घरफिचर्सभारत भाग्यविधाता!

भारत भाग्यविधाता!

Subscribe

प्रचंड लोकसंख्येचा देश असूनही भारतात अजून करोनाला बेताल मुसंडी मारता आलेली नाही आणि मृत्युमुखी पडलेल्यांची संख्याही नगण्य आहे. साधनांचा तुटवडा किंवा सुविधांची मारामार असतानाही भारत या संकटातून सावरला आहे. कारण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन केलेली कारवाई भारताच्या पथ्यावर पडली आहे आणि त्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनेही भारताचे गुणगान केले आहे. योग्यवेळीच नव्हेतर नेमक्या वेळी लॉकडाऊनचा निर्णय अमलात आणण्याचा धोका पुढारलेल्या देशांना घेता आला नाही, पण लोकसंख्येचा प्रचंड पसारा असूनही भारतात लॉकडाऊन हाच आजच्या काळातला निर्णायक उपाय असल्याचेच सिद्ध केलेले आहे.

करोनाने आपले हातपाय संपूर्ण जगात चांगलेच फैलावले आहेत. संपूर्ण जग या करोनाविरोधात लढा देत आहे. अशा परिस्थितीत करोनाच्या युद्धाचा निकाल काय लागणार, याची चिंता आजतरी संपूर्ण जगाला सतावत आहे. युद्ध म्हटले की, काहीजण धारातीर्थ पडतात. त्यांच्या बलिदानातून इतरांना लढण्याची प्रेरणा मिळते. आज भारतासह जगभरात करोनाने काही हजार लोकांचे बळी घेतले आहेत. या बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, त्यांचे बलिदान वाया जाणार नाही. कारण करोनाविरोधाचा लढा अजून तीव्र करण्यात आला आहे.

डॉक्टर, पोलीस, पॅरामेडिकल स्टाफ आणि लॉकडाऊनदरम्यान आपले जगणे सुसह्य होण्यासाठी जे-जे म्हणून झडत आहेत, त्यांच्या परिश्रमांना फळ लाभण्यासाठी आज प्रत्येकाने या लढ्यात काहीतरी योगदान देणे गरजेचे आहे. ते योगदान हे काहीही न करता घरात बसून देता येऊ शकते. फक्त घरात बसले तरी ते पुरेसे आहे. तितकीच सरकारची आणि करोनाविरोधात लढणार्‍यांची तुमच्या-आमच्यासारख्या सर्वसामान्यांकडून अपेक्षा आहे. तितके केले तरी हे युद्ध आपण जिंकणार आहोत. अर्थात हे युद्ध जिंकल्यावर जग कसे असेल, याची चिंता आज प्रत्येकाला सतावत आहे.

- Advertisement -

दुसर्‍या महायुद्धानंतर जग असेच बदलले होते. महायुद्धाचा शेवट झाल्यावर जे काही करारमदार मोठ्या विजेत्या देशांमध्ये झाले, त्यातून संयुक्त राष्ट्रसंघाचा जन्म झाला. नव्या जगातील रचनेत ब्रिटन वा फ़्रान्स अशा देशांना आपली साम्राज्ये सोडून द्यावी लागली. त्यामुळे अनेक नव्या राष्ट्रांची निर्मिती झाली. हे देश अर्थातच कमकुवत होते. त्यामुळे या नव्या देशांना कोणत्या ना कोणत्या तरी बड्या देशांच्या आश्रयाला जाऊन उभे रहावे लागले. त्यांच्या तालावर नाचणे भाग पडले. त्यांना राष्ट्रसंघाचे सदस्य करून घेण्यात आले, पण त्यांना जागतिक राजकारणात कुठलाही अधिकार देण्यात आला नाही. महाशक्ती वा पुढारलेले देश होते, त्यांच्याच कलाने जग चालत होते. तिथल्या राजकीय संकल्पना व वैचारिक तात्विक भूमिका उर्वरित जगावर राष्ट्रसंघाच्या माध्यमातून लादल्या जात होत्या. पुढे त्यांना संस्थात्मक व कायद्याचे रूप देण्यासाठी विविध जागतिक करार झाले आणि त्यातून आणखी अनेक आंतरराष्ट्रीय संस्था संघटना अस्तित्वात आल्या.

कुठलेही युद्धक्षेत्र हे व्यवहारी पातळीवर सलग चाललेले अराजक असते. त्यात आपल्या बाजूचे वा समोरच्या बाजूचे अराजक असो, दोन्हीवर नियंत्रण मिळवू शकतो, तोच ते युद्ध जिंकत असतो. आपल्याला त्या पद्धतीने करोनाच्या संकटाला सामोरा जाणारा कोणी जागतिक नेता आज दिसतो आहे काय? दुसरे महायुद्ध संपल्यावर अस्तित्वात आलेला अमेरिका हा महाशक्ती देश आहे आणि मागल्या आठ दशकात त्याने जगाला नेतृत्वही दिलेले आहे. कुठल्या देशातली समस्या असो किंवा दोनतीन देशातले वादविवाद असोत, अमेरिकेने त्यात हस्तक्षेप केला आहे किंवा त्यांना मदतही केलेली आहे. आरंभी सोवियत युनियनशी अमेरिकेची स्पर्धा चालायची. पुढल्या काळात मुक्त अर्थव्यवस्था आली आणि जागतिकीकरणाने जग एकत्र आणले गेले. त्यानंतर सोवियत साम्राज्य ढासळले आणि अमेरिका एकमुखी जागतिक नेता ठरला. चीन त्याला आव्हान देण्याइतका संपन्न देश झालेला आहे, पण अजून त्याला जगाला नेतृत्व देण्याची दृष्टी लाभलेली नाही. अशा काळात करोनाने घातलेला घाव मानव जातीच्या जिव्हारी बसला आहे. त्यातून सावरायचे कसे ही मोठी चिंता होऊन बसली आहे. पुढारलेले श्रीमंत पाश्चात्य देश अगतिक झालेत, रुग्णशय्येवर पडलेले आहेत.

- Advertisement -

प्रचंड लोकसंख्येचा देश असूनही भारतात अजून करोनाला बेताल मुसंडी मारता आलेली नाही आणि मृत्युमुखी पडलेल्यांची संख्याही नगण्य आहे. साधनांचा तुटवडा किंवा सुविधांची मारामार असतानाही भारत या संकटातून सावरला आहे. कारण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन केलेली कारवाई भारताच्या पथ्यावर पडली आहे आणि त्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनेही भारताचे गुणगान केले आहे. योग्यवेळीच नव्हेतर नेमक्या वेळी लॉकडाऊनचा निर्णय अमलात आणण्याचा धोका पुढारलेल्या देशांना घेता आला नाही, पण लोकसंख्येचा प्रचंड पसारा असूनही भारतात लॉकडाऊन हाच आजच्या काळातला निर्णायक उपाय असल्याचेच सिद्ध केलेले आहे. त्याचे कौतुक व अनुकरण सुरू झाले आहेच. अमेरिकेसारखा महाशक्ती देश भारताने उपयोगी औषधे पाठवण्यास मान्यता दिली म्हणून जाहीरपणे आभार मानतो आहे. ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी तर रामायणाचा हवाला देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना संजिवनी बुट्टी देणारा संकटमोचन हनुमान ठरवलेले आहे.

थोडक्यात करोनाचा पुढल्या काळात पराभव होऊन मानवजात त्यातून सावरून उभी राहील यात शंकाच नाही, पण तेव्हाचे जग कालच्या जगासारखेच असणार नाही. त्याचा चेहरामोहरा पूर्णत: बदललेला असेल. त्याचे नेतृत्व करणारे अनेकजण बदलून गेलेले असतील. त्या नेतृत्वाचे स्वरूपही आजच्यापेक्षा बदललेले असेल. श्रीमंत वा शस्त्रसज्ज असलेले देश वा त्यांच्या बळाचा वापर करून पुढाकार घेणारे नेतृत्व मागे पडलेले असेल. मानवी जगाला संकटातून वाचवणारा व मदतीचा हात निर्भेळ मनाने देणारा समाज वा नेता, जगाचे नेतृत्व करायला पुढे आलेला असेल. जगाचे नेतृत्व कसे हवे त्याची आज कठोर परीक्षा चालू आहे आणि त्यात ब्राझील अमेरिकेने मत दिलेले आहे. जपान, इस्रायल आधीच भारताचे समर्थक झालेले आहेत, पण करोना विरुद्धच्या युद्धात जगभरच्या देशांना भारताने योग्य उदाहरण घालून दिलेले आहे.

अर्थव्यवस्था, उद्योग वा व्यापारापेक्षाही माणूस आधी जगवला पाहिजे आणि तो जगवला तर नवी अर्थव्यवस्था उभारता येईल, हा नव्या जगासाठीचा साक्षात्कार आहे. चीन असो वा अमेरिका वा पाश्चात्य देश असोत; त्यांना माणूस व अर्थकारण यातून योग्य निर्णय घेता आले नाहीत किंवा समतोल राखता आलेला नाही. त्याचे दुष्परिणाम सर्वांना भोगावे लागत असताना कोट्यवधी लोकांना जगवण्याचा भारताने घेतलेला वसा, करोना नंतरच्या जगासाठी उद्धाराचा नवा मार्ग असणार आहे. तो जगाची राजकीय भौगोलिक आर्थिक रचना बदलून टाकणार आहे.

करोनाचा धक्का संपल्यावर नव्याने जग उभारण्याची हिंमत वा इच्छाशक्तीही अनेक देश गमावून बसले आहेत. त्या नव्या जगाचे मानवाचे किंवा सदस्य देशांचे प्रतिनिधित्व करणारे नाहीत. म्हणून त्यांच्या अशा आकस्मिक निर्वाणाचे दु:खही करण्याचे कारण नाही. त्याला त्यांचा नैसर्गिक मृत्यू म्हणायलाही हरकत नाही. कारण करोनानंतरच्या जगात अनेक जगातिक संस्थांना स्थान नसेल वा त्यांचा उपयोगही नसेल. नव्या जगाची रचना नवे लोक, नेतृत्वाची नवी पिढी करणार आहे आणि त्यात कालबाह्य झालेल्या महाशक्ती वगैरे देशांना स्थान असू शकणार नाही. वास्तवात जगाचे नेतृत्व करू शकतील व जगभरच्या लोकसंख्येला ज्यांचा आधार वाटेल, असे नेतृत्व करोना नंतर उदयास येणार आहे आणि त्यातून जगाची नवी रचना होणार आहे.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -