अधीर माध्यमे, बधीर जनता

माध्यमसत्ता आपल्याकडे अधिक प्रबळ झाली; पण तिने आपली विश्वासार्हताही गमावली. मागच्या काही वर्षात तर सोशल मीडियाचा जबरदस्त विळखा आपल्याला पडला आहे. प्रत्येकाला आपल्या अभिव्यक्तीचं सेन्सॉरहीन नवं दालन उपलब्ध झालं आहे. यातूनच ‘फॉरवर्डेड’ गोष्टी सार्वत्रिक झाल्या. व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर किंवा तत्सम माध्यमांनी संपूर्ण जग व्यापले गेले. या माध्यमाने उरलीसुरली नैतिकताही संपवून टाकली आणि एका आभासी, अनोळखी जगात आपण प्रवेश केला. ‘ट्रोलिंग’ हा वर्तमानाचा स्वभाव बनला. युट्युबसारखे स्वतंत्र चॅनल सहज सुरु करणे शक्य झाल्यामुळे स्थानिक प्रश्न, कला आणि कितीतरी गोष्टी यामुळे जगासमोर येवू शकल्या हे खरे; पण त्याचबरोबर गल्लोगल्ली, गावोगावी सुमार वार्ताहरांचे पेवही फुटले.

social media
कांदा निर्यातबंदीविरोधात "सोशल" आंदोलन, राज्य कांदा उत्पादक संघटनेचा निर्धार

सध्याचा काळ हा माणसाला संभ्रमित करणारा आणि त्याच्या महत्त्वाकांक्षांना चाप लावणारा आहे. या काळात माणसाचे प्राधान्यक्रम बदलले. असुरक्षितता ही या काळाची ओळख बनत चालली आहे. काळाचा आणि काळाने आकाराला आणलेल्या विविध धारणांचा मोठा दबाव सध्या समाजावर आहे. हे दबाव प्रस्थापित करणारी माध्यमसत्ता आपल्याला वेढून आहे. निकोप जीवनव्यवहार आता जवळपास संपुष्टात आला आहे. संभ्रम, संशय आणि भीती ही त्रिमिती आपल्या जगण्याचं अनिवार्य भाग बनू पाहत आहे. या काळाचे सर्वात मोठे वैशिष्ठ्य म्हणजे बातम्यांचा आणि अफवांचा वेगाने होणारा संसर्ग. हा संसर्ग कोविड विषाणूपेक्षाही अधिक वेगाने होत आहे. कधीकाळी आकाशवाणी, दूरदर्शन आणि वर्तमानपत्रे ही माध्यमे जगाची खबरबात समजून घेण्याची विश्वासार्ह साधने होती.

तथापि आपल्या एकूणच भौतिक पर्यावरणात वेगाने बदल घडत गेले आणि माहिती तंत्रज्ञानाचे एक नवे युग अवतरले. यातूनच मागच्या साधारण दशक दीडदशकात न्यूज चॅनेल्सची अधिसत्ता अधिक प्रबळ झाली. ‘बातम्यांचे स्वतंत्र चॅनेल्स’ ही संकल्पना खूप वेगाने जगभरात रुजली. विविध भाषा, प्रदेशासह अनेक चॅनेल्सचा उदय झाला. त्यामुळे बिनमहत्त्वाच्या अनेक बातम्यांना जगभर प्रसिद्धी मिळाली. 24 बाय 7 हे बातम्यांचे नवे सूत्र तयार झाले. आणि दिवसरात्र बातम्यांचा सुळसुळाट सुरू झाला. विशेष म्हणजे प्रेक्षकांनीही या घटनेला मोठा प्रतिसाद दिला. सुरुवातीच्या काळात असलेल्या पाचदहा वाहिन्यांची संख्या आता शेकड्याने वाढली. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि प्रादेशिक अशा कितीतरी वाहिन्यांनी आपले जगणे व्यापून टाकले. टीआरपीची स्पर्धात्मक आणि निरर्थक चढाओढ सुरु झाली. कथित घटनांची शहानिशा न करताच प्रत्येक बातमी ‘ब्रेकिंग न्यूज’ आणि ‘एक्सक्लुझिव’ करण्याचा अट्टाहास सुरु झाला. स्वत:कडे क्रेडिट घेण्याचा हा प्रकार निव्वळ हिडीस या प्रकारातला आहे.

माध्यमसत्ता आपल्याकडे अधिक प्रबळ झाली; पण तिने आपली विश्वासार्हताही गमावली. मागच्या काही वर्षात तर सोशल मीडियाचा जबरदस्त विळखा आपल्याला पडला आहे. प्रत्येकाला आपल्या अभिव्यक्तीचं सेन्सॉरहीन नवं दालन उपलब्ध झालं आहे. यातूनच ‘फॉरवर्डेड’ गोष्टी सार्वत्रिक झाल्या. व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर किंवा तत्सम माध्यमांनी संपूर्ण जग व्यापले गेले. या माध्यमाने उरलीसुरली नैतिकताही संपवून टाकली आणि एका आभासी, अनोळखी जगात आपण प्रवेश केला. ‘ट्रोलिंग’ हा वर्तमानाचा स्वभाव बनला. युट्युबसारखे स्वतंत्र चॅनल सहज सुरु करणे शक्य झाल्यामुळे स्थानिक प्रश्न, कला आणि कितीतरी गोष्टी यामुळे जगासमोर येवू शकल्या हे खरे; पण त्याचबरोबर गल्लोगल्ली, गावोगावी सुमार वार्ताहरांचे पेवही फुटले. कोणत्याही घटनेला तिखटमीठ लावून चवदार बनवणे या गोष्टीला प्राधान्य मिळत चालल्यामुळे आणि ‘सबसे तेज’ वगैरेची स्पर्धात्मक भानगड सुरु झाल्यामुळे बातम्यांचा वेग आणि आवाका वाढला. आता हे सगळे टाळणे केवळ अशक्य झाले आहे.

सध्या तर बातम्यांचे जग कोरोनामय झाले आहे. आणि ते स्वाभाविकही आहे. कारण कोरोनाने आपल्या समाजजीवनाला संपूर्णपणे प्रभावित केले आहे. त्याच्या दृश्यअदृश्य परिणामातून मुक्त होण्याची आपली धडपड सुरु आहे. या काळात इलेक्ट्रॉनिक मीडियाचा आततायीपणा अधिक ठळक झाला आहे. बातमीला काही मूल्य असतात हे विसरलेली ही माध्यमसत्ता सध्या मात्र उबग आणत आहे. सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या, विकास दुबेचे एन्काऊंटर किंवा अमिताभ आणि त्यांच्या कुटुंबियांना झालेला कोरोना संसर्ग असो की, सलमान खानचे शेतकरी बनणे असो. यासह कितीतरी निरर्थक बातम्यांनी आपल्या टीव्हीचा पडदा व्यापलेला आहे. मानवी जगण्याचे असंख्य प्रश्न भोवतालात असताना अशा ‘रचित’ बातम्यांची नाट्यमय अभिव्यक्ती अलिप्तपणे पाहण्याशिवाय आपल्याकडे कोणताच पर्याय उपलब्ध नाही. घटनांचा आणि बातम्यांचा इतका मोठा अपभ्रंश यापूर्वी कधी झाला नव्हता. तद्दन खोटी आणि तरीही अत्यंत ‘ठाम’ विधानं नोंदवणारी ही माध्यमे विरोधाभासांनी भरलेली आहेत.

अमिताभला आणि त्याच्या कुटुंबियांना कोरोना झाला ही राष्ट्रीय बातमी नक्कीच आहे; कारण तो या देशातला सर्वात मोठा सेलिब्रिटी आहे. पण म्हणून त्याच्या बेडपर्यंतचा आणि त्याच्या प्रात:विधीचा दैनदिन वृत्तांत देण्याची खरंच गरज असते काय? तो किती वाजता झोपला? किती वाजता उठला? किंवा त्याने किती वाजता ‘अमुक तमुक’ केले? हे सगळे उबग आणणारे आहे. बरं ! सांगायलाही हरकत नाही, पण मग किमान सर्वांच्या सांगण्यात किमान एकसूत्रता तरी असावी ना? तर तेही दिसत नाही. सलमान खानने त्याच्या फार्महाऊसवर शेती केली किंवा त्याने शेतात पिकांची ‘लावणी’ वगैरे केली, हे सांगितले तरी काही बिघडत नाही, पण ‘सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज’ म्हणून ही बातमी दिवसभर वाजवत राहणे आणि त्यांचे सेलिब्रिटीपण प्रेक्षकांवर थोपवणे हा प्रकार खूप उथळ आहे. अशा सुमार बातम्यात अधिक स्वारस्य दाखवण्याचा प्रकार संपादकाची वैचारिक दिवाळखोरीच दाखवणारा आहे. सुशांतची आत्महत्या दुर्दैवी नक्कीच आहे. पण म्हणून महिनाभर त्या बातम्यांचा रतीब घालायचा काय? पडद्यावरचा ‘चित्रकोश’ सतत हलवत ठेवण्याच्या हट्टापायी कोणत्याही थरापर्यंत प्रेक्षकाला घेऊन जाणारी ही मानसिकता घातक तर आहेच, पण पत्रकारितेच्या विशिष्ट मूल्यांना मारकही आहे. ‘आम्हीच हे सर्वात आधी सांगितले’ ही अनाठायी घाई कशासाठी? अ-नैतिक बातम्यांचा हा ओंगळपणा आपल्याला काही भान देणारा आहे का?

अर्थात बातमी हा काही भावोत्कट विषय नसला तरी बातम्यांचीसुद्धा एक नैतिक संहिता असते. ती किमान पाळली जावी, अशी अपेक्षा करण्यात काही गैर नाही. दोनेक महिन्यांपूर्वी एका सामाजिक कार्यकर्ता असलेल्या स्त्रीच्या निधनाची बातमी देण्यापूर्वी एका वृत्तनिवेदिकेने ‘आता एक सकारात्मक बातमी’ असा उल्लेख केला होता. अनवधानाने अशी चूक होऊ शकते हे गृहीत धरले तरी अशा चुका वारंवार घडतांना आपण पाहत आहोत. म्हणजे आपल्याकडून काही गंभीर चूक झालीय याची जाणीवही त्यांना नसते. इलेक्ट्रॉनिक मीडिया हे समाज बदलाचे सर्वात प्रभावी साधन आहे. परंतु वैचारिक समज असलेले आणि कोणतेच सांस्कृतिक भान नसलेले ‘लोक’ तिथे असले की असे घडणे स्वाभाविक आहे. लेखन आणि भाषेतले दोष हा तर चर्चेचा स्वतंत्र मुद्दा आहे. याविषयी कोणतेच गांभीर्य दिसून येत नाही.

सोशल मीडियाने तर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पुढे दहा पावलं टाकली आहेत. अफवांनी ग्रासलेला कुतूहलजनक समाज या माध्यमामुळे अधिक उपद्रवी आणि प्रतिक्रियावादी बनला आहे. व्हिडीओ किंवा विविध स्वरूपाच्या हजारो पोस्ट क्षणात इकडून तिकडे फिरत असतात. फुकट सल्ल्याच्या अतात्त्विक उमाळ्यांनी तर सध्या आपले जगणे पूर्णपणे व्यापले आहे. थोडक्यात काय तर आजच्या बातमी व्यवहारापासून स्वत:ला दूर ठेवणे कठीण झाले आहे. तर्कशुद्ध विचार करणार्‍या माणसांनाही या काळाने गोंधळात टाकले आहे. अशा संभ्रमयुक्त काळात स्वतःला सर्वार्थानं ‘जपणं’ आवश्यक आहे.

-र्डॉ. पी. विठ्ठल

-(लेखक नांदेड विद्यापीठाच्या भाषा संकुलात प्राध्यापक असून नामवंत कवी आहेत.)