घरफिचर्सबोधीवृक्षाच्या सावलीत

बोधीवृक्षाच्या सावलीत

Subscribe

अलिकडच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या मानवमुक्तीच्या कामाविषयी अनेक गैरसमज पसरवण्याचे प्रकार होत आहेत. बाबासाहेबांच्या विचारांची मोडतोड करून आंबेडकरी चळवळीला संबंधितांना नक्षल आणि माओवादाकडे झुकवण्यामागचे हे एक कारण असू शकते. बाबासाहेबांच्या विचारांमध्ये भेसळ करून त्यातून आपले वैयक्तिक हेतू साध्य करण्याचे प्रयत्न अशा तथाकथित चळवळवाद्यांकडून सुरू आहेत. या प्रकाराला डॉ. आंबेडकरांचेच नाव देऊन वाढवण्याचे प्रयत्न होत आहेत, ही जास्त धोक्याची बाब आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आज असते तर अमुक एका पद्धतीचे शोषण, अन्याय झाले नसते, असे संबंधितांकडून सांगितले जाते. मात्र, हे सांगताना बाबासाहेब आज नाहीत, मात्र आम्ही आहोत, ही बाब अशीच ठळक रेषेत अधोरेखित केली जाते. बाबासाहेबांच्या चळवळीबाबत नकारात्मक विचार करताना त्यात जास्तीत जास्त निराशावाद कसा जोपासला जाईल, देशातील कायदा आणि राज्य घटनेवरचा विश्वास उडण्यासाठी पोषक वातावरणनिर्मिती करण्याची पुरेपुर आणि जाणीवपूर्वक काळजी काही गटांकडून घेतली जात आहे. त्यातूनच माओवादी, नक्षलवादी, दहशतवादी विचारसरणीला किंवा हिंसेला प्रोत्साहन दिले जाण्याचा प्रयत्न व्हायला नको. वर्तमान परिस्थितीची गरज भासवून हिंसक क्रांतीचे समर्थन करत बाबासाहेबांनी सांगितलेल्या बुद्धांच्या सर्वसमावेशक नैसर्गिक समतेच्या विचारांची शकले पाडण्याचे काम त्यांचेच नाव घेऊन केले जात असेल तर प्रज्ञा, शील, करुणेवर आधारीत बाबासाहेबांच्या विवेकवादी चळवळीसमोर आव्हान उभे राहिले आहे.

बाबासाहेब कधीच संपलेले नसतात.. तो सर्व प्रकारच्या शोषणाला संपवणारा विचार आहे, बुद्धांच्या अनित्यतावादाच्या सिद्धांतानुसार बाबासाहेबांचा देह चैत्यभूमीवर निसर्गात विलीन झाला. मात्र, त्यांचे विचार त्यांच्या असंख्य पुस्तकांतून, लेखनातून, भारतीय संविधानाच्या माध्यमातून आजही अस्तित्वात आहेत. त्यामुळे बाबासाहेब आज असते तर…हा नकारात्मक विचार घातक ठरणारा आहे. त्यातून नक्षल, माओ, दहशत, धर्म किंवा अन्य कुठल्याही विषारी हिंसक वादाचे समर्थन होणार नाही, यासाठी चळवळीच्या शिलेदारांनी दक्ष राहायला हवे.

- Advertisement -

बाबासाहेब कायम आपल्यातच आहेत. त्यांच्या विचारांचे विश्लेषण व्हायला हवे, मग अखिल मानवतावादाच्या भूमिकेतून ते जर टिकात्मकही असेल तरी हरकत नाही. मात्र, त्याचा तथ्य आणि सत्य या तत्त्वावर प्रतिवाद करण्याची तयारी आंबेडकरांच्या चळवळीतील अनुयायांनी ठेवायला हवी. त्यासाठी बाबासाहेबांच्या समग्र लेखनाचा अभ्यास वाढवणे ही सगळ्यांचीच गरज बनली आहे. या विचारांच्या आंदोलनातून मानवी समतेचे धम्मातील सत्यच समोर येण्यासाठी पूरक स्थितीच निर्माण होईल.

परंतु, बाबासाहेबांच्या चळवळीचे नाव घेऊन संबंधितांनी जात, धर्म, वर्ग, लिंग, अलगतावाद आणि आर्थिक फरकातील विभाजनातील कारणाच्या कुठल्याही गटवादी सिद्धांताचा पुरस्कार करताना किंवा मत मांडताना बाबासाहेबांनी सांगितलेल्या बुद्धांच्या सर्वसमावेशक मानवी मूल्यांना धक्का लावता कामा नये. जगातला कुठलाही तात्त्विक वाद, इतिहास, स्वातंत्र्य, हक्काधिकारांची चळवळ आणि हिंसक, अहिंसक क्रांतीचा विचार करताना तो डॉ. आंबेडकरांच्या विचारांनी दाखवलेल्या मार्गावर जाणार्‍या बुद्धांच्या शिकवणीतील कसोटीवरच पडताळून पाहावा, त्यातला खरेखोटेपणा तिथल्या तिथे सिद्ध होईल. निदान समग्र समाजबदलाचे क्रांतीकारी स्वप्न पहाणार्‍या चळवळीशी संबंधितांनी तरी हा मार्ग सोडता कामा नये.

- Advertisement -

बाबासाहेब आज नाहीत त्यामुळे त्यांचा मार्ग न्यायपूर्ण व्यवस्था निर्माण करण्यासाठी सद्यस्थितीत पुरेसा नाही, त्या काळाच्या तुलनेत आजच्या सामाजिक किंवा आर्थिक स्थितीत मोठा बदल झाला आहे. असा केला गेलेला विचार आत्मघात आणि विनाशाच्या मार्गावर नेणारा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचा विचार कुठेही निघून गेलेला नाही, किंवा तो जुनाही झालेला नाही, कारण तो सत्य आणि तथ्यावर आधारीत आहे. त्याला धम्माच्या मध्यममार्गाचे अधिष्ठान आहे. तो मूळ मानवाच्या हिताचा कल्याणाचा विचार आहे. ज्याची सुरुवात मंगलकारक, मध्य मंगलकारक आणि अंत्यही मंगलकारक असाच आहे. गरज आहे ती बाबासाहेबांच्या असंख्य पुस्तकांच्या पानातून हा विचार आत्मसात करण्याची.

एकीकडे शांती आणि अहिंसेच्या मार्गाने जाणार्‍यांना अण्वस्त्र सज्ज युद्धसंकल्पनांची भीती दाखवली जात आहे. एकूणच जग टच्च फुगलेल्या फुग्यासारखे स्फोटक स्थितीत असल्याचे सांगून बुद्ध डावलून हिंसेचे समर्थन केले जात आहे. शस्त्रसज्जता किंवा आत्मरक्षा ही हिंसेची आवश्यकता असू शकते, विश्वाला शांतीचा संदेश देणार्‍या बुद्धांनाही कौशल्यपूर्ण शस्त्रकला अवगत होतीच. मात्र, त्याच्या वस्तुनिष्ठ आवश्यतेबाबत सद्सद्विवेकाचा मार्ग म्हणूनच धम्माचे प्रयोजन करण्यात आले. एखाद्या घटनेची हिंसा, सैन्यबळ किंवा शस्त्रकला आवश्यकता असू शकते मात्र ती एकूणच मानवी जगण्याची गरज किंवा जीवनाचा पाया होता कामा नये. त्यामुळे मानव पशूतुल्य बनून जाईल. अशी धम्माची भूमिका आहे. त्यामुळेच बुद्धांची जगातील ओळख ही त्यांच्या शांतीचा संदेश देणार्‍या धम्मामुळे आहे. त्यांच्या क्षत्रिय कुळ किंवा शस्त्रकौशल्य सज्जतेमुळे नाही, हे आंबेडकरी चळवळीला माओवाद, नक्षलवाद किंवा हिंसक चळवळीचा पर्याय देणार्‍या संबंधितांनी ध्यानात घ्यावे. अंगुलीमालाचे प्रवर्तन बुद्धांनी याच मानवी जीवनाचे सत्य आणि अहिंसेच्या बळावर केले होते. युद्धकलेच्या बळावर नव्हे.

त्यामुळेच सर्व प्रकारच्या शोषणाचा, अन्यायाचा प्रतिकार करताना अन्यायाला पूरक अशा भविष्यातील स्थितीचे बीज बाबासाहेबांनी रक्तविहिन क्रांती केलेल्या इथल्या मातीत जाणता-अजाणता आपल्या हातून रोवले जात नाही ना, याची सद्सद्विवेकबुद्धीचा वापर करून डोळसपणे काळजी घेतली गेली पाहिजे. कुठल्याही प्रकारच्या हिंसेंच्या क्रांतीचा विचार पेरणार्‍या कारवायांच्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक असलेल्या मानवमुक्तीच्या चळवळीवरील ही जबाबदारी आणखीनच वाढली आहे.

-संजय सोनवणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -