घरफिचर्सआयाबायांनो रात्र वैर्‍याची आहे, सांभाळा!

आयाबायांनो रात्र वैर्‍याची आहे, सांभाळा!

Subscribe

भारतात महिला संपूर्ण कुटुंबाची काळजी अग्रक्रमाने घेताना दिसतात. पण स्वत:च्या तब्येतीची मात्र हेळसांड करत आहेत. कोरोनाबद्दलची भीती मनात असल्याने अनेकजणी कोरोना चाचणीही लवकर करत नाहीत. परिणामी आजार बळावून त्या मृत्युमुखी पडत आहेत. तसेच कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक रोगप्रतिकारकशक्ती ही योग्य आहारातून येते. पण भारतातील अनेक महिलांना पोटभर अन्नही मिळत नसल्याने अनेकजणींमध्ये कोरोनाशी लढण्याची शक्तीच नसल्याने त्यांचा मृत्यू होत आहे. तर यातही वयस्क महिलांना कोरोनाची लागण होताना दिसत आहे. डॉक्टरी सल्ला न घेता काहीजणी घरातच स्वत:वर प्राथमिक उपचार घेतात. यामुळे तब्येत खालावल्यावर त्यांच्यावर वेळेअभावी तातडीने उपचार करणे डॉक्टरांना कठीण जाते. त्यातच त्या दगावत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून जगाच्या मानगुटीवर बसलेला कोरोना व्हायरस केव्हा जाईल माहीत नाहीये, पण त्याच्याशी संबंधित बातम्यांमधून रोज काही ना काही नवीन माहिती समोर येत आहे. जगभरात सुरू असलेल्या कोरोना लसीवरील संशोधनाची माहिती, वाढणारा-कमी होणारा मृत्यूदर, लॉकडाऊन आणि बेकारी या बातम्यांच्या काथ्याकुटीत एका बातमीने मात्र भारतातीलच नाही तर जगातील संशोधकांची पुन्हा झोप उडवली आहे. विशेष म्हणजे ही बातमी भारतातील महिलांसंबंधी आहे. जगभरात कोरोना पुरुषांना टार्गेट करत असतानाच भारतात मात्र आता महिलांवर त्याची वक्रदृष्टी पडली आहे. यास कारणीभूत कोरोना नसून महिलांचा निष्काळजीपणा असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. ही भारतातील प्रत्येक घरासाठी चिंतेची बाब आहे.

चीनमध्ये कोरोनाच्या संसर्गादरम्यान एक सर्वेक्षण करण्यात आले होते. यात पुरुषांच्या तुलनेत महिलांना कोरोनाचा धोका कमी असल्याचे समोर आले होते. हे सर्वेक्षण कोरोनाग्रस्त व कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पुरुष आणि महिलांच्या आकडेवारीवर करण्यात आले होते. त्यानंतर ज्या ज्या देशांमध्ये कोरोनाने हाहा:कार उडवला त्या देशांमध्येही कोरोनामुळे मृत्युमुखी पडणार्‍यांच्या संख्येत महिलांची संख्या कमी व पुरुषांची अधिक असल्याचे समोर आले. यामागे वैद्यकीय कारण असल्याचेही समोर आले. विशिष्ट प्रकारच्या हॉर्मोन्समुळे महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत अधिक रोगप्रतिकारशक्ती असते जेणेकरून ती कोरोनाला हरवू शकत असल्याचा दावा संशोधकांनी केला. पण काही दिवसांपूर्वी भारताच्या व अमेरिकेच्या संशोधकांनी वेगळेच निदान केलंय. नवी दिल्लीतील इन्स्टिट्यूट ऑफ ग्रोथ या संस्थेचे संशोधक अभिषेक कुमार यांनी समूह संसर्गावर आधारित डेटावर अभ्यास केला असता इतर देशांच्या तुलनेत भारतात महिलांनाही मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.

- Advertisement -

या मार्च ते 20 मे या दरम्यानच्या काळात भारतात 3.2 टक्के महिलांचा कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला, तर याच काळात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पुरुषांची टक्केवारी 2.1 टक्के एवढी होती. यात 5-19 वर्षे वयाच्या बालिका व तरुणींचा समावेश असून 40-50 वर्षे वयोगटातील महिलाही आहेत. एकीकडे जगात कोरोनामुळे मृत्यू पावणार्‍यांमध्ये महिलांचे प्रमाण कमी असतानाच भारतात मात्र हे प्रमाण वाढत असल्याने संशोधकांनी चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या संशोधक साबरा क्लेन यांनीही भारतातील महिलांचा मृत्यूदर गोंधळात टाकणारा असल्याचे म्हटले आहे. हॉवर्ड युनिव्हर्सिटीत लोकसंख्या व आरोग्य विषयाचे प्राध्यापक असलेल्या एस. व्ही. सु्ब्रमण्यम यांनीदेखील या मृत्यूदराचे विश्लेषण केले आहे.

या सर्व संशोधक व प्राध्यापकांच्या संशोधनानुसार, भारतात महिला संपूर्ण कुटुंबाची काळजी अग्रक्रमाने घेताना दिसतात. पण स्वत:च्या तब्येतीची मात्र हेळसांड करत आहेत. कोरोनाबद्दलची भीती मनात असल्याने अनेकजणी कोरोना चाचणीही लवकर करत नाहीत. परिणामी आजार बळावून त्या मृत्यूमुखी पडत आहेत. तसेच कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक रोगप्रतिकारकशक्ती ही योग्य आहारातून येते. पण भारतातील अनेक महिलांना पोटभर अन्नही मिळत नसल्याने अनेकजणींमध्ये कोरोनाशी लढण्याची शक्तीच नसल्याने त्यांचा मृत्यू होत आहे, तर यातही वयस्क महिलांना कोरोनाची लागण होताना दिसत आहे. डॉक्टरी सल्ला न घेता काहीजणी घरातच स्वत:वर प्राथमिक उपचार घेतात. यामुळे तब्येत खालावल्यावर त्यांच्यावर वेळेअभावी तातडीने उपचार करणे डॉक्टरांना कठीण जाते. त्यातच त्या दगावत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर भारतातील अनेक घरात स्त्री पुरुष भेद अजूनही कायम असल्याने महिलांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केले जाताना दिसत असल्याचे व ही गंभीर बाब असल्याचे मत वेल्होर येथील क्रिस्टीयन मेडिकल कॉलेजमधील व्हायरोलॉजी विभागाचे माजी प्राध्यापक टी. जेकब जॉन यांनी व्यक्त केले आहे. या सर्व कारणांबरोबरच अस्वच्छता हे देखील भारतीय महिलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमुख कारण आहे.

- Advertisement -

विशेषत: झोपडपट्टीसारख्या भागात वैयक्तिक स्वच्छता ठेवणे एकवेळेस जमू शकते, पण परिसर स्वच्छता हा गंभीर प्रश्न असून तो सार्वजनिकरित्या सोडवला जाणे गरजेचे आहे. यामुळे महिलांनी कुटुंबाबरोबरच स्वत:ची काळजी घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे. कोरोना हा साधारण सर्दी खोकला वाटत असला तरी तो जीवघेणा ठरू शकतो. यामुळे भारतातीलच नाही तर जगातील प्रत्येक महिलेपुढे आज कुटुंबाबरोबरच स्वत:चीही काळजी घेण्याचे दुहेरी आव्हान आहे. त्यास सामोरे जाण्यासाठी शस्त्र नाही तर योग्य आहार, योग्य शारीरिक स्वच्छता, सकस आहाराबरोबरच सकारात्मक दृष्टिकोन अंगिकारावा लागणार आहे. कारण आजच्या आधुनिक काळात भारतातील कुटुंब व्यवस्था ही पुरुषांच्या हाती कमी आणि महिलेच्या हातात अधिक आहे. घरातील मुख्य पुरुषाप्रमाणेच स्त्रीदेखील त्या कुटुंबाचा भक्कम आधार आहे. यातील एकही जण जरी ढासळला तर अख्ख घरच जमीनदोस्त होणार आहे. यामुळे स्वत:बरोबरच कुटुंबासाठी प्रत्येकीने काळजी घ्यायलाच हवी. कारण ही काळरात्र वैर्‍याच्या रूपात वावरणार्‍या कोरोनाची आहे.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -