी, सी.टी.स्कॅन, एम.आर.आय., पेटस्कॅन या तपासण्यांच्या सहाय्याने गर्भाशयमुखाच्या कॅन्सरचे निदान व व्याप्ती निश्चित होते.

साधारणत: वयाच्या साठीनंतर बर्‍याचशा पुरुषांत प्रोस्टेट ग्रंथी आकाराने वाढू लागते व त्यामुळे मूत्रप्रवृत्ती वारंवार व थांबून थांबून होणे, मूत्रप्रवृत्तीच्या वेळी वेदना होणे, मूत्रप्रवृत्ती झाल्यानंतरही समाधान न होणे, ओटीपोट दुखणे किंवा फुगणे व क्वचित प्रसंगी मूत्रातून रक्तप्रवृत्ती होणे ही लक्षणे दिसू लागतात. बरेचवेळा ही लक्षणे बी.पी.एच.ची (बिनाईन प्रोस्टेट हायपरट्रॉफी) ही असू शकतात. अशावेळी प्रोस्टेट कॅन्सरचे निदान निश्चित करण्यासाठी गुदमार्गातून बोटाने पौरुष ग्रंथीचे परीक्षण करणे (डी.आर.इ.-डिजीटल रेक्टल एक्झॅमिनेशन), सोनोग्राफी, सी.टी. स्कॅन, बायॉप्सी, पी.एस.ए. ट्यूमर मार्कर, बोनस्कॅन यापैकी योग्य त्या तपासण्या केल्या जातात.

पुरूषांमध्ये वृषणाचा आकार वाढणे, तेथे जडपणा किंवा गाठ निर्माण होणे, तेथे वेदना किंवा जलसंचिती होणे, पोटात विशेषत: अधोदरात मंदस्वरुपी वेदना होणे ही वृषण ग्रंथीच्या कॅन्सरची (टेस्टिक्युलर कॅन्सर) लक्षणे असून सोनोग्राफी, सी.टी स्कॅन, बायॅाप्सी, ए.एफ्.पी व एच.सी.जी या रक्तातील तपासण्यांच्या सहाय्याने टेस्टिक्युलर कॅन्सरचे निदान निश्चित होते.रक्ताच्या कॅन्सरमध्ये ताप येणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, चक्कर येणे, दम लागणे, अशक्तपणा, नाक व हिरड्यांतून रक्तप्रवृत्ती, वारंवार जंतूसंसर्ग होणे ही लक्षणे सामान्यत: दिसून येतात. रक्ततपासणी, बोन मॅरो अ‍ॅस्पिरेशन, बायॉप्सी, फ्लोसायटोमेट्री, सायटोजिनेटिक्स, फिश टेस्ट, लिंफ नोड बायॉप्सी, मस्तिष्क जलाचे परीक्षण यासारख्या तपासण्यांच्या मदतीने रक्ताच्या कॅन्सरचे व त्याच्या विशिष्ट प्रकाराचे निदान निश्चित करता येते.

हॉजकिंग्स लिंफोमा व नॉन हॉजकिंग्स लिंफोमा या कॅन्सर प्रकारांत शरीरातील मन्या (मान), कक्षा (काख), जंघा (जांघ) या स्थानातील तसेच उदरपोकळीतील लसिका ग्रंथीची वाढ होणे, ताप येणे, वजन कमी होणे, थकवा ही लक्षणे दिसतात. रुग्णाचे प्रत्यक्ष परीक्षण, बायॉप्सी, बोन मॅरो अ‍ॅस्पिरेशन बायॉप्सी, सी.टी.स्कॅन, पेट स्कॅन या सारख्या तपासण्यांच्या सहाय्याने निदान निश्चिती करता येते.भारतासारख्या देशात तुलनेने कमी प्रमाणात आढळणार्‍या त्वचेच्या कॅन्सरमध्ये (मेलॅनोमा) शरीरावर नवीन तीळ निर्माण होत रहाणे, त्यांच्या आकार-स्वरुप व रंगात सतत बदल होत रहाणे, लाल-काळपट-निळ्या रंगाचे, स्त्राव किंवा रक्त स्त्रवणारे, खाज-वेदना असलेले, आकाराने मोठे असे मस, लवकर भरून न येणारे त्वचेवरील व्रण ही लक्षणे दिसून येतात. सामान्यत: वैद्यकीय प्रत्यक्ष परीक्षण, त्वचेची बायॉप्सी, लसिका ग्रंथीची बायॉप्सी यांच्या सहाय्याने त्वचेच्या कॅन्सरचे निदान निश्चित होते.अशा रीतीने विविध तपासण्यांच्या सहाय्याने कॅन्सरची निदान निश्चिती करता येते.

वैद्य स. प्र. सरदेशमुख
ए. व्ही. पी., पीएच्. डी. (आयुर्वेद)
संचालक, इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रिटमेंट अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, वाघोली, पुणे